Radhika Joshi

Others

3  

Radhika Joshi

Others

मुखवटे आणि चेहरे

मुखवटे आणि चेहरे

2 mins
40


गुलाबी थंडीचे दिवस. संध्याकाळची सहाची वेळ. आपला किरणांचा पसारा आवरुन तो दिनमणी केव्हाच मार्गस्थ झाला होता. जिजामाता उद्यान गर्दीने अगदी फुलून गेलं होतं. बागेच्या प्रवेशद्वारापाशीच दिनकरराव एका मोठ्या लाकडी स्टँडला वेगवेगळ्या बाहुल्या, मुखवटे, पिपाण्या, फुगे, खेळण्यातल्या दुर्बिणी, धनुष्यबाण असा बच्चेकंपनीला मोहात पाडणारा खजिना घेऊन उभे होते. नेहमीप्रमाणेच मुलांचा त्यांच्याभोवती गराडा होता. तो खजिना बघताना मुलांचे चेहरे जेवढे आनंदाने फुलून आले होते, त्यापेक्षा जास्ती आनंद दिनकररावांच्या चेहऱ्यावर झळकत होता. हे रोजचंच दृश्य होतं. तेवढ्यात त्यांचा मुलगा निलेश तिथे आला आणि पायानेच स्टूल बाजूला ढकलून त्यावर बसला. त्याची चिडचिड आणि उतरलेला चेहरा बघूनच दिनकररावांच्या लक्षात आलं, आजही कुठे नोकरीचं जमलेलं नाही. एक सुस्कारा सोडून ते आपल्या कामाकडे वळले. गर्दी कमी झाल्यावर ते निलेशजवळ आले आणि न बोलता फक्त त्याच्या पाठीवर थोपटलं. दहा वाक्यांचं काम त्यांच्या स्पर्शातल्या मायेने चोख बजावलं. निलेशचा चेहरा निवळला.

तो वडिलांना म्हणाला, "मी तुम्हाला आग्रह करुन गावाकडून इथे बोलवून घेतलं आणि तुम्हाला हे असं काम करावं लागतंय. माझीच मला लाज वाटते. कधी नोकरी मिळेल काय माहिती!

"अरे, एवढ्यातच हिंमत हारुन कसं चालेल?

एक ना एक दिवस नक्कीच मिळेल तुला नोकरी. आणि माझं इथे येण्याचं म्हणशील तर, तुझी आई गेल्यापासून तसंही माझं मन गावाकडे रमत नव्हतंच."

"तुमचं हे काम मात्र मला आवडत नाही. आपल्याकडे थोडेफार पैसे आहेत. अगदीच रस्त्यावर नाही आलो आपण. त्यातही, हे तुमचे दात विचकणारे मुखवटे मला खिजवत आहेत असं वाटतं."

"बेटा, ही दुनियाच मुखवटयांची आहे. आतला खरा चेहरा कोणाचाच दिसत नाही.

माझ्या सख्ख्या भावाने नाही आपुलकीचा, प्रेमाचा मुखवटा घालून आपली जमीन बळकावून आपल्याला बेघर केलं."

निलेश निरुत्तर होऊन तसाच बसला.

दोनच दिवसांनी आक्रीत घडलं. रात्री बाग बंद झाल्यावर तो आणि दिनकरराव घरी चालले असताना, एका मवाल्याच्या तावडीतून एका तरुणीची सुटका करताना त्या गुंडाने तरुणीवर फेकलेलं ऍसिड निलेशच्या डाव्या बाजूच्या चेहऱ्यावर पडलं आणि क्षणार्धात ती बाजू होरपळून निघाली.

एका सत्कर्माचं, निष्पाप जीवाला मिळालेलं हे फळ. औषधोपचाराने वेदना शमल्या, पण चेहऱ्यावरचे आणि मनावरचे खोल व्रण तसेच राहिले.

एक दिवस निलेशच्या पाहण्यात, 'एका मूकनाट्यासाठी आर्टिस्ट हवे आहेत' अशी जाहिरात आली. तसा त्याला अभिनय

छान जमत होता. तिथे त्याचं सिलेक्शन झालं. अल्पावधीतच त्याचं नाव गाजायला लागलं. मूकनाट्य सादर करताना चेहऱ्यावर पेंट लावतात आणि मुद्राभिनयाच्या ताकदीवर पूर्ण नाट्य प्रेक्षकांपर्यंत पोचतं. दिवसांगणिक त्याचा अभिनय बहारदार होत होता. प्रसिद्धी, यश, पैसाही वाढतच होता. आता तर त्याने कॉस्मेटिक सर्जरीच्या सहाय्याने चेहरा पूर्ववत करुन घेतला होता.

मुखवटे घालून वावरणाऱ्या तमाम लोकांपुढे मूकनाट्य सादर करणारा, अजून एक मुखवटा घातलेला चेहरा....


-समाप्त



Rate this content
Log in