माझी गानतपस्या
माझी गानतपस्या
डिसेंबर महिन्याचे दिवस होते. सकाळची साडेसहाची वेळ. आसमंतात मस्त धुक्याची दुलई पसरली होती. पानांवरचे चमचमणारे दवबिंदू केवळ कमाल दिसत होते. पक्ष्यांची मंजुळ किलबिल सगळा परिसर जादुई करुन
टाकत होती.
चला, माझ्या गानसाधनेची सुरुवात अश्या मंगलमय वातावरणात होणार होती तर.
अरे हो, सांगायचं राहिलंच, आज माझा रियाझाचा पहिला दिवस होता. पहाटे उठून ब्रेकफास्ट, डबे सुपरफास्ट स्पीडने बनवून मी आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर आले होते. रियाझाच्या निमित्ताने कितीतरी दिवसांनी इतकी सुंदर, प्रसन्न सकाळ प्रत्यक्ष अनुभवत होते. त्यामुळे माझा उत्साह अजूनच दुणावला. एक निवांत कोपरा निवडून चटईवर बसले.
गानसाधना सुरु करायचं जेव्हा मी मनाशी पक्कं केलं तेव्हा इलेक्ट्रॉनिक तालमशीन, स्वरमंडल वगैरेची मी चौकशी केली होती. साथीला हे लागणारच ना. पण त्यांच्या किंमती ऐकून माझ्यातील दक्ष गृहिणी जागी झाली होती. आधी अत्यावश्यक गोष्टींची खरेदी, मग गंगाजळी बघून चैनीच्या गोष्टी, हे तर प्रत्येक गृहिणीच्या अंगवळणी पडलेलंच असतं. पण मी ह्यातून मार्ग तर काढणारच होते. गुगलवर सर्च करुन सूरसाधक नावाचं मोबाईल ऍप मग डाउनलोड केलं. एकदम मस्त होतं ते. वेगवेगळी साथीची वाद्यं त्यांचा स्पीड सेट करुन लावता येत होती. 'सी शार्प, बी मेजर' अश्या बऱ्याच स्केल्स उपलब्ध होत्या. अर्थात माझ्या आवाजाची स्केल मला कुठे माहिती होती. सध्या उषा उत्थपची स्केल मी आपली मानली आणि त्याला साधारण मॅच होणारी ऍपमधली आवाजाची पट्टी ऍडजस्ट केली.
कुठेतरी मी वाचलं होतं, पहिला प्रदीर्घ 'सा' जर स्वच्छ, नितळ लागला, तर अनाहत स्वराची स्वर्गीय अनुभूती मिळते.
त्याबरहुकूम मी डोळे मिटले आणि 'सा' लावला. माझी मीच दचकले आणि आजूबाजूला पाहिलं. असा खरखरीत आवाज कुठून आला ते मला कळेना. मग लक्षात आलं, त्या आवाजाचा उगम अस्मादिकांच्या कंठातूनच झाला होता.
पहिल्यांदा असं होणारच अशी मी स्वतःची समजूत काढली आणि नेटाने परत 'सा' लावला. यावेळेस बाजूच्या बंगल्यामधलं कुत्रं..सॉरी हं, कुत्रं म्हणायचं नसतं म्हणे, शेरु भुंकला...माझ्या आवाजामुळे नाही काही!
मग सा, रे, ग... असे स्वर प्रयत्नपूर्वक लावत गेले. षड्ज ते षड्ज हा माझा प्रवास खडतर असणार हे माझ्या लक्षात आलं. अर्थात, मी सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सगळे स्वर लावून बघितले. बेटे आपापल्या जागी स्थिर रहातच नव्हते. त्यांची इकडेतिकडे पळापळ चालूच होती. आजचा रियाझ मी इथेच थांबवला. दैवी अनुभूती तर मिळाली नव्हती पण काहीतरी नवीन गोष्ट सुरु केल्याचं समाधान कुठेतरी होतं. चटईवरुन उठल्यावर दिसलं, आजूबाजूच्या खिडक्यांतून बरेच त्रस्त चेहरे आमच्या बिल्डिंगकडे पहात होते. प्रसन्नपणे हसून सगळ्यांशी जुजबी बोलले. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. भरल्या पोटी म्हणे रियाझ चांगला होत नाही. त्यामुळे एक कप कॉफी फक्त घेतली होती.
खरंतर भक्तिगीतं, भावगीतं, फिल्मीगाणी मी थोडीफार गाऊ शकत होते (बाथरुममध्ये हं). पण पिक्चर बघून डोक्यात एक समीकरण फिट्ट बसलं होतं. पिक्चरची नायिका सुस्नात होऊन, शक्यतो पांढरी काठापदराची साडी नेसून, लांबसडक केस पाठीवर मोकळे सोडून, तंबोरा घेऊन तल्लीन होऊन रियाझ करते. तेही सकाळी-सकाळीच. साडी, लांबसडक केस, तंबोरा नसला म्हणून काय झालं, तल्लीन होऊन मी पण आजचा रियाझ केला होताच की. अजून माझ्या डोक्यात फिट्ट बसलेलं समीकरण म्हणजे हलाखीची परिस्थिती दाखवायची असली की खोकत-खोकत सुलोचनाताई पायमशीनवर रात्र-रात्र जागून कपडे शिवणार. त्यांची एकूणात सुदृढ शरीरयष्टी, चेहऱ्यावरची तकाकी बघता उपासमार, हलाखीची परिस्थिती असेल असं वाटत नव्हतं हा भाग निराळा. त्यामुळे शिवणकलेच्या वाटेला मी अजिबात गेले नाही. हो, उगाच गरिबीत दिवस काढायला लागले तर? शिवाय टीबी सारखं दुखणं मागे लागलं तर? आणि शिवणकला सोडून बाकीच्या त्रेसष्ठ कला आहेत की आत्मसात करायला. असो, विषयांतर होतंय.
माझा टेरेसवरचा रियाझ छान चालू होता. किती प्रगती झाली ते गुलदस्त्यातच होतं. अलिकडे एक मात्र व्हायला लागलं होतं. मी वर आलेली दिसले की बाजूच्या सोसायटीतल्या खिडकीतच उभ्या असलेल्या बायका अगदी आवर्जून बोलायला लागल्या होत्या. कुठले कुठले विषय काढायच्या. एरवी मला ते आवडलं असतं पण आत्ता माझ्या गानसाधनेचा वेळ बराचसा ह्यातच संपत होता. एक तासापेक्षा जास्ती वेळ मी सध्यातरी स्पेअर करु शकत नव्हते. आता जेमतेम दहा मिनिटं मला मिळायला लागली. यावर उपाय म्हणून मी घरातच एका कोपऱ्यातल्या खोलीत दार बंद करुन माझी साधना करु लागले. नवरा आणि मुलांनी आडवळणाने नाराजी व्यक्त केली पण मी बधले नाही. आता माझी रियाझाची वेळ व्हायच्या आत तिघंही उठून, आवरुन बसायला लागली. नवरा टेरेसवर मॉर्निंग वॉकसाठी जायला लागला. मुलगा जिमला आणि मुलगी सायक्लिंगला जायला लागली. बायका जात्याच कश्या चतुर असतात बघा. आधी फिटनेसकडे इतकं रेग्युलरली कोणी लक्ष देत नव्हतं. आता सगळे कसे आपसुक फिटनेसप्रेमी झाले होते. माझ्या रियाझाची कमाल होती ही.
मी बाहेर पडले की वाटेत कोणीतरी शेजारी भेटायचे आणि विचारायचे, "हल्ली वर गाण्याची प्रॅक्टिस करायला का येत नाही?" त्यावेळेस त्यांच्या ओठांच्या कोपऱ्यातलं कुत्सित हसू मला दिसायचंच. पूर्वी असे वार मी लीलया परतून लावत असे. पण आता संगीतविश्वाशी मी पुरती एकरुप झाल्यामुळे असे शब्दच्छल करण्यात माझी शक्ती वाया घालवत नव्हते.
आता सगळं कसं सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस संपूर्ण जगाला हवालदिल करुन सोडणारी कोरोनाची महाभयंकर साथ आली.
लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट, त्यामुळे सगळीकडे नीरव शांतता असायची. घरात थोडं जोरात बोललं तरी शेजारी ऐकू जायला लागलं, तिथे मी मोकळेपणाने गातीये कुठली? त्यातून सगळीकडे इतकं टेन्शन असताना आत्मानंदात बुडून जाणं मला प्रशस्त वाटेना. म्हणून माझी गानसाधना मी तात्पुरती थांबवली. बराच खंड पडत गेला. पण आता लवकरच परत सुरु करणार आहे माझा रियाझ .
जर थोड्याच दिवसांत मी नावारुपास आलेलं ऐकलं तुम्ही, तर आश्चर्यचकित होऊ नका. माझी कठोर गानतपस्या तुम्ही जाणताच.
