अथांग
अथांग
मानवाची अनेक भलीबुरी गुपितं, त्याची सुखदुःखं, आपल्या उदरात सामावून घेत वरकरणी स्थितप्रज्ञ वाटणारा, पण अंतर्यामी विलक्षण खळबळ माजलेला, अथांग पसरलेला सागर...
जेव्हा आपण स्वतःला खूप महान वगैरे समजायला लागतो ना तेव्हा या समुद्राशी जरुर हितगुज करायला जावं. त्याच्या विराट रुपापुढे आपण किती खुजे, नगण्य आहोत ह्याची जाणीव होऊन आपले पाय आपोआप जमिनीवर येतात.
याची रुपं तरी किती विविध बघायला मिळतात. त्यानेच संध्याकाळपासून बंदिस्त करुन ठेवलेल्या आणि भल्या सकाळी, आकाशात अलवार सोडून दिलेल्या केशरी हिरण्यगर्भामुळे खुललेलं त्याचं रुपडं, दुपारच्या तळपत्या उन्हात चमचमणाऱ्या उबदार लाटा आणि चमचमणारी किनाऱ्यावरची वाळू, सूर्यास्ताच्या वेळी काहीसा गूढ, गंभीर भासणारा त्याचा पसारा, आणि रात्री डोळ्यांना पुसटश्या दिसणाऱ्या लाटा, फक्त ऐकू येणारी धीरगंभीर गांज...
प्रत्येकवेळी तितकाच आकर्षक आणि जास्तच विशाल भासणारा सागर.
कधीकधी त्याच्या सौम्य लाटा एखाद्या कुटुंबवत्सल पित्याप्रमाणे, आपल्या लेकराबाळांना जवळ घ्यावं तश्या पायाला बिलगतात. कधी एखाद्या प्रियकराच्या अधीरतेने कवेत घेणाऱ्या त्याच्या लहरी वाऱ्यासवे नर्तन करत येतात. कधीतरी मात्र त्याच्या खवळलेल्या रौद्रकाय लाटेच्या तडाख्यात सारं काही उद्धवस्त होऊन जातं.
मानवाच्या वागण्यासारखंच त्याचंही वागणं क्वचित बेभरवशाचं, अनिश्चित. तरीही तितकंच भुरळ घालणारं, आश्वस्त करणारं.
असंख्य जलचरांचा आश्रयदाता, कित्येकांच्या उदरनिर्वाहाचा स्रोत असलेला हा अर्णव यत्किंचितही मोठेपणा मिरवत नाही. खूप काही सोसलेल्या, तावून-सुलाखून निघालेल्या एखाद्या सिद्धपुरुषासारखाच तो अचल भासतो.
किनाऱ्यावर बांधलेली, शंखशिंपल्यांनी सजवलेली वाळूची घरकुलं, प्रेमीजनांनी कोरलेली नावं बघून तो आपल्या सहस्त्र लाटांनी या बालिशपणाला हसत असेल? का कौतुकाचे मेघ त्याच्या विशाल डोळ्यांत डोकावत असतील?
कदाचित फक्त एक गोष्ट त्याला कासावीस करत असेल, डोळ्यांतील एक अश्रूचा थेंब....
