Jyoti gosavi

Drama Crime

4.5  

Jyoti gosavi

Drama Crime

माझ्या घरातील चोरी

माझ्या घरातील चोरी

11 mins
1.3K


ही घटना आहे 1996 सालची, जो मुलगा आता पंचवीस वर्षाचा आहे तो त्यावेळी माझ्या पोटात होता. मोठा तीन वर्षाचा आणि छोट्या च्या वेळी मला आठवा महिना चालू होता. दोघेजण नोकरी करणारे असल्यामुळे घरात कामवाल्या बाईची नितांत गरज होती. तशी मी शोधात होते. वटपौर्णिमेचा तो दिवस होता. मी आपल्या परंपरेप्रमाणे सर्व दागिने घालून नटून थटून वडाची पूजा करून घरी आले. आणि एकदम देवदूताला प्रमाणे माझ्या मैत्रिणीच्या ओळखीच्या, केळी विकणाऱ्या एका आजी एक सोळा सतरा वर्षाच्या मुलीला कामाची गरज आहे तिला कामावर ठेवता का? असे विचारत घेऊन आल्या. मला तर कामवालीची गरज होती मी एका पायावर तिला ठेवून घेतली. त्यातून 24 तास घरात राहणारी म्हटल्यावर सोने पे सुहागा! नंतर तो सुहागा माझ्या घरातील सोन्याला भारी पडला. मी एकदम खुश झाले आजी म्हणाल्या "बघा तिला तुमच्या लहान बहिणीप्रमाणे वागवा, प्रेमाने वागवा ,तिची जबाबदारी माझ्यावर आहे ,असे मला बजावून त्या आजी निघून गेल्या. मी पण तिला माझ्या लहान बहिणी प्रमाणे वागवत होते .माझ्या घासातला घास काढून तिला देत होते. एक वेळ सकाळचा नाश्ता मी केला नसला तरी तिला मात्र घरात असेल ते बटर /बिस्कीट काहीबाही काढून चहाबरोबरती देत होते.


ती घरातली सर्व कामे मन लावून करत होती. खाऊन-पिऊन पाचशे रुपये पगार ठरला. तिच्याबाबत मला मात्र काही माहिती नव्हते. खरोखरी पोलिस नेहमी सांगतात   तुमच्याकडे असणाऱ्या कामवाल्या बाईचा पत्ता, फोटो ,घेऊन ठेवा. एखादा ऍड्रेस प्रूफ, देखील घेऊन ठेवा. परंतु ही गोष्ट नंतर पटते. मला मी तिला नेहमी घरच्यांबाबत विचारत असे. तेव्हा ती घरामध्ये आई-वडील व भाऊ आहे असे सांगत होती. भांडुपच्या येथील खिंडीपाडा

झोपडपट्टीमध्ये कुठेतरी त्यांची झोपडी आहे असे समजले.


ते जुलै महिन्याचे दिवस, एकदा खूप पाऊस झाला. एकदा जोराचा वारा सुटला तेव्हा "बघा ना ताई! आमची झोपडी डोंगरावर असल्याने वाऱ्याने उडून जाते तेवढे ती मला बोलली होती. ती माझ्याकडे नीट राहावी म्हणून मी तिला एक छानसा ड्रेस घेऊन दिला. पावसाळी छत्री घेऊन दिली. पण एकदम पूर्ण विश्वास मात्र मी तिच्यावरती टाकला नव्हता. मी रोज कपाटाला लॉक करून त्याचा हँडल रोज चेक करून ओढून किल्ली बरोबर कामावर घेऊन जात होते. वटपौर्णिमेला माझ्या अंगावरचे दागिने बघून तिने मला आल्या आल्या एक प्रश्न मात्र विचारला की ताई तुम्ही नेहमी एवढे दागिने घालता का? मी मूर्ख होते की मला या प्रश्नाबाबत काही वावगे वाटले नाही. काही समजले नाही.

मी तिला म्हटले की, अगं नेहमी नाही घालत, सणावाराला कधीतरी घालते. त्यानंतर तो संवाद मी विसरून देखील गेले होते परंतु ती मात्र विसरली नव्हती. साधारणतः पंधरा दिवस झाले आणि तो रविवारचा दिवस होता. माझी मॉर्निंग ड्युटी होती. आम्ही मेंटल हॉस्पिटलच्या कॉटर्स मध्ये राहत असल्याने ड्युटीचे आणि आणि घर यामध्ये काही फारसे अंतर नव्हते. आमच्या क्वाटर्स ची लाईट गेल्याने नळाला पाणी देखील नव्हते. त्यामुळे मी डबा बनवला नाही आणि सरीताला खालून दोन कळशा पाणी भरून आण. आणि मला पोळी-भाजीचा डबा घेऊन नंतर हॉस्पिटलमध्ये ये! असे सांगितले आणि मी कामावर गेले.

हो ताई बिनघोर तुम्ही पुढे जा! मी डब्बा घेऊन येते असे आश्वासन तिने मला दिले.

मी ठाणे मेंटल हॉस्पिटल येथे मनोविकृतीतज्ज्ञ परिचारिका या पदावरती कार्यरत होते. मी कामावर गेले आणि मिस्टरदेखील काहीतरी त्यांच्या कामासाठी डोंबिवलीला गेले. एकतर सकाळी कामावर निघायला उशीर झालेला, मिस्टरांनी घाईघाईने कपाटाला लाॅक केले आणि किल्ली माझ्या खिशात टाकली आणि दोघेजण आम्ही बाहेर पडलो. घरामध्ये मोठा मुलगा चिन्मय तो तीन वर्षाचा होता. ती आणि तो असे दोघेच घरात होते. बारा वाजले, एक वाजला, दीड वाजला तरी डब्याचा पत्ता नाही. एकतर आठ महिन्याचे बाळ पोटात असल्यामुळे मला कडकडून भूक लागलेली होती. मी तिच्या येण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात मिस्टर मला न्यायला स्कूटर घेऊन आले. मी त्यांच्यावरती भडकले का हो तुमचा डबा कुठे राहिला? सरीता कुठे गेली? बायको आठ महिन्यांची गरोदर आहे तिच्या पोटापाण्याची काही चिंता? मी त्यांच्यावर ती चिडले. अगं मी घरी गेलो नाही. मी पण आत्ताच येतोय बिल्डिंगच्या खालूनच मी गाडी घेतली आणि तुला न्यायला आलोय, असे ते बोलले. आम्ही दोघे घरी आलो घराच्या दरवाजाला बाहेरून कडी होती. आतमध्ये गॅसवर कुकर होता त्याच्या दणादणा शिट्यांचा आवाज बाहेर येत होता. पहिला घरात जाऊन गॅस बंद केला.


माझा तीन वर्षाचा मुलगा बेडवरची झोपलेला होता आणि सरिताचा घरात कुठेच पत्ता नव्हता. मी मुलाला हलवून हलवून जागं करण्याचा प्रयत्न केला. आणि सरिता ताई कुठे गेली? म्हणून विचारले पण त्याला काही सांगता येईना. त्याच्या डोळ्यावर मला प्रचंड झोप दिसत होती. बहुदा तिने त्याला अफू वगैरे घातली असावी. पण नशीब चांगले होते म्हणून तिने मुलाला काही केले नाही. आम्ही दोघांनीदेखील जेवण केले.


त्यावेळी दूरदर्शन आणि डीडी मेट्रो असे दोनच चॅनल होते. त्याच्यावरती दुपारी एक पिक्चर पाहीला. तिने लावलेल्या कुकर मधील वरण-भात बाहेर काढून जेवण केले आणि दुपारची  झोपदेखील काढली. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि एका ठिकाणी घर बुकिंग केले होते, बिल्डरला त्याचा चेक द्यायचा होता म्हणून खिशातली किल्ली काढून कपाट उघडायला गेले तर, काय कपाट उघडेच, त्याच्या आतला लॉकर उघडला तर तो लॉकरदेखील उघडा, व त्याच्याआत भिंतीमध्ये छोटा लॉकर असतो त्याला किल्ली लावली तर तो पण उघडा, आणि आतील सर्व दागिने, पैसे गायब. जसजसे मी एक एक दरवाजा उघडत होते तसे तसे माझ्या काळजावर अक्षरशः जड वजन ठेवल्याप्रमाणे वाटत होते. हात थरथरत होते आणि शेवटचा कप्पा मोकळा बघितल्यावर, मी यांना अहो! इकडे या म्हणून जोराने हाक मारली आणि समोरचा मोकळा लॉकर बघून दोघे सुन्न झालो.


मी घरात पाऊल टाकल्यापासून मला सरिता दिसली नव्हती. पण मला असे वाटले ही तरुण वय आहे गेली असेल नोकरी सोडून. कोणाच्यातरी नादाने भरकटतं पण तिने चोरी केली असेल व आपली आतापर्यंतची कमाई लुटली असेल असे मात्र वाटले नव्हते. कारण एक चावी माझ्या खिशात होती आणि त्याची दुसरी चावी कपाटातला ड्राॅवर आणि साईड कप्पा त्याच्या मधल्या पोकळीत होती. पण आमच्या दुर्दैवाने त्यांनी सकाळी सकाळी घाईघाईत कपाट लावले, पण चेक केले नाही. कपाट उघडेच राहीले. आणि आयतीच दुसरी चावी ड्राॅवरच्या पोकळी ठेवलेली, ती तिच्या हाती सापडली. आम्ही स्वतः गोदरेज कपाट घेईपर्यंत ड्रावर आणि कपाटाची भिंत त्यात पोकळी असते किंवा  लाॅकर च्या आत मध्ये अजून एक छोटा लाॅकर असतो हे आम्हाला माहित देखील नव्हते. परंतु सरिताला सारे काही माहीत होते. कारण ती सराईत चोरटी होती. आणि रोज ती माझ्या कपाटाचा दरवाजा चेक करत होती. नंतर तिने कबुली मध्ये सांगितले की तिथे दोन मित्र देखील आम्ही घरी नसताना येत होते नशीब त्यांनी कोणी माझ्या मोठ्या मुलाला काही केले नाही.

आम्ही दोघे सुन्न होऊन बसलो, पण हातपाय गाळून चालण्यासारखे नव्हते. अशा परिस्थितीत मी प्रथम सावध झाले आणि तिला शोधायला आम्ही बाहेर पडलो. तिचे नाव, गाव, फोटो, पत्ता काहीच जवळ नव्हते. फक्त ज्या केळी विकणाऱ्या मावशी होत्या त्यांचा क्लू होता. त्यांचा पण पत्ता माझ्याकडे नव्हता. ज्या मैत्रिणीच्या ओळखीने त्या मुलीला घेऊन त्या मावशी आल्या होत्या तिच्याकडे गेले, त्या मैत्रिणीला पण मावशींचा पत्ता माहीत नव्हता. फक्त आमच्या हॉस्पिटलमधील हेमा नावाची मावशी त्या मावशींच्या घराशेजारी राहत होती. एवढाच क्लू आमच्याकडे होता. मी हेमाच्या शोधासाठी हॉस्पिटलमध्ये गेले तर, नेमकी दुर्दैवाने तिची आज सुट्टी होती. नशीब साऱ्या बाजूने पालथे पडलेले, पण मी हिंमत सोडली नाही. तिच्या घराशेजारी कोणी राहते का म्हणून चौकशी केली असता तिच्या घराशेजारी राहणारी शमू नावाची अजून एक मावशी मला भेटली आणि तिला रिक्षात टाकून मी हेमाच्या घरापाशी पोहोचले. नशीब हेमा घरातच होती. तिला मी केळीवाल्या मावशींचा पत्ता विचारला तर हेमा मला त्या मावशीच्या घरी घेऊन गेली. मिस्टर स्कूटरवरती फॉलो करत होते. केळीवाल्या बाईंनी हकीगत ऐकल्यानंतर त्या घाबरल्या. केळेवाल्या बाई आणि त्यांची मैत्रीण त्या मुलीला शोधण्याच्या नावाखाली गल्लीबोळातून पळू लागल्या. मग मला केळेवाल्या मावशीचादेखील संशय आला कारण यापूर्वी दोन वेळा मावशी सरिताची हालहवाल विचारायला आणि तिला नीट वागवतात की नाही हे बघायला माझ्या घरी आली होती. मग मी त्या मावशीलादेखील दम दिला मी कामवाली तुमच्याकडून घेतलेली आहे मी पोलीस तुमच्या दारात घेऊन येईल शिवाय त्या मावशींची सून घराबाहेर येऊन आपल्या सासूला शिवीगाळ करू लागली, या म्हातारीला नको ते उद्योग लागतात आता आपल्या दारात तिच्यामुळे पोलीस येतील असे सासू-सून मध्येच सुरू झाले. परंतु मी दिलेल्या धमकीमुळे त्या एरियातील चार-पाच माणसे मावशीबरोबर तिला शोधायला गेली. नंतर मला कळले की त्या मावशीदेखील साध्या होत्या. तिचा घरदार पत्ता त्यांना काही माहित नव्हता. फक्त सत्संगामध्ये झालेल्या तोंडओळखीवर मावशी तिला आमच्याकडे घेऊन आली. ती मावशीदेखील आमच्याबरोबरच त्या मुलीचे घरदार शोधत होती. पण कोणालाच तिचा काही पत्ता नव्हता जशी काय ती हवेत विरून गेली. हा सगळा प्रकार होईपर्यंत रात्रीचे अकरा वाजले. आता मात्र आमचा धीर खचला. रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही दोघे आणि स्पेशली मी डोक्यावरती टेन्शन, पोटात आठ महिन्याचे मूल घेऊन सगळी झोपडपट्टी तुडवत होतो.


मी यांना म्हणाले आता मात्र आपण पोलीस स्टेशनला जाऊया. रात्री अकरानंतर वागळे इस्टेट पोलिस स्टेशन शोधत-शोधत आम्ही तेथे गेलो. आमच्या दोघांची उतरलेली तोंडे, माझे आठ महिन्याचे पोट आणि सोबत एक लहान मूल, त्याच्या अंगात ताप अशी सारी परिस्थिती बघून तिथल्या पोलीस दादांना आमची दया आली. आणि त्यांनी ताबडतोब आमची दखल घेतली. त्यांनी मला घरी जायला सांगितले आणि मिस्टरांना त्यांचे बरोबर तपासाला घेऊन गेले. रात्री साडे अकरा बारा नंतर मी पाया मध्ये ताप असलेले रडणारे मूल घेऊन आणि पोटात आठ महिन्याचे मुल अशा अवस्थेमध्ये स्कूटर चालवत भांडूपला माझ्या सासरच्या घरी कशी आले ते मला आज देखील आठवत नाही. फक्त तेव्हा मला आधाराची गरज होती आणि त्या गरजेपोटी मी एवढे मोठे धाडस केले होते. तेव्हा तर रस्ते खूप छोटे आणि अरुंद होते रस्त्याला खड्डे रोडवरचे लाईट कमी-जास्त मोठ्या मुलाला अंगात ताप अशा परिस्थितीत मी भांडूपला पोहोचले.


पाच सहा जणांची पोलीस टीम आणि माझे पती हे सर्वजण रात्रभर भांडुपच्या खींडीपाडा ची झोपडपट्टी तुडवत होते. व अशा -अशा वर्णनाची, कुरळ्या केसांची, काळीसावळी सरीता नावाची मुलगी कोठे राहते याचा शोध घेत होते. काही म्हणता काही खबर लागेना. पोलीस पण परत फिरणार एवढ्या मध्ये त्यांचा एक खबऱ्या समोरून आला. आणि त्याच्याकडून या मुलीची माहिती आणि घर देखील मिळाले. तिच्या आई-वडिलांनी चक्क कानावर हात ठेवले ही आमची मुलगी गेल्या तीन वर्षापासून आमच्याकडे राहतच नाही, व तिच्या चोरीची आमचा काहीही संबंध नाही. पोलिसांनी सगळ्या घरात शोधाशोध केली तेव्हा  पत्र्याच्या ट्रंकेमध्ये तिचा एक ग्रुप फोटो सापडला. त्या ग्रुपमध्ये अजून दोन चार मित्र -मैत्रिणी होते. त्यांना पकडून आणले असता, त्यांना पण ती कोठे आहे याबाबत माहीत नव्हते. आणि ते लोक याबाबतीत दाद देत नव्हते. पण पोलिसी खाक्या दाखवतात मात्र एका मित्राने तिने अशी -अशी चोरी केल्याबद्दल कबुली दिली .परंतु त्याचा त्यामध्ये काही सहभाग नव्हता. प्रथम ती चोरी केल्यावर वर्तक नगरला तिच्या मावशीकडे गेली होती. असे कळले मग दुसऱ्या दिवशी पोलीस वर्तकनगरच्या पत्त्यावर गेले. ती माणसे पण तशी आपल्यासारखीच सभ्य आणि मध्यमवर्गीय होती. ती मुलगी त्यांच्याकडे गेली खरी, परंतु त्यांना देखील या प्रकरणाबद्दल काहीच माहीत नव्हते.

हे पहा ! चोरीचा माल घेऊन ती प्रथम तुमच्याकडे आली होती. त्यामुळे तुम्हाला देखील आत टाकावे लागेल असा पोलिसांनी दम दिला. ही माणसे घाबरली व व जर सरिता आमच्याकडे आली तर आम्ही ताबडतोब कळवू असे त्यांनी पोलिसांना आश्वासन दिले. तिकडे सकाळी उजाडताना मिस्टर घरी आले. काही देखील क्लू मिळाला नव्हता. आमचे मन थाऱ्यावर नव्हते. काही सुचत नव्हते. एक तर बारा तोळे सोने आणि असेल नसेल तेवढे किडूक-मिडूक मुलाच्या मनगट्या पासून ते करगोटा पर्यंत सर्व वस्तू आणि सहा हजाराची कॅश ती घेऊन गेली. पोलिसांनी काढलेली एकूण ऐवज याची रक्कम ऐंशी हजारापर्यंत जात होती. मला घरात शिरल्याबरोबर ती एक छत्री दिसली नव्हती ती मी म्हटले जाऊदे असे तिने माझ्याकडे पंधरा दिवस काम केलेले आहे एक छत्री गेली तर जाऊ दे. शिवाय एवढी रक्कम घरात ठेवण्याचे कारण ,आम्ही डबल सिलेंडर साठी नंबर लावला होता आणि तो येणार होता म्हणून एवढी कॅश घरात आणून ठेवली होती. आम्ही उपाशीतापाशी आमच्या घरात तोंडे पाडून बसलेलो. आमच्या शेजारणीने आम्हाला जबरदस्ती चहा बिस्किटे खाऊ घातली.


आमच्या घरातून जाताना ती एकदम एका साध्या प्लास्टिक बॅगमध्ये सर्व दागिने घेऊन बाहेर पडली. तिला आजूबाजूच्या सर्वांनी बघितलेली होती. पण कोणालादेखील तिचा संशय आला नाही. शिवाय तेव्हा एकमेकाची कामवाली पळवली जात असल्याने मी, ही माझी भाची आहे असे इतरांना सांगितले होते. कर्मधर्मसंयोगाने ती पुन्हा एकदा मावशीकडे आली. मावशीने तिला काय करतेस? कुठे राहतेस ?असे गोड बोलून विचारले तेव्हा ती कळवा येथील खारीगाव झोपडपट्टीत राहत असल्याबाबत कळाले. तिच्या मावशीने ताबडतोप वागळे इस्टेट पोलिसांना कळवले .आता पोलिसांनी कळवा खारेगाव च्या झोपडपट्टीमध्ये सापळा लावून ठेवला होता. ईथे दिसली, तिथे दिसली असे कानावर येत होते परंतु प्रत्यक्षात पोलिसांच्या हाती मात्र ती लागत नव्हती. तशात त्यांच्या एका खबऱ्याकडून बातमी मिळाली की ठाणे स्टेशनच्या सहा नंबर प्लॅटफॉर्म वरती एक प्रायव्हेट हमाल काम करतो. त्याच्याबरोबर तिचे अफेअर आहे सध्या ती त्याच्याकडेच राहते. आणि लवकरच दोघे पळून जाऊन लग्न करणार आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या झोपडी वरच नजर ठेवली आणि सकाळी आठ वाजल्यापासून साध्या वेषातले चार पोलिस तेथे सापळा लावून बसलेले, पण सावज काही फिरकत नव्हते. आता पोलीस पण कंटाळले आणि परत फिरणार तेवढ्यात, संध्याकाळी सहाच्या सुमारास या बाई साहेब एक प्लास्टिक बॅग हातात घेऊन ती हलवत हलवत आरामात येत होत्या. तिला त्यांनी झोपडीमध्ये आत शिरू दिले आणि ताबडतोब धाड घातली आणि तिच्या हातातील प्लास्टिक बॅग मध्येच सर्व मुद्दे माला सहित तिला पकडले. सर्व सोने वस्तू तिच्या हातातच सापडल्या. त्यात मोठी ओळखीची खूण म्हणजे माझे मिस्टर "महिंद्रा अँड महिंद्रा" मध्ये असल्याने त्या वेळी त्यांच्या कंपनीला 50 वर्षे झाली होती, तेव्हा प्रत्येक कामगाराला कंपनीने आपल्या सर्विसप्रमाणे महेंद्रा जीपचा सिम्बॉल असलेले सोन्याचे एक नाणे भेट दिले होते. तसे आमच्याकडे देखील अडीच तोळ्याचे सोन्याचे नाणे होते. त्यामुळे हा सर्व माल आमचाच आहे ही मोठी खूण होती .


अक्षरशः (वागळे इस्टेट) ठाणे पोलिसांनी तिला कोणताही "क्लू"नसताना तीन दिवसाच्या आत पकडली, आणि एवढी मोठी चोरी शोधून काढली. तिला पोलीस स्टेशनला मी जेव्हा बघायला गेले तेव्हा, ती एकदम निर्विकार बसलेली तिच्या चेहर्‍यावर कसलीही अपराधीपणाची भावना नव्हती. ते बघून बघून माझे डोके सटकले. तरी मी तिला एवढेच बोलले काय ग सरिता? मी तुला लहान बहिणीसारखी मानली, घासातला घास दिला ,आणि तू मात्र माझ्याशी अशी वागलीस, तुला लाज कशी वाटली नाही? त्यावर तिने मला मोठ्या तोऱ्यात उत्तर दिले. मिळालं ना तुमचं सगळं ?मग आता जास्त बोलायची गरज नाही. तिचं उत्तर आणि चेहर्‍यावरचे भाव पाहून मी सर्दच झाले.

सोने आणि सगळ्या वस्तू मिळाल्या मात्र सहा हजाराची रक्कम तिने खर्च केली. तेव्हा आमचे पगार पाच-साडेपाच हजार होते. तिने तिच्या नव्या संसारासाठी स्टोव्ह, पातेली, भांडी याची खरेदी केली होती. पोलिसांनी मला त्या वस्तूदेखील ताब्यात घेणार का? असे विचारले.

मी म्हणाले साहेब! ती माझ्याशी प्रामाणिक राहिली असती तर, मी तिला संसाराच्या वस्तू घेऊन दिल्याच असत्या ना? त्या तिलाच देऊन टाका. शेवटी मी पोलिसांना त्या वस्तू तिलाच नेऊ द्या असे सांगितले. सर्व कायदेशीर बाबी उरकून माझे दागिने पोलिसांनी पंधरा दिवसाच्या आत कोणतीही अपेक्षा न ठेवता परत दिले. खरोखर इन्स्पेक्टर क्षीरसागर आणि त्यांची सर्व टीम यांनी अपार मेहनत घेऊन या चोरीचा छडा लावला. अन्यथा दोन दिवसांनी ती त्या हमाला बरोबर ती कसाराच्या पुढे कुठेतरी पळून जाणार होती. आणि लग्न करून निघून जाणार होती. मग ती आम्हाला उभ्या जन्मात सापडली नसती. पोलिस हेदेखील जनतेचे मित्र असतात हे त्यातून अगदी स्पष्ट झाले हे सर्व इतरांना कळावे म्हणून हा लेखन प्रपंच.

त्यावेळी माझ्या घरी मोठे पोलीस अधिकारीदेखील येऊन कपाट वगैरे सगळे छाननी करून बघून गेले त्यानंतर मी सर्व ऐवज ताब्यात घेऊन, प्रथम बँकेमध्ये लॉकर काढून त्यात सर्व ठेवले आणि निश्चिंतपणे डिलिव्हरीच्या प्रोसिजर साठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तो तन्मय नावाचा मुलगा त्या वेळी पोटात होता तो आता पंचवीस वर्षाचा झाला पोलिसांनी आम्हाला केस उभी राहिली तर कोर्टात येऊन जबानी देण्याचे सांगितले परंतु त्याची केस उभी राहिली नाही आणि जबानी देण्याचा प्रश्न आला नाही. त्यानंतर जवळ-जवळ तीन चार वर्षांनी भांडूपच्या रस्त्याने स्कूटरवरून येताना तिला एका बसस्टॉपवरती उभे असताना पाहिले. तिनेही आमच्याकडे पाहिले आणि ताबडतोब ती तिथून निघून गेली. त्यावेळी माझे नशीब जोरावर होते म्हणून माझा कष्टाचे, मेहनतीचे, दागिने परत मिळाले. तिच्यावरती खटला भरला गेला की नाही? तिला सजा झाली की नाही? हे काही कळाले नाही.  तेव्हा पेपरला बातमी आली होती. ठाणे वार्ताला देखील बातमी दाखवली होती.


नाहीतर असाच इनोसंट चेहरा घेऊन तिने अजून किती लोकांना लुटले असेल तर माहित नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama