पदन्यास
पदन्यास
विजेच्या वेगाने लयकारी करणारी तिची पावलं, पूर्ण प्रेक्षागृहात घुमलेला घुंगरांचा लयबद्ध आवाज आणि त्याला पूरक असणारी देहबोली.. प्रेक्षक इतके मंत्रमुग्ध झाले होते की दाद द्यायचं पण भान उरलं नव्हतं.
आजच्या या बेभान नृत्याविष्काराचं रहस्य फक्त दोघांना माहिती होतं. तिला स्वतःला आणि समोरच्याच रांगेत बसलेल्या, तिला ज्या प्रसंगी मानसिक आधाराची नितांत गरज होती त्याच प्रसंगी तिला सोडून गेलेल्या तिच्या एकेकाळच्या प्रियकराला.
ती ग्रीनरुममध्ये आली आणि तिने बाकीच्या सरंजामाबरोबर शांतपणे जयपूर फूट.. कृत्रिम पायपण उतरवला.
