Radhika Joshi

Crime

4.2  

Radhika Joshi

Crime

मोह मोह के धागे

मोह मोह के धागे

47 mins
360


अगाथा ख्रिस्तींच्या ‘आफ्टर द फ्युनरल’ वर आधारित


प्रकरण पहिले

अंधेरी वेस्ट, वर्सोवा बीच एरिया… धनिक लोकांची बंगल्यांची सोसायटी… नावाप्रमाणेच पांढराशुभ्र असलेला डौलदार ‘धवल’ बंगला… झगमगीत दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला आलिशान दिवाणखाना… अद्यावत वस्त्रप्रावरणांमध्ये वावरणारे आमंत्रित… दरवळणारा संमिश्र उंची परफ्युम्सचा सुगंध… वातावरण भारून टाकणारे पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरचे जादुई स्वर…

निमित्त होतं माझे स्नेही, रिटायर्ड कर्नल प्रदीप चक्रदेव यांच्या ऐंशिव्या वर्षातल्या पदार्पणाचं आणि त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचं. घरगुती सोहळा असला तरी बरेच आमंत्रित होते. वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाचा आणि प्रकाशनाचा समारंभ आटोपल्यावर कर्नल आणि मी निवांत गप्पा मारत बसलो होतो.

बाकी सगळे आमंत्रित निघून गेले होते. कर्नलच्या आणि माझ्या मैत्रीमध्ये कोणत्याही प्रकारची ईर्षा, असूया, चढाओढ नसल्यामुळे वयाचे अंतर झुगारून आमची निखळ मैत्री गेली पंचवीस वर्षे टिकून होती.

“कर्नल, आजचा समारंभ एकदम झक्कास झाला.”

“गौतम, या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याचं सगळं श्रेय तुलाच आहे. मला आत्मचरित्र लिहिण्यासाठी प्रवृत्त करण्यापासून पब्लिशिंगपर्यंत सगळं तूच तर केलंस.”

“त्याशिवाय पुढच्या पिढ्यांना तुम्ही 1965च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात किती असामान्य पराक्रम गाजवला होता ते कसं काय समजणार? यू वेर जस्ट इन्क्रेडिबल इन युअर डे.”

“आता सगळं इतिहासजमा झालं. युद्धस्य रम्यस्य कथा: म्हणून फक्त आठवायच्या त्या. बाय द वे, आज आपला लिटल चॅम्प, तुझा उजवा हात वरुण कुठे आहे?”

“पर्सनल कामासाठी तो पुण्याला गेला आहे. आज रात्रीपर्यंत येईलच तो.”

“अच्छा, अच्छा! गौतम, या फंक्शनच्या निमित्ताने माझा सगळ्या नातेवाईकांना एकत्र बोलवण्यामागे एक हेतू होता. आय हॅव रिवाईज्ड सम ऑफ माय विल क्लॉजेस. ते विल उद्या सगळ्यांसमोर ऍडव्होकेट गोखले वाचून दाखवणार आहेत. त्यावेळी तू तिथे हजर रहावंस असं मला वाटतं. नंतर त्यावरून कोणतेही वाद व्हायला नकोत.”

“ही तुमची अतिशय कौटुंबिक बाब आहे. मी त्यावेळेस तिथे हजर असणं योग्य ठरणार नाही.”

“हे बघ, काय योग्य, काय अयोग्य ते मला ठरवू दे. तुला काय वाटतं, आज हे सगळेजण माझा वाढदिवस आणि पुस्तक प्रकाशनासाठी जमले होते? अजिबात नाही. माझा विलच्या संदर्भातला मेसेज त्यांना मिळाला म्हणून सगळे आले होते. इतक्या दिवसात कोणाला माझी वास्तपुस्त सुद्धा करावीशी वाटली नाही. मनी स्पीकस् फॉर देम. वीस वर्षांपूर्वी माझा एकुलता एक मुलगा, नील, कारगिल युद्धात कामी आला आणि त्या धक्क्याने माझ्या पत्नीचंही लवकरच निधन झालं. तेव्हा यांच्यापैकी कोणालाही माझी फिकीर वाटली नाही. सगळ्यांनी फक्त तोंडदेखलं सांत्वन केलं होतं. त्यात कुठेही मायेचा ओलावा, माझ्याविषयीची काळजी नव्हती. मला सावरलंत फक्त तू आणि माझ्या धाकट्या बहिणीने, शालनने. गौतम, युअर कौन्सिलिंग ऍक्टस् लाईक अ सुदिंग मेडिसिन फॉर मी. आय विल ऑलवेज बी इन युअर डेट. माझी धाकटी बहीण शालन, खरंतर मनाने चांगली आहे पण तिचा फटकळ आणि सडेतोड स्वभाव तिचा चांगुलपणा झाकोळून टाकतो. त्यातच भर म्हणजे तिचा एकसुरी, कर्कश्य आवाज आणि अर्धवट डोळे मिटून, मान कलती करून बोलण्याची लकब. त्यामुळे तिच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात थोडीशी ग्रेईश शेड आहे. आमच्या दोघांच्या वयातही जवळजवळ वीस वर्षांचे अंतर आहे. बाकी कशीही असली तरी ती किती उच्च प्रतीची चित्रकार आहे हे तू जाणतोसंच.”

“हो तर! कितीतरी जागतिक पातळीवरचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ओरिजिनली, वरुण जे .जे .स्कूल ऑफ आर्टस् चा स्टुडंट आहे. तो नेहमी शालन मॅडमच्या चित्रांची भरभरून तारीफ करतो.”

“हं. आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो. माझ्या प्रॉपर्टीचा निम्मा शेअर मी धर्मादाय संस्था, चिल्ड्रन ऑरफनेजेस, मिलिटरी वेल्फेअर फंड या सारख्या संस्थांना दिला आहे. उरलेल्या अर्ध्या शेअर मधला अर्धा वाटा शालनच्या नावे केला आहे. हा माझा बंगलाही तिच्याच नावे केला आहे. तिला स्वतःची आर्ट गॅलरी काढायची इच्छा खूप वर्षांपासून आहे. तिने काढलेल्या चित्रांचं कलेक्शनही आता खूप झालं आहे. त्यामुळे मी तिला प्रॉपर्टीचा मोठा हिस्सा द्यायचं ठरवलं आहे. यामुळे बाकीचे नक्कीच नाराज, नुसते नाराजच नाही तर प्रचंड संतापणार आहेत याची मला कल्पना आहे. तेवढ्यासाठीच उद्या तू यावेळेस हजर रहावंस असं मला वाटतं .”

“ओके! तुमची इच्छा मी डावलणार नाही.”

उद्या साडे दहाच्या सुमारास ‘धवल’वर येतो असं म्हणून मी त्यांचा निरोप घेऊन निघालो.


प्रकरण दुसरे

दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो तेव्हा सगळेजण प्रशस्त हॉलमध्ये एकत्र जमले होते.

अजूनही कालच्या समारंभाच्या तुरळक खुणा विखुरलेल्या होत्या. ऍडव्होकेट गोखले आलेले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि साशंकता यांचं मिश्रण दिसत होतं. मला बघितल्यावर प्रत्येकाच्या चेहर्‍यावर नाराजीची छटाही उमटली. मी जेव्हा माझी डिटेक्टिव्ह एजन्सी पंचवीस वर्षांपूर्वी सुरू केली होती, जवळपास त्याचसुमारास चक्रदेवांशी माझे स्नेहबंध जुळले होते. त्यामुळे या जमलेल्या सगळ्या मंडळींशीही माझा चांगलाच परिचय होता. चक्रदेव यांची पुतणी प्रिया आणि भाचा शेखर हे दोघं तर तेव्हा शाळेत होते. माझ्याशी असलेल्या एवढ्या दाट परिचयाचा कित्येकदा या सगळ्यांना लाभ झाला होता. अर्थात याची जाणीव त्यांनाही होतीच. पण तरीही या अतिशय खाजगी प्रसंगी माझी उपस्थिती माझ्या अपेक्षेप्रमाणेच सगळ्यांना खटकली. कर्नलनी मात्र मला बोलावून त्यांच्याजवळ बसायला सांगितलं.

गोखल्यांनी विलचे सगळे क्लॉजेस वाचून दाखवल्यावर वातावरणात जाणवण्याइतका ताण वाढला होता. एक प्रकारची चमत्कारिक शांतता सगळीकडे पसरली होती. मी आणि कर्नलने एकमेकांकडे पाहून नेत्रपल्लवी केली आणि कर्नल उठून आतमध्ये निघून गेले. बाकी सगळे जण एकदम चिडीचूप बसले होते. शालन मॅडमना प्रॉपर्टीचा बराच मोठा शेअर मिळाला होता. तरीही या अनपेक्षित लाभामुळे त्यासुद्धा गोंधळलेल्या दिसत होत्या. मी हळूहळू सगळ्यांशी बोलायला सुरुवात केल्यावर वातावरणही हळूहळू निवळलं. चक्रदेवांचा मोठा भाऊ प्रमोद आणि बहिण कुसुम दोघेही फारसे बोलले नाहीत. चेहर्‍यावर अर्थातच नाराजी दिसत होती. कुसुम मॅडमचा मुलगा शेखर, केसांत हात खुपसून एका सोफ्यावर बसला होता. त्याची स्वतःची एक नाट्यसंस्था होती. सध्या तरी ती संस्था प्रायोगिक स्थितीतच होती. मी त्याच्या शेजारी जाऊन बसल्यावर माझी चाहूल लागून त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो उदासवाणं हसला.

मी त्याच्या पाठीवर थाप मारुन त्याला विचारलं, “काय शेखर, काय म्हणते आहे तुझी नाट्यसंस्था? कोणतं नवीन नाटक येतंय तुमचं?”

“कसलं नवीन नाटक, काका! जुन्या नाटकांचेच प्रयोग कसेबसे सुरू आहेत. हल्ली नेपथ्य करणार्‍यांपासून कलाकारांपर्यंत प्रत्येकाचंच मानधन कमालीचं वाढलं आहे. मजबूत पैसा हातात असेल तरंच नवीन नाटकांचे प्रयोग आता शक्य आहेत. आत्ता मला पैशांची खरी गरज होती म्हणून मी मामांकडे थोडीशी मदत मागितली होती. त्यांनी जर ती केली असती तर माझे बरेचसे प्रॉब्लेम्स दूर झाले असते. पण त्यांनी मदत करण्याचं नाकारलं. त्यातून प्रॉपर्टीतही माझा इतका कमी शेअर आहे की नवीन नाटकाच्या प्रयोगाचं फक्त स्वप्नच बघावं लागणार आहे.”

“अरे, तू कशाला एवढी चिंता करतोस! आणि कोणाच्या मदतीची अपेक्षा तरी का करतोस? तुझ्यात हिम्मत आहे, जिद्द आहे. हळूहळू तुझी नाट्यसंस्था नक्कीच नावारूपाला येईल. थोडासा पेशन्स ठेवायची मात्र जरूर आहे. अगदी कुठलाही बिझनेस असला तरी, काल सुरू केला आणि आज लगेच भरभराटीला आला असं कधीच होत नाही. यू कान्ट मेक द सन राईझ अर्लि! स्वकर्तुत्वावर मिळालेल्या यशाचा आनंद दुसऱ्याने केलेल्या मदतीमुळे मिळालेल्या यशापेक्षा नक्कीच जास्त असतो.”

अर्थात माझं हे बोलणं शेखरला कितपत पटलं, याचा अंदाज त्याच्या चेहर्‍यावरून मला आला नाही. चक्रदेवांची पुतणी प्रिया हॉलच्या एका कोपऱ्यात तिच्या नवऱ्याशी, साकेतशी, हळू आवाजात बोलत होती. दोघेही चांगलेच अपसेट दिसत होते. दोघांनीही बॉटनी मध्ये पीएचडी केलेली होती आणि दोघेही मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये रिसर्च सेक्शनला होते. मला बघताच त्यांनी आपसातलं बोलणं थांबवलं.

प्रिया मला म्हणाली, “या काका, खूप दिवसांनी भेट होत आहे. तुमच्या इनव्हेस्टीगेशनबद्दल पेपरमध्ये छापून आलेलं तुमचं कौतुक मी बरेचदा वाचते.”

ती उगाचंच मखलाशी करत आहे हे माझ्या लक्षात आलं.

मी तिच्या रिसर्चबद्दल चौकशी केल्यावर ती सांगायला लागली, “सध्या मी झाडांच्या फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेबद्दल रिसर्च करत आहे. झाडांना एक विशिष्ठ प्रकारच्या औषधाचं इंजेक्शन दिल्यावर सूर्यप्रकाशाशिवायही ते चांगल्या प्रतीचं आणि मुबलक अन्न तयार करू शकतील यावर माझं संशोधन सुरू आहे. त्यासाठी एक पॉलिहाऊस बनवण्याची जरुरी आहे, जिथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांवर हा प्रयोग करू शकेन. हे काय हल्ली इंजेक्शन्सच्या सिरिंज् पर्समध्ये घेऊनच मी फिरते” असे म्हणून तिने रिकाम्या सिरिंज् मला दाखवल्या.”आय डेस्परेटली नीड मनी फॉर दॅट. काकांना माझा शेअर आत्ताच देण्याची मी विनंती केली होती पण काकांनी माझी चांगलीच निराशा केली. रिसर्च इन्स्टिट्यूट कडून मिळणारे फंडस् अगदी तुटपुंजे असतात त्यामुळे आमच्या रिसर्चचा आवाकाही तेवढाच ठेवावा लागतो.”

शेखरसारखीच प्रियाचीही समजूत काढून मी तिथून काढता पाय घेतला.

कर्नल चक्रदेवांनी रिटायर झाल्यावर निव्वळ वेळ घालवण्यासाठी शेअर ट्रेडिंग सुरू केलं होतं .अचूक वेळी अचूक निर्णय घेण्याची त्यांची आर्मीतील सवय आणि रिस्क घेण्याची तयारी यामुळे कदाचित त्यांना कायम प्रॉफिटंच होत आला होता. आणि बघता बघता खूपच मोठी माया त्यांनी जमवली होती .त्यांच्या पत्नीच्या आणि मुलाच्या निधनानंतर ते एकदम विरक्त झाले होते. त्यामुळे सगळा पैसा साठवलेला होता. त्यावर या सगळ्या नातेवाईकांचा डोळा होता. प्रत्येकाला आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांचा पैसा हवा होता. त्यांची कुठलीही जबाबदारी मात्र नको होती. मला या सगळ्याचं वैषम्य वाटल्याशिवाय राहिलं नाही.

एवढ्यात शालन मॅडम समोरून येताना दिसल्या. मला पाहताच त्या लगबगीने माझ्याकडे आल्या. “नमस्कार गौतमजी! कसे आहात? खूप दिवसांनी गाठ पडते आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही ज्या ठिकाणी दिसता तिथे एखादा गुन्हा घडला आहे की काय असं वाटून मनात धडकीच भरते.”

शालन मॅडमचा स्वभाव मला पुरेपूर माहीत असल्यामुळे मी त्यांचं बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रकार असल्या तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यात मात्र कुठेच आदब, मॅच्युरिटी नसायची. त्यामुळे सगळेजण अंतर राखूनच त्यांच्याशी वागायचे.

मी चक्रदेवांच्या रूममध्ये शिरलो आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया त्यांना सांगितल्या. त्यांना त्या अपेक्षितच होत्या. तरीही उद्विग्नपणे ते बोलले,” बघितलंस गौतम, या छुप्या, मनावर घाव घालणाऱ्या शत्रूंपेक्षा युद्धभूमीवरचे शत्रू कितीतरी सरस म्हटले पाहिजेत. त्यांच्याशी निदान दोन हात तरी करता येतात.”

” कर्नल, इतकं मनाला लावून घेऊ नका. पैशांचा हा मोह भल्याभल्यांची मती गुंग करतो.पैसा हा जगण्याचे एक साधन, तर मरणाचे एक कारण ठरू शकतो. माझ्या इनव्हेस्टीगेशनच्या व्यवसायात तर बहुतेक सगळे गुन्हे या मोहापायी झालेले आहेत .”

” यु सेड इट, गौतम! मला खूप प्रकारचे अनुभव आले, संकटं आली, परीक्षा बघणारे क्षण आले. या सगळ्यांना सामोरं जाता जाता आता पार थकून गेलो आहे .या एकाकी जगण्याचा आता मला कंटाळा आला आहे.”

“कर्नल, आज पहिल्यांदाच अशी पराभूत झाल्याची भावना मला तुमच्या बोलण्यातून जाणवली आहे. यू ऑल्वेज हॅव बीनअ ग्रेट वॉरियर ऑन ऑल फ्रँट्स ऑफ लाइफ.”

हसतंच माझ्या पाठीवर थाप मारत ते बोलले,” ओके.. ओके ! लीव्ह ईट! चल, जेवणाची वेळ झालीच आहे. आता जेवूनच जा.”

आणि ह्या प्रसंगानंतर पंधरा-वीस दिवसांत पहाटे चक्रदेवांच्या बंगल्यावरून मला त्यांच्या नोकराचा, रमेशचा, फोन आला. चक्रदेवांचा झोपेतच मृत्यू झाला होता.

प्रकरण तिसरे

नेहमीप्रमाणे रमेश, जो त्यांच्याकडेच राहतो, तो त्यांना पहाटे ऊठवायला गेला होता.

चक्रदेवांची काहीच हालचाल दिसली नाही. घाबरून जाऊन त्याने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं. डॉक्टरांनी तपासल्यावर, झोपेतच चक्रदेवांचा हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाल्याचं निदान केलं. रमेशने प्रसंगावधान राखून मला आणि त्यांच्या नातेवाईकांना ही दुःखद बातमी कळवली. चक्रदेवांचं जाणं अनपेक्षित नसलं तरी आकस्मिक होतं. एक दिलखुलास सुहृद गमावल्याचं दुःख मला नक्कीच झालं. त्यांचं पंधरा-वीस दिवसांपूर्वीचं ते नैराश्यपूर्ण वक्तव्य मला आठवायला लागलं. मी वरुणला ही बातमी कळवली आणि थोड्याच वेळात आम्ही दोघेही त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो.

माझ्या व्यवसायामुळे मृत्यू मला अपरिचित नसला तरी इतर वेळी मी जेवढ्या अलिप्त नजरेने अशा घटनांकडे बघतो तेवढं अलिप्त आत्ता राहणं शक्यच नव्हतं. जवळजवळ पंचवीस वर्षांचा सहवास एका क्षणात संपला होता. माझे पाणावलेले डोळे बघून वरुणने माझे हात हातात घेऊन मूकपणे मला धीर दिला.

चक्रदेवांच्या क्रियाकर्मानंतरच्या दुसऱ्या दिवशी ऍडव्होकेट गोखल्यांनी बाकीच्या नातेवाईकांबरोबर मलाही बंगल्यावर बोलावलं होतं. तीन-चार आठवड्यांपूर्वी आम्ही सगळे असेच हॉलमध्ये एकत्र जमलो होतो. फक्त आता त्यात कर्नल मात्र नव्हते. गोखल्यांनी बाकीच्यांकडून विलच्या संदर्भातले कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून घेतले. लवकरच प्रत्येकाच्या अकाउंटला त्यांच्या वाट्याची अमाऊंट जमा होणार होती. चक्रदेवांच्या आठवणी निघणं अपरिहार्य होतं.

अचानक शालन मॅडम त्यांच्या नेहमीच्या कर्कश्य आवाजात बोलल्या, “गौतमजी, दादाचा खुनी सापडला का?”

आम्ही या अचानक पडलेल्या बॉम्बशेलमुळे इतके अवाक झालो की कोणाच्या तोंडून काही शब्द फुटेना.

मी स्वतःला सावरलं आणि त्यांना म्हणालो, “शालन मॅडम, काय बोलता आहात तुम्ही? फॅमिली डॉक्टरांनी स्वतः कर्नलच्या मृत्युचं सर्टीफिकीट दिलं आहे. पुराव्याशिवाय अशी बेजबाबदार विधानं करणं गुन्हा आहे. कर्नलना अगदी नैसर्गिक मृत्यू आला होता.”

“किरकोळ तक्रारी सोडल्या तर दादाची तब्येत चांगली होती. मी रमेशकडे सहज चौकशी केली तेव्हा मला असं समजलं की त्याचा मृत्यू ज्या रात्री झाला, त्याच्या थोडावेळ आधी वेगवेगळ्या वेळी प्रिया आणि शेखर त्याला भेटायला आले होते. त्यांचं हे बोलणं ऐकताना प्रिया आणि शेखरच्या रागाचा पारा चांगलाच चढला होता.”

कुसुम मॅडम सुद्धा एकदम उसळून ओरडल्या, “शालन, तू काय बोलत आहेस तुझं तुला तरी कळतंय का? किती भयानक आरोप तू करत आहेस. पैशांसाठी एवढ्या खालच्या पातळीवर आम्ही कधीतरी जाऊ का?”

नंतर प्रिया आणि शेखर तावातावाने काहीतरी बोलायला लागले. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्या फॅमिली सीनमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. माझ्यातला डिटेक्टिव्ह मात्र आता खडबडून जागा झाला. विचारचक्र वेगाने फिरायला लागलं. त्या दिवशी मला कुठली गोष्ट अनैसर्गिक वाटली होती का याची चाचपणी मनात सुरू केली. छे! त्यावेळेस मी पुरता भावनेच्या आहारी गेलो होतो. नेहमीसारखा सतर्क अजिबात नव्हतो.

लगेच मी रमेशला गाठलं आणि त्या रात्री नक्की काय झालं होतं ते विचारलं. त्याच्या सांगण्यानुसार दिवसभर कर्नल अगदी व्यवस्थित होते. रोजच्यासारखंच संध्याकाळी ते लवकर जेवले. त्यानंतर थोड्याच वेळात शेखर आला होता. दोघेही त्यांच्या रूममध्ये बोलत बसले होते. रमेश शेखरसाठी कॉफी घेऊन गेला तेव्हा दोघांचेही चढलेले आवाज त्याने ऐकले. थोड्याच वेळात शेखर निघून गेला. तो गेल्यानंतर अर्ध्या तासातच प्रिया आली होती. ती पण त्यांच्या रूममध्ये गेली होती. दहाच मिनिटात ती पण त्यांच्या रूममधून बाहेर आली आणि तिने काकांची झोपण्याची वेळ झालेली असल्यामुळे ‘मी निघते आता’ असं रमेशला सांगितलं. ती गेल्यानंतर रमेशने त्यांच्या रूममध्ये डोकावून पाहिलं तेव्हा ते झोपलेले दिसले. काही हवं आहे का असे विचारल्यावर त्यांनी फक्त हातानेच ‘नको’ अशी खूण केली. मग रमेश त्याच्या कामाला निघून गेला. कर्नल रात्री नेहमीच नऊच्या सुमारास झोपायचे आणि पहाटे उठायचे. त्यामुळे त्यांच्या लवकर झोपण्याचं रमेशला बिलकुल आश्चर्य वाटलं नाही. रमेशच्या या सांगण्यातून कुठलाही धागादोरा मला मिळाला नाही. शिवाय बाह्य लक्षणांवरून तरी चक्रदेवांचा खून झाला असल्याची कुठलीच चिन्हं दिसली नव्हती. अशी कुठलीही शंका तेव्हा आम्हाला आली नसल्यामुळे त्यांचं पोस्टमॉर्टेम करण्याचा विचार मनात अजिबात आला नव्हता. त्यांचा अनपेक्षित मृत्यु मला थोडा खटकला होता पण अनैसर्गिक वाटला नव्हता. तश्याच स्थितीत मी माझ्या ऑफिसवर परतलो. वरुण माझी वाटच बघत होता.

माझ्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच त्याने विचारलं, “सर, काय झालं?”

मी त्याला घडलेला किस्सा सांगितला आणि म्हणालो, “वरुण, जर कर्नलचा खरंच खून झाला असेल तर खुन्याला शोधण्याचा मार्ग आता खुंटला आहे. काही पुरावे असलेच तर ते आत्तापर्यंत नष्ट झालेले आहेत. अर्थात शालन मॅडमच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे ते मी आत्ता सांगू शकत नाही. कारण अशी पोरकट विधानं त्या नेहमीच करतात. पण आत्ताचा त्यांचा आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे नेहमीसारखं दुर्लक्ष मी नक्कीच करू शकणार नाही. वरुण, तू तातडीने एक काम आता करायचं. प्रिया आणि शेखरची डिटेल व्यावसायिक माहिती मला आणून दे. आपल्याला आता दिरंगाई करून चालणार नाही.”

“ओके, सर. मी लगेच कामाला लागतो. तुम्ही मात्र अपसेट होऊ नका. शालन मॅडमच्या बोलण्यात काहीही तथ्य नसणार. असं बोलून तो त्याच्या कामगिरीवर निघून गेला.मी माझ्या आवडत्या खुर्चीवर बसून शांतपणे कर्नलच्या वाढदिवसापासून घडलेल्या सगळ्या घटनांचा सगळ्या बाजूंनी विचार करायला लागलो.

प्रकरण चौथे

डोकं शांत ठेवून विचार केल्यावर बऱ्याचदा कोड्याची उकल होते हा माझा नेहमीचा अनुभव होता. पण आत्ताची सिच्युएशन मात्र खूपच वेगळी होती.

गुन्हा खरंच घडला आहे का याबाबतच संभ्रम होता. यावेळेस मला आऊट ऑफ द बॉक्स विचार करावा लागणार होता. संध्याकाळपर्यंत वरुणने प्रिया आणि शेखरची जी माहिती मिळवली ती मनात संशय निर्माण करणारी होती.

प्रिया आणि साकेत या दोघांनी रिसर्चच्या नावाखाली सेंटरकडून जे फंड्स घेतले होते ते रिसर्चसाठी न वापरता पर्सनल गोष्टींसाठी वापरल्याचा पुरावा रिसर्च सेंटरकडे होता. त्यामुळे ऍथॉरिटीजने त्यांना लवकरात लवकर ती पूर्ण रक्कम त्यांच्याकडे जमा करण्यास सांगितली होती. जोपर्यंत त्यांना क्लीनचिट मिळत नाही तोपर्यंत त्यांना डिसमिस करण्यात आलं होतं. दोघांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवली होती. कर्नलच्या विलमधला शेअर त्यांना लवकरात लवकर हवा होता. पैसे मिळण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नसल्यामुळे, स्वतःच्या काकांच्या मृत्यूवर स्वतः शिक्कामोर्तब करण्याएवढी प्रिया निर्ढावलेली असेल असं मला वाटत नव्हतं. तरी पैशांसाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या लोकांचा माझ्या अनेक केसेस मध्ये खूप वेळा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता.

शेखरलाही अगदी तातडीने पैशांची गरज होती. त्याच्या नाट्यसंस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारापासून ते कामगारापर्यंत सर्वांचे मानधन त्याने कित्येक महिन्यांपासून दिलेलं नव्हतं. सगळेजण त्याला सांभाळून तरी किती दिवस घेणार? ‘मानधन मिळाल्याशिवाय इथून पुढे कुठलेही काम आम्ही करणार नाही’, असं अल्टीमेटम सगळ्यांनी दिलं होतं. त्यामुळे शेखरलाही ताबडतोब पैसे उभे करावे लागणार होते.

स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करण्याच्या स्टेजला प्रिया आणि शेखर दोघेही होते. शिवाय कर्नलशी दोघांचीही कुठलीही भावनिक गुंतवणूक नव्हतीच. ते हयात असताना क्वचितच दोघांनी त्यांची विचारपूस केली होती. त्यांच्या हयात नसण्याचा मात्र फायदा दोघांना होणार होता. त्यामुळे त्यांची असा गुन्हा करण्याची मानसिकता बळावली असण्याची दाट शक्यता होती.

दुसऱ्याच दिवशी मी दोघांना भेटलो, पण…

प्रकरण पाचवे

आता संदर्भ सगळे बदलले होते.

कारण सकाळी अकराच्या सुमारास इन्स्पेक्टर भोसल्यांचा मला फोन आला. माझ्यामुळे त्यांचीही चक्रदेव आणि फॅमिलीशी चांगली दोस्ती झाली होती. भोसल्यांनी मला ताबडतोब शालन मॅडमच्या घरी येण्यास सांगितलं. त्यांचा मृत्यू झाला होता.

वरुणबरोबर मी ताबडतोब त्यांच्या घरी पोहोचलो. शालन मॅडमची केअरटेकर सीमाने बाकीच्या नातेवाईकांबरोबर इन्स्पेक्टर भोसल्यांनाही फोन करून बोलावलं होतं. त्यांचे फॅमिली डॉक्टर गोडबोले तिथे हजर होते. त्यांची तपासणी चालू असताना मी भोसल्यांना बाजूला घेऊन काय झालं ते विचारलं.

भोसले सांगायला लागले, “आत्ता थोड्या वेळापूर्वीच सीमाचा मला फोन आला होता. शालन मॅडमचा अनपेक्षितरित्या मृत्यू झाल्याचे तिने सांगितलं. सकाळी नऊच्या आसपास प्रिया आणि शेखर शालन मॅडमना भेटायला आले होते. साधारण अर्ध्या तासात ते निघून गेले. नंतर शालन मॅडम परत झोपल्या. थोड्यावेळानंतर सीमा त्यांना उठवायला गेली तर त्यांची काहीच हालचाल दिसेना. म्हणून तिने फॅमिली डॉक्टर बरोबरच बाकीच्या लोकांनाही फोन करून बोलावून घेतलं. आता नक्की काय झालं आहे ते डॉक्टर सांगतील.”

सिच्युएशन रिपीट्स! जसे कर्नलच्या मृत्यूपूर्वी प्रिया आणि शेखर तिथे हजर होते तसेच शालन मॅडमच्या मृत्यूपूर्वीही ते तिथे होते. ही बाब आता मात्र मला चांगलीच खटकायला लागली. इट कांट बी अ शिअर कोईन्सिडन्स. ह्यावेळेस मात्र मी चांगला ऍलर्ट होतो, त्यामुळे माझ्या नजरेतून काहीही सुटणार नाही याची काळजी मी नक्कीच घेणार होतो. डॉक्टरांची तपासणी चालू असताना त्यांनी सगळ्यांना बाहेरच्या खोलीत थांबायला सांगितलं होतं. मी मात्र त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या बरोबरच शालन मॅडमच्या मृतदेहाची बारकाईने पाहणी करत होतो.

अचानक मला त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराजवळच्या शिरेच्या शेजारी इंजेक्शनची खूण दिसली. मी त्याकडे डॉक्टरांचं लक्ष वेधून शालन मॅडमना डायबिटीससाठी इन्शुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागत होतं का ते विचारलं.

“नाही. सकाळच्या एका गोळीवर त्यांची शुगर कंट्रोलमध्ये होती. माझ्याही ही गोष्ट मगाशी लक्षात आली होती आणि मी चक्रावून गेलो होतो. आत्ता एवढ्यात मी त्यांना दुसरं कुठलंही इंजेक्शन दिलं नव्हतं. शिवाय त्यांची ब्लड शुगर रुटीन टेस्ट दोन आठवड्यांपूर्वीच झाली होती. हे इंजेक्शन कोणीतरी नवशिक्या माणसाने दिल्यासारखं दिसतंय. सराईत डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर इतका स्पष्ट मार्क दिसतंच नाही. थांबा, मी सीमाला बोलावून तिलाच विचारतो की मॅडम दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी गेल्या होत्या का.”

सीमा कमालीची डिस्टर्ब्ड दिसत होती. तिचे डोळेही रडून सुजल्यासारखे वाटत होते. तिला डॉक्टरांनी शालन मॅडमच्या हातावरची इंजेक्शनची खूण दाखवून त्याबद्दल विचारणा केली.

तिच्या चेहर्‍यावर प्रचंड आश्चर्य उमटलं आणि ती डॉक्टरांना म्हणाली, “नाही, मॅडम तुमच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच डॉक्टरांकडे जात नव्हत्या. त्यांच्या ब्लड टेस्टला ही बरेच दिवस झाले आहेत. आत्ता ही खूण दिसण्याचं काही कारणच नाही.”

आम्ही चांगलेच बुचकळ्यात पडलो. ह्या गोष्टीचा मॅडमच्या मृत्यूशी काही संबंध असेल का याचा विचार मी करायला लागलो. इंजेक्शनद्वारे काही विषारी द्रव्य शरीरात इंजेक्ट केलं असेल तर तशी प्राथमिक लक्षणं दिसायला हवी होती. आणि एकदम माझ्या डोक्यात विजेसारखा एक विचार चमकला…

‘एअर एम्बॉलिझम’. रिकाम्या सिरिंजमधून व्हेनमध्ये एअर बबल सोडण्याची प्रक्रिया.

माझ्या नजरेसमोर प्रियाच्या पर्समधल्या सिरिंज दिसायला लागल्या. झाडांना इंजेक्शन देण्याची प्रियाला सवय होती. पण माणसांना देताना एखाद्या नवशिक्याप्रमाणे दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कर्नलच्या बाबतीतही असंच घडलं असावं का? कर्नलच्या मृतदेहाची एवढी बारकाईने तपासणी करण्याची गरज तेव्हा आम्हाला वाटलीच नव्हती. डॉक्टरांना मी एम्बॉलिझमची शंका बोलून दाखवली.

ते एकदम उद्गारले, “येस! इट कॅन बी अ रिझन फॉर हार्ट फेल्युअर. थोडीशी हाय शुगर लेव्हल सोडली तर शालन मॅडम चांगल्या ठणठणीत होत्या. त्या रेग्युलर चेकअपसाठी यायच्या. प्रकृतीच्या बाबतीत एकदम काटेकोर होत्या. कुठलंही छोटं दुखणंही त्या कधी अंगावर काढायच्या नाहीत. त्यामुळे मलाही त्यांचा मृत्यू अनपेक्षित वाटत आहे.”

डॉक्टरांचं हे मत मी भोसल्यांच्या कानावर घातलं आणि आम्ही दोघांनी मिळून पोस्टमॉर्टेमचा निर्णय घेतला. भोसल्यांनी पोस्टमॉर्टेमचे सगळे सोपस्कार पार पाडले. त्याचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत मिळणार होता.

हे सगळं होईपर्यंत प्रिया आणि शेखर हॉलमध्येच बसून होते. दोघांनाही चांगलाच धक्का बसल्याचं जाणवत होतं. त्यांचा या प्रकरणात काही हात असेल तर त्यांच्या अभिनयाला दाद द्यावीशी वाटली इतके दोघं विमनस्क वाटत होते. मी त्या दोघांनाही धीर देण्याच्या भानगडीत न पडता ती दोघं इथे आली होती तेव्हा नक्की काय घडलं ते विचारलं.

प्रिया सांगू लागली, “काका, तुम्हाला तर माहितच आहे की शालन आत्याने काल माझ्यावर आणि शेखरवर प्रदीप काकांच्या मृत्युला आम्ही जबाबदार असल्याचा इनडायरेक्ट आरोप केला होता. तेव्हा रागाच्या भरात आम्ही दोघेही आत्याला बरेच उलट-सुलट बोललो होतो. नंतर मात्र आम्हाला खूप वाईट वाटलं होतं. तिचा जर आमच्याबद्दल काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा आणि तिची माफीही मागावी या हेतूने आम्ही दोघेही इथे एकत्र आलो होतो. तेव्हा पावणे नऊ-नऊ वाजले असतील. सीमाने आत्या तिच्या रूममध्ये असल्याचं सांगितल्यामुळे आम्ही तिच्या रूममध्ये गेलो. तेव्हा ती झोपलेली दिसली. मी तिच्या जवळ जाऊन तिला हाक मारल्यावर ती उठली, पण झोपेमुळे तिचे डोळे जड झाल्यासारखे वाटत होते. शेखरने तिला बरं वाटत नाहीये का असं विचारलं सुद्धा, तेव्हा तिने सांगितलं की काल रात्री दीड-दोनच्या सुमारास तिने झोप येत नसल्यामुळे झोपेची गोळी घेतली होती. त्याचा इफेक्ट तिला अजूनही जाणवत होता. आम्ही काय बोलतो आहोत हे तिला समजत नसावं असं वाटत होतं. तिच्या डोळ्यांवर झापड येत होती. मी सीमाला हाक मारली आणि तिला डॉक्टरांना फोन करायला सांगितला तेव्हा तिने आमच्या समोरंच डॉक्टरांना फोन केला.”

“हो,” डॉक्टर गोडबोले मध्येच बोलले, “सीमाचा मला फोन आला होता. शालन मॅडमना झोप न येण्याचा थोडा प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी त्यांना वेलॉनॉक्स 10- mg ची एक गोळी प्रिस्क्राइब केली होती. अतिशय सेफ गोळी आहे ती. रोज रात्री एक गोळी त्यांना घ्यायला सांगितली होती. त्या गोळीचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. मला जेव्हा समजलं की शालन मॅडमनी काल रात्री दीड-दोन च्या सुमारास ती गोळी घेतली होती तेव्हाच मी सीमाला सांगितलं की इतक्या उशिरा गोळी घेतल्यामुळे झोप अजून पूर्ण झाली नसल्याची शक्यता आहे. तरीही मी अकराच्या सुमारास त्यांना चेक करायला येईन. पण त्याआधीच सीमाचा मला परत फोन आला होता.”

प्रिया परत सांगायला लागली ,आत्याशी बोलण्याचा आमचा प्रयत्न तसा वायाच गेला. मग आम्ही दोघेही तिथे जास्ती वेळ थांबलो नाही. आम्ही घरी येऊन पोचतो न पोचतो तोच सीमाचा फोन आला.”

मी म्हणालो, ” शालन मॅडमचा मृत्यू एअर एम्बॉलिझममुळे झाल्याचा डॉक्टरांना संशय येतोय.”

“काय? प्रिया जवळ जवळ किंचाळलीच ,असा संशय का आला तुम्हाला?”

“त्यांच्या हाताच्या शिरेजवळ इंजेक्शनची खूण दिसते आहे. आत्ता एवढ्यात त्यांना कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन दिलेलं नाही .”

शेखरने मला विचारलं,” एअर एम्बॉलिझम म्हणजे काय? मला समजलं नाही .”

मी त्याला सांगायला लागलो,” जेव्हा एखाद्या माणसाच्या आर्टरी किंवा व्हेनमध्ये रिकामं इंजेक्शन इंजेक्ट केलं जातं तेव्हा एअर बबल त्या माणसाच्या व्हेन किंवा आर्टरी मधून पास होऊन हार्टच्या ब्लड सप्लाय मध्ये अडथळा आणतो. ताबडतोब मेडिकल हेल्प मिळाली नाही तर हार्टवरचं प्रेशर प्रचंड वाढून कार्डियाक अरेस्ट होतं. अशा केसमध्ये मृत्यूचं कारण हार्ट फेल्युअर एवढंच दिसतं. शिवाय कोणताही पुरावा मागे उरत नाही .खून करण्याची अतिशय क्रूर पण खुन्याच्या दृष्टीने अतिशय सेफ मेथड आहे ही. अर्थात पुरावा मिळाल्याशिवाय शालन मॅडमच्या बाबतीत मी आत्ताच काही बोलणार नाही. पी.एम. फाइंडिंग्जवरूनही काहीतरी नक्कीच समजेल.”

एवढ्यात भोसले सीमाला म्हणाले ,”सीमा, आता आम्ही निघतो. दुपारी परत यावंच लागेल.”

आम्हीही भोसल्यांचा निरोप घेऊन निघालो. संध्याकाळी सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर सुन्न मनाने मी आणि वरूण ऑफिसवर पोहोचलो. पी.एम रिपोर्ट मिळाला होता . त्यानुसार शालन मॅडमच्या पोटात वेलॉनॉक्सचा डबल डोस म्हणजे 20-mg इतका सापडला होता . त्यामुळे त्या जरा गुंगीत असल्यासारख्या प्रिया आणि शेखरला वाटल्या होत्या. पण 20-mg मुळे बाकी फारसा दुष्परिणाम होणार नाही असाही डॉक्टरांचा रिपोर्ट होता . मृत्यूला कारणीभूत होण्याएवढं जास्त प्रमाण तर अजिबात नव्हतं . एअर बबल इंजेक्शनची शक्यता मात्र नाकारता येत नाही असंही त्यांनी रिपोर्टमध्ये लिहिलं होतं .पण ते ठामपणे काहीच सांगू शकत नव्हते. इंजेक्शनचा मार्क दिसत असूनही ठोस पुरावा नसल्यामुळे गुन्हेगार म्हणून कोणाकडेच बोट दाखवता येत नव्हतं . ही माझ्या कारकिर्दीतील अशी पहिलीच केस होती की गुन्हा नक्की घडला आहे की नाही हे सुद्धा नक्की समजत नव्हतं. एक खून का दोन खून याचाही पत्ता लागत नव्हता.

वरूणने मला विचारलं ,सर ,”प्रिया आणि शेखरवर खरंच तुमचा संशय आहे का?”

मी त्याला म्हणालो,” दोन्ही घटनांच्या वेळेस दोघांचीही उपस्थिती हा खरंच योगायोग असू शकेल का याचाच मी कधीपासून विचार करतो आहे.

चक्रदेवांच्या बाबतीत तर सगळाच संभ्रम आहे. पण शालन मॅडमच्या केसमध्ये जर प्रिया आणि शेखर सस्पेक्टेड असतील तर त्यांना संधी कशी मिळाली असेल ?ती दोघंही जेमतेम अर्धा तास शालन मॅडम बरोबर होती. तेवढ्या अर्धा तासात वेलॉनॉक्सचा डबल डोस देऊन त्याचा इफेक्ट दिसायला लागून एअर बबल इंजेक्शन देणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्यातून शालन मॅडम मुकाट्याने प्रिया आणि शेखरकडून गोळीचा डबल डोस घेतील ही त्याहून अशक्यप्राय गोष्ट आहे .नाही वरूण, आपली विचारांची दिशा चुकते आहे. शालन मॅडमना काल रात्री दोनच्या सुमारास कोणी औषध दिलं ते सीमाला विचारलं पाहिजे.”

” सर ,तिला मी ऑलरेडी हे विचारलं .मॅडमनी स्वतः औषध घेतल्याचं तिने सांगितलं. साधारण रात्री दहाच्या सुमारास सीमा नेहमी त्यांना गोळी द्यायची. काल रात्री त्या खूप वेळ पेंटिंग करत बसल्यामुळे गोळी घ्यायला दीड दोन वाजले होते.

सर, मी त्यांच्या चित्रकलेचा भक्त आहे असं म्हटलं तरी चालेल .त्यासंदर्भात बरेचदा मी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा अत्यंत एकाग्रतेने ,जगाचं भान विसरून चित्र काढताना मी त्यांना बरेचदा बघितलं आहे. त्यामुळे अशी शक्यता वाटते की दहाच्या सुमारास त्यांनी गोळी घेतली असेल आणि पेंटिंगच्या नादात आपण गोळी घेतल्याचं विसरून पुन्हा दीड दोनच्या सुमारास गोळी घेतली असेल .त्यामुळे वेलॉनॉक्सचा डबल डोस त्यांच्या पोटात गेला असेल. सर, बाकी त्या स्वभावाने कशाही असल्या तरी अतिशय उच्च प्रतीच्या चित्रकार होत्या यात वादच नाही.”

“हो ,अगदी खरं आहे .पूर्वी अंधेरी ईस्ट ला दोन खोल्यांचं त्यांचं छोटं घर होतं .आता तिथेच त्यांनी छोटेखानी बंगला बांधला आहे. त्यांचे यजमान लग्नानंतर तीन- चार वर्षातच वारले. मूलबाळ काही नव्हतं तेव्हा त्यांनी लांबच्या नात्यातल्या कोकणातल्या मुलाला विनायकला स्वतःजवळ ठेवून घेतलं तेव्हा तो पाच-सहा वर्षांचा होता. त्यांनी त्याला दहावीपर्यंत शिकवलं. त्यात त्याची फारशी प्रगती नव्हती हे पाहून ओळखीतून एका दवाखान्यात कंपाउंडर म्हणून चिकटवलं. पुढे त्याचं लग्न अनाथाश्रमातल्या सीमाशी त्यांनी लावून दिलं. विनायक आणि सीमा दोघेही त्यांची उत्तम देखभाल करत होती. त्या दोघांची मुलगी आता दहावीत आहे. रोज शाळेत जाताना तिला लोकलने ये-जा करायला लागू नये म्हणून सीमाने तिला होस्टेलवर ठेवलं आहे. विनायक मात्र छोट्याश्या दुखण्याचं निमित्त होऊन तसा लवकरच गेला. सीमाचं शिक्षण जरी सातवी- आठवी पर्यंत झालेलं असलं तरी ती अतिशय व्यवहार चतुर आणि स्मार्ट आहे .शालन मॅडमचे बँकेचे सगळे व्यवहार ,ऑनलाइन बिलं भरणं सगळं तीच करत होती.”

“शालन मॅडम कधी याबद्दल माझ्याशी बोलल्या नाहीत. अर्थात आम्ही फक्त ड्रॉईंग या एकाच विषयावर बोलायचो.सीमाचं मात्र त्या कधीतरी कौतुक करायच्या.सीमासुद्धा मॅडमचं बघून बघून आता त्यांच्या तोडीस तोड ड्रॉइंग काढायला लागली आहे. सर, आपण जर शालन मॅडमचं आर्ट गॅलरीचं स्वप्न पूर्ण केलं तर?”

“यू सेड इट वरुण! या सगळ्या प्रकरणाचा छडा लागला की मग मिशन आर्ट गॅलरी!”

“सर, ही केस मात्र मला चांगलीच चॅलेंजिंग वाटत आहे.”

“तुला खरं सांगू का? जितकी चॅलेंजिंग केस असेल तितका मला जास्त आनंद होतो. कारण तेवढी जास्त विचारांना चालना मिळते. मेंदू तरतरीत राहतो. हे चॅलेंज मी स्वीकारलंय, वरुण.”

पण तेव्हा मला माहित नव्हतं की हे चॅलेंज इथेच संपणारं नव्हतं.

प्रकरण सहावे

दुसऱ्या दिवशी साडेबाराच्या सुमारास भोसल्यांचा मला फोन आला.

“गौतमजी, तुम्ही ताबडतोब ‘सेवन हिल’ हॉस्पिटलला या. सीमावर कोणीतरी विषप्रयोग केला आहे. तिला आम्ही इथे ऍडमिट केलंय.”

“काय! आलोच मी.”

वाटेत वरुणला पिकअप करून आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. दारातच भोसले भेटले.

“आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं आहे की सीमाच्या जीवावरचा धोका टळला आहे पण अजून ती शुद्धीवर आलेली नाही. त्यामुळे तिचं स्टेटमेंट मात्र आपल्याला नंतरच घ्यावं लागेल.”

“पण हे झालं कसं? त्याबद्दल सीमा काही बोलली का?”

“नाही. तिचा मला फोन आला होता तेव्हा तिला नीट बोलताही येत नव्हतं. कसबसं तिने ‘लगेच घरी या’ एवढंच सांगितलं. मी माझ्या दोन माणसांना घेऊन गेलो तेव्हा ती अनकॉन्शस होती. सुदैवाने मेन डोअर मात्र उघडच होतं. आम्ही लगेचच जीपमधून तिला इथे आणलं. डॉक्टरांनी चेक करून पॉयझनिंगची केस असल्याचं सांगितलं. त्यांनी लगेचच ट्रीटमेंट सुरू केली. कोणतं विष, किती प्रमाणात तिच्या पोटात गेलं आहे याचे डिटेल्स अजून समजायचे आहेत. फक्त आता ती आऊट ऑफ डेंजर आहे एवढं त्यांनी सांगितलं आहे.”

“भोसले, ही केस चांगलीच कॉम्प्लिकेटेड बनत चालली आहे. सुरुवातीला कर्नलचा आकस्मिक मृत्यू, नंतर लगेच शालन मॅडमचा संशयास्पद मृत्यू आणि आता सीमावर विषप्रयोग. एक गोष्ट मात्र नक्की. विलचे जे बेनिफिशियरी आहेत त्यांच्यापैकीच कोणीतरी गुन्हेगार आहे, हे नक्की.”

आम्ही हे बोलत असतानाच डॉक्टरांनी आम्हाला बोलावलं. सीमा शुद्धीवर आली होती. तिच्या पोटात सोडियम सायनाइड हे पेस्टिसाइड सापडलं होतं जे माणसांसाठी प्राणघातक ठरू शकतं. डोसचं प्रमाण कमी होतं आणि वेळेत मेडिकल हेल्प मिळली त्यामुळे तिचे प्राण वाचले. तिला अगदी थोडाच वेळ भेटण्याची डॉक्टरांनी आम्हाला परवानगी दिली.

सीमा डोळे मिटून पडून राहिली होती. तिचा चेहरा अगदीच मलूल दिसत होता. आमची चाहूल लागताच तिने डोळे उघडले. आम्ही समोर दिसताच ती एकदम एक्साईट होऊन घाईघाईने काहीतरी सांगायला लागणार तेवढ्यात मी तिला हातानेच थोपवलं आणि थोडक्यात काय घडलं ते सांगायला सांगितलं.

तिने सांगायला सुरुवात केली, “आज सकाळी प्रियाताई माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आल्या होत्या. शालन मॅडमच्या अचानक जाण्यामुळे मी खूपच अस्वस्थ होते. जेवण बनवण्याची वगैरे इच्छाच नव्हती. कालपासूनच मी काही खाल्लेलं नव्हतं. सकाळी खरतर मला चांगलीच भूक लागली होती. अशा वेळेस प्रियाताईंनी आवर्जून माझ्यासाठी डबा आणल्यामुळे मला खूप बरं वाटलं. त्या गडबडीत होत्या त्यामुळे डबा देऊन लगेच गेल्या. मी सुद्धा लगेच खायला सुरवात केली. थोडंसं खाऊन झाल्यावर मला अस्वस्थ वाटायला लागलं. श्वास नीट घेता येईना. गळा आवळल्यासारखं वाटायला लागलं. मी कसाबसा भोसलेसाहेबांना फोन केला. पुढची माझी आठवण येथे जाग आल्यानंतरचीच आहे.”

एवढं बोलतानासुद्धा सीमाला चांगलाच दम लागला होता. डॉक्टरांनी आम्हाला बाहेर जाण्याची खूण केली. आम्ही बाहेर आलो.

“गौतमजी, इथे सुद्धा परत प्रिया आहेच. मी माझ्या माणसांना ताबडतोब पाठवून सीमाला पाठवलेल्या डब्यातल्या पदार्थांचे केमिकल ऍनॅलिसिस करवून घेतो. डब्यावरचे फिंगरप्रिंट्सही चेक करायला सांगतो. रिपोर्ट आल्यावर सत्य काय ते बाहेर येईलंच. म्हणजे पुढची लाईन ऑफ ऍक्शन आपल्याला ठरवता येईल.”

“भोसले, हे सगळं तुम्ही कराच, पण मला मात्र असं वाटतंय की प्रिया जर खरंच या सगळ्या थरार नाट्यामागे असेल तर ती प्रत्येक घटनेच्या वेळेस स्वतः विरुद्ध एवढे धडधडीत पुरावे कशाला ठेवेल? मला आधी प्रिया आणि शेखरचा संशय येत होता, पण आता मात्र असं वाटायला लागलं आहे की चक्रदेव कुटुंबियांचं आपल्याला माहीत नसलेलं एखादं रहस्य वगैरे असावं ज्यामुळे कोणीतरी तिऱ्हाईत व्यक्ती या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला संपवण्याच्या मागे आहे. अगदी सीमालाही त्याने सोडलेलं नाही. ही खूपच वेगळ्या वळणाची केस आहे आणि त्यामुळेच आपल्याला नव्याने याचा प्रत्येक अँगल तपासावा लागणार आहे. चला भोसले, आता निघूया. लेट्स होप! आता अजून काही विपरीत होणार नाही.”

असं बोलत बोलतंच मी आणि वरुण भोसल्यांचा निरोप घेऊन निघालो आणि ऑफिसवर पोहोचलो. एकूणच सगळ्या घटना मन सुन्न करणाऱ्या होत्या. त्यामुळे फारसं काही न बोलताच आम्ही बाकीच्या केसेसची किरकोळ कामं करायला सुरुवात केली. पुढचे चार-पाच दिवस तसे शांततेत गेले. या दिवसात सीमाला डिस्चार्ज मिळून ती घरी आली होती. अजूनही तिची तब्येत म्हणावी तेवढी पूर्वपदावर आलेली नव्हती. माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील ही पहिलीच केस अशी होती की कुठलाही धागादोरा सापडत नव्हता. सीमावरचा विषप्रयोग वगळता राहिलेल्या दोन घटनांना गुन्हा घडला असं तरी म्हणायचं का, ते सुद्धा मला समजत नव्हतं. हातावर हात ठेवून बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता आणि नेमकी तीच गोष्ट मला मान्य नव्हती.

मी सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाही. या केसचाही मी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार होतो. मी आर्ट गॅलरी वरती आता माझं लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. विचार करता करता एक कल्पना मनात चमकली. कर्नलनी आपला बंगला शालन मॅडमच्या नावे केला होता. आता त्या हयात नव्हत्या. तेव्हा बंगल्याचंच मॉडिफिकेशन करून तिथे आर्ट गॅलरी सुरू केली तर? मी लगेच वरुणला ही कल्पना सांगितली. त्याला तर एकदमच पसंत पडली. आता पुढचं काम म्हणजे ऍडव्होकेट गोखल्यांना हा विचार बोलून दाखवायचा. सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज् तेच पूर्ण करू शकणार होते. बाकीच्या नातेवाईकांची संमती पण आवश्यक होती.

मी ताबडतोब गोखल्यांना फोन केला. माझ्या विचारांची रूपरेषा सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी साडेदहाच्या सुमारास चक्रदेवांच्या बंगल्यावर येण्याचं त्यांनी कबूल केलं. त्यानंतर मी बाकीच्यांनाही कॉल करून दुसऱ्या दिवशी धवलवर यायला सांगितलं. सीमाकडे मात्र मी स्वतः जायचं ठरवलं. त्यानिमित्ताने शालन मॅडमची सगळी चित्रंही डोळ्यांखालून घालता आली असती. सीमाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही कोणीही तिला भेटायला गेलो नव्हतो. त्यामुळे शालन मॅडमच्या घरी गेल्यावर दोन्ही गोष्टी साध्य होतील याचा विचार करून मी आणि वरुण तिच्याकडे पोहोचलो. आम्हाला पाहता तिची चर्या उजळली. अजूनही ती काहीशी थकल्यासारखी दिसत होती. मी तिच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आमच्या येण्याचा हेतू सांगितला. अपेक्षेप्रमाणेच तिला खूप आनंद झाला.

ती आम्हाला म्हणाली, “मला वाटत होतं शालन मॅडमची चित्रं आता नुसतीच पडून राहणार. त्या असतानाही त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या चित्रांमध्ये थोडासाही इंटरेस्ट दाखवला नव्हता. त्यामुळे आता तर त्या चित्रांना कोणीच वाली उरला नाही असंच मला वाटलं. आर्ट गॅलरीचं फक्त स्वप्नच उरणार अशी मनाची धारणा व्हायला लागली होती. आंतरराष्ट्रीय पुरस्कार जरी मिळाले असले तरी त्यांची कला नजरेआड झाल्यावर हळूहळू लोकं त्यांना विसरणार तर नाहीत ना, अशीही भीती मला वाटायला लागली होती. गौतम सर, तुम्ही मला स्वार्थी म्हणाल पण मला आता माझ्या भवितव्याची चिंताही वाटू लागली आहे. मॅडमचे बाकीचे नातलग मला आता या घरात तरी राहू देतील का नाही हा प्रश्नही मला भेडसावायला लागला आहे.”

“हे बघ सीमा, तू इतकी वर्षं शालन मॅडमची सेवा केली आहेस, तेव्हा बाकीचे नातलग तुला नक्कीच वाऱ्यावर सोडणार नाहीत. आणि तू त्यांच्या चित्रांबाबतही निश्चिंत रहा. आपण सगळे मिळून शालन मॅडमच्या आर्ट गॅलरीचं स्वप्न पूर्ण करूया. आता मी त्या चित्रांवर नजर टाकतो. चित्रं किती आहेत आणि सुस्थितीत आहेत ना हे बघून घेतो. नंतर वरुण येऊन सगळी चित्रं घेऊन जाईल.”

“चालेल, सर. चला, सगळी चित्र माझ्या रूममध्ये आहेत.”

आम्ही तिच्या मागोमाग तिच्या रूममध्ये गेलो.

आत शिरल्या-शिरल्या वरुण एकदम म्हणाला, “सर…”

“काय रे काय झालं?”

तो थोडासा घुटमळून म्हणाला, “नाही, काही नाही.”

मी सुद्धा त्याला फार छेडलं नाही. काही महत्त्वाचं असेल तर तो सांगितल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री होती. खोली चांगलीच प्रशस्त होती आणि सीमाने ती एकदम टापटीप ठेवली होती. अर्थात पूर्ण घर अतिशय व्यवस्थित, आरशासारखं लख्ख होतं. खोलीच्या एका कोपर्‍यात चित्रांचा भलामोठा खजिना होता. सीमाने सगळी चित्र व्यवस्थित ट्रेसिंग पेपरमध्ये गुंडाळून ठेवली होती. सीमाचा हा अजून एक गुण नजरेत भरणारा होता. खोलीच्या एका भिंतीशी ड्रेसिंग टेबल होतं. त्यावर शालन मॅडमचा बऱ्यापैकी मोठा, मान कलती करून बोलतानाचा फोटो फ्रेममध्ये लावून ठेवलेला होता. चित्रांची वरवर पाहणी करून झाल्यावर आम्ही बाहेर आलो.

सीमाने मला विचारलं, “सर, भोसले साहेबांनी मला सांगितलं की प्रियाताईंनी पाठवलेल्या डब्यात विष सापडलं. खरंच त्यांनी माझ्यावर विषप्रयोग केला होता? का?”

“प्रियाच्या डब्यात जरी विष सापडलं असलं तरी डब्याच्या वरच्या कव्हरवर फक्त प्रियाचे फिंगरप्रिंट्स सापडले आहेत. डबा तर तिच्या कामवाल्या मावशींनी बनवला आणि भरला होता. आतल्या सगळ्या डब्यांवर फक्त तुझे आणि त्या मावशींचे प्रिंट्स सापडले आहेत. त्या कामवाल्या मावशी प्रियाला सामील असतील असं वाटत नाही, कारण मुळातंच तुझ्यावर विषप्रयोग करून प्रियाचा काय फायदा होणार होता? मला आता असं वाटायला लागलं आहे की चक्रदेवांचा काहीतरी भूतकाळ, जो मला अज्ञात आहे, त्याचा या सगळ्याशी संबंध असावा. कर्नल आर्मीत होते तेव्हापासूनचा सगळा भूतकाळ तपासावा लागणार आहे. आमचा जरी बऱ्याच वर्षांचा स्नेहबंध होता तरी काही अप्रिय, अक्षम्य गोष्टी त्यांनी कदाचित माझ्यापासून लपवल्याही असतील. कदाचित त्यांच्या नकळत त्यांच्याकडून कोणावर तरी अन्याय झाला असेल, म्हणून त्या व्यक्तीने कदाचित हे सगळे कारस्थान रचले असेल. फिल्मी वाटली तरी दुसरी कोणतीही व्हॅलिड शक्यता मला सध्या दिसत नाहीये. चक्रदेव कुटुंबाशी संबंधित, अगदी तुझ्यासकट सगळ्या लोकांना, संपवण्याचा त्या व्यक्तीचा प्रयत्न दिसतो आहे. सुदैवाने तू अगदी सहीसलामत यातून बाहेर पडलीस.”

नुसत्या त्या आठवणींनीही सीमाचा चेहरा कोमेजून गेला. मी तिला दुसऱ्या दिवशी साडेदहाच्या सुमारास चक्रदेवांच्या बंगल्यावर येण्यास सांगितलं.

ती त्या कल्पनेने उल्हसित झाल्यासारखी वाटली आणि सांगायला लागली, “सर, मला शालन मॅडमनी इतक्या वर्षात कधीही बंगल्यावर नेलं नाही. ठराविक अंतर त्यांनी आमच्यामध्ये कायमंच राखलं होतं. त्यांच्या चित्रकलेच्या गुणवत्तेविषयी प्रश्नच नाही, त्याबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि राहील. पण इतक्या सुंदर कलेला साजेसा सुंदर स्वभाव मात्र त्यांचा नव्हता. मी त्यांची आश्रित आहे हे त्या कधीही विसरल्या नाहीत आणि मलाही कधी विसरू दिलं नाही.”

सीमाच्या बोलण्यातला कडवटपणा मला चांगलाच जाणवला.

ती पुढे म्हणाली, “पण सर, आर्ट गॅलरीसाठी माझ्याकडून होईल तेवढी मदत करायला मी एका पायावर तयार आहे.”

“सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आणि आवश्यकता आहेच. उद्या तू धवलवर ये,” असं म्हणून आम्ही सीमाचा निरोप घेऊन बाहेर पडलो.

वरुणला दुसऱ्या दिवशी धवलवर येण्याची आठवण करून मी माझ्या घरी आलो.

प्रकरण सातवे:

दुसऱ्या दिवशी सव्वादहाच्या सुमारास वरुणबरोबर मी बंगल्यावर पोहोचलो.

गोखले सोडून बाकी सगळी मंडळी आलेली होती. प्रिया आणि शेखरचा नूर बराच उतरलेला दिसला. प्रियाच्या डब्यात विष सापडल्यामुळे तिची भोसल्यांनी कसून चौकशी केलेली होते. त्यामुळे ती तर एकदमच गप्प गप्प होती. सीमा सगळ्यांबरोबर सोफ्यावर बसून गप्पा मारत होती. ते बघून कुसुम मॅडमच्या चेहर्‍यावर मात्र चांगलीच नाराजीची छटा उमटली होती.

गप्पा मारता मारता सीमाने एकदम त्यांना विचारलं, “मागच्या वेळेस या सेंटर-टेबलवर एक छान फुलदाणी होती ती आता दिसत नाही.”

कुसुम मॅडम एकदम फटकन तिला म्हणाल्या, “सीमा, जा, इथे बसून नुसत्या गप्पा मारण्यापेक्ष सगळ्यांसाठी कॉफी बनव. किचनमध्ये तुला कॉफीचं सामान सापडेल.”

सीमाचा चेहरा खर्रकन उतरला. काही न बोलता ती किचनमध्ये गेली. मला क्षणभर असं वाटून गेलं की ती नुकतीच जिवावरच्या संकटातून बचावली होती तेव्हा तिच्याशी थोडं सहानुभूतीपूर्वक वागायला काहीच हरकत नव्हती. मी पण उठून किचनमध्ये गेलो. सीमा कॉफी बनवत होती.

मला बघून ती म्हणाली, “पाहिलत ना सर, मी चक्रदेव कुटुंबाचा भाग नाही. मी आश्रित आहे, हे सतत मला जाणवत राहील याची सगळे काळजी घेतात.”

मी तिला समजावलं आणि लवकर बाहेर यायला सांगितलं. गोखले यायची वेळ झालीच होती. मी बाहेर आलो तेव्हा कुसुम मॅडम हॉलमधल्या मोठ्या आरश्यासमोर उभ्या होत्या. अतिशय सुंदर कोरीव काम केलेला हा आरसा भिंतीवर अशा ठिकाणी लावला होता की पूर्ण हॉलचं प्रतिबिंब त्यात दिसावं. पूर्वी एकदा कर्नल मला म्हणाले होते की दिवस-दिवस ते आणि त्यांचा नोकर रमेश दोघंच घरात असतात. दुसरी कोणाची सोबतच नाही. फारसं भेटायलाही कोणी येत नव्हतं. त्यामुळे या आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसलं तरी बरोबर कोणीतरी आहे असं त्यांना वाटायचं. शेवटी लादला गेलेला एकटेपणा माणसाला कधीतरी असह्य होतोच. कुसुम मॅडम काहीतरी निरर्थक चाळा करत आरश्यासमोर उभ्या होत्या.

तेवढ्याच सीमा कॉफीचा ट्रे घेऊन आली. तिला बघताच पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर नापसंतीचे तीव्र भाव उमटले. सीमाही त्यांच्याकडेच बघत होती. ती निश्चितच दुखावली जाणार होती. बघता बघता कुसुम मॅडमच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले. त्यांचा चेहरा विलक्षण दिसायला लागला. गर्रकन् वळून त्या काहीतरी बोलणार एवढ्यात गोखले आले.

त्यामुळे मॅडम मला एवढंच बोलल्या, “गौतमजी, इथलं डिस्कशन झालं की मला वरच्या रूममध्ये येऊन भेटा. तुमच्याशी काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं आहे.”

मी त्यांच्या बोलण्यावर मान डोलावली. आमची कॉफी पिऊन होताच मी लगेच या बंगल्याचंआर्ट गॅलरीमध्ये मॉडिफिकेशन करण्याचा प्रस्ताव मांडला.

“हा बंगला कर्नलनी शालन मॅडमच्या नावाने केलेला आहे. त्या आता हयात नसल्या तरी त्यांचे स्वप्न आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण करावं असं मला वाटतंय. सीमाने त्यांची चित्रं अगदी सुस्थितीत ठेवली आहेत, त्यामुळे चित्रांचं शिफ्टिंग बिलकुल अवघड नाही. तुम्ही परवानगी दिलीत तर ती सगळी चित्रं वरुण स्वतःच्या फ्लॅटवर घेऊन जाईल. ती चित्रं डिस्प्ले करण्याआधी लॅमिनेशन वगैरे फिनिशिंग करावं लागेल. त्याची पूर्ण जबाबदारी वरुण घेईल. बाकी बंगल्याच्या मॉडिफिकेशनचं काम इंटिरिअर डिझायनरला सांगून आपण करून घेऊ शकतो. गोखले, या सगळ्यामध्ये काही लीगल अडचणी येऊ शकतील का हे विचारण्यासाठी तुम्हाला इथे बोलावलं आहे. शिवाय बाकी सगळ्यांचा कन्सेंट महत्त्वाचा आहेच.”

गोखले म्हणाले,” मला तरी यात कुठलाही लीगल प्रॉब्लेम दिसत नाही. घरच्या लोकांची संमती असल्यावर कुठलीच अडचण येणार नाही. तुमचा प्रस्ताव अगदी योग्य आहे, गौतमजी. तसंही या बंगल्याचं आणि शालन मॅडमच्या नावे जो मोठा शेअर ट्रान्सफर झाला आहे त्याचं पुढे काय करायचं हे विचारण्यासाठी मी सगळ्यांना एकदा बोलवणारंच होतो. सीमा, मॅडमचे आर्थिक व्यवहार बघण्यासाठी कोणी लीगल ॲडव्हायझर होता का? तुला कितपत याची माहिती आहे?”

सीमा कुसुम मॅडमकडे एक कटाक्ष टाकून म्हणाली, “नाही, त्यांचे बँकेचे किरकोळ व्यवहार फक्त मी करत होते. बाकीचे महत्त्वाचे आर्थिक व्यवहार त्या स्वतः बघायच्या. त्यांनी मला कधीही त्यात सामील केलं नाही.”

“ठीक आहे. पुढच्या आठवड्यात मी घरी येतो. घरी काही फाइल्स, बँकेची पासबुकं वगैरे असतील त्याच्यावरून काही ट्रेस लागतोय का ते बघीन. सध्या पहिली प्रायॉरिटी आर्ट गॅलरीला. बाकी तुम्हां सर्वांची संमती असेल तर चित्रांचं शिफ्टिंग लगेच करुया. माझ्या ओळखीचा एक इंटिरिअर डेकोरेटर आहे. त्याच्याबरोबर आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करू. तो या बंगल्याच्या मॉडिफिकेशनचं काम अगदी छान आणि लवकरात लवकर करेल ही माझी गॅरंटी.”

आश्चर्य म्हणजे सगळ्यांनी ताबडतोब या प्रस्तावाला मान्यता दिली. प्रिया आणि शेखरने तर लागेल ती सर्व मदत करण्याची तयारी दाखवली. आपली इमेज सुधारण्याची याहून चांगली संधी त्या दोघांसाठी कुठली होती? वरुणनेही दुसऱ्या दिवशी चित्रांच्या शिफ्टिंगसाठी फोन करून टेम्पोवाला ठरवून टाकला. प्रिया आणि शेखर लगेच जायला निघाले. सीमा कॉफीचा सरंजाम घेऊन किचनकडे वळली. कुसुम मॅडम वरच्या बेडरूमकडे जायला निघाल्या. जिन्याच्या वरच्या पायरीवर पोचल्यावर त्यांनी मला वर येण्याची आठवण केली. प्रमोद सर, वरुण आणि मी गोखल्यांशी बोलत बोलत दरवाज्यापर्यंत पोचतो न पोचतो तोच जोरदार किंकाळी पाठोपाठ काहीतरी गडगडत आल्याचा आवाज मी ऐकला.

मागे वळून बघितल्यावर कुसुम मॅडम जिन्याच्या पायथ्यापाशी वेड्यावाकड्या पडलेल्या दिसल्या. त्यांच्या डोक्याच्या उजवीकडून रक्त वहात होतं. मी वयाला न शोभणाऱ्या चपळाईने त्यांच्याजवळ धावत गेलो. त्या मोठ्या कष्टाने काहीतरी पुटपुटल्या आणि त्यांची शुद्ध हरपली. वरुणने प्रसंगावधान राखून ॲम्बयुलन्स मागवली. पुढच्या वीस मिनिटांत कुसुम मॅडम आयसीयूमध्ये तर आम्ही आयसीयूच्या बाहेर बसलेलो होतो. प्रिया आणि शेखर धवलपासून जेमतेम कॉर्नरपर्यंत गेले होते, त्यांनाही वरुणने लगेच बोलवून घेतलं होतं. आम्ही कोणीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. माझं विचारचक्र मात्र वेगाने फिरायला लागलं होतं. कुसुम मॅडमने पुटपुटलेल्या शब्दांचा अर्थ लावण्याचा माझा प्रयत्न चालला होता. त्या चक्कर आल्यामुळे तोल जाऊन पडल्या का कोणी त्यांना ढकललं? पण तशी संधी कोणाला होती? प्रिया आणि शेखर गेटच्या बाहेर, सीमा किचनमध्ये आणि आम्ही बाकीचे हॉलच्या दारात बोलत उभे होतो. मग नक्की काय झालं? ही केस म्हणजे नुसते विचार आणि नुसत्या शक्यता! त्यातून निष्पन्न काही होत नव्हतं. कॉम्प्लिकेशन्स मात्र वाढत होती. खरंतर गुंतागुंतीची केस सॉलव्ह करायला मला नेहमीच आवडते. पण एरवी केसची एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी कडी मिळत जाते. पण यावेळेस मात्र पहिलीच कडी कुठे सापडत नव्हती. मला माझ्या तर्ककुशलतेचा जो रास्त अभिमान होता तो आता डळमळीत व्हायला लागला होता.

नाही…

नाही! असं होऊन चालणार नाही. मी स्वतःलाच बजावायला लागलो. माझी नेहमीची आवडती टॅगलाईन मी आठवायला लागलो, ‘Impossible says I’m possible’. सापडेल, योग्य दिशा नक्कीच सापडेल…

माझे विचार असे जोरात धावत असतानाच डॉक्टर बाहेर आले आणि आमच्या जवळ येऊन सांगायला लागले, “सुदैवाने इंटरनल हॅमरेज किंवा कुठेही फ्रॅक्चर नाही. बाकीचे पॅरामीटर्सही नॉर्मल आहेत. अजून त्या शुद्धीवर आल्या नाहीत. पण आत्ता तरी कोणताच रिस्क फॅक्टर दिसत नाहीये. सिव्हिअर ब्रेन इंज्युरी नसल्यामुळे कोमाची लक्षणं अजिबात नाहीत. अर्थात त्या शुद्धीवर आल्या तरी लगेच त्यांना भेटण्याची परवानगी आम्ही तुम्हाला देणार नाही. त्यांचं वय लक्षात घेता कोणतीच रिस्क आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे आत्ता तुम्ही इथे कोणीही थांबला नाहीत तरी चालेल.”

शेखर एकटाच तिथे थांबणार होता. त्याच्या खांद्यावर थोपटून डॉक्टर निघून गेले. तो बिचारा भांबावून गेला होता. त्याची स्वतःची टेन्शन्स, एकापुढे एक घडलेल्या विचित्र घटना आणि आता आईचा अपघात का हत्येचा प्रयत्न? सगळे अपडेट्स आम्हाला देण्याबद्दल त्याला बजावून आम्ही सगळे निघालो. वरुणलाही मी घरी जायला सांगितलं. ऑफिसवर जाऊन कुठलंही काम किंवा चर्चा करण्याएवढी एनर्जी दोघांनाही नव्हती. रात्री दहाच्या सुमारास शेखरचा मला फोन आला. कुसुम मॅडम अर्ध्या तासापूर्वी शुद्धीवर आल्या होत्या.

आयसीयूच्या काचेच्या दारातून शेखरने त्यांना हात केल्यावर त्यांनी हात हलवून प्रतिसाद दिला होता. डॉक्टरांनी काळजीचं काही कारण नसल्याचं सांगितलं होतं. मात्र पूर्ण चोवीस तास अंडर ऑब्झरव्हेशन ठेवल्यानंतरच आम्ही त्यांना भेटू शकणार होतो. मी वरुणला ही बातमी सांगितली आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या ठरलेल्या वेळेत चित्रांचं शिफ्टिंग करायला सांगितलं. अजून कुठलंही विघ्न यायच्या आत निदान ते काम तरी मार्गी लागलं असतं.

डोक्यात विचारांची गर्दी झालेली असूनही आश्चर्य म्हणजे मला कित्येक दिवसांनी शांत, गाढ झोप लागली.

दुसर्‍या दिवशी जाग आल्यावर मला माझा नेहमीचा फॉर्म नेमका सापडल्याचा फील आला. इतके दिवस कुठेतरी दिशाहीन भरकटत असल्यासारखं वाटत होतं पण आज विचारांची दिशा नक्की झाल्यासारखं वाटायला लागलं. मी

चक्रदेवांचा भूतकाळ खणून काढायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांचं आत्मचरित्र उघडल्यावर त्यांची पहिल्यापासून पोस्टिंग्ज् कुठे कुठे झाली होती त्याची लिस्ट मला मिळाली. इंटरनेटवरून ईमेल आयडी मिळवले. तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना मेल पाठवून चक्रदेवांच्या संदर्भातील माहिती विचारण्यासाठी त्यांना कॉन्टॅक्ट कधी आणि कसा करू शकतो अशा आशयाचा मजकूर लिहिला. त्यांच्या चार-पाच सहकार्‍यांचा रेफरन्स आत्मचरित्रात मिळाला. त्यांचं सोशल मीडियावर अकाउंट आहे का ते चेक करायला सुरुवात केली. या सगळ्याचा किती उपयोग होणार होता माहीत नाही पण प्रयत्न तर करायलाच हवा होता. घडणाऱ्या घटनांचा नुसता निरीक्षक होणं माझ्या स्वभावात आणि पेशात बसतंच नव्हतं.

तिकडे दिवसभरात वरुणने चित्रांचं शिफ्टिंग व्यवस्थित केलं. फिनिशिंगचं काम तो लवकरच सुरु करणार होता. एकदा वरुणवर कुठलंही काम सोपवलं की तो ते पूर्ण जबाबदारीने व्यवस्थित पार पाडणारच याची मला खात्री होती.

दुपारी चारच्या सुमारास मी कुसुम मॅडमना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो. शेखर तिथे होताच. त्याने सांगितलं की कुसुम मॅडमची तब्येत आता एकदम स्टेबल आहे. पण डॉक्टरांनी मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी भेटण्याची परवानगी दिली होती. औषधांच्या गोळ्यांच्या प्रभावामुळे त्या अजूनही झोपेच्या अंमलाखाली होत्या. मी पण त्यांना भेटण्याचा आग्रह न धरता दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्याचं ठरवलं.

आणि रात्री दीड वाजता माझा मोबाईल वाजला.

प्रकरण आठवे

तो फोन वरुणचा होता.

आश्चर्यानेच मी फोन उचलल्यावर वरुणने अजून एक आश्चर्याचा धक्का दिला, “सर, प्लीज दार उघडा. मी बाहेर उभा आहे.”

माझी झोप खाडकन उतरली. मी घाईघाईने दार उघडलं. वरुण हातात मोठं पार्सल घेऊन उभा होता. तो कमालीचा उत्तेजित दिसत होता.

“सॉरी, सर! तुम्हाला अवेळी डिस्टर्ब करत आहे,” तो बोलला, “पण खूप महत्त्वाचा दुवा हाती लागला आहे. सकाळपर्यंत मी थांबू शकलो नसतो.”

तो आत आल्यानंतर त्याने पार्सल उघडलं. मी यांत्रिकपणे फक्त बघत उभा होतो. पुढचा तासभर वरुण नॉनस्टॉप बोलत होता. मी त्याला मध्ये अजिबात अडवलं नाही. जसजसा तो एकेक मुद्दा सांगत गेला, तसतसा माझ्या मनात एक-एक दुवा जुळत गेला. जिगसॉ पझलमध्ये प्रत्येक तुकडा आपापल्या जागी फिट बसला की सुस्पष्ट चित्र तयार होतं तसंच माझ्या मनात या संपूर्ण केसचं चित्र सुसंगत तयार झालं. मी पूर्णपणे हादरून गेलो होतो.

काय अफलातून प्लॅन आखला होता! जबरदस्त डोकेबाज व्यक्ती होती ती.खुनाचं मोटिव्हही मला समजलं होतं. अच्छा! तर यासाठीच केला होता सगळा अट्टाहास…

मी वरुणला अक्षरश: मिठी मारली आणि त्याला म्हणालो, “ग्रेट जॉब, वरुण! एवढ्या भयंकर षडयंत्राचा केवळ तुझ्यामुळे सुगावा लागला आहे. मी कुठल्या भलत्याच दिशेने तपास करत होतो. ऑल क्रेडिट गोज टू यू!”

वरुण एकदम संकोचून म्हणाला, “सर, माझा यात काहीही ग्रेटनेस नाही.”

“असं अजिबात म्हणू नकोस. तुझी सतर्कता आणि चाणाक्षपणा यामुळेच केवळ याचा पत्ता लागला आहे.”

आता पुढची बोलण्याची सूत्र मी हातात घेतली आणि वरुणला आपली लाइन ऑफ ऍक्शन काय असेल ते डिटेल समजावून सांगितलं. भोसल्यांना इनफॉर्म करायला हवं होतं. त्यांची मदत लागणारंच होती. ‘हिअर से एव्हिडन्स’ चा काहीही उपयोग नव्हता. त्यामुळे खुन्याचं स्टेटमेंट भोसल्यांना रेकॉर्ड करावं लागणारंच होतं. कुसुम मॅडमची उद्या भेट होऊ शकणार होती. अर्थात खुनी कोण ते आता समजलं होतं पण मॅडमच्या साक्षीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं असतं.

दूधवाल्याने दारावरची बेल वाजवली तेव्हा आम्ही भानावर आलो. सकाळचे सहा वाजले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हळूहळू सूर्यकिरणं सगळीकडे पसरायला लागली होती. वातावरण प्रसन्न होतं. आमची मन:स्थितीही तशीच होती. संभ्रमाचे सगळे ढग विरून गेले होते. सूर्यप्रकाशाइतक्याच सगळ्या गोष्टी स्वच्छ, स्पष्ट दिसत होत्या. सर्वात समाधानाची गोष्ट माझ्यासाठी ही होती की माझ्या परमस्नेह्यांना मी योग्य न्याय मिळवून देणार होतो. या केसमध्ये जर मी अपयशी झालो असतो तर स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. वरुणला मी गोखल्यांसकट सगळ्यांना अकरा वाजता धवलवर येण्यासाठी फोन करायला सांगितले आणि मी सुद्धा तयारीला लागलो.

अकरा वाजता मी धवलवर पोहोचलो तेव्हा सगळी मंडळी हजर होती. भोसलेही त्यांच्या दोन माणसांबरोबर आलेले दिसत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यांवर कमालीची उत्सुकता दिसत होती. सीमा मात्र परवाचा अनुभव लक्षात घेता एका कोपऱ्यात टेबलाला टेकून उभी होती. मी तिला सगळ्यांबरोबर सोफ्यावर बसायला सांगितलं. ती थोडीशी संकोचूनच बसली.

हॉलमधल्या मोठ्या आरशासमोर उभं राहून मी बोलायला सुरुवात केली, “असं म्हणतात, अ मिरर नेव्हर लाइज्. माणूस जसा आहे तसाच तो आरशात दिसतो. पण सायंटिफिकली बघितलं, तर हे चूक आहे. आपण नेहमी ज्या गोष्टी बघतो त्या थ्री डायमेन्शनल असतात आणि मिरर इमेज टू डायमेन्शनल आणि रिव्हर्स असते. मिरर हे ऑप्टिकल डिव्हाईस असल्यामुळे त्यातून लाईट रिफ्लेक्ट होऊन रिअल आणि व्हर्चुअल इमेजेस फॉर्म होतात. अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स-“

मध्येच शेखर माझं वाक्य तोडत म्हणाला, “काका,

मिरर इमेजेसची माहिती आम्हाला हवी तेव्हा आम्ही गुगलवर सर्च करू. तुम्ही एवढ्या घाईने आम्हाला का बोलवून घेतलंत ते सांगा.”

सगळेजण आता सत्य जाणून घ्यायला अधीर झाले होते. मी मात्र मुद्दाम वेळकाढूपणा करत होतो. प्रत्येकाची प्रतिक्रिया मला बारकाईने बघायची होती. अपेक्षित प्रतिक्रिया मला अपेक्षित चेहऱ्यावर दिसायला लागली होती.

मी हसत हसतच मगाचचाच मुद्दा पुढे रेटत म्हणालो, “चेहरा हा मानवी मनाचा आरसा समजला जातो. मनातल्या भावनांचं प्रतिबिंब अचूक चेहऱ्यावर उमटतं. पण काही माणसांच्या हेतूचा मात्र चेहऱ्यावरून काहीही थांगपत्ता लागत नाही. चेहऱ्यावरचे भाव लपवण्याचं कसब त्यांनी साधलेलं असतं. त्यामुळे समोरची माणसं मात्र फसतात. निर्विकार चेहरा ठेवून गुन्हेगाराला बेसावध ठेवणं ही माझ्या व्यवसायाची मात्र गरज आहे. मुव्हिंग ऑन… वरुण, ते पार्सल घेऊन ये.”

वरुणने बाहेर जाऊन गाडीच्या डिकीतून एक मोठं पार्सल आत आणलं आणि सगळ्यांसमोर उघडलं. आत असलेली शालन मॅडमची सहा ऍवॉर्ड विनिंग पेंटिंग्ज् बाहेर काढून भिंतीपाशी नीट उभी करून ठेवली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. अजूनही नक्की काय चाललंय याचा बोध कोणालाच होत नव्हता. थोड्याश्या नाट्यमय पद्धतीने खरा खुनी प्रकाशात आणण्याची माझी आवडती स्टाईल होती. त्यामुळे मी सगळ्यांची उत्सुकता अधिकाधिक ताणून धरत होतो.

“ही शालन मॅडमची ऍवॉर्ड विनिंग पेंटिंग्ज् आहेत. पण यातील एकही पेंटिंग ओरिजिनल नाही. कुणा व्यक्तीने या सगळ्या पेंटिंग्ज्ची सहीसही नक्कल चितारली आहे. कोणाला अशी संधी मिळू शकेल?”

सगळ्यांच्या माना एकजात सीमाकडे वळल्या. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर ओतप्रोत आश्चर्य.

“अगदी बरोबर,” मी प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणालो, “सीमा इज द मर्डरर्.”

प्रकरण नववे

रागाने थरथरत ताडकन उठून सीमा म्हणाली, “काय वाट्टेल ते आरोप करताय तुम्ही माझ्यावर! काय पुरावा आहे तुमच्याजवळ?”

तोपर्यंत भोसल्यांची दोन माणसं तिच्या दोन्ही बाजूंना येऊन उभी राहिली होती. काही चुकीची हालचाल तिने करू नये यासाठी ही दक्षता मी घेतली होती.

मी बोलायला सुरुवात केली, “सीमा, करेक्ट मी इफ आय ऍम रॉंग एनीव्हेअर… या सगळ्याची सुरुवात झाली ती कर्नलच्या विलच्या वाचनानंतर. शालन मॅडमने स्वतःला मिळालेल्या मोठ्या शेअरबद्दल सीमाला सांगितलं आणि इथेच या मास्टर प्लॅनचं बीज रोवलं गेलं. शालन मॅडम सीमाच्या उपकर्त्या असल्या तरी त्यांच्या स्वभावामुळे ती त्यांचा प्रचंड तिरस्कार करत होती. अर्थात त्यांच्या उपकाराची जाण ठेवून ती वागत होती, त्यांच्या चित्रकलेविषयी तिला प्रचंड आदर होता तरीही त्यांच्याबद्दलची अढी तिच्या मनात वर्षांनुवर्षं स्लो पॉयझनिंग सारखी झिरपत राहिली. तिच्या बुद्धीवर, मनावर अंमल गाजवू लागली.”

मध्येच मला थांबवून प्रमोद सरांनी विचारलं, “गौतमजी, दादाच्या विलचा सीमाला काय फायदा होणार होता?”

“देअर यू आर! आत्ता समजेल तुम्हाला तिचा काय फायदा होणार होता ते,” असं म्हणून मी शालन मॅडमच्या एका विशीष्ठ पेंटिंगजवळ गेलो. खिशातून पेपर नाईफ बाहेर काढून पेंटिंगच्या मागच्या चौकटीत एका ठिकाणी छेद दिला. चौकटीचा छोटा तुकडा अलगद बाहेर आला. आतल्या छोट्याश्या पोकळीत हात घालून मी काही कागदपत्र बाहेर काढले. ते स्टँम्पपेपर बघून सीमा अक्षरशः चवताळली. माझ्या हातातल्या कागदांवर ती झडप घालणार तेवढ्यात भोसल्यांच्या माणसांनी तिला पकडून ठेवलं. रागाने धुमसतंच ती कशीबशी उभी राहिली.

मी ते कागदपत्रं सगळ्यांना दाखवत बोललो, “हे शालन मॅडमचं विल. त्यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी सीमाच्या नावावर केली आहे. साधारण दीड वर्षांपूर्वी त्यांची शुगर एकदम शूट झाली होती. सीमानेच तेव्हा सगळी धावपळ करून त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. नंतर कर्नलना आणि तुम्हा सगळ्यांना कळवलं होतं. कर्नलबरोबर मी पण दोन-तीन वेळा मॅडमना भेटायला गेलो होतो. तुमच्यापैकी मात्र कोणालाच वेळ नव्हता त्यांना भेटायला यायला. सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या सबबी सांगितल्या होत्या. सीमानेच त्यांची सर्व देखभाल केली होती. तेव्हा त्या एकदा बोलता बोलता कर्नलना म्हणाल्या होत्या, ‘आता लवकरच मी माझं विल करून टाकणार आहे. या आजारपणामुळे मला जाणवलं की हे एक काम मार्गी लावलेलं बरं.’ नंतर त्यांनी विल केलं का, केलं असल्यास बेनिफिशिअरी कोण याची चौकशी मला करण्याचं काहीच कारण नव्हतं. पण या विलवरची तारीख त्यांच्या आजारपणानंतर लगेचचीच आहे. त्यांनी जेव्हा सीमाच्या नावे स्वत:च विल केलं तेव्हा त्यांची प्रॉपर्टी जास्ती नव्हती. त्यांच्या मते त्यांची पेंटिंग्ज् ही त्यांची संपत्ती होती.

“पण कर्नलनी जेव्हा आपल्या प्रॉपर्टीचा मोठा शेअर मॅडमना दिला तेव्हा मात्र सीमाचं विचारचक्र वेगाने फिरायला लागलं. त्यांचा काटा काढण्याची दोन सबळ कारणं म्हणजे त्यांच्याविषयीचा प्रचंड तिरस्कार आणि त्यांची प्रचंड संपत्ती. सीमाच्या मनात त्यांना आपल्या मार्गातून दूर हटवण्याची कल्पना चांगलीच मूळ धरू लागली. आणि कर्नलच्या मृत्यूनंतर तिला तशी संधी चालून आली. या षडयंत्राची पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे नक्कल. एक शालन मॅडमच्या हावभावांची, लकबींची हुबेहूब नक्कल आणि दुसरी त्यांच्या चित्रांची नक्कल. शालन मॅडम दिसायला चारचौघींसारख्या होत्या. खूप काही वैशिष्ठपूर्ण चेहऱ्याचे फीचर्स किंवा हेअर स्टाईल नव्हती. त्यामुळे त्यांचा गेटअप करणं सीमाला अवघड गेलं नाही. ती खरंच ऑल राऊंडर आहे. अभिनयकौशल्य, चित्रकारी, धाडसीपणा, निर्णयक्षमता, सूत्रबद्ध नियोजन करण्याची हातोटी, चौफेर वाचन, किती सांगू! पण भल्याभल्यांची मती फिरवणारा हा पैशांचा मोह, त्यामुळे तिच्या अंगच्या सगळ्या गुणांना अतिशय चुकीची दिशा मिळाली. कोणाला तिळमात्रही संशय येणार नाही असं कुटील कारस्थान तिने रचलं.”

“एक मिनिट काका,” शेखर मध्येच ओरडला, “मला आत्ता आठवलं. मामांच्या वाढदिवसाच्या साधारण दोन-तीन दिवसांनंतर सीमाचा मला फोन आला होता. तिला आमच्या नाटकाच्या प्रॉपर्टीतून केसांचा विग, चष्मा अशा किरकोळ दोन-तीन गोष्टी हव्या होत्या. तिच्या मुलीच्या गॅदरिंगसाठी या वस्तू हव्या आहेत असं तिने मला सांगितलं. माझ्यासाठी ही एकदमंच किरकोळ बाब होती. मी ड्रेपरी सेक्शनला फोन करून सीमाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या तिला देण्यास सांगितल्या. माझी स्वतःची टेन्शन्स इतकी होती की ही बाब मी पूर्णपणे विसरूनही गेलो होतो. बापरे! म्हणजे या गोष्टी तिने या षडयंत्रासाठी वापरल्या?”

“अगदी बरोबर. तिचं सगळं प्लॅनिंग अचूक होतं. शालन मॅडमच्या नकळत त्यांची नक्कल करण्याची प्रॅक्टिस ती एकीकडे करत होती आणि दुसरीकडे त्यांच्या पुरस्कार मिळालेल्या सहा चित्रांची डुप्लिकेट चित्रंही काढत होती. दोन्ही गोष्टी सोप्या नव्हत्या. पण तिची जिद्द आणि चिकाटी वाखाणण्यासारखी होती. वाढदिवसानंतर चक्रदेवांचा दोन-तीन आठवड्यातच मृत्यू झाल्यामुळे तिने आपल्या प्लॅनला गती दिली. आणि चक्रदेवांच्या क्रियाकर्मानंतरच्या दुसऱ्या दिवशी आपण सगळे एकत्र जमलो होतो तेव्हा स्वतःच्या नाटकाचा जणू शुभारंभ तिने केला. आदल्या दिवशी रात्री तिने शालन मॅडमना वेलॉनॉक्स च्या 10-mg ऐवजी 20-mg ची गोळी दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दिवसभर त्या गुंगीतच होत्या. त्यांना आजूबाजूचं कुठलंही भान नव्हतं. आणि सीमा त्यांच्यासारखा गेटअप करून धवलवर आली. एखाद्या कसलेल्या कलाकाराप्रमाणे तिने हुबेहूब मॅडमची भूमिका वठवली. कर्कश्य आवाजात बोलणं तर तिला परफेक्ट जमलं होतं. प्लॅनचा पुढचा भाग म्हणून तिने चक्रदेवांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याच्या संशयाचं पिल्लू सोडून दिलं. प्रिया आणि शेखर चक्रदेवांना शेवटचे भेटले होते ही माहिती रमेशला विचारून त्या दोघांकडे तिने संशयाची सुई वळवली. हेतू फक्त हाच की शालन मॅडमचा खून केल्यानंतर साहजिकच ह्या दोन मृत्यूंमध्ये समान धागा आहे आणि दोघांचाही खुनी एकच आहे असं सर्वांना वाटावं.

“त्यादिवशी रात्रीही तिने वेलॉनॉक्सचा डबल डोस मॅडमना दिला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रिया आणि शेखर जेव्हा त्यांना भेटायला आले होते तेव्हा मॅडमवर झोपेचा अंमल असल्यासारख्या वाटत होत्या. ती दोघं निघून गेल्यानंतर सीमाने मॅडमना एअर बबल इंजेक्शन दिलं. कुठलीही मेडिकल हेल्प न मिळाल्यामुळे थोड्याच वेळात शालन मॅडमचा मृत्यू झाला. त्यांचा अचानक मृत्यू झाल्यावर मी मृतदेहाची खूप बारकाईने तपासणी केली. तेव्हा मला त्यांच्या हातावर इंजेक्शनची खूण दिसली. कुठलेही इंजेक्शन एवढ्यात त्यांना दिलं गेलं नव्हतं ही खात्री करून घेतल्यावर मला एम्बॉलिझमचा संशय आला. तरीही सीमावर संशय घेण्याचं काही कारणंच नव्हतं. कर्नलचाही अशाच प्रकारे खून करण्यात आला असावा का या विचाराने मात्र मी खूप अस्वस्थ झालो. सीमा फक्त एवढ्यावरच थांबली नाही.

“स्वतःवर कोणी संशय घेऊ नये म्हणून मॅडमच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी तिने स्वतःवरच विषप्रयोग करवला. आपल्या जीवाला काही धोका पोहोचणार नाही याची खबरदारी घेत अगदी अल्प प्रमाणात सोडियम सायनाइड नावाचं पेस्टिसाइड प्रियाने दिलेल्या डब्यात तिने मिक्स केलं. भोसल्यांना फोन करून, ते इथे यायला निघाले आहेत याची खात्री करून मगच तिने तो डबा थोडासा खाल्ला. तिच्या अपेक्षेप्रमाणेच भोसल्यांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. जर भोसले अव्हेलेबल नसते तर तिने नक्की मला फोन केला असता. मिळणाऱ्या एवढ्या मोठ्या संपत्तीच्या मानाने एवढीशी रिस्क काहीच नव्हती.

“लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे मी मात्र चक्रावून गेलो होतो. सीमालाही टारगेट केलेलं बघून कोणीतरी पूर्ण चक्रदेव घराण्यातील लोकांना संपवण्याच्या मागे आहे असा संशय मला यायला लागला होता. म्हणून मी त्यांचा पूर्ण भूतकाळ खणून काढायचं ठरवलं होतं. सीमाने मॅडमच्या घरी छोट्याशा जागेत अतिशय कलात्मक पद्धतीने छानशी फुलझाडे लावली आहेत. त्या बागेत बांधकामाचे साहित्य ठेवलेले छोटं कपाट आहे त्यात आम्हाला सोडियम सायनाइड या पेस्टिसाइड ची बाटली सापडली.”

“ओ माय गॉड!” आता प्रिया एकदम ओरडली. “काका, ते पेस्टिसाइड मी तिला आमच्या रिसर्च सेंटर मधून दिलं होतं. एवढंच नाही तर तिला सहा इंजेक्शनच्या सिरिंजचा पॅक पण दिला होता. सोडियम सायनाइड माणसांसाठी जीवघेणं ठरू शकतं. हातांना कुठे कट वगैरे असेल तर हॅन्डग्लव्हज् मधून ते जखमेत शिरायची रिस्क नको म्हणून मी तिला त्या इंजेक्शनच्या सिरिंज् दिल्या होत्या. त्यातूनच ते औषध झाडांना इंजेक्ट करायला तिला सांगितलं होतं. त्याच इंजेक्शनचा प्रयोग तिने आत्यावर केला?”

“सकृतदर्शनी तरी तसंच दिसतंय. नाऊ लेट्स मूव्ह ऑन टू पेंटिंग्ज्! शालन मॅडमची इंटरनॅशनल अवॉर्ड विनिंग सहा चित्रं सीमाने या माणसाला विकली असावीत,” असं म्हणून मी मगाचच्याच चौकटीच्या पोकळीत हात घालून एक व्हिजिटिंग कार्ड बाहेर काढलं. ते बघितल्यावर सीमाचा उरलासुरला धीरही खचला. ती मटकन तिथल्या एका खुर्चीवर बसली.

मी पुढे बोलायला लागलो, “मनसुखलाल शर्मा असं या माणसाचं नाव कार्डवर आहे. कदाचित त्याने ही पेंटिंग्ज् विकत घेण्याची ऑफर मॅडमना दिली असणार. त्याने आपलं कार्डही तेव्हा त्यांना दिलं असणार. अर्थातच मॅडम या गोष्टीला राजी होणं शक्यच नव्हतं. मॅडमचा काटा काढल्यानंतर सीमाने ओरिजिनल पेंटिंग्ज् शर्माला विकली असावीत. कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की सीमासुद्धा मॅडमच्या सहवासात राहून त्यांच्या तोडीस तोड चित्र काढू शकते. मॅडमएवढी प्रगल्भ कल्पनाशक्ती तिच्याकडे नसली तरी चित्राची नक्कल ती खूपच चांगली करू शकते. मी आणि वरुण जेव्हा चित्रांच्या शिफ्टिंगच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी सीमाला भेटायला गेलो होतो तेव्हा वरुणला सीमाच्या रूममध्ये शिरतांच पेंट्सचा वास जाणवला होता. शालन मॅडमना जाऊन जवळजवळ दोन आठवडे झाले होते. शिवाय सीमाही नुकतीच जिवावरच्या संकटातून बचावून हॉस्पिटलमधून परतली होती. आत्ता पेंटिंग्ज् करण्याएवढी सीमाची तब्येत सुधारलेली नसताना एवढ्या घाईने पेंटिंग करायचं काय कारण असावं हा प्रश्न वरुणला सतावत होता. वरुणने ही सहा चित्रं बघितल्यावर ती ओरिजिनल नसावीत असा दाट संशय आला. चित्रांच्या ओरिजिनॅलिटीची खात्री करून घेण्यासाठी त्याने या चित्रांचं त्याच्या चित्रकार मित्राच्या मदतीने कार्बन डेटिंग करून घेतलं. आणि ही सहा चित्रं डुप्लिकेट असल्याचं त्याला समजलं. कार्बन डेटिंग करताना त्याने चित्रं चौकटीपासून वेगळी केली होती. त्या वेळेस एका चित्राच्या चौकटीत त्याला हा चोरकप्पा दिसला. त्यात असलेलं विल आणि व्हिजिटिंग कार्ड पाहिल्यावर तो त्याच क्षणी, रात्री दीड वाजता माझ्याकडे आला. मग सगळ्या घटनांची सुसूत्र साखळी ओवली गेली.

“आता नाटकाचा शेवटचा अंक! चार दिवसांपूर्वी आपण सगळे इथेच भेटलो होतो. तेव्हा सीमा सहज बोलली होती, ‘मागच्या वेळेस सेंटरपीसवर असलेली एक छान फुलदाणी आता दिसत नाहीये’. तेव्हा मी चमकलो होतो. कारण ती आधी कधीही इथे आली नव्हती, मग तिला त्या फुलदाणी विषयी कसं काय समजलं? अर्थात त्यावेळेस मी या गोष्टीला जास्ती महत्व दिलं नाही. ती माझी खूप मोठी चूक होती. कुसुम मॅडम या आरशापाशी उभ्या होत्या, तेव्हा आरशातून सीमाला बघताना एका क्षणी त्यांच्या चेहर्‍यावर मला विलक्षण भाव दिसले होते. खूप गहन कोडं अनपेक्षितरीत्या सुटल्यावर त्याचं तितकंच अनपेक्षित उत्तर समोर आल्यावर एखाद्याची जी रिऍक्शन होईल तशीच रिऍक्शन कुसुम मॅडमची होती. नंतर पायऱ्यांवरून गडगडत खाली आल्यावर शुध्द हरपण्यापूर्वी त्यांचे शब्द होते, ‘सीमा मान.’

शी वॉज टॉकिंग लिटरली! तेव्हा मला असं वाटलं की सीमाचा अपमान केल्यामुळे तिने त्यांना जिन्यावरून ढकललं असं त्या सांगत आहेत. पण ती तर तेव्हा किचनमध्ये होती. हॉलमधून जिन्यावर गेली असती तर आम्हाला नक्कीच दिसली असती. मुख्य म्हणजे कुसुम मॅडमच्या समोरूनच तिला वर जावं लागलं असतं. समोरून धक्का मारणं कसं काय शक्य होतं? त्यामुळे तेव्हाही मी तिच्यावर संशय घेतला नाही.

“मी आणि वरुण जेव्हा सीमाला भेटायला मॅडमच्या घरी गेलो होतो तेव्हा तिच्या रूममधल्या ड्रेसिंग टेबलवर मॅडमचा मान कलती करून बोलतानाचा फोटो पाहिला तेव्हा मला आश्‍चर्य वाटलं होतं. त्यांचा फोटो स्वतःच्या ड्रेसिंग टेबलावर ठेवण्याऐवढे बंध त्या दोघींमध्ये नक्कीच नव्हते. त्याही कोड्याचं उत्तर मला काल रात्री मिळालं. सीमा त्या फोटोकडे बघून शालन मॅडमच्या हावभावांची, लकबींची आरशात बघून नक्कल करत होती. पण हे करताना अनावधानाने तिच्या हातून एक मोठी चूक घडली होती. मॅडमचा फोटो तिच्या समोर असायचा त्यामुळे फोटोत जरी त्यांची मान उजवीकडे झुकलेली होती तरी सीमाला दिसताना ती तिच्या डाव्या बाजूला झुकलेली दिसायची त्यामुळे ती पण डावीकडे मान झुकवून बोलायची प्रॅक्टिस करत गेली. हा फरक तिच्या अजिबात लक्षात आला नव्हता. सीमा प्रचंड शार्प आहे त्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे तिला आपली चूक मागावून नक्कीच लक्षात आली असणार. त्यामुळेच चार दिवसांपूर्वी कुसुम मॅडम आरशापुढे उभं राहून सीमाला बघत असताना त्यांचा अचानक बदललेला चेहरा आणि त्या मला काहीतरी महत्वाचं सांगणार असल्याचं त्यांचं बोलणं याची लिंक तिला लगेच लागली.

“आता प्रश्न असा आहे की सीमा इतक्या झटपट जिन्यावर त्यांच्यामागे कशी आली? काल रात्री तेही कोडं सुटलं. सीमानेच कुसुम मॅडमना त्या बेसावध असताना मागून धक्का दिला होता. पण हॉलमधून समोरून जिन्यावर जाऊन नाही. तुम्हाला बहुतेक माहित असेल, किचनमधून मागच्या बागेत उघडणारं एक दार आहे. बागेतून वरच्या बेडरूम्सच्या पॅसेजमध्ये जाणारा एक चिंचोळा जिना आहे. कर्नल कधीच त्याचा वापर करत नसत.पण पूर्वी बंगला बांधताना तो जिना बांधला गेला होता तो तसाच होता. रोज रात्री रमेश त्याला कुलूप लावून ठेवतो आणि सकाळी कुलूप काढून ठेवतो. किचनमध्ये ते दार आहे हे नवख्या माणसाला अजिबात समजत नाही. किचन फर्निचरचाच एक भाग वाटावा म्हणून बाकी किचन कॅबिनेटना जसा सनमायका आहे तसाच त्या दारालाही आहे. त्यामुळे पाहणाऱ्याला ते कपाटंच वाटतं. सीमा जर पहिल्यांदाच आली असती तर तिला ते दार कळणं अशक्य होतं. निदान तोपर्यंत माझी तशीच समजूत असल्याने सीमाला कुसुम मॅडमना ढकलण्याची संधी मिळणं शक्य नाही असंच मला वाटलं होतं. शिवाय बाकीचे गौप्यस्फोट झाले नसल्यामुळे एवढ्याशा अपमानावरून सीमा या थराला जाईल असंही मला वाटलं नाही. कुसुम मॅडमच्या बोलण्याचा अर्थ मला लावता आला नाही हेच खरं.

“सीमा शालन मॅडम बनून जेव्हा धवलवर आली होती तेव्हा मला आठवतंय, किचन मधला दरवाजा रमेशने काही कारणासाठी उघडला होता तेव्हा ती त्या दारातून बागेत गेली होती. बागेतून वरच्या बेडरूमकडे जाणारा जिना तिला रमेशने दाखवला होता. मी आत्ता आल्याआल्या त्याच्याशी या संदर्भात बोललो तेव्हा त्याने ही माहिती मला दिली. अर्थात तेव्हा आपल्या सगळ्यांनाच त्या शालन मॅडम आहेत असंच वाटत होतं. त्यामुळे रमेशला थोडं आश्चर्य वाटलं होतं की मॅडमना हा जिना कुठे जातो हे इतक्या वर्षात कसं काय माहित नाही? पण त्यांचा स्वभाव बघता तो जास्त काही बोलला नाही. सीमाने केवळ तिच्या चौकस स्वभावामुळे या जिन्याची चौकशी केलेली होती. या जिन्याचा वापर करण्याची वेळ आपल्यावर येईल असं तिला तेव्हा मुळीच वाटलं नव्हतं. कारण कुसुम मॅडमना जिन्यावरून ढकलण्याचा प्लॅन तिला ऑन द स्पॉट बनवून अमलात आणावा लागला होता.

“मी आज सकाळी इथे यायच्या आधी कुसुम मॅडमना हॉस्पिटलमध्ये भेटून आलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की कर्नलच्या कायदेशीर सोपस्कारांच्या वेळेस जेव्हा सीमा शालन मॅडमचा गेटअप करून आली होती तेव्हा तिची डावीकडे मान झुकवून बोलण्याची लकब त्यांना खटकत होती. काहीतरी चुकतंय असं सारखं त्यांना वाटत होतं म्हणून त्या जरा निरखून तिच्याकडे बघत होत्या. काय चुकतंय हे तेव्हा त्यांच्या लक्षात येत नव्हतं. नंतर तिने कर्नलच्या मृत्यूच्या संदर्भात प्रिया आणि शेखरवर आरोप केले त्यामुळे सगळं चित्रंच बदललं. ही गोष्ट तेव्हा त्यांच्या मनातून पार पुसली गेली. चार दिवसांपूर्वी त्या इथे सहज आरशासमोर उभा असताना सीमाला त्यांनी आरशात बघितलं तेव्हा तिची मान थोडीशी डावीकडे झुकलेली होती. तेव्हा त्यांना एकदम जाणवलं की शालन मॅडम त्यादिवशी उजवीकडे मान झुकवून नाही तर डावीकडे मान झुकवून बोलत होत्या आणि तेच त्यांना सतत खटकत होतं. प्रचंड आश्चर्य वाटून त्या मला सांगायला वळल्या तेवढ्यात गोखले आले होते आणि सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगण्यापेक्षा मला एकट्यालाच सांगावी म्हणून त्यांनी मला नंतर वर बोलावलं होतं. जिन्याच्या वरच्या पायरीवरून माझ्याशी बोलल्यावर त्यांना चाहूल लागली म्हणून त्या अर्धवट वळल्या तेव्हा त्यांना मागे सीमा उभी असलेली दिसली. दचकणं, आश्चर्य आणि प्रचंड भीती या संमिश्र भावना त्यांच्या मनात उमटत असतानाच तिने त्यांना जिन्यावरून ढकलून दिलं. क्रूरपणाचा कळस होता तो. त्यांच्या सुदैवाने त्या यातून वाचल्या आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्जही मिळेल. आज सुरुवातीला मिरर इमेजविषयी मी जे बोलत होतो ते कुठल्या कॉन्टेक्सटमध्ये बोलत आहे ते सीमाला ताबडतोब कळलं आणि ती खूप अस्वस्थ झाली होती. तिची हीच रिॲक्शन मला बघायची होती.

“माझ्या अंदाजाप्रमाणे मी सगळं चित्र सुस्पष्टपणे तुमच्यासमोर उभं केलं आहे. सीमाच खुनी आहे. एक खून आणि दुसऱ्या खुनाचा प्रयत्न असे चार्ज तिच्यावर आहेत.”

“हो, मी खुनी आहे,” सीमा अचानक ओरडत उठली. “मी खुनी आहे. शालन मॅडमना मी मारलं. कुसुम मॅडमना मी जिन्यावरून ढकललं. ओरिजिनल चित्रं मी शर्माला विकली. त्या बदल्यात त्याने मला पंचवीस लाखांचा चेक दिला. तो अजून मी एनकॅश केलेला नाही.”

एव्हाना भोसल्यांनी तिच्या या कबुलीजबाबाचं रेकॉर्डिंग सुरू केलं होतं.

ती पुढे बोलत होती, “शालन मॅडम चित्रकार म्हणून कितीही ग्रेट असल्या तरी एक व्यक्ती म्हणून अतिशय कोत्या स्वभावाच्या होत्या. प्रचंड फटकळ होत्या. मी त्यांना सुरुवातीला ‘ताई’ म्हणायला लागले होते तेव्हा त्यांनी मला लगेच फटकारलं होतं. ‘हे बघ सीमा, स्वतःची पायरी ओळखून वाग. नस्ती नाती जोडू नकोस. मला तू मॅडमंच म्हणायचंस.’ त्यांचे माझ्यावर खूप उपकार असले तरी त्याची परतफेडही माझ्यापरीने मी कायमंच करत आले. त्यांच्या घरकामाव्यतिरिक्त बाहेरची बरीचशी कामं, बँकेचे किरकोळ व्यवहार, आजारपणात त्यांची देखभाल हे सर्व मी आपलेपणाने केलं. पण त्यांनी कधीही माझं कौतुक केलं नाही. फक्त आणि फक्त सतत पाणउतारा केला, कायम आश्रितासारख्या वागवत राहिल्या. ‘हो मॅडम… नाही मॅडम… करते मॅडम… आणते मॅडम…’ अहोरात्र फक्त मॅडम, मॅडम आणि मॅडम! त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड तिरस्कार, द्वेष निर्माण झाला. वर्षांनुवर्षं तो मनात साचत राहिला आणि त्यांना मारण्याचे विचार माझ्या मनात यायला लागले. माझ्या नावावर त्यांनी जरी विल केलं असलं तरी तेव्हा त्यांच्याकडे फारसे पैसे अजिबात नव्हते. होती फक्त चित्रं. पूर्वी एकदा शर्मा घरी आला होता आणि त्याने मॅडमना ती चित्रं विकत घेण्याची ऑफर दिली होती. मॅडम त्याच्यावर प्रचंड संतापल्या होत्या. त्यांनी त्याला जवळजवळ हाकलून लावलं होतं. मॅडमने फेकून दिलेलं शर्माचं व्हिजिटिंग कार्ड मी माझ्याकडे ठेवलं होतं. त्यावरून मी त्याला कॉन्टॅक्ट करून सहा चित्रांचा सौदा ठरवला.

“शालन मॅडम बनून मी जेव्हा धवलवर आले होते तेव्हा कुसुम मॅडम मला सारख्या निरखून बघत होत्या. माझ्या अभिनयात काही उणीव राहिली आहे का या विचाराने मी तेव्हा जरा गडबडले होते. नंतर मात्र प्रदीपसरांच्या मृत्यूविषयी वादळी विधान केल्यामुळे त्यांचं माझ्याकडे निरखून बघणं थांबलं होतं. पण माझ्या मनात तो भुंगा सतत राहिला होता आणि घरी आल्यावर आरशासमोर उभे राहून शालन मॅडमची नक्कल करून बघताना एका क्षणी मला जाणवलं की मी उजव्याऐवजी डावीकडे मान झुकवून बोलत आहे. तेव्हा जरी माझी चूक कुसुम मॅडमच्या लक्षात आली नसली तरी त्यांना माझा संशय खासंच आला होता. त्यामुळे आता त्यावर त्यांना जास्ती विचार करायला वेळ देणं धोक्याचं होतं. शिवाय प्रदीप सरांच्या मृत्यूविषयी शालन मॅडमनी शंका व्यक्त केल्यावर लगेच त्यांचाही मृत्यू व्हावा यावरून त्या दोघांचेही खून झाले असून खुनी व्यक्ती एकच आहे असं वाटावं म्हणून मी दुसर्‍याच दिवशी मॅडमना एअर बबल इंजेक्शन देऊन मारलं. माझ्यावर कोणाचाही संशय येऊ नये म्हणून मला कुठलाही धोका होणार नाही अशा पद्धतीने स्वतःवरच विषप्रयोग करवला. परवा आरशातून बघताना कुसुम मॅडमना माझं गुपित कळल्याचं त्यांच्या चेहर्‍यावरून मला जाणवल्यावर मला त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न करावा लागला.

“आयुष्यभर मॅडमची सेवा केल्याबद्दल, माझी उमेदीची सगळी वर्षं त्यांची ताबेदारी सहन केल्याबद्दल त्यांच्या पैशांवर माझा हक्क होतांच… होता नाही… आहेच!”

आणि अचानक तिच्यात बदल झाला. मान झुकवून, आत्तासुद्धा डावीकडेच, कर्कश्य आवाजात, अर्धवट डोळे मिटून ती हुबेहूब शालन मॅडमच्या आवाजात बोलायला लागली. सर्व काही माहीत असूनही अंगावर सरसरून काटा आला. आपली सगळी स्वप्नं डोळ्यांदेखत उधळली गेलेली बघून तिच्या मनाचा तोल पूर्णपणे ढळला होता. भोसले त्यांच्या माणसांच्या मदतीने तिला पोलीस स्टेशनवर घेऊन गेले.

पुढची सगळी चक्रं खूप वेगाने फिरली. आज दोन- अडीच महिन्यांतच ‘शालन आर्ट गॅलरी’च्या उद्घाटनासाठी पुन्हा आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. गोखल्यांच्या ओळखीच्या इंटिरियर डिझायनरने इतक्या कमी कालावधीत धवलचं आर्ट गॅलरीत रूपांतर करण्याची किमया केली होती. प्रिया आणि शेखरने खूप मेहनत घेऊन या पूर्ण प्रोजेक्टची धुरा सांभाळली होती. पैशांच्या अतिमोहाची परिणीती काय होते ते दोघांनाही या प्रकरणामुळे चांगलंच समजलं होतं. कदाचित चुकीच्या मार्गावर भरकटण्यापासून ती दोघंही बचावली होती. वरुणही त्यांच्या मदतीला होताच. भोसल्यांनी तातडीने शर्माला गाठून त्याचा चेक त्याला परत करून सहा मूळ चित्रं परत मिळवली होती. तो तयार नव्हतांच. कारण त्या चित्रांचं ब्लॅक मार्केटिंग करून त्याला खोऱ्याने पैसे मिळाले असते. आपला पोलिसी हिसका भोसल्यांना त्याला दाखवावा लागलांच.

आर्ट गॅलरीच्या प्रवेशद्वारापाशीच वरुणने काढलेली कर्नल आणि शालन मॅडमची लाइफ-साइज पोर्ट्रेटस् निमंत्रितांचे सुहास्य मुद्रेने स्वागत करत होती. प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते आर्ट गॅलरीचं उद्घाटन झालं. सगळेजण आत गेले.

मी आणि वरुण अजून कोणी निमंत्रित आले तर त्यांच्या स्वागतासाठी थोडावेळ बाहेरच थांबलो होतो. नेहमी जीन्स, टी-शर्ट मध्ये असणारा वरुण आज कुर्ता-पायजमा घातल्यावर एकदम गोंडस दिसत होता.

मी त्याला म्हणालो, “वरुण, आजचा दिवस केवळ तुझ्या सतर्कतेमुळे दिसत आहे. या केसमध्ये माझ्या नकळत मी भावनिकरित्या गुंतल्यामुळे नेहमीसारखा ऍलर्ट अजिबात नव्हतो. सगळं श्रेय फक्त तुलाच आहे. आता मी खरंच म्हातारा झालो आहे.”

“सर, तुम्हाला कोण म्हातारा म्हणेल? तुम्ही अजूनही तितकेच डेअरडेव्हिल आहात.”

“अरे, आता कुठला आलोय डेअरडेव्हिल! पन्नाशी पार केली की मी. बाय द वे वरुण, मला एक प्रश्‍न नेहमी पडतो, तू अजून सिंगल कसा काय? तुझ्यासारख्या इतक्या हुशार, हँडसम, डॅशिंग मुलाला मुलींनी मोकळं कसं काय ठेवलं?”

“सर… आपण आत जाऊयात का?”

मी हसत-हसतंच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि आत जायला निघालो. जाताना मी सहज कर्नलच्या पोर्ट्रेटकडे वळून पाहिलं. ते माझ्याकडे समाधानाने बघून हसत असल्याचा मला भास झाला.

माय गुड ओल्ड फ्रेंड...



Rate this content
Log in

Similar marathi story from Crime