Radhika Joshi

Others

3  

Radhika Joshi

Others

स्वतःसाठी जगताना

स्वतःसाठी जगताना

3 mins
183


कितीदा आठवण करुन द्यायची स्वतःलाच स्वतःच्या स्वप्नांची!

कितीदा पटवून द्यायचं स्वतःला, की ही माझी आवड, ही माझी इच्छा!

'हा काय म्हणेल? हिला हे आवडेल? त्यांना हे रुचेल?' असाच विचार करत जगताना कुठेतरी स्वतःसाठी जगायचं कित्येकदा राहूनच जातं.

कितीही आधुनिक विचारांची, स्वतंत्र, कर्तृत्ववान स्त्री असली तरी अनेक प्रकारची नाती निभावताना तिची तारांबळ उडते. स्वतःच्या इच्छांना, विचारांना मुरड घालावी लागते. मग बहुतांशी बायका प्राप्त परिस्थिती स्विकारतात. आदर्श मुलगी,

पत्नी, सून, आई, बहीण इत्यादी भूमिका बजावण्याच्या नादात स्वतःची ओळख हळूहळू विसरली जाते. भलेही काही स्त्रिया ऑफिसमध्ये उच्चपदावर कार्यरत असतील, पण घरी आल्यावर आपल्या कर्तृत्वाची झूल

गुंडाळूनच घराशी एकरुप होतात.

आपल्या कुटुंबातील लोकांबरोबर मायेचं, प्रेमाचं नातं घट्ट करण्यासाठी, त्यांच्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी कित्येक वर्षं खर्ची पडतात. मग त्या स्त्रीची साधारण पन्नाशी जवळ आली की तिला जाणवतं, 'अरे, माझ्या आवडीच्या कितीतरी गोष्टी करायच्या राहूनच गेल्या की.'

अर्थात, आता हे चित्र खूपच बदललं आहे. अगदी शाळा, कॉलेजमधल्या मुलींनाही आत्मभान असलेलं बघून सुखद आश्चर्य वाटतं.

मुळात 'स्वतःसाठी जगणं' म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या धुडकावून लावून, सगळी नाती तोडून टाकून, मनाला येईल तसं बेछूट वागणं अभिप्रेत नाहीच आहे. सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडून आपल्या आवडीची छोटीशी गोष्ट तरी आवर्जून करणं आणि ती करताना कुठलीही अपराधीपणाची भावना मनात न बाळगणं हेच तर आहे स्वतःसाठी जगणं.

अभियांत्रिकीची पदवी असूनही, मुलं लहान असताना, त्यांच्या संगोपनासाठी जेव्हा पूर्णवेळ गृहिणीपदाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली होती तेव्हा बऱ्याच लोकांनी, 'माझा निर्णय कसा चुकीचा आहे' हे मला पटवून देण्याचा प्रयत्न केला. 'तुझं स्वतःचं काही आयुष्य रहाणार नाही.'असं काही मैत्रिणींनी सांगितलं.

केवळ जॉब करणार नाही म्हणून माझं स्वतःचं काही आयुष्य असणार नाही, ही समजूत मला मुळीच पटली नाही. उलट ऑफीसच्या कामाचं प्रेशर नसेल तर मी अधिक मोकळेपणाने माझं आयुष्य, माझ्या पद्धतीने आखू शकणार नाही का?

माझं जगणं अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी मी एक नियम कटाक्षाने पाळते. वास्तवाच्या रोजच्या सरधोपट, काहीश्या रुक्ष वाटेवर, अनपेक्षित दृष्टीक्षेपात आलेलं एखादंही देखणं वळण मी डावलत नाही. तिथे हमखास, छोटासा का होईना, पण आनंदाचा, समाधानाचा ठेवा मला सापडतोच. तो ठेवा माझ्यातील मीपणाला गोंजारतो. हेच असतं माझं स्वतःसाठी जगणं.

कधीतरी निवांत पाय पसरुन, हेडफोन लावून, थोडा वेळ, डोळे मिटून आवडीची गाणी ऐकणं असूदे. नाहीतर मुलीकडून करवून घेतलेला, मन शांत करणारा हेडमसाज असूदे. किंवा एखाद्या रहस्यमय कादंबरीचा शेवट जवळ आलेला असताना, घरातल्यांना जेवणासाठी दहा मिनिटं थांबवून ठेवून पुस्तक पूर्ण वाचून मगच उठणं असूदे. हे आणि असेच कितीतरी, स्वतःसाठी जगलेले छोटे-छोटे क्षण माझी ओंजळ समाधान आणि तृप्ती यांनी गच्च भरुन टाकतात. माझी अशी पक्की धारणा आहे, ज्या कुटुंबातील स्त्री समाधानी असते, तिचं घरंही प्रसन्न असतं, येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्याएवढं ते सक्षम बनतं.

एकदा का आपली भावनिक आणि वैचारिक गरज काय आहे हे आपल्याला पक्कं कळलं की आपल्या घरच्या लोकांनाही आपण ते समजावून सांगू शकतो. समजून घेतलं तर उत्तम नाहीतर तो अट्टाहास करायचा नाही.

स्वतःतील 'ती' आपल्याला उमगली की रोजचं जगणंच एक सेलिब्रेशन होऊन जातं.

लौकिकार्थाने मी एक यशस्वी, कर्तबगार स्त्री अजिबात नाही. माझा जीवनप्रवास प्रेरणादायक वगैरे अजिबात नाही. पण मला त्याचा पश्चात्ताप, खंत, कमीपणाची भावना मुळीच नाही. कुटुंबाला पहिलं प्राधान्य देऊनही, आत्मभान असलेली, प्रसंगी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची ताकद असलेली, लोकांच्या चष्म्यातून स्वतःला न जोखणारी स्त्री असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.



Rate this content
Log in