The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

vinit Dhanawade

Crime Drama Thriller

4.0  

vinit Dhanawade

Crime Drama Thriller

चेकमेट !!

चेकमेट !!

53 mins
22K


"कसा आहेस ? " इन्स्पेक्टर अभिषेकने तुरुंगात येत म्हटलं. " ठीक आहे... तुमचीच कृपा... " सागर उभा राहत म्हणाला. सागर तुरुंगात कैदी म्हणून होता. इन्स्पेक्टर अभिषेक आज पुन्हा चौकशीसाठी आला होता, आज काहीतरी माहिती मिळावी म्हणून... सागर, इन्स्पेक्टर अभिषेकची वाटच बघत होता जणू. " मी येणार हे तुला माहित होतं वाटते... " अभी आतमध्ये जात म्हणाला.

"बसा साहेब... तुम्ही येणार हे मला माहित नव्हतं तर माझं तसं अनुमान होतं.... असो, आज असेच आलात... आज रेकॉर्डिंग करत नाहीत का, माझं स्टेटमेंट..... " सागर अभीकडे बघत म्हणाला. इन्स्पेक्टर अभिषेक, आत ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. सागर त्याच्यासमोरच बसला.

" गेल्या ४ मिटिंगमध्ये जे काही रेकॉर्डिंग झालं... त्यात काहीच नव्हतं. तू काहीच सांगितलं नाहीस... म्हणून आज असाच आलो. " अभि शांतपणे म्हणाला.

त्यावर सागर हसला. " मी खरं सांगितलं असतं, तुम्ही रेकॉर्ड केलं असतं, पण त्याचा काही फायदा झाला नसता.... मी बोललो असतो की तुम्ही बळजबरीने माझ्याकडून बोलवून घेतलंत.... " सागर अगदी शांतचित्ताने बोलत होता. अभिला काय बोलावं ते कळत नव्हतं. थोडावेळ अभि, सागरकडे बघत राहिला. विचार करून बोलला.

" हे बघ सागर... हे तुलाही माहित आहे आणि मलाही... त्या दोघांना तू मारलं आहेस... तुझी शिक्षा त्या बाकीच्यांना का देतो आहेस... " त्यावर सागर पुन्हा हसला. आजूबाजूला बघितलं.

" तुम्ही एकटे आहेत म्हणून सांगतो... दोघांना नाही पण एकाला नक्की वर पाठवलं आहे.... आता तो कोण आहे ते तुम्ही शोधा... " तसा अभि खुर्चीवरून उठला आणि सागरची कॉलर पकडली.

" गेले २ महिने झाले... तुझ्यामुळे त्या बाकी ४ जणांना आत टाकलं आहे... त्याचे काहीच वाटत नाही तुला.... " सागरने त्याचे हात झटकले.

"इन्स्पेक्टर.... हात मलाही उचलता येतो... पण चांगल्या माणसांवर हात उचलत नाही मी..." अभि त्याच्यापासून जरा लांब जाऊन उभा राहिला. थोडावेळ तिथे थांबून मग आपल्या केबिनमधे आला.

दोन महिन्यापूर्वी, ५ खून ,५ दिवशी असे एका मागोमाग झाले. मिळालेल्या पुराव्यानुसार, ५ जणांना अटक झाली. केस इन्स्पेक्टर अभिषेककडे आली होती. सोबत महेश होता. जेव्हा केस सोडवणं अशक्य झालं तेव्हा या दोघांकडे केस आली. आधीच्या इन्स्पेक्टरने ५ जणांना पकडलं होतं. अर्थात पुरावे बक्कळ नसले तरी खूप काही मिळालं होतं. महत्वाचं म्हणजे,CCTV चे विडिओ.. ५ ही खुनांच्यावेळी, त्यांना भेटलेल्या शेवटच्या व्यक्तीमध्ये या पैकी कोणी ना कोणी होतंच. अभि वैतागून त्याच्या केबिनमध्ये आला आणि असाच बसून विचार करू लागला. थोड्यावेळाने डॉक्टर महेश त्याचं काम संपवून भेटायला आला.

" काय झालं अभी... सकाळी सकाळी टेन्शन मध्ये... " महेश अभिच्या केबिनमधे आला.

" सावंत.. जरा दोन चहा सांगा.. " महेश खुर्चीवर जाऊन बसला.

" काही नाही रे... ही नवीन केस... त्या inspector ने त्या ५ जणांना कशावरून पकडलं तेच कळत नाही. ", " हम्म... ते जरा विचित्र आहे ना... एकाचेही फिंगर प्रिंट्स नाहीत... " महेश बोलला. तोपर्यंत चहा आली. अभिने पुन्हा केस फाईल उघडली. ५ खून, प्रत्येक वेळेला पकडलेल्या आरोपीपैकी, मृत व्यक्तीला भेटलेला शेवटचा व्यक्ती... फक्त त्यांचे फिंगर प्रिंट्स नाहीत किंवा असा ठोस पुरावा नाही... बाकी खुनाची पद्धत एकच... सागर सोडून बाकीचे ४ जण मुके... बोलताच येत नाही. त्यात सागर काही कबूल करायला तयार नाही.

" त्यात आज बोलतो कसा... मी एकालाच मारलं आहे... ते कोणाला आणि कसं ते तुम्ही शोधा... शहाणाच आहे मोठा... " आता अभि हसत म्हणाला.

" बरं... त्याची पुढची सुनावणी कधी आहे.... " महेशने चहा संपवली.

" दोन दिवसानी.... तू येणार आहेस ना.. " , "बघू... काम नसेल तर येईन... चल मी निघतो... " महेश गेल्यावर अभि कोर्टात जाण्याची तयारी करू लागला.

२ दिवसांनी, कोर्टात केस उभी राहिली... आधीही २ महिन्यात ३ वेळा त्यांची सुनावणी झाली होती. परंतु त्यातून काहीच निकाल हाती आला नव्हता. म्हणून यावेळेस काय निकाल लागतो याची सर्वांना उत्सुकता होती. ५ पैकी ४ आरोपी अपंग (मुके) असल्याने केसला वेगळाच अर्थ प्राप्त झाला होता. खून करताना वापरलेलं हत्यार मिळालं नव्हतं. पाचही खून गोळी मारून झाले होते. खूप शोधून सुद्धा ते हत्यार सापडलं नव्हतं. त्यात सागरने सगळे आरोप फेटाळून लावले होते. वकीलसुद्धा नाकारला होता त्याने. सागरला वकिलीची चांगली जाण होती बहुतेक. म्हणून स्वतःच, स्वतःची केस लढत होता. तशी मुभा असते ना कोर्टात. तर... आतापर्यंत झालेल्या तीन सुनावणीत झालेल्या आरोपात, सागरने सगळ्या आरोपातून नकार दिला होता. फक्त CCTV फुटेजमुळे यांना पकडलं होतं. म्हणून यावेळेस कोणते नवीन पुरावे मिळाले आहेत यासाठी सर्व जमले होते. जज अजून यायचे होते. सागर आणि त्याच्यासोबत असलेले ४ आरोपी एकत्र बसले होते. महेश आला आणि अभिच्या बाजूला जाऊन बसला.

"ऐक जरा... बाहेर ये... बोलायचे आहे जरा... " महेश अभिच्या कानात कुजबुजला...

" अरे..... आता सुरु होईल केस... नंतर बोलू... " अभि, महेशला खाली बसवत म्हणाला.

" त्याचसंबंधी बोलायचं आहे... " ते ऐकून अभि लागलीच बाहेर गेला.

"बोल... काय सांगायचं आहे..." ,

" मला एक सांग... या ५ जणांची केस एकत्र का चालू आहे... ",

"म्हणजे काय बोलायचे आहे तुला... ",

"अरे... यांचा काही संबंध आहे का... ५ खून झाले... मग ५ वेगवेगळ्या केस का केल्या नाहीत...एकच सुनावणी का.... असं विचारतो आहे मी.. ",अभि विचारात पडला.

"हो रे... ते मलाही माहित नाही... आधीच्या ३ पैकी २ सुनावणी तर केस माझ्याकडे येण्याआधीच झालेल्या होत्या. तेव्हापासून ही एकच केस आहे." ,

"बरं... मग ऐक...मी थोडा तपास केला. आधीच्या इन्स्पेक्टर पाटील यांनी ५ वेगवेगळ्या केस उभ्या करण्यापेक्षा एकच केस फाईल केली. कारण एकच पद्धत होती खुनाची... त्यांनी ते लॉजिक वापरलं. पण या ५ जणांचा खरोखर संबंध आहे... " ,

"काय ? " ,

" हे पाचही एकमेकांचे मित्र आहेत.. " हे तर अभिला माहीतच नव्हतं.

" आणखी एक गोष्ट... हे सगळं मागच्या केससारखं वाटत नाही तुला... ?",

"काय ते ? " ,

"CCTV फुटेज... त्यावरून यांना अटक केली ना.. या सर्वाना खून करायचा होता तर वेष बदलून, मेकअप वगैरे करून आले असते ना किंवा लपून आले असते. पण इथे तर सगळेच कॅमरा समोर येतात. " महेशने आणखी माहिती पुरवली.

" काय बोलायचे आहे नक्की.. ",

" मला वाटते ना... यापैकी कोणीच खून केलेला नाही... " महेशने मत मांडलं.

" ते बघू... तू बोलतोस तेही बरोबर आहे... बाकी... आज काय होते ते कळेल आता.. "दोघे आत आले.

१० मिनिटांनी केसच्या सुनावणीला सुरुवात झाली. पुन्हा एकदा CCTV फुटेजचा पुरावा उभा करून वकिलाने सागरसह चार जणांवर आरोप केला. यावेळेस सागरकडून कोणताच बचाव झाला नाही. सागर काहीच बोलत नाही म्हणून जजनेच त्याला विचारलं.

" मिस्टर सागर, यावेळेस तुम्हाला काही बोलायचे नाही का ? " सागर आता आरोपीसोबत जाऊन उभा राहिला. " नाही जज साहेब, एक सांगायचे होते.... आम्हा, पाचही जणांना गुन्हा कबूल आहे... ते खून आम्हीच केले... " या सागरच्या वाक्याने, कोर्टात एकच खळबळ उडाली.

" मिस्टर सागर... तुम्ही काय बोलत आहेत ते कळते आहे का तुम्हाला... " जज साहेबांनी पुन्हा विचारलं.

" हो सर, मी स्वतः सांगतो आहे... आणि या सर्वांच्या वतीनेसुद्धा... ",

"ठीक आहे... पण तसं सर्वानी लेखी लिहून द्यावे लागेल. कारण काही जणं अपंग आहेत... " हे खूपच विचित्र होतं. सागर अचानक कसा बदलला. ३ वेळेस तर निर्दोष आहे असंच सांगत होता. अभिला जास्त धक्का बसला होता. अचानक कसं हे घडलं. सगळ्यांनी लेखी लिहून दिलं. जज साहेबांनी सगळं वाचून घेतलं.

" आरोपींनी स्वतःच गुन्ह्यांची कबूली दिली असल्याने केस पुढे चालवण्यात अर्थ नाही. तरी यातील काही आरोपी अपंग असल्याने त्यांना कोर्ट थोडी कमी शिक्षा देत आहे. त्या चार आरोपींना ५० वर्ष सक्तमजुरी तर सागर यांना आजन्म कारावासची शिक्षा सुनावण्यात येत आहे." केस संपली... आरोपींना पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं. शिक्षेची सुनावणी झाली असली तरी त्या सगळ्या क्रियेला २ दिवस तरी लागणार होते. तोपर्यंत तरी आराम होता अभिला. एकदम आरामात बसला होता तो त्याच्या केबिनमध्ये... महेश आला.

" काय साहेब... एकदम आरामात,... " महेश हसत म्हणाला.

" हा रे... बघ ना... त्या सागरने केसच संपवून टाकली. असं का केलं त्याने याचा विचार करतो आहे.. ",

"आता कशाला विचार करतो आहेस... शिक्षा तर मिळाली त्यांना... ",

"तरी पण... २ महिने काही बोलत नव्हता आणि आता अचानक खुनाची कबुली... विचित्र वाटते ना... " अभि उभा राहत म्हणाला.

" जाऊ दे ते... त्याला भेटायला जाणार होता ना... गेला नाहीस... " महेश त्याचं सामान उचलत म्हणाला.

" जातच होतो..." महेश त्याच्या घरी आणि अभि, सागर ज्या तुरुंगात होता... तिथे निघाला.

सागर आणि त्या चार जणांची त्या तुरूंगातून ,दुसऱ्या मोठ्या तुरुंगात रवानगी होण्यास आठवडा जाणार होता. तोपर्यंत ते तिथून जवळच असलेल्या तुरुंगात होते. सागर त्याच्या तुरुंगात बुद्धिबळ खेळत बसला होता. याआधी सुद्धा तो असा एकटाच बुद्धिबळ खेळत असे. इन्स्पेक्टर अभिषेकला त्याने बघितलं नाही, एवढा तो त्या खेळात मग्न झाला होता. अभि त्याला कधीपासून बघत होता. थोड्यावेळाने सागरची नजर अभिषेक वर पडली. तसा तो उभा राहिला.

" या या इन्स्पेक्टर साहेब ...आज इकडे कसे आलात ? " ,

"असाच... तुला भेटायला आलो. " अभिने हवालदाराला हाताने खूण करून टाळ उघडायला सांगितलं आणि अभि आत गेला.

"तुझ्याबरोबर बोलायचं होतं म्हणून आलो. " अभि आत ठेवलेल्या खुर्चीवर बसला.

"असं आहे तर.. अजूनही काही बोलायचे आहे का... मला वाटलं निकाल लागला तसं तुमचं काम संपलं... " सागर बुद्धिबळाच्या पटाकडे पाहत म्हणाला.

" असं का केलंस ?... हे जर तू आधी सांगितलं असतं तर तुझा आणि पोलिसांचा... दोघांचा वेळ वाचला असता... " अभि बोलला तसा सागर त्याच्याकडे न बघताच हसू लागला. खूप वेळ हसत होता तसाच. "तुम्हाला येतो का हा खेळ खेळता... " सागरने विचारलं.

" आधी खेळायचो... आता नाही... का " ,

"नाही... तुम्ही विचारलं ना... आधी का नाही सांगितलं... सेम... अगदी या खेळासारखं... यात घाई करून चालत नाही. सावकाश... डोकं लावून, योग्य ती चाल रचुन खेळावं लागते.. " सागर बोलला.

" पण तू एकटाच का खेळत असतोस.. " अभिच्या पुढच्या प्रश्नावर सुद्धा सागर हसला.

"एकटा नाहीच आहे... समोरची चाल खेळल्याशिवाय ते शक्य नसते आणि आता या खेळात समोरच्या चाली रचून झाल्या आहेत. आता आमची वेळ आहे, योग्य त्या चाली रचायची." अभिला अजिबात कळत नव्हतं ,सागर काय बोलतो आहे ते... अभि बाहेर आला, हवालदाराने टाळ लावलं. सागरकडे बघत म्हणाला,

" मला वाटते, की हे तू आधीच सांगायला पाहिजे होतं... Anyways... केस तशीही बंद झाली आहे... " ते ऐकून सागर मोठ्याने हसला.

" केस बंद झाली नाही सर... आता कुठे केसला सुरुवात झाली आहे. आराम करायचा असेल तर तो आताच करून घ्या... हे डॉक्टर महेशलासुद्धा सांगा... कारण नंतर झोपायला तरी मिळेल का ते माहित नाही तुम्हाला... " पुन्हा मोठ्याने हसत बुद्धिबळ खेळू लागला. आधीच्या हसण्यावर एवढं लक्ष नाही दिलं अभिने, पण शेवटी जो हसला. ते विकृत हास्य होतं. सागरकडे शेवटचा एक कटाक्ष टाकून अभि घरी निघाला.

आणखी ६ दिवसांनी, त्या चार आरोपींना एका ठिकाणी तर सागरला जन्मठेपेची दुसऱ्या तुरुंगात नेण्यात आलं. आता अभिषेककडे दुसरी केस आलेली. त्यात तो गुंतला होता. महेश त्याच्या कामात बिझी झालेला. सागर त्याची शिक्षा भोगत होता. दैनंदिन गोष्टी सुरु झाल्या. यातच आठवडा उलटला. अभिची आणखी एक केस सोडवून झाली. नवीन केस सुरु करणार इतक्यात एका खुनाची केस हाती आली. अभि लगेचच घटनास्थळी पोहोचला. महेश अर्ध्या तासाने आला. गोळी मारून हत्या केली गेली होती. त्यांच्या राहत्या घरात... मृतदेह महेशच्या लॅबमध्ये पाठवला. सोबत महेश निघून गेला. अभि काही पुरावा वगैरे मिळतो का ते बघत होता. फिंगर प्रिंट्स आणि बाकी ते त्याची टीम बघत होते. अभि तसं काही संशयास्पद मिळालं नाही. CCTV ची व्यवस्था नसल्याने वॉचमॅनला विचारण्याशिवाय पर्याय नव्हता.

" कोणीच आलं नव्हतं त्यावेळेस सर.. "अभिने ते ऐकून घेतलं. दुसरं काय होतं हातात त्याच्या. तो दिवस तर नुसता पुरावे गोळा करण्यात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी महेश post mortem चे रिपोर्ट घेऊन आला.

" इंटरेस्टिंग गोष्ट आहे अभि... " महेश धावतच त्याच्या केबिनमध्ये पोहोचला.

"काय झालं एवढं धावायला... " अभि हातातलं काम सोडून उभा राहिला.

"बस... बस अभि... सॉलिड माहिती मिळाली आहे.. पवारांचा खून झाला ना... गोळी मारून... त्यांच्या शरीरातून जी बुलेट (गोळी) मिळाली ना... ती अगदी सेम टू सेम त्या पाच खुनात वापरलेल्यासारखीच आहे... " महेशने माहिती पुरवली.

" काय बोलतोस !! " अभि लगबगीने ते रिपोटर्स बघू लागला.

" मी जेव्हा पहिली ,ही गोळी बघितली ना... तेव्हाच मला संशय आला होता. मी लगेच match सुद्धा करून बघितली... तेव्हाच मला संशय आला होता. तर उत्तर एकच.. ",

" ह्म्म... पण त्या पाच खुनांचा आणि याचा काय संबंध.... " अभीचा पुढचा प्रश्न...

" मला वाटलंच होतं... म्हणून लगेच मी यांचा काही संबंध आहे का ते माहिती काढली. तर त्या मृत व्यक्तीपैकी एकाचे हे मानलेले भाऊ होते. " आता अभिला विचार करायला भाग पडले.

" शिवाय मला त्यांच्या शर्टाच्या खिशातून काही सापडलं... " आणि डॉक्टर महेशने एका लहान पिशवीतून एक बुद्धिबळाची सोंगटी बाहेर काढली. अभिने ती हातात घेतली...

" याला 'प्यादं' म्हणतात ना... याचा काही संबंध आहे का... " अभिने महेशला विचारलं.

" ते तुला शोधायचं आहे... पण मला तरी वाटते की यांचा आणि त्या पाच खुनांचा काहीतरी संबंध असावा नक्की... " आता खरंच अभि विचारात पडला.

महेश थोड्यावेळाने एक कॉल आला तसा निघून गेला. अभि एकटाच त्याच्या केबिनमध्ये विचार करत बसला होता. महेशने रिपोर्ट आणले होते, बाकीचे रिपोर्ट यायचे बाकी होते. त्याशिवाय काही हालचाल करता येणार नव्हती. त्याचं फाईल पुन्हा पुन्हा बघत होता अभि. समोर ते 'बुद्धिबळातलं प्यादं' होतं. त्याने ते हातात उचलून घेतलं आणि बोटांमध्ये फिरवू लागला. अचानक त्याला सागर आठवला आणि त्याचं बोलणं... तसाच उठला , गाडी काढायला सांगितली आणि तडक सागर जिथे होता तिथे पोहोचला. सागर त्याचं नेहमीच काम संपवून पुन्हा एकदा बुद्धिबळाचा डाव मांडून बसला होता. अभिला बघितलं त्याने पण उभा राहिला नाही.

"सागर ... काय संबंध आहे सांग मला... " अभिने त्याला बाहेरूनच विचारलं.

" अरे व्वा !! सुरुवात झाली वाटत.. छान " सागर हसत म्हणाला. " आणि तुम्हाला पुढचा क्लू मिळाला असेल ना... प्यादं " यावरून अभिला नक्की समजलं की याला खूप काही माहित आहे..

" सागर... सांग... काय चाललंय नक्की... तुला ते माहित आहे, हे मला कळलं आहे... " ,

"तुम्ही तसे हुशारच आहेत... चला.. आत येता का... सांगतो सगळी गोष्ट.. " सागरने अभिला आत बोलावलं. अभि आत आला तसा सागर पुन्हा म्हणाला...

" वेळ आहे ना.. कथा जरा मोठी आहे.. चालेल ना... ",

"तू सुरु कर.... मी बघेन वेळेचं... " एका हवालदाराला सांगून त्याच बोलणं रेकॉर्ड करायला सांगितलं.

"चला सुरुवात करू... पहिलं सांगतो की आम्हा ५ जणांचे अटक होणे... it's a part of the plan... परफेक्ट जमला.. आधी वाटलं होतं की तसं होणार नाही... पण छान जमलं. त्यानंतर , हे तुमचं इकडे येणे... ते सुद्धा प्लॅनप्रमाणेच... मला माहित होतं की हे प्यादं घेऊन तुम्ही इकडेच येणार.... तो खरंतर मला इशारा आहे... पुढचा क्लू तुम्हाला देण्यासाठी... तो नंतर देतो... आधी स्टोरी... बुद्धिबळाचा खेळ आहे ना.. तसंच काहीसं झालं आहे... फक्त आमच्याकडेच सैन्य थोडं कमी होतं म्हणून... सांगायचं झालं तर असं.. " सागरने बुद्धिबळाच्या एक -एक सोंगट्या बाजूला काढून ठेवल्या. फक्त राजा आणि ६ प्यादे.. एवढंच सफेद सैन्य ठेवलं.

" हा... आता बरोबर आहे.. त्यातले आम्ही ५ प्यादे.. " सागर बोलला.

" म्हणजे... तू खून केलास ना.. मग एवढे दिवस का कोर्टात नकार देत राहिलास... " सागर पुन्हा हसला.

" तेव्हासुद्धा सांगितलं... या खेळात वेळ खर्च करावा लागतो. तेव्हा रिझल्ट मिळतो. अजून एक गोष्ट... आमच्यापैकी कोणीच खून केलेला नाही... हा सुद्धा प्लॅनचा भाग आहे... " अभि उठला आणि सागरची मान पकडली.

" काय खेळ समजला का तुम्ही.. पोलीस, कोर्ट वगैरे... मज्जा येते का खून करायला... " सागर फक्त हसत होता. थोड्यावेळाने अभि खाली बसला.

" कोणी मारलं त्यांना... " ,

"सांगतो.. आधी पुढच्या क्लू ची तयारी करतो. " आता सागर, काळ्या सैन्याची एक-एक सोंगटी बाहेर ठेवू लागला. बुद्धिबळाचा पटावर आता २ प्यादे, १ हत्ती, १ घोडा, १ उंट , वजीर आणि राजा होता.

" काय समजायचे... एवढ्या सगळ्यांना मारलं तुम्ही... " अभि ते बघून म्हणाला.

" नाही नाही सर... फक्त ५ जण आधी आणि आता एक... हे जे मेले आहेत ना, ते सगळे प्यादेच होते... ",

"तू मारलं नाहीस, मग कोणी मारलं... " ,

"आमच्या एका उरलेल्या प्याद्याने... तुम्हाला अजिबात माहिती नाही हा खेळ... " सागर पुन्हा हसत म्हणाला.

" बाकी मोठे योद्धे जरी गेले असले तरी एक प्यादा... योग्य ठिकाणी, पण दुसऱ्या राजाच्या पटावर पोहोचला तर तो वजीर होतो... माहित नसेल तर विचारा कोणालाही... प्यादं एक एक पाऊल चालतो... तसंच चाल करत करत तो तिथे पोहोचला... म्हणून एवढा वेळ मी कोर्टात टाईमपास करत होतो. " अभिच्या सगळं डोक्यावरून गेलं.

" काय बोलतो आहेस ते तुला तरी कळते का... "

"तुम्हाला पुढचा क्लू द्यायचा आहे... हा घ्या... " काळ्या सैन्यातील हत्ती उचलून त्याने अभिच्या हातात दिला. "शोधा... " म्हणत सागर पुन्हा खेळण्यात मग्न झाला. हा खरं बोलतो आहे की काहीतरी बरळतो आहे उगाच. पण त्याला मी सांगण्याआधीच , माझ्याकडे 'प्यादं' आहे हे माहिती होतं.... काय करायचं नक्की. सागरचा इतिहास कोणालाच माहित नव्हता. आधीच्या इन्स्पेक्टरने सुद्धा ती माहिती काढायचा प्रयन्त केला नाही. अभिने लगेच माणसं कामाला लावली. ५ ही जणांचा काही संबंध आहे का... त्यांचा फॅमिली background काय... तो बोलतोय तसा ६ वा कोण असेल, जो खून करतो आहे... एवढे आणि बरेचसे प्रश्न अभिला पडले.

पहिली माहिती मिळाली ती अशी, की ६ व्या खुनाच्या आधी एक पोस्टमन आलेला, त्यांना काही द्यायला. अभि पुन्हा घटनास्थळी पोहोचला. निदान त्याने आणलेलं पत्र किंवा काही पार्सल मिळते का ते बघण्यासाठी... "साधारण किती वाजता आलेला पोस्टमन... " अभिने वॉचमॅनला विचारलं.

" सकाळी १०.३० ते १०.४५ च्या सुमारास, आणि हो... तो याच भागातला पोस्टमन आहे... त्याला ओळखतो मी. " wow !! अभि मनातल्या मनात म्हणाला. वॉचमनने सांगितल्याप्रमाणे, त्या पोस्टमनला बोलावून घेतलं.

" हा बोला... तुम्हाला कळलं असेल... तुम्ही ज्यांना पार्सल दिलंत ,त्यांचा खून झाला.. " अभिने त्या पोस्टमनला विचारलं.

" हो सर, पण मला का बोलवलं... " तो घाबरत म्हणाला. " मी काही नाही केलं सर... ",

"ते आम्ही ठरवणार... पहिलं सांगा... तुम्ही त्यांना काय दिलं नक्की... " अभीचा पुढचा प्रश्न...

" पार्सल होतं ते... लहानसं पाकीट.. " ,

" ओळखाल का ते ? ",

"हो नक्की.. ", अभिने तिथे सापडलेलं एक पार्सल, त्यांना दाखवलं.

" हा सर... हेच पार्सल मी दिलं होतं.. " अभिने निरखून पाहिलं. देणाऱ्याचा पत्ता,नावं वगैरे काहीच नव्हता.

" हे पार्सल... ते पोस्टात देताना समोरच्या व्यक्तीचा पत्ता लिहिता ना... ",

"हो... आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये लिहून घेतला असेल... " पोस्टमनने सांगितलं. तसे अभि आणि दोन हवालदार, पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचले.

" काय प्रोसेस आहे साधारण... एखादं पार्सल पोस्ट करताना... " अभिने तिथे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला विचारलं.

" पहिलं काय पार्सल आहे ते चेक करतो... वजन करून किती पैसे होतात ते सांगावे लागते... देणाऱ्याला पटलं तर मग त्याचा पत्ता आणि जिथे पोहोचवायचे आहे तो पत्ता आणि नावं... लिहून घेतो... पॅकिंग नसेल तर तेही करतो आम्ही.. " ,

"ok.. मग हे पार्सल तुमच्याकडून गेलं आहे का... " त्याने ते निरखून पाहिलं. स्टॅम्प याच पोस्ट ऑफिसचा होता. त्याने नोंद वही काढली.

" हा सर... हे पत्ते आहेत दोन्ही... " अभिने वही पाहिली. पत्ता तर खोटाच असणार हे माहित होतं, तरी अभिने एकाला त्या पत्यावर पाठवलं. नावं होतं " रहिमा शेख. " नाव वाचून अभिने विचारलं..

" यांचा चेहरा आठवतो का... " ,

"बुरखा होता सर.. " अभिला तेच अपेक्षित होतं.

" आणि पार्सल आठवते का... काय होतं.. " तो जरा विचार करू लागला...त्या पार्सलकडे एकदा पाहिलं.

" हो सर... आठवलं... त्यांना स्पीड पोस्ट करायचं होतं... बुद्धिबळात असते ना ते... प्यादं... ते होतं... " अच्छा... म्हणजे इथूनच गेलेलं ते... पुढे काय करणार.. पुन्हा त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आला.

केबिनमध्ये महेश वाट बघत बसला होता. " काय अभि... काही भेटलं का.. ",

"नाही रे.. त्या सागरला माहित आहे... हे सगळं कोण करते आहे ते... तो काही सांगायला तयार नाही... बुद्धिबळाचा खेळ चालू आहे सगळा... हा बघ... पुढचा क्लू दिला त्याने... " सागरने त्याला दिलेला 'बुद्धिबळातील हत्ती' महेशला दाखवला. आणि अभिने सगळी माहिती सांगितली.

" अरे बापरे !! म्हणजे आणखी किती खून होणार... " महेश घाबरला.

"तेच तर माहित नाही.. ",

"मग आता काय करायचे .. " महेशचा प्रश्न...

" आता काय... वाट बघायची.. पुढचा खून होण्याची... कारण कोणाला प्रोटेक्ट करायचं तेच माहिती नाही." अभि हताश होऊन म्हणाला.

पुढचा दिवस, जास्त काही माहिती मिळाली नाही. पुरावे जास्त काही नव्हतेच. फिंगर प्रिंट्स सुद्धा नाही. अभिला चैन पडत नव्हता. केबिनमध्ये येरझाऱ्या घालत होता. थोड्यावेळाने , त्या पाच खुनांची आणि आता झालेल्या खुनाची फाईल पुन्हा बघू लागला. सगळीकडे एकचं... गोळी मारून हत्या... सहाही खूनाच्या वेळी हत्यार मिळालं नव्हतं... कुठे गेलं हत्यार... विचार करून डोकं दुखायची वेळ आली. त्यातच , अभिचं लक्ष त्या 'हत्ती' वर गेलं.... हाच क्लू दिला ना त्या सागरने.. अभिला राग आला.. इतक्यात महेश आला.

" बरं झालं तू आलास ते.. चल... " अभिने त्याला बघताच म्हणाला.

"कुठे ? " ,

"सागरकडे.. त्याला माहित आहे खरा खुनी कोण आहे ते.. " दोघे तडक.. सागरला भेटायला पुन्हा त्या तुरुंगात आले. यावेळेस सागर आरामात पहुडला होता.

" आज बुद्धिबळ खेळत नाही वाटते.. खेळ संपला का.. " अभि त्याला झोपलेला बघून बोलला. त्यावर सागर न उठताच बोलला.

" नाही... खेळ तर आता सुरु झाला आहे... इन्स्पेक्टर अभिषेक ... मज्जा येणार आता... " हसत म्हणाला. अभि त्याला मारणारच होता, पण महेशने त्याला थांबवलं.

अभि ऐकायला तयार नव्हता. त्याच आवेशात तो तुरुंगात शिरला.. सागरला जबरदस्ती उठवलं आणि तिथे असलेल्या खुर्चीवर ढकलून दिलं. सागर धडपडत बसला खुर्चीवर. पुन्हा महेशने अभिला अडवलं.

" सांग लवकर... कोण आहे तो... कुणाचा खून होणार आहे.. " अभिला त्या आवेशात पाहून सागर घाबरला. महेशने अभिला शांत केलं. त्याला बाहेर पाठवलं. तो बाहेर गेला तसा महेशने सागरकडे मोर्चा वळवला.

" हे बघ सागर.. मी डॉक्टर आहे.. पोलीस नाही, मी काही करू शकत नाही... असं तुला वाटत असेल ना... तर ते विसरून जा... मी राग दाखवत नाही, याचा अर्थ मला तो येत नाही असा नाही आहे. मुकाट्याने सांग, काय चाललंय नक्की... नाहीतर पुढल्या वेळेस अभिला मी अडवणार नाही... " सागर चिडीचूप झाला.

सागर काही बोलत नाही, ते बघून महेश बाहेर जाऊ लागला.

" थांबा सर... सांगतो.. पण मी क्लू देईन.. जास्त काही सांगू शकत नाही... कारण हा प्लॅन त्याचा आहे... आणि त्याला वचन दिलं होतं आम्ही, म्हणून... " महेश ते ऐकून जागच्या जागी उभा राहिला.

" सांग... काय माहिती आहे तुला... " सागरने एक दीर्घ श्वास घेतला.

" मी कोड्यात सांगेन.. कारण प्लॅन यशस्वी झालाच पाहिजे.... सांगतो आता... तो एक silent person आहे... शांतपणे ऐकून घेतो सगळ्याचे... यशस्वी होण्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असते. आपल्या माणसांसाठी जीव देऊ शकणारा असा तो आणि घेतलेलं काम पूर्ण करूनच सोडतो." सागर बोलायचं थांबला. " का करत आहे तो आणि कोण आहे नक्की तो... "

" तो हे का करतो आहे.. हे नंतर सांगेन तुम्हाला... तो कोण आहे हे तुम्हाला शोधायचे आहे... " महेशला कळलं की हा अजून काही बोलणार नाही... म्हणून महेश बाहेर आला. हवालदाराने टाळ लावलं.

" शेवटचं सांगतो... त्याचा नेम कधीच चुकत नाही... " सागर बोलला. महेशने ते ऐकलं. सागर पुन्हा जाऊन झोपला. अभि बाहेर बसला होता. महेशने त्याला सगळं संभाषण सांगितलं.

" मग... काय करूया पुढे आता... याला ना चांगला चोप दिला पाहिजे... सगळं सांगून टाकेल." अभि आताही रागात होता.

" नाही... तरीही तो सांगणार नाही... म्हणतो प्लॅनप्रमाणे झालंच पाहिजे सगळं... तू बोललास तसंच करावं लागेल.. पुढच्या खुनाची वाट बघावी लागेल. "

पुढचा दिवस, सकाळी अभि लवकर पोलीस स्टेशनमध्ये आला.. झोपच लागली नाही त्याला. पुन्हा त्याच फाईल बघत बसला होता. चहा पित होता तेव्हाच कॉल आला. आणखी एक खून... महेशला घेऊन तिथे लगेच पोहोचला. खून झालेला तो , त्या व्यक्तीच्या इमारतीच्या गेटजवळच... कोणी बघितलं नाही त्यांना मारताना... CCTV फुटेज मिळालं, पण त्यात फक्त ते खाली पडताना दिसत होते... गोळी कुठून आली मग... महेश मृतदेह घेऊन त्याच्या लॅबमध्ये गेला. पुरावा काहीच नाही. अभि थोडावेळ थांबून पुन्हा त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आला. संध्याकाळपर्यंत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची चौकशी झाली. रात्री उशिरा महेशचा कॉल आला म्हणून अभि थांबला.

" अभि... सेम वेपन आहे... सागर बोलतो तोच खून करत आहे... पण त्याला कसं पकडायचं.. " अभि आधीच थकला होता.

" उद्या सकाळी बघू... आता माझं डोकं भयानक दुखते आहे... " दोघे आपापल्या घरी निघून गेले.

सकाळी अभि तयारी करून पोलीस स्टेशनला पोहोचला तर महेश आधीच तिथे बसला होता.

" काय रे... झोपला नाहीस का.. " अभि खुर्चीवर बसत म्हणाला.

" अरे ... बसू नकोस.. चल, निघायचे आहे... ",

" कुठे ? " ,

"गाडीत तर बस.. " अभिने गाडी सुरु केली.

" सांग आता... " अभि म्हणाला.

" पहिल्या ५ खुनाच्या ठिकाणी जाऊ.. " अर्थात त्या सगळ्या जागा सील केलेल्या होत्या... कोणाचे येणे-जाणे नाही.

" महेश.. आपण आधीच खूप वेळा आलो आहे इथे.. आता काही मिळणार नाही... " अभि बोलला.

" थांब जरा... आधी एक काम कर... त्यातील फोटोग्राफ बाहेर काढ.... या रुममधले... डेड बॉडी कुठे होती ते दाखव.. " तिथे आधीच खुणा करून ठेवल्या होत्या. महेशने ,अभिला त्याप्रमाणे उभं राहायला सांगितलं.

" बघ... तू समज, तो मृत व्यक्ती आहेस.. तसा उभा राहा... " अभिने पोझिशन घेतली.

" आता तुला मी गोळी मारणार... म्हणजे तुझ्या समोर उभा असणार मी... बरोबर ना.. " महेश बोलला.

" हो मग... " अभि... महेशने काही लिहून घेतलं.

" आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ चल... " अभिला काही कळलं नाही... दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुद्धा तसेच केलं दोघांनी. अभिने पोज घेतली. महेशने नोंद केली. असं करत करत ४ ठिकाणे झाली. पाचव्या ठिकाणी जेव्हा पोहोचले तेव्हा अभि वैतागून बोलला..

" काय चाललंय तुझं नक्की... ",

"पहिली तू पोज घे... मग सांगतो... " अभिने पुन्हा पोज घेतली.

" आता बघ... तुला जर मी गोळी मारणार असेन तर दारात किंवा जरा आत येऊन मारिन ना.. इकडे का मारिन.. ",

"म्हणजे... ",

" शिवाय तुला हत्यार मिळालं नाही... ते मिळणार सुद्धा नव्हतं... " ,

"काय बोलतो आहेस.. ?",

"या पाच जणांकडे ते नव्हतच...कारण ती बुलेट (गोळी) एका Rifle ची आहे...आणि Rifle .... long range shooting साठी वापरतात. सागर चे बोलणे काल रात्री आठवलं मला... "त्याचा नेम कधीच चुकत नाही "... अभि..हे फोटो बघ... मृत व्यक्ती खिडकीसमोरच उभी होती... किंवा या पाच जणांनी त्यांना खिडकी समोर आणलं असेल. सर्व फोटोमध्ये खिडक्या उघड्या आहेत... सहावा खून तसाच झाला. आता सातवा खून, तेव्हा तर ते बाहेरच होते. हत्यार मिळणार कसं... तो sniper आहे अभि ....दुरून नेम लावून गोळी झाडतो." अभिच्या सगळं ध्यानात आलं.

" म्हणजे तो सगळयांना आधीपासून ओळखतो.. यांच्यावर पाळत ठेवून असणार तो... त्याशिवाय त्याला कसं माहित कोण कुठे राहतो ते... " महेशला पटलं ते...

" चल निघूया... " दोघे गाडीत बसले तर गाडी सुरु होण्याचे नाव घेत नव्हती.

" काय झालं रे... " ,

"बहुदा बंद पडली... काल पासून त्रास देत होती... काय करूया... " दोघे गाडीतून उतरले. "टॅक्सी करूया का... ",

"नको... ट्रेनने जाऊ.. किती वर्ष झाली असतील.. कॉलेजमध्ये असताना ट्रेनचा प्रवास करायचो... आठवलं का.. " महेश जुन्या आठवणीत रमला.

" हो... चालेल... ट्रेनने जाऊया.. " दोघे तिकीट काढून ट्रेनने निघाले.

गर्दी नव्हतीच. बसायलासुद्धा जागा होती... तरी दोघे दरवाजातच उभे राहून गप्पा मारत होते. एकच स्टेशन गेलं असेल. डब्यात चॉकलेट विकणारा मुलगा चढला. पुढे काही चॉकलेट विकून तो या दोघांजवळ आला. "साहब.. ",

"नको आहे आम्हाला... पुढे जा... " अभि त्याच्याकडे न बघताच बोलला.

" चॉकलेट नही साहब... ये देना था... " म्हणत त्याने "बुद्धिबळातील उंट " अभि समोर धरला.

अनपेक्षित !!! ... अभि चकित झाला. " किसने दिया... बोल जल्दी !!... " अभिने त्याचा हात पकडला... तो मुलगा घाबरला. " मैने कुछ नही किया साहब... वो आदमी ने ५० रुपया दिया और आपके तरफ इशारा किया... देने को.. " ,"कहा है वो.. " अभि ट्रेनच्या डब्यात इकडे तिकडे बघू लागला. तोपर्यंत पुढचं स्टेशन आलं. तो मुलगाही बघू लागला. " वो... वो रहा साहब... लाला टीशर्ट... टोपी वाला... " अभिने पाहिलं. एक जण होता दारात उभा... लाल टीशर्ट, डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर रुमाल गुंडाळलेला... अभि त्या मुलाला सोडून झपकन त्याच्याकडे निघाला. अभिला जवळ आलेलं बघून 'त्याने' पटकन प्लॅटफॉर्म वर उडी मारली. आणि पळू लागला. अभिने तेच केलं. पडता -पडता वाचला. स्वतःला सावरलं आणि त्याचा पाठलाग करू लागला. पण 'तो' इतका चपळ होता की बघता बघता गर्दीत निघून गेला. कुठे शोधणार... अभि रेल्वेच्या ब्रिजवर उभा राहून बघत होता... महेश आला थोड्यावेळाने. " जरा.. जरासाठी निसटला तो... " अभि श्वासांवर नियंत्रण ठेवत बोलला. " महेश... तो त्यांच्यावरच नाही... तर आपल्यावरसुद्धा नजर ठेवून आहे.... " अभि आजूबाजूला बघत म्हणाला.

पोलिस स्टेशनकडे न जाता ते दोघे पुन्हा सागरला भेटायला गेले.

" अरे व्वा !!... पुढचा क्लू मिळाला वाटते. छान.. " या दोघांना बघून सागर बोलला.

" तू आता बऱ्या बोलाने सांग... कोण आहे तो.. नाहीतर.. " अभि रागात बोलला. सागर हसला...

" ते तर तुम्हाला शोधायचे आहे... एवढं सांगितलं तुम्हाला सर... चला अजून एक क्लू देतो... त्याला गणित खूप आवडते.. नंबर गेम्स.. वगैरे... आताही एक नंबर गेम सुरु आहे... तो तुम्हाला कळला तर उत्तम.. " महेशने अभिला पुन्हा अडवलं.

" अरे पण का करत आहात तुम्ही हे... " महेशचा प्रश्न

" हा... मी बोललो होतो ना... सांगेन म्हणून... सांगतो.. २ वर्षांपूर्वी हा खेळ त्यांनी सुरु केला होता आणि बुद्धिबळाचा नियम आहे की, खेळ अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही... बुद्धिबळ सगळ्यांना छान वाटतो ना खेळ.. पण यासारखा रक्तरंजित खेळ दुसरा कोणता नाही. या खेळात फक्त समोरच्याला मारायचं, एवढंच शिकवलं जाते... बरोबर ना... तर आता पुरतं एवढाच क्लू... नंबर गेम कळला तर पुढचा खून कधी होणार हे कळेल तुम्हाला... फक्त कोणाचा खून होणार ते शोधा.. जमलं तर वाचवा... " सागर हसत म्हणाला आणि झोपायला गेला.

अभि, महेश त्यांच्या पोलिस स्टेशनमध्ये आले.... 'उंट' हा क्लू होता. नंबर गेम कसला ते माहित नाही.. " एक काम करू... तू त्या सगळ्यांची मागील माहिती काढ आणि मी तो नंबर गेम काय आहे ते बघतो... " महेश अभिला म्हणाला. " आणखी एक... २ वर्षांपूर्वीची अशी एखादी घटना बघ... मोठी... ज्याचा या सगळ्यांशी काही संबंध असेल.. " अभि लगेचच कामाला लागला. महेश ते केस पेपर्स घरी घेऊन गेला.

दोन दिवस खूप डोकं घालूनसुद्धा महेशला काहीच कळलं नाही... तिथे अभिला मोठ्या ५ ते ६ केसेस मिळाल्या होत्या, पण एकाचाही संबंध त्या केसेसशी नव्हता लागत. सातव्या खुनानंतर तिसरा दिवस, महेश पुन्हा त्यात काही शोधत होता. अभि मिळालेल्या माहितीच्या आधारे, या सगळ्यांचा काही संबंध आहे का ते बघत होता. आणि फोन खणाणला.... खून... पुन्हा पळापळ. यावेळेस चक्क एका ऑफिसमध्ये खून... लंच टाईमला... अभि ,तिथे पोहोचताच त्याच्या काही लक्षात आलं. मृत व्यक्ती, जेवायला खिडकी जवळ बसली होती.

" हे नेहमी इथे बसायचे का जेवायला.. " अभिने त्यांच्या सहकाऱ्यांना विचारलं.

" हो.. ठरलेली जागा होती त्यांची... " ,

" एकटेच बसायचे का जेवायला.. म्हणजे टिफिन share नाही करायचे का... " ,

" नाही... जरा तापट होते... एकटेच येऊन बसायचे... " अभिने पुढे काही विचारलं नाही. त्या खिडकीपासून काही अंतरावर तीन इमारती होत्या.. गोळी तिथूनच आली असेल.. शिवाय त्या इमारती, under construction होत्या. CCTV कॅमेरा तिथे नसणारच हे अभिला माहित होतं, तरी दोन हवालदारांना तिथे चौकशीसाठी पाठवलं. जागा सील करून, पुन्हा पोलिस स्टेशनला आले.

" काय सॉलिड आहे ना तो... किती अभ्यास केला आहे त्याने या सगळ्यांचा ...मानलं पाहिजे त्याला... " अभि महेशला बोलला. महेशचं लक्ष खाली पेपर्सकडे होतं.

" रिपोर्ट आहेत का महेश.. ",

" रिपोर्ट्स जाऊ दे रे... ते नाही महत्वाचं... मला वाटते , त्याचा नंबर गेम मला कळला आहे... yes... मला समजला... "महेश उत्साहात म्हणाला.

" लवकर... लवकर सांग... " अभि त्या पेपर्स कडे बघत म्हणाला.

" हे बघ... पहिले पाच खून... त्यांच्या तारखा बघ... १० जानेवारी, ११ जानेवारी, १२ जानेवारी, १३ जानेवारी आणि १४ जानेवारी.... OK " ,

"हा पुढे... " ,

"आता सहावा खून.... ११ मार्च... सातवा, १४ मार्च... आणि आज १७ मार्च... ",

" पुढे सांग रे.. " ,

"जानेवारी म्हणजे १... .... १० जानेवारी, म्हणजे.. १० + १ केलं त्याने... म्हणून ११ मार्च... यातच वेळ सुद्धा आहे... सकाळी ११ वाजता... " अभि समजला.

" त्यानंतर ११ मार्च म्हणजेच... ११+३ = १४... १४ मार्चला खून... दुसऱ्या खूनाची तारीख... ११ जानेवारी... means ११+१ = १२ ..... , सातवा खून १४ मार्च, वेळ दुपारी १२ वाजता... आता, आजचा खून... १४ मार्च, १४ + ३ = १७ , आज १७ मार्च... तिसऱ्या खूनाची तारीख.. १२ जानेवारी, १२ + १ = १३... १३ म्हणजे दुपारी १.... आजचा आठवा खून... १७ मार्च, दुपारी १ वाजता.. " महेशने कोडं सोडवलं.

" शाब्बास !!... महेश... यांचा अर्थ पुढचा खून होणार तो २० मार्च ,दुपारी २ वाजता.. " अभिने लगेच आकडेमोड केली.

संध्याकाळ झालेली.. अभि आणि महेश, शेजारी असलेल्या कॉफी शॉप मध्ये गेले.

" आणखी अभि.. मला काही कळलं आहे असं वाटते... " ,

" काय ? " अभि कॉफी घेत बोलला.

" त्यांच्या size नुसार त्यांना नावं दिली असतील... हत्ती म्हणजे ते जरा जाड होते... उंट म्हणजे त्यांची height बघितली ना तू.. असं असेल बहुदा.... " ,

"तसं असेल तर... मग प्यादं.. ते कसं सांगशील.. " महेश पुन्हा विचारात पडला. आणखी अर्धा तास गप्पा मारत बसले होते दोघे. बिल देण्यासाठी दोघे काउंटर जवळ आले. तर महेश चे लक्ष शेजारीच ठेवलेल्या वस्तू वर गेलं. " अभि !! " महेशने अभिचे लक्ष तिथे वळवलं. एक काळ्या रंगाचे "बुद्धिबळातील प्यादं " ...तिथे ठेवलं होतं. आणि खाली कागदावर " only for inspector अभिषेक " असं लिहिलं होतं. अभिने लगेच तिथे विचारपूस केली.

" कोणी ठेवलं हे इथे.... " तिथे असलेल्या मुलीला अभिने मोठ्याने विचारलं .

" सर,... खरंच मला माहित नाही... " ती रडू लागली.

"CCTV तरी चालू आहे ना... " महेशने विचारलं.

दोघेही CCTV चे फुटेज बघू लागले. चेहरा तर दिसत नव्हता त्याचा... पुन्हा रुमाल लावला होता त्याने.. पण अभिने ट्रेनमध्ये बघितलेल्या मुलासारखाच वाटत होता तो. लाल टीशर्ट... डोक्यावर टोपी... " हे फुटेज... पोलिस स्टेशन मध्ये पाठवून द्या... " अभि आणि महेश बाहेर आले. " प्रत्येक चालीवर लक्ष आहे त्याचं... आता तर पोलिस स्टेशन जवळ पण आला तो... कमाल आहे ना... " महेश एकटाच बडबड करत होता. अभि मात्र विचारात होता... प्यादं हातात होतं त्याच्या.... २० मार्च... वेळ दुपारी २ वाजता... तारीख आणि वेळ तर समजली... कोण मरणार असेल आणि कोण मारत असेल या सगळ्यांना ..... अभि विचार करत करत घरी निघाला.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बघता बघता २० मार्च आला. अभिला अजून काही वेगळी माहिती मिळाली नव्हती. महेशसुद्धा तीच ती माहिती वाचून कंटाळला होता. आज दोघे फक्त एका फोनची वाट बघत बसले होते.. खुनाच्या माहितीचा फोन.. दुपारी जेवण सुद्धा नीट गेलं नाही पोटात. दुपारचे २. ३० वाजले असतील. आणि अभि वाट बघत असलेलया माहितीचा फोन आला. महेश सहित पुन्हा अभि आपली टीम घेऊन निघाला... तिथे पोहोचला तर गाडीत खून... मृत व्यक्ती गाडीत असताना त्याला गोळी मारली होती. गाडीची काच भेदून आरपार गोळी त्यांना लागली होती. ते बघून महेश चक्रावून गेला. " खरंच !! कमाल आहे त्याची यार... कसं काय सगळं करतो ते कळत नाही... " महेश बोलला.

Dead body , postmortem साठी पाठवून अभि पुन्हा सागरकडे आला. सागर बुद्धिबळ खेळत बसला होता. टाळे न उघडताच अभि , सागर बरोबर बोलू लागला.

" तो कोण आहे ते माहित नाही.... तुला माहित असून ते तू सांगू शकत नाही.... पण कारण असेल ना या मागे काहीतरी.. बोल " सागर त्याच्याकडे बघतच नव्हता.

" थांबा हा... जरा खेळ संपत आला आहे माझा.. " सागर त्या खेळाकडे बघत म्हणाला. अभि त्याला बाहेरूनच बघत होता. सागरने एकदा अभिकडे पाहिलं. पुन्हा त्याने बुद्धिबळाच्या पटावर उरलेलय सोंगट्या मांडल्या. ....... घोडा, वजीर आणि राजा, एवढ्याच....

" बरोबर एवढेच उरले आहेत ना आता.... " सागर अभिकडे बघत म्हणाला. " तो सगळयांना मारणार... हे नक्की... या खेळात सगळेच मरणार...कोणीच वाचणार नाही... " अभिला कळलं, याच्यापुढे बोलून काही फायदा नाही. निघाला... तो निघाला तसा सागर बोलला काही तरी.. " या खेळात राजाला का महत्त्व देतात तेच कळत नाही... सर्वात महत्त्वाचा तर वजीर असतो.. तो मेला की खेळच जवळपास संपून जातो. " एवढंच बोलला सागर..

अभि त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये आला. महेश वाट बघत होता. " अभि... काही माहिती मिळाली आहे ... या सर्वबाबत..." महेशने एक फाईल अभि समोर धरली. अभि फाईल उघडून वाचू लागला. " या पाच जणांची माहिती मिळाली. मित्र होते ते आधीच ठाऊक होते... पण अजून एक गोष्ट कॉमन आहे... ते एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत... नाशिकचे आहेत सगळे... " अभि ती माहिती वाचत होता. खूप वेळाने बोलला.

" महेश, मला वाटते मी आताच तिथे जायला पाहिजे... आणखी तीन जणांचे जीव धोक्यात आहेत... ",

"हो... अभि... त्यात त्या कॉलेजचा पत्तासुद्धा आहे.. मीही येतो... " ,

" नको.. मी एकटाच जातो... कारण त्याचे आपल्यावर सुद्धा लक्ष आहे... त्यामुळे एकाने तरी इथे असणं आवश्यक आहे... पुढचा खून २३ ला होणार आहे... त्या आधी मी येण्याचा प्रयत्न करीन... "

अभि लगेचच तयारी करू लागला. दुपारपर्यंत योग्य ती कागदपत्र गोळा करून २ हवालदारांसहित निघाला. आजच नाशिकला पोहोचायला हवे, असा विचार करून अभिने गाडी सुरु केली. पोलीस स्टेशनच्या गेटजवळ गाडी आली तसा अभिने ब्रेक लावला. " काय झालं सर ?" एक हवालदाराने विचारलं. अभि गाडीतून खाली उतरला. गेट जवळच , रस्त्याच्या बरोबर मध्ये .... बुद्धिबळातील 'घोडा' ठेवला होता..... पुढचा क्ल्यू... अभिने तो हातात उचलून घेतला. आजूबाजूला बघत उभा राहिला. नक्कीच कुठेतरी जवळच असेल तो.... आपल्याला बघत. थोडावेळ थांबून अभि गाडीत जाऊन बसला आणि गाडी सुरु केली.

त्याचदिवशी अभि रात्री नाशिकला पोहोचला. विलंब न करता, तसाच त्या कॉलेजमध्ये गेला. आधीच त्याने कॉल करून , मी येतो आहे असे त्यांना सांगून ठेवले होते. तसे तिथे दोघे थांबले होते. अभि पोहोचला कॉलेजच्या ऑफिसमध्ये. " प्रिन्सिपल सर कुठे आहेत ? " अभिने आल्या आल्या प्रश्न केला.

" येतील ते आता... जेवायला गेले आहेत. " ,

" त्यांना सांगितलं होतं ना थांबायला... " अभि चिडला.

" सर ... रागावू नका प्लिज... डायबेटीस आहेत ना ते, वेळेवर जेवायला लागते त्यांना... आणि इथेच राहतात... येतील ५ मिनिटात... " तिथे उपस्थित असलेल्या एकाने माहिती दिली. तसा अभि शांत झाला. १० मिनिटांनी ते सर आले.

ते आले तसे त्या ४ जणांचे फोटो अभिने त्यांच्या समोर ठेवले. " हे तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत ना.. " त्यांनी ते बारकाईने पाहिले.

" बहुदा गेल्या वर्षी पास झालेले विद्यार्थी आहेत हे... काय ना, आता जास्त लक्षात राहत नाही चेहरे... " प्रिन्सिपल सर म्हणाले.

" सर , मी ओळखतो यांना.... " मागे उभा असलेला एक सहकारी म्हणाला.

"पुढे या तुम्ही... आणि काय माहिती आहे ते सांगा.. " अभिने त्याला पुढे बोलावलं.

" हे चौघे... आमच्या कॉलेजची बुद्धिबळाची टीम होती, त्यात होते.",

" नक्की का... ",

" हो हो... मलाही आठवलं आता... " प्रिन्सिपल सर म्हणाले.

"सागर सर आणि ५ जणांची टीम होती. " सागरचे नाव ऐकताच अभिचे डोळे चमकले. सागरचा फोटोसुद्धा आणला होता त्याने.

" हाच का... " ,

" हो... हेच सागर सर... " प्रिन्सिपल सर म्हणाले." पण तुम्ही कसं ओळखता सगळ्यांना आणि हे फोटो कसे तुमच्याकडे. " ,

" म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही... या सगळ्यांना अटक झाली आहे... खुनाची केस चालू आहे सगळ्यांवर... " प्रिन्सिपल सहित सगळेच एकमेकांकडे पाहू लागले.

" तरीच ते सागर सर, दोन -तीन महिने गायब आहेत..... " एक जण म्हणाला.

" सागर सर म्हणजे..... ते इथे शिकवायला होते का... " अभिने पुढचा प्रश्न विचारला.

" हो... सागर इथे मुलांना इतिहास शिकवायचे.... इनफॅक्ट शिकवतात. ते मुंबईला कधी गेले, का गेले, काही कळत नाही." ,

" आणि हे बुद्धिबळाचे काय... त्यांचा काय संबध.... ",

" सागर सरांना बुद्धिबळ उत्तम जमते. आमच्या कॉलेजमधून एक टीम जाते दरवर्षी.... स्पर्धेला... त्यात ते आणि इतर ५ जण होते. छान टीम होती. ".

" ok ... पण मला सांगा... हे चार जण मुके-बहिरे आहेत... हे चालते तुमच्या कॉलेजमध्ये... " अभिने आणखी विचारलं.

" तुम्ही कॉलेजचे नाव वाचलं नाही का... हे कॉलेज त्याचेच आहे... अपंग विद्यार्थी इथे शिकतात.. " अभिच्या आता ध्यानात आलं.

प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये सगळे बसले होते. मागे लावलेल्या फोटोवर अभिची नजर गेली. काही फोटोज मध्ये, सागर आणि ते चार जण होते. ट्रॉफी सहित फोटो होते. बुद्धिबळाची स्पर्धा जिंकले असतील. अभिने तर्क लावला. सहा जणांची टीम, त्यातल्या ५ जणांना ओळखलं... आणखी एक होता. त्याच्याकडे बोट दाखवत अभिने विचारलं.

" हा कोण ? " प्रिन्सिपल जागेवरून उठले आणि फोटो जवळ आले.

" हा संदेश... आमच्या आधीच्या प्रिन्सिपल सरांचा मुलगा.. ",

"ok... कुठे असतो हा... ",

" तो नाही ह्या जगात आता... एका अपघातात त्यांची सगळी फॅमिली गेली." अभिला ते ऐकून वेगळंच वाटलं.

"सगळे म्हणजे ? .... " अभि...

" काय झालं ते नक्की माहित नाही मला... पण ते जात होते कुठेतरी, बहुदा लग्नाला जात होते... तेव्हा अपघात झाला गाडीला त्यांच्या... फक्त प्रिन्सिपल सर तेवढे वाचले... बाकी सर्व अपघातात गेले. " ,

" मग हा कसा या टीम मध्ये... ",

" त्यालाही बोलता येत नव्हते... फक्त ऐकायला यायचे त्याला... इथेच होता शिकायला... हुशार होता अगदी... " सरांनी माहिती दिली.

" मग ते सर कुठे असतात... " ,

" त्यांना मानसिक धक्का बसला, वेड्यांच्या रुग्णालयात असतात ते... खूप स्पप्न होती त्यांची... मुलगा हुशार होता ना त्यांचा... खेळात, अभ्यासात... " ते सर सांगत होते. अभि एक-एक फोटो बघत होता. संदेश मेडल घालून उभा होता.

" अभ्यासात मेडल मिळवायचा.... बुद्धिबळात तर ग्रेट... तसाच नेमबाजीत.... " संदेशचा आणखी एक मोठा फोटो होता, rifle gun घेऊन... तो फोटो बघून अभि काही संशय आला. तो खून करणारा सुद्धा rifle gun नेच गोळी मारून खून करत होता. सागरचे बोलणे आठवलं त्याला. silent killer आहे, सगळ्यांचे चुपचाप ऐकून घेतो... संदेशच असावा तो... कारण सागर बोलला होता, की उरलेल्या एका प्याद्याने हे सर्व खून केले आहेत आणि त्याच्या टीम मधला सहावा मेंबर म्हणजे संदेश...

" याचा पूर्ण फोटो मिळेल का.... " तसा सरानी एक फोटो काढून अभिला दिला. अभिच्या काय मनात आलं माहित नाही... सर्व मृत व्यक्तींचे फोटो त्याने फाईल मधून आणले होते. ते सर्व फोटो त्याने सर्वांसमोर ठेवले.

" या पैकी कोणाला ओळखता का तुम्ही... कारण यांच्या खुनासाठीच सागर आणि या चार जणांना अटक झाली आहे. तर नीट लक्ष देऊन बघा... " एक एक फोटो बघत होते सगळे... प्रिन्सिपल सरांनी एक फोटो हातात उचलून घेतला आणि बारकाईने बघू लागले.

" या बाकी बद्दल माहिती नाही... पण हा एक गुन्हेगार होता... याला ओळखतो मी.... कारण.. याच कॉलेजमध्ये याला चोरी करताना पकडल होतं... याची केस सुद्धा मिळेल तुम्हाला, शेजारच्या पोलीस स्टेशन मध्ये.. "

वा !! चांगली माहिती मिळाली... रात्र सुद्धा झालेली... अभिने सगळ्यांना घरी जाण्यास सांगितले.. त्यानेही आराम केला.

दुसऱ्या दिवशी , सकाळीच अभि, त्या पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिथे गेल्या गेल्या सगळे फोटो, तिथल्या अधिकाऱ्याला दाखवले.

" हो... याला ओळखतो मी... याचा रेकॉर्ड आहे आमच्याकडे... देतो मी फाईल याची.. " ते फाईल काढायला उठले तसं त्याचे लक्ष दुसऱ्या फोटो वर गेलं. नंतर तिसऱ्या....

" सर , हे सुद्धा क्रिमिनल आहेत... तुमच्याकडे कसे यांचे फोटो... " अभिला काय समजायचे होते ते समजला.

" या सर्वांचे मुंबईत खून झाले आहेत... एक काम करा... माझ्याकडे आणखी काही फोटो आहेत... तेही बघून घ्या... " आणखी दोन जणांना त्यांनी ओळखलं...

"आणखी एक काम करा... उरलेल्या व्यक्तीचे काही रेकॉर्ड्स आहेत का तेही चेक करा...म्हणजे असले तर... " आणि तसंच झालं... मेलेले सगळेच, कुठे ना कुठे तरी गुन्ह्यात अडकलेले होते. अभिने सगळी माहिती घेतली. म्हणजे महेश बरोबर बोलत होता. या सर्वांचा एकमेकांशी काही संबंध नाही.. मग त्याने संदेशचा फोटो दाखवला त्यांना.

"हा कोण ? " त्यांनीच उलट प्रश्न केला अभिला.

" २ वर्षांपूर्वी... तुमच्या बाजूला असलेल्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांची पूर्ण फॅमिली एका अपघातात गेली... त्यांचा हा मुलगा.. याला बघितलं आहे का कधी.. " अभिने विचारलं.

" हो सर... आठवलं... पण ती केस इथे नाही आहे.. " तसा त्याने अभिला एका पुढच्या पोलीस स्टेशनचा पत्ता दिला. अभि लगेचच पोहोचला. तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने लगेच ती फाईल काढून दिली.

" अपघात कसा झालेला आणि किती लोकं होती गाडी मध्ये.. " ,

" अपघात कसा झाला ते माहित नाही... कारण कोणीही बघितला नाही अपघात होताना... त्यात रात्री २ ते २.३० मध्ये झालं हे... त्यामुळेच गाडीवरचा कंट्रोल गेला असं गृहीत धरलं आम्ही.... शिवाय त्या गाडीत खूप काही सामान होतं... बहुदा त्यामुळेच... " ,

" ठीक आहे... किती लोकं होते... " ,

"५ जण होते... त्यातले एकच वाचले... प्रिन्सिपल सर.. " अभि फाईल बघत होता.. त्याला काही वेगळं दिसलं.

" इथे तर तीनच व्यक्ती मृत आहेत असे लिहिलं आहे... ",

" हो सर... गाडी खाली दरीत कोसळली ना... एक डेड बॉडी सापडलीच नाही... ",

" मग हे सर कसे वाचले.. ",

" ते माहित नाही.... ते एका कोपऱ्यात पडले होते... " अभिला काही समजत नव्हतं.

" डेड बॉडी सापडली नाही... मग ती व्यक्ती मृत आहे , हा अंदाज कसा लावला तुम्ही... " अभि रागात म्हणाला. ते इन्स्पेक्टर मान खाली घालून उभे राहिले.

" बरं... त्या गाडीचे रिपोर्ट कुठे आहेत... आणि त्यांचे post mortem चे रिपोर्ट ,तेही द्या लवकर... " सगळ्यांची धावपळ सुरु झाली. अभिने रिपोर्ट काळजीपूर्वक बघितले.

" ते पाच जणं कोण होते, ते तरी लिहिलं का... "

" हो सर... प्रिन्सिपॉल त्यागी सर.... त्याचे कुटुंब... मुलगा संदेश, त्यांची पत्नी... , त्यांचा भाऊ... आणि आणखी एक व्यक्ती... ज्याची ओळख पटली नाही... त्यात त्याच्या मुलाची डेड बॉडी सापडली नाही... " अभिने त्या अनोळखी व्यक्तीचा फोटो बघितला. " याची डेड बॉडी घेऊन जायला कोणी आले नाही का. ? " अभिने फोटो बघत विचारलं.

" नाही सर... कोणीच नाही... याशिवाय त्याला कोणीच ओळखत नाही... "

थोड्यावेळाने, गाडीचे रिपोर्ट आले. गाडीचे ब्रेक वगैरे ठीक होते. आणखी काही नव्हतं. गाडी प्रिन्सिपॉल सरांच्या नावावर घेतली होती. शहरापासून थोड्याच अंतरावर गाडीचा अपघात झाला होता.

" एवढ्या रात्रीचे कुठे निघाले होते. " ,

" माहित नाही सर, बहुदा लग्नाला चाललेले होते... ",

" गाडी कोण चालवत होतं... ? " ,

" तोच अनोळखी इसम... " अभिला खूप प्रश्न पडले होते.

" बरं... या फोटो पैकी कोणाला ओळखता का ते बघा... ते सगळे क्रिमिनल आहेत ते कळलं आहे, फक्त तुमच्याकडे काही केस चालू आहे का ते बघा... mostly ,दोन वर्षांपूर्वी चे असं काहीतरी... " अभिने पुढे विचारलं.

" बघतो सर.. " १५-२० मिनिटांनी त्याने एक केस फाईल बाहेर काढली.

" सगळेच बारीक सारीक गुन्हा मध्ये होतेच... परंतु हे दोघे... त्यांच्या नावावर एक मोठी तक्रार होती, नंतर त्या केस चे काय झाले ते माहित नाही. " अभिने ती केस फाईल बघितली... ते दोघे म्हणजे... 'हत्ती आणि उंट' केस होती फसवणुकीची... सर्वात कुतूहल म्हणजे ... केस केली होती ती प्रिन्सिपॉल त्यागी सरांच्या बायकोने...

" काय केस होती नक्की... " अभीचा पुढचा प्रश्न..

" खरंतर मला जास्त काही माहिती नाही... पण कुलकर्णी वकील यांच्याकडे ही केस होती... ते जास्त माहिती देतील. " अभिने त्यांचा पत्ता घेतला आणि तडक निघाला... वेळेत पोहोचला. अभि तिथे पोहोचला तेव्हा ते कुठेतरी निघायची तयारी करत होते.

" सर. मी इन्स्पेक्टर अभिषेक... मुंबई पोलीस... मला काहीतरी माहिती हवी होती... वेळ आहे का तुम्हाला.. "

"हं... मला एक मिटिंग होती पण जाऊ दे, नंतर जाईन... तुम्ही बोला... मुंबई वरून आलात म्हणजे नक्की काही खास असेल... " कुलकर्णी बोलले.

" हो सर " अभिने त्यागी सरांचा फोटो दाखवला. " यांना ओळखता ना तुम्ही... " त्यांनी लगेच ओळखलं. " मग यांची केस... जी तुमच्या कडे चालू होती... त्याबद्दल विचारायचे होते. ",

" एक मिनिट " ते त्यांच्या PC मध्ये बघू लागले.

" हा ... मिळाली केस... ही बघा माहिती... " अभि बघू लागला.

" त्यांच्या मिसेसने तक्रार नोंदवली होती, त्यावरून केस उभी राहिली होती. मिसेस त्यागीनी... अलका आणि त्यांचे मिस्टर दीपक... यांच्यावर फसवणुकीची केस केली होती. ",

" जरा सविस्तर सांगा. "

" ते जे कॉलेज आहे ना... ते, शिवाय त्यांचे राहते घर... आणि आणखी काही जमीन... हे सगळं अलका आणि दीपक यांनी फसवून त्याच्या नावावर केली असा आरोप होता.",

"ते कॉलेज त्यागी सरांचे आहे का... ",

" नाही .. परंतु अलका यांच्याकडे त्याचे पेपर्स आहेत... असं मिसेस त्यागी याचे म्हणणे होते.",

"मग केसचे काय झाले.. " ,

" आठवड्याने त्यांचा अपघात झाला ना.. केस कोण लढणार मग... त्यागी सर आहेत... पण आजारी.. " ,

" हे अलका आणि दीपक कुठे असतात ? ",

" माहिती नाही... केस बंद झाली, कोर्टाने निकाल दिला आणि दुसऱ्या दिवशीच हे दोघे कुठे गेले निघून कोणाला माहित नाही." , अभि विचार करू लागला. ५ जणांवर केस होती, मिसेस त्यागींना वाटत होते की हेच पाच जण सामील आहेत यात... कुलकर्णीने ते ५ फोटो दाखवले... त्यातले दोघे तेच... 'हत्ती आणि उंट'... "यातले ... या अलका आणि हे दीपक... आणि हा अलकाचा भाऊ... समीर... बाकी या दोघांचा काय संबंध होता हे माहित नाही. तरीही हे गुंडच होते, परंतु या केसमध्ये काय करत होते , त्यांनाच माहिती... "

वेगळी माहिती, तरीही अपूर्ण.. तो खरंच अपघात होता का तेही माहिती नाही. त्या गाडीत असलेला आणि मृत्युमुखी पडलेला अनोळखी व्यक्ती कोण... त्याची माहिती नाही.. त्या केस मध्ये पाचच जण सामील होते. तर खून झालेल्या इतरांचा काय संबंध... आणि सर्वात महत्वाचं, त्यागी सरांचा मुलगा... संदेश... खरंच जिवंत आहे का.. असेल तर तोच खून करतो आहे का.. या प्रश्नांसह अभि पुन्हा मुंबईकडे निघाला.

२२ तारखेला दुपारी, अभि मुंबईत पोहोचला. महेश त्याचीच वाट बघत बसला होता. अभिने सगळी माहिती महेश समोर ठेवली.

" संदेश जिवंत असल्याचा पुरावा कुठे आहे आपल्याकडे... " महेश बोलला. अभि, संदेशचे फोटो बघत होता.... निरखून अगदी. अचानक काहीतरी आठवल्या सारखं तो उठला. आणि काहीतरी शोधू लागला.

" काय शोधतोस... " महेशने विचारलं.

" कॉफी शॉपमधला व्हिडीओ फुटेज... ",

"ते कशाला आता... " तोपर्यत अभिने विडिओ लावला सुद्धा. 'तो' ते प्यादं ठेवतानाचे व्हिडीओ फुटेज होते ते... एका वेळी त्याने तो व्हिडिओ "pause " केला... आणि जवळ जाऊन पाहू लागला.

" काय बघतो आहेस तू... " महेशने पुन्हा विचारलं.

" हे बघ,... ट्रेनमध्ये मी ज्याला बघितल होतं, त्याच्या हातावर एक खूण होती... जन्म खूण वगैरे असावी. तशीच खूण या संदेशाच्या फोटो मध्ये आहे बघ... आणि आता... या व्हिडीओमध्ये ... लक्षपूर्वक बघ... त्याच्या हातावर, संदेश सारखीच खूण आहे.. याचा अर्थ हा संदेशच आहे... " महेशला बऱ्याच अंशी पटलं ते.

" पण या वरून कोणाचा खून होणार ते कळत नाही ना... " अभि त्याच विचारात होता.

" ते तर उद्याच कळेल... २३ मार्च, दुपारी ३ वाजता.... " अभि बोलला. तोपर्यंत संध्याकाळ होत आलेली. आणखी थोडावेळ थांबून दोघेही घरी निघाले. पुढचा दिवस, आज आणखी एकाचा खून होणार... अभि फक्त बातमी कुठून येते याची वाट बघत होता. बरोबर दुपारी ३. १५ वाजता फोन आला. movie theater मध्ये खून... अभि ते सगळं लक्षपूर्वक बघत होता. गोळी मागून मारली होती.

" मला वाटते,त्या प्रोजेक्टरच्या इथून गोळी आली असावी. " महेशने एक अंदाज लावला. गोळी डोक्यात पण मागून लागली होती. आणखी काही फोटो वगैरे काढून मृत व्यक्तीचे अभि निरक्षण करू लागला. अचानक त्याला काही आठवलं. एक फोटो बाहेर काढून तो दोघाचे मापन करू लागला. महेश, अभिला बघत होता.

" महेश... याची दाढी काढली तर ... आणि केस काळे केले तर ... हा फोटो मधला व्यक्ती होऊ शकतो ना... " महेशने अभि कडून फोटो घेतला आणि चेक करू लागला. मेलेल्या व्यक्तीला दाढी होती ,तसेच केस 'ग्रे' रंगाचे होते.

" अगदी बरोबर अभि.. हाच आहे तो... म्हणजे संदेश या सगळ्यांना मारतो आहे... ज्याच्यावर केस होती त्यांना.. " महेश म्हणाला.

" याचाच अर्थ... या दोघांचा जीव धोक्यात आहे. ... आपल्याला लवकर काहीतरी करावे लागेल... " अभि, महेशला उद्देशून म्हणाला.

डेड बॉडी, महेशने लॅबमध्ये पाठवून दिली. ती जागा सील करून निघणार, इतक्यात मूवी प्रोजेक्टर सुरु झाला आणि समोरच्या मोठ्या स्क्रिन वर 'बुद्धिबळातील वजीर' दिसू लागला. अभिने चपळाई केली. तसाच धावत तो प्रोजेक्टर रूममध्ये गेला. कोणीच नव्हतं तिथे. मात्र एका कोपऱ्यात एक व्यक्ती बांधलेल्या अवस्थेत होती. अभिने लगेच त्याला मोकळं केलं.

" कोण आहात तुम्ही.. " अभिचा प्रश्न... ते आधीच घाबरले होते. थोड्यावेळाने, त्यांना धीर आला तसे ते बोलले.

" मी... मी इथे जॉब करतो... मुव्ही प्रोजेक्टरवर.... मीच मूवी सुरु करतो... " ,

" मग हे कोणी केलं.... " ,

" एक मुलगा आलेला... त्याने चाकूचा धाक दाखविला आणि बांधून ठेवलं... नंतर मोठ्या बंदुकीने गोळी ही झाडली... खाली बसलेल्या कोणाला तरी... " ते भीतीने थरथरत होते.

" त्याचा चेहरा बघितला का तुम्ही... ",

"नाही... तोंडावर रुमाल बांधला होता... " ह्म्म्म ... अभि विचार करू लागला... काय मनात आलं त्याच्या... संदेशचा फोटो समोर धरला त्यांच्या...

" नीट आठवून सांगा... त्याच्या हातावर अशी खूण होती का... " त्यांनी खूप आठवण्याचा प्रयन्त केला.

" नाही आठवत सर... त्याने मला बांधलं होतं... गोळी मारली आणि इथे प्रोजेक्टर काहीतरी लावून निघून गेला... ",

"ठीक आहे ... घेऊन जा यांना... " अभिने एका हवालदाराला सांगितलं.CCTV कॅमेरा होता तिथे... अभिने तो व्हिडिओ चेक केला.. ते खरं बोलत होते... अभिने पुन्हा त्या व्यक्तीच्या हातावर लक्ष दिलं... तशीच खूण... तोच तो...

सगळे निघाले तिथून... अभि मात्र सागर कडे आला. अभिला आलेलं पाहून सागर हसला. " घोडा गेला वाटते... very good... " सागर टाळ्या वाजवत म्हणाला. अभि शांतपणे ते ऐकत होता. काही न बोलता तो त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये आला. आता त्याला कळलं होतं कि कोणाचा खून होणार आहे ते, कधी आणि कुठे ते सुद्धा कळलं होतं...

" अरे पण... तू त्या दोघांना कुठे शोधणार.... " महेशचा प्रश्न...

" कुठे म्हणजे... इकडेच.. मुंबईत... तो समीर आहे, अलकाचा भाऊ... याचा अर्थ ते दोघेही मुंबईत असतील ना... " अभि

" कश्यावरुन... समीर, ज्याचा आता खून झाला... त्याने तर वेशच बदलला होता जवळपास... तरी त्याने मारलं... जर याने वेश बदलला असेल तर... त्या दोघांनींही तसेच केलं असेल... आणि एव्हाना त्यांनाही समजलं असेल... समीरचा खून झाला आहे ते... " महेशच्या बोलण्यात तथ्य होते. तरी एक चान्स घेऊया ,म्हणत त्या दोघांच्या फोटो कॉपी सर्व शहरातील, पोलीस स्टेशन मध्ये पाठवून, त्यांची काही माहिती आहे का ते बघण्यास सांगितले.

पुढचा दिवस, मीडियाचा दबाव वाढत चालला होता. अभि पुढच्या क्लूचा विचार करत होता. " वजीर " ....

" वजीर म्हणजे सेनापती ना.. बरोबर ना .. " अभिने महेशला विचारलं.

" हो... वजीर म्हणजे सेनापती... या खेळातील सर्वात महत्त्वाचं पात्र... जवळपास सगळाच खेळ यांच्याभोवती फिरतो. सागर बोलला ते बरोबर... राजाला काहीच महत्त्व नसते या खेळात... वजीर गेला की खेळच संपतो.. " महेशने माहिती दिली.

" मग.. या दोघांमध्ये... दीपक.. हेच पुरुष आहेत.... म्हणजे राजा अजून कोणीतरी वेगळा आहे तर... " अभिने विचार मांडला. महेश त्यावर काही बोलला नाही. तो पूर्ण दिवस तर आणखी माहिती गोळा करण्यात गेला. शिवाय त्या दोघांमधलं कोणी भेटते का यावर गेला. शेवटची मृत व्यक्ती.... त्याचे मोबाईल रेकॉर्ड चेक करून आणखी माहिती मिळाली. परंतु त्यातले बरेचसे नंबर बंद होते. म्हणजेच समोरच्या व्यक्तीला कळलं की, याचा खून झाला आहे. शिवाय तो त्याचं नाव बदलून राहत होता शहरात. आणखी वेगळी माहिती. रात्री पर्यत तेवढीच माहिती होती.

दुसरा दिवस, २५ मार्च... उद्या आणखी एक खून होणार... अभि त्याच्या केबिनमध्ये येरझाऱ्या घालत होता. सकाळीच तो खूप ठिकाणी जाऊन आलेला. अलकाचा भाऊ... शेवटी जिथे जिथे गेला होता, तिथे जाऊन आलेला. जास्त काही माहिती मिळाली नाही. त्याचबरोबर, त्या दोघांना बघितलं... असे २-३ ठिकाणांवरून फोन आलेले.. तिथेही जाऊन आलेला.. ते नव्हतेच ते... संध्याकाळ झाली पुन्हा पोलीस स्टेशनला यायला.

२६ मार्च उजाडला... अभि सकाळीच महेश सोबत, सागर ला भेटायला गेलेला... सागर त्याच्या नेहमीच्या तुरुंगातील कामावर होता. त्याला बोलावण्यात आले.

" सागर... शेवटचं विचारतो.... सरळ सांग.... कोण आहे तो आणि का करतो आहे... " अभि रागात होता.

" हेच.. मलाही तुम्हाला सांगायचे होते... मला वाटलं काल येणार तुम्ही.... बरं,.... आज सांगतो. आजपण एकाचा नंबर आहे ना... " सागर हसत म्हणाला... (खाड)... सागरच्या गालावर अभिने जोरदार चपराक लगावली. कोसळला सागर... महेशने लगेच अभिला पकडलं.

" सांगतो... सांगतो... " सागर घाबरत म्हणाला. अभि त्याच्या समोर उभा राहिला. सावरून सागर जागीच बसला.

" दोन वर्षांपूर्वी... एक घटना घडली. मी शिक्षक आहे, हे तुम्हाला कळलं असेलच.... त्या कॉलेजचे सर, प्रिन्सिपॉल त्यागी.. खूप शांत आणि सच्चा माणूस... कोणाच्या मध्ये नाही... कोणाला वाईट बोलणे नाही... काही नाही... देव माणूस अगदी. अपंगांना पाहून दया यायची त्यांना... त्याची सेवा करता यावी म्हणून अश्या कॉलेजमध्ये होते. स्वतःचा पगार सुद्धा यांच्यावर खर्च करायचे... असे हे सर... सगळं छान चालू होते.... ती अलका कुठून आली काय माहीत... कॉलेजला पैशाची मदत केली तिने... स्वतःला बिजनेस मन म्हणणारे हे दोघे... नंतर सरांच्या अगदी ओळखीचे झाले... इतके की त्यांच्या घरी वगैरे येणं-जाणं सुरु झाले... कधी कधी जेवणही त्यागी सरांच्या घरी व्हायचे..... अलका मॅडम नंतर कॉलेजमध्ये यायच्या वरचेवर... सगळ्यांना ते खटकायचे.... पण बोलणार कोण... त्यात एक दिवस , यांची केस कानावर आली. अचानक सगळं... त्यागी मॅडमनी असं का केलं ते विचारायला गेलो तर कळलं की त्यागी सरांनी घर, जमीन सुद्धा त्या अलकाच्या नावावर केलेली. काहीच कळत नव्हतं. केस उभी राहिली.... त्याचदिवशी, संध्याकाळी... अलका मॅडमच्या भावाचा अपघात झाला... दुसऱ्या दिवशी, त्यागी सरांच्या भावाचा मुलगा बेपत्ता झाला... लगेच त्यागी मॅडमच्या वाहिनीचा अपघात झाला... म्हणजे हे सगळं अस ... पटापट अगदी वेगात होतं होते ना ... ते काही कळत नव्हतं. गडबड आहे हे समजून त्यागी मॅडम, सर, त्यांचा मुलगा संदेश... त्यांनी शहर सोडण्याचा निर्णय घेतला... तर नंतर कळलं की त्यांचा ही अपघात झाला... " सागर बोलत होता.

" संदेश कसा वाचला मग... आणि तोच खून करतो आहे.. हेही माहित आहे मला " अभि मधेच बोलला.

" हो... संदेश आणि त्यागी सर वाचले... खरंतर , संदेशनेच सरांना वाचवलं... तुम्हाला त्या अपघाताची माहिती मिळाली असेलच... अलका मॅडमने त्यांचा एक माणूस आमच्या कॉलेजमध्ये ठेवला होता... हे कोणाला माहीतच नव्हतं... त्यानेच तर गाडी सरळ दरीत नेली... अलका मॅडमने त्याला तशी ऑर्डरच देऊन ठेवली होती... त्यात तोही मेला... पण त्याच्या कुटुंबाला खूप पैसे दिले होते तिने... " ,

" पण मग .... संदेश का मारतो आहे सगळ्यांना... " महेशने विचारलं..

" तुम्हाला अजूनही कळलं नाही... एवढं सगळं झालं... त्या अलका आणि दीपकने... त्यांच्यावर केस केल्या बरोबर... याचा कुटुंबातील एकेकाला मारलं... हे जे सर्व मेले आहेत ना... त्यांचा संबंध प्रत्यक्ष ... संदेशाच्या कुटुंबाशी येतो... अलका आणि दीपक... सराईत गुन्हेगार आहेत... पैसे देऊन त्यांनी या भाडोत्री मारेकऱ्याकडून त्यागी कुटुंब संपवलं... तेव्हाच संदेशने हा पूर्ण प्लॅन केला... " सागर सांगत होता.

" मग तुमचा काय संबंध.... तुम्ही ५ जण कशाला अडकलात स्वतःहून... " अभि...

" आमचाच टीम मेंबर आहे ना तो.. त्यात त्यागी सरांनी खूप केलं आमच्यासाठी... त्याची परतफेड नको का करायला.... या सगळ्यांची माहिती गोळा करताना २ वर्ष कशी गेली ते कळलंच नाही... झालं... एवढीच माहिती आहे.... एक सांगतो, तुम्ही कितीही प्रयन्त केलात तरी मरणार ते सगळेच.. आम्ही फक्त वाट बघत होतो... ही वेळ कधी येणार ती.... आली आता वेळ.... "सागरने बोलणं संपवलं. अभि त्याच्याकडे खूप वेळ बघत होता. काय बोलावं ते कळत नव्हतं. महेश, अभि दोघे कोठडीतून बाहेर आले. हवालदाराने टाळ लावलं, तरीही अभि सागरकडे बघत होता.

" बुद्धिबळ संदेशच्या आवडीचा खेळ " सागर पुन्हा बोलू लागला. " तसाच खेळ सुरु करूया असं त्याने लिहून सांगितलं मला... त्याचा भाग झालो आम्ही... एकेकाला बाहेर काढलं.. लपले होते सगळे... एव्हाना तुम्हाला कळलं असेलच ते... मेलेले प्यादे... म्हणजे ते भाडोत्री मारेकरी... हत्ती म्हणजे जाडा... उंट म्हणजे उंच... आणि घोडा.. तिचा भाऊ... घोडा सर्वात हुशार, इतरांपेक्षा... तसाच तो होता... आता राहिले फक्त वजीर आणि राजा... " सागर बोलत होता.. इतक्यात अभीचा मोबाईल वाजला.

"सर.. तुम्हाला मोठ्या सरांनी बोलावलं आहे.. " त्याच्या पोलीस स्टेशन मधून कॉल आलेला. दोघे निघाले. पुन्हा सागर बोलला काहीतरी...

" वजीर आणि राजा ... दोघेच बाकी आहेत... सगळेच मरतील... कोणीही वाचणार नाही... आज वजीरचा नंबर... सर्वात महत्वाचा, हुशारीचे आणि ताकदीचे पात्र... सेनापती... फक्त इंग्रजीत त्याला "Queen " का म्हणतात ते कळत नाही. बेस्ट ऑफ लक सर... " सागर कोपऱ्यात जाऊन बसला. अभि आणि महेश त्यांच्या मोठ्या सरांकडे आले.

"काय चाललंय अभि... आणि खुनी का मिळत नाही अजून... ",

" सर... प्रयन्त चालू आहेत... " ,

" किती दिवस तेच ऐकतो आहे मी... मला माहित आहे... तू किती प्रेशर मध्ये असतोस... पण मीडियाला ते कळत नाही... ",

" हो सर... लवकरच तुम्हाला केस सोडवून देतो... " अभि म्हणाला.

" ठीक आहे... तुम्ही निघू शकता आता... " महेश आणि अभि बाहेर आले. अभीचा मोबाईल वाजला.

" सर , तुम्ही पाठवलेला दोन फोटो पैकी त्या मॅडमसारखी दिसणारी एक सापडली आहे... ",

" कुठे ? " ,

" एअरपोर्ट जवळ एक फ्लॅट आहे... तिथे त्या आत गेल्या... ",

"ok... त्याच आहेत का... " अभिने पुन्हा विचारलं.कारण आधी असंच ३-४ वेळेला झालं होतं.

" माहित नाही सर... पण त्याचं वाटतात.. " ,

" किती % वाटतं कि त्याचं आहेत... १% तरी का... " अभिने पुन्हा विचारलं... समोरून काही उत्तर आलं नाही. " खात्री करा आणि मगच कॉल करा... " अभिने कॉल कट्ट केला.

दुपार उलटून जात होती. ४ वाजता खून होणार कोणाचा तरी... अभिने घड्याळात पाहिलं... ३.३० वाजले होते. पुन्हा फोन वाजला. महेशने उचलला.

"सर... त्याचं आहेत त्या.. फक्त केस कापलेले आहेत त्यांनी.. ५० % तरी त्याचं वाटतात... ",

" मी सांगतो अभिला.. " महेशने अभिला सांगितलं...

" ती अलका असेल तर ती एकटी कशी असेल... सोबतीला दिपक हवाच ना... तिच्या भावाचा खून झाला, मग ती एकटी फिरणं शक्यच नाही.. " अभिचे बोलणं पटलं महेशला.

" हो... बरोबर बोलतो आहेस अभि... खून तर वजीरचा होणार आहे... म्हणजे ती नसेलच.. तरीही मी तिचा फोटो पाठवायला सांगितलं आहे.. " महेश बोलतो तोच फोटो आला मोबाईल वर... अभिने फोटो पाहिला... जवळपास अलकाचं होती ती.. अभिला काही संशय आला... त्याने तिथे पाळतीवर असलेल्या पोलिसाला कॉल केला..

" कितीवेळ झाला... त्यांना तिथे येऊन.. ",

" सर... सकाळी १२ पासून त्या इथेच आहेत... खिडकीजवळ येऊन उभ्या राहतात... पुन्हा आत जाऊन बसतात... " हे ऐकलं आणि अभिला काय झालं माहित नाही...

" तुम्ही त्यांना अरेस्ट करा... माझी ऑर्डर आहे.. मी येतो आहे लगेच.. " असं म्हणत त्याने फोन कट्ट केला. महेशला गाडीत बसायला सांगितलं...

"काय झालं अभि.. ? " महेशचा प्रश्न..

" तो ट्रॅप आहे... अलकासाठी.... आणि संदेश तिथेच लपून बसला असेल कुठेतरी... तिला मारण्यासाठी... " अभि गाडी चालवत म्हणाला. घड्याळात बघितलं. दुपारचे ३.५०... अभि वेगाने गाडी चालवत होता...

" पण तुला कसं माहित... अलकाला मारणार आहे ते.. " महेशचा आणखी एक प्रश्न...

" सागर काय बोलला... वजीरला इंग्रजीत queen का म्हणतात माहित नाही... हेच महेश... हेच... वजीर, मराठीत किंवा हिंदीत... त्याला Queen च म्हणतात नॉर्मली... म्हणजे राणी... अलकाचा खून होणार आहे... " महेशच्या डोक्यात लक्ख उजेड पडला. बरोबर ४ वाजता ,अभि, महेश तिथे पोहोचले... बघतात तर त्यांची टीम फ्लॅटच्या बाहेरच...

" काय झालं... आत का नाही गेलात... " अभि मोठयाने ओरडला.

" कसं जाणार सर... सगळीकडून बंद आहे... त्यानीच आतून बंद केला आहे... " एक जण बोलला... अभि पुढे काही बोलणार, तसा गोळीचा आवाज झाला.... अभि समजला.... " तोडा... दरवाजा... " सगळ्यांनी जोर लावून दरवाजा तोडला. सर्व धावतच अलका उभी होती, तिथे वरच्या रूमकडे धावत गेले.... पुन्हा तेच... गोळी मारली होती.. याही वेळेस डोक्यात.. तिच्या भावाप्रमाणे... सराईत नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले असणार संदेशने... अभि त्या डेड बॉडीकडे पाहत, विचार करत होता.

डेड बॉडी पाठवून दिली... तिच्याकडे तसं काहीच सामान नव्हतं...फक्त तिची पर्स तेवढी होती.. मोबाईल होता, तोही वेगळा असणार... कारण त्यातील कॉन्टॅक्ट एकतर इथे येण्या आधीच delete केले असणार किंवा त्यात ते नव्हतेच... call history चेक करायची ठरवली अभिने... ते तसं सांगून अभि पुन्हा त्याच्या पोलीस स्टेशन कडे निघाला. पुढच्या एक तासात, अलकाच्या मोबाईलची call history आली. दोनच नंबर , ज्यावर सतत कॉल केले होते. लगेच ते कॉल कुठून आले ते शोध सुरू झाला. एक तर बंदच होता. दुसरा कॉल खूप वेळाने सुरु झाला. लगेच त्याची लोकेशन शोधली... अभि त्याच्या टीम सोबत निघाला. संद्याकाळचे ७ वाजले होते... तेव्हा ते त्या लोकेशन वर पोहोचले. एका चाळीत त्या मोबाईलची लोकेशन होती.

खूप शोधलं तेव्हा एका ३०-३५ वर्षाच्या माणसाचा तो नंबर होता हे कळलं. लगेचच पकडून त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं. कसून चौकशी सुरु झाली. प्रथम तो सगळ्या गोष्टीना नकार देत होता, शेवटी अभीचा पारा चढला. दोन -तीन फटके पडले तसा तो बोलू लागला.

" साहेब.. मी काही केलं नाही... " ,

" मग तुला कॉल कसा केलेला अलका मॅडमने... " ,

" मी ड्राइवर आहे त्यांचा... " ,

" मग तू त्यांच्या सोबत का नव्हतास... आणि इथे का लपून बसला होतास ",अभि मोठ्या आवाजात बोलला.

" त्यांनीच सांगितलं होतं... ",

" आणि त्यांचे मिस्टर कुठे आहेत ? ",

" खरंच साहेब... मला काही माहिती नाही... कालपासून घरी आले नाहीत ते... कुठे गेले माहिती नाही... " तो काकुळतीने म्हणाला.

" चल... त्याचे घर दाखव... " अभि त्याला घेऊन गाडीत बसला.

रात्री ते अलकाच्या घरी पोहोचले... बंगला होता... बंगल्यात फक्त २ नोकर... भिंतीवर दोघांचा फोटो होता... अर्थात नवीन. अभिने त्याच्याकडे असलेला जुना फोटो आणि नवीन फोटो जुळवून पाहिला... थोडाफार फरक असला तरी तो दिपकच होता. नोकरांकडे चौकशी केली, त्यांनाही काही माहिती नव्हती.

" काल सकाळी जॉगिंगला गेले साहेब... ते आलेच नाही परत... त्यानंतर मॅडमला एक चिट्ठी आणून दिली कोणीतरी... तेव्हा पासून घाबरल्या होत्या त्या... नंतर सतत फोन चालू होते... कोण फोन करत होता ते माहित नाही... पण रात्रीपर्यंत येत होते फोन.. मग आज सकाळी, कोणाला न सांगता त्या निघून गेल्या... अजून आलेल्या नाहीत.. " एका नोकराने त्याला जेवढं माहित होतं तेवढ सांगितले.

" येणार सुद्धा नाहीत त्या... त्यांचा खून झाला आहे... " ते ऐकून ड्राइवर सहित बाकीचे नोकर चाट पडले.... ती चिट्ठी इथेच असणार...अभि मनातल्या मनात बोलला.

" सगळं घर शोधून काढा.. काहीतरी नक्की मिळेल.... लगेच..... आपल्याकडे वेळ कमी आहे.. " सगळेच तो बंगला शोधू लागले.

एका कपाटात काही घरांची वगैरे कागदपत्र होती... नीट बघितलं.. सागर बोलल्याप्रमाणे... त्यागी सरांच्या घराचे पेपर्स होते ते... त्या कॉलेजचे पेपर्स होते.. शिवाय आणखी काही ठिकाणचे पेपर्स होते.. याचा अर्थ, की हे दोघे आधीपासून लोकांना फसवत आहेत तर... शेवटी एकदाची ती चिट्ठी मिळाली. त्यात सरळ लिहिलं होतं की दिपक यांना किडनॅप केलं आहे... त्यांना सोडवायची रक्कम लिहिली होती.. त्याचा काही अर्थ नव्हता.. आणि त्या फ्लॅटचा पत्ता होता... जिथे अलकाला गोळी मारली. शेवटी, जेवढी माहिती मिळाली, कागदपत्र मिळाली. तेवढी घेऊन सर्व पोलीस स्टेशनकडे निघाले.. अभि मात्र घरी आला.

पुढच्या दिवशी, अभि आणि त्याची टीम सकाळ पासून कामाला लागली. दिपक यांचा नवीन फोटो सगळीकडे दिला गेला. कोणीतरी नक्की याला पाहिलं असेल... दुपारपर्यंत तरी मिळालेल्या पुराव्यांची जुळवाजुळव चालू होती. दिपक यांचा पत्ता नव्हता... संदेश नक्की कुठे लपून राहतो हे कळत नव्हतं... कारण त्याचेही फोटो दिले होते सर्व पोलीस स्टेशन मध्ये... संध्याकाळी उशिरापर्यंत... मिळालेल्या माहिती आधारे, संदेश त्यांना कुठे कुठे घेऊन जाण्याची शक्यता होती... तिथे अभि जाऊन आला. हातात काही लागलं नाही. संदेशचा प्लॅनच तसा होता.. अभि आणि महेश फक्त विचार करत होते.

२८ मार्च, उद्या दीपकचा खून होणार... हा विचार अभिला गप्प बसू देत नव्हता. कारण दिपकला नक्की कुठे लपवून ठेवलं आहे ते कळत नव्हते. अशातच अभि पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन उभा राहिला. तो बाहेर यायचीच कोण तरी वाट बघत होता.. अभि फक्त बाहेर येऊन उभा राहिला... त्याचबरोबर.. एक गोळी,त्याच्या पायाजवळ ... जमिनीवर लागली. अभिला काही झालं नाही.. परंतु त्या हल्ल्याने तो बावरला. लगेच जरा मागे झाला, स्वतःला सावरलं. अभि गोळी कोणत्या दिशेने आली ते बघू लागला. हातात स्वतःची गन होती. गोळीचा आवाज ऐकून आतले सर्व पोलीस बाहेर आले. आणखी एक गोळी, बाजूला असलेल्या झाडावर लागली. अभिचे लक्ष तिथे गेले.. त्याचवेळी एक वस्तू, दुसऱ्या दिशेने अभिच्या हातावर येऊन आदळली.. त्याने काही अभिला जखमी वगैरे केलं नाही.... परंतु या सगळ्यामुळे.. सगळेच घाबरले.

१० ते १५ मिनिटे सगळेच, आणखी काही होते का याची वाट बघत होते. पुढे काही झालं नाही. महेश तिथे नव्हताच त्यावेळी. जमिनीतील आणि झाडाला लागलेली, बुलेट त्याने चेक केली.... तीच होती, जी संदेश वापरत होता. आणि अभिला जी वस्तू आदळली होती, ती होती... एका कागदात गुंडाळलेला "बुद्धिबळातील राजा".... तो तसाच त्याने आपल्या टेबलावर ठेवला होता.

" अभि... तो संदेशच होता ... ज्याने सकाळी इथे गोळीबार केला.. " महेश रिपोर्ट घेऊनच आला होता. अभि मात्र वेगळ्या विचारात होता... महेशने तो राजा हातात घेतला. " पण मला एक कळत नाही.. आता तर फक्त राजाच राहिला आहे.. मग त्याने हा क्यू का द्यावा... " महेशचे ते बोलणे ऐकून अभि लगेच बोलला...

" Exactly.... हेच.... त्याने का केलं असं.. " अभिच्या त्या प्रश्नाने महेश विचारात पडला... थोडावेळ शांततेत गेला.

" काय झालं सकाळी... ते सांगशील का मला... " महेशने विचारलं.

" हा... बघ... मी बाहेर आलो पोलीस स्टेशनच्या... उभा राहिलो एका ठिकाणी... चालत होतो तोपर्यंत काही झालं नाही... जसा उभा राहिलो त्याचवेळी गोळी, शूज जवळ .. जमिनीवर लागली. तसा मागे झालो.. त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला, झाडाला गोळी लागली... मी लगेच तिथे बघितलं.. आणि हे माझ्या हाताला येऊन लागलं... डाव्या बाजूने... " अभिने सगळी स्टोरी सांगितली.

" हम्म... याचा अर्थ.. त्या दोन्ही गोळ्या.. तुला मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी नव्हत्या... ",

" हे तुला कसं माहित... " अभिने विचारलं.

" तो नेमबाज आहे.. त्याचा नेम चुकणे शक्य नाही.. तुला मारायचं असते तर पहिलीच गोळी तुला लागली असती... मला वाटते.. त्याला काहीतरी दाखवून देयाचे असेल.. शिवाय हा राजा... या क्ल्यूचा काही उपयोग नाही तरी का दिला. त्याला लक्ष वेधून घेयाचे होते.. अभि.. कळला का प्लॅन... " अभिने मान डोलावली. लगेच त्याला काही आठवलं.

" महेश... तो राजा एका कागदात गुंडाळला होता... त्या कागदावर बघ काही आहे का.. " महेशच्या बाजूलाच तो पेपर होता. महेशने वाचला... " हो... पत्ता आहे... " अभिने पाहिला.

" काय वाटते तुला.. जाऊया का... " अभिने महेशला विचारलं.

" एक चान्स तर घायला पाहिजे... चल निघू लगेच... " अभि,महेश सोबत टीम घेऊन निघाला.. पुढच्या अर्ध्या- पाऊण तासात ते सगळे ,त्या पत्त्यावर पोहोचले. एक वेगळाच असा फ्लॅट होता तो.. दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून सगळे आत शिरले. रिकामाच होता... कोणीतरी नक्की राहत असणार.. अश्या खुणा होत्या तिथे.. दबक्या पावलांनी सगळे आत शिरले. कोणी नव्हतं आत... कोणी नाही बघून सगळे रिलॅक्स झाले आणि त्या जागेची तपासणी करू लागले... आत, एका बेडरूममध्ये... समोर भिंतीवर, त्यागी कुटुंबाचा फोटो होता. त्याखाली एका टेबलावर काही फोटोज होते.. अभिने ते बघितले... आतापर्यंत मारलेल्या व्यक्तींचे फोटो... त्यासोबत त्यांचे पत्ते... महेशला समजलं सगळं. " हा इथे राहून काम करायचा सर्व... " महेश बोलला. त्याने सगळ्यांची माहिती काढली होती. कोण किती वाजता ,घरातून बाहेर पडायचा. कुठे राहतात, कुठे जातात... इतकंच काय तर कोणाला भेटतात ते सुद्धा माहिती होती.. फोटोसहित जमवली होती.

खूप सारे फोटो आणि बरीचशी माहिती.. अलका आणि दिपकची माहितीसुद्धा... जुन्या नव्या फोटो सहित... ग्रेट काम ना... अभि त्याची तयारी बघून एम्प्रेस झाला. सरतेशेवटी, एक बंद लिफाफा भेटला. त्यात एका चिट्ठीवर " only for अभिषेक... " असं लिहिलं होतं.. अभिने लगेच ते वाचण्यास सुरुवात केली. " नमस्कार सर... मी संदेश... आतापर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. आणि मी हे कसं केलं तेही कळलं असेलच तुम्हाला.. मला देशासाठी करायचे होते काहीतरी....निदान खेळात तरी.. खूप स्वप्न होती माझी आणि माझ्या कुटुंबाची. सगळी नष्ट करून टाकली या अलका आणि दिपकने... त्यांना त्याची शिक्षा द्यायला पाहिजे होती कोणीतरी... आमच्यासारख्या, आणखी कोणाची वाट लागू नये यासाठीच त्यांना संपवावे हे ठरवलं मी.. सॉरी.... दिपक माझ्यासोबत आहे.. या पाकिटात एक पत्त्ता सुद्धा देत आहे.. तिथे गेल्यावर तुम्हाला पुढचा क्ल्यू मिळेल. दिपक ला मी २९ मार्चला , संध्याकाळी ५ वाजताच मारणार आहे... तोपर्यंत तुम्ही माझ्यासमोर येऊ शकता... एक मात्र नक्की.... काही झालं तरी चेकमेट होणारच... " महेशने सुद्धा ते पत्र वाचलं. त्यात पत्ता मिळाला. अभि, काही हवालदारांसोबत तिथे निघाला. बाकीचे महेश सोबत, ते फोटो... कागदपत्र वगैरे घेऊन पोलीस स्टेशनकडे निघाले.

'त्या' पत्यावर पोहोचले तेव्हा कळलं की ती एक बंद खोली आहे. आत गेल्यावर आणखी एका कागदावर , दुसराच पत्ता लिहिला होता.. तिथून लगेचच ते दुसऱ्या पत्तावर निघाले. तुटकी इमारत होती ती... त्याच्या गेटवरच एक कागद लावला होता.. अभिच्या नावाचा... पुन्हा एक पत्ता... अभि वैतागला... तरीही तो निघाला तिथे. रात्र झाली हे सगळं होईपर्यंत... त्या नव्या जागी पोहोचले.. तिथेही एक चिट्ठी भेटली. त्यात लिहिलं होतं, " Sorry अभिषेक सर...मला फक्त आजचा दिवस संपवायचा होता... तुम्हाला उद्या दुपारी बरोबर ४ वाजता मी क्ल्यू देईन.. बाय... " अभिने रागात तो कागद फाडून टाकला. रात्र झाली असल्याने सगळेच तिथूनच घरी निघाले.

पुढचा दिवस, २९ मार्च.... अभि त्याच्या क्ल्यूची वाट बघत होता... महेश, संदेशच्या रूममधून आणलेल्या गोष्टी, फोटो... गोळा करून त्यातून काय मिळते का ते बघत होता. अभि तर रात्री पासून झोपलाच नव्हता. बसल्या जागी त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही. महेशने त्याला थोड्यावेळाने जागं केलं. बघतो तर दुपारचे १२ वाजले होते.

" अरे... एवढा वेळ मी झोपून होतो... जागं तरी करायचं ना... " अभि डोळे चोळत उठला.

" झोपला होतास ना... आणि बघतो आहे... किती धावत असतोस ते.. मीच बोललो यांना... कोणी उठवू नका म्हणून... " अभि तोंड धुवून आला.

" बर... काय म्हणतो आहेस.. काही सापडलं का तुला... " अभिने महेशला विचारलं.

" काही मिळणार नाही... हे तर त्यालाही माहित होतं... perfect plan होता ना... अगदी त्याच्या मनासारखं झालं सर्व ...ते पुरावे मुद्दाम आपल्याला मिळावेत, दिसावेत म्हणून संदेशने स्वतःच त्याच्या रूमवर ठेवून दिले होते. आपणसुद्धा त्याच्या तालावर नाचत राहिलो. ",

" हम्म.. पण दिपकला कसं वाचवणार आपण ...संदेशला थांबवायला हवे ना... " अभि विचार करून बोलला.

" एक गोष्ट कळली पण मला... बुद्धिबळातील नावं किंवा सोंगट्या त्याने अश्याच वापरल्या नाहीत... " ,

" म्हणजे ? " अभि..

" बघ... सागर म्हणाला... एक प्यादं... दुसऱ्या राजाच्या पटावर , पण योग्य ठिकाणी पोहोचला तर वजीर होतो.. तसंच झालं ना... त्यागी कुटुंब नाशिकचे... आणि हे सगळे मेलेले ... मुंबईचे.. संदेशने वेळ घेतला परंतु योग्य वेळेत पोहोचला... त्याने सर्वाना मारायला सुरूवात केली. जसा वजीर... त्याला कोणीही अडवू शकत नाही. तसंच तो मारत गेला.. प्याद्यांना मारणे तसे सोप्पे असते.. ते त्याने आरामात केलं.. उंटाला तिरक्या चालीत मारता येत नाही... समोरून मारतात त्याला.. त्याने काय केलं आठवं.. ते कॅन्टीनमध्ये बसले होते.. समोरच्या इमारती मधून गोळी झाडली... नंतर हत्ती... हत्तीला समोरून मारता येत नाही, तिरक्या चालीत मारतात... त्यांना इमारती बाहेर मारलं.. गोळीचा अंदाज लावला तर कमरेच्यावर गोळी लागली होती.. म्हणजेच तिरक्या दिशेने गोळी आली होती... घोडा... हुशार सोंगटी... त्याला मागून डोक्यात गोळी मारली... आणि राणी.. म्हणजेच वजीर... त्याला सहजा-सहजी मारता येत नाही... एक ते स्वतःचा एखादा सैनिक देऊन मारतात किंवा राजाला फसवून मारतात... त्याने दिपकला किडनॅप करून अलकाला समोर यायला लावून डोक्यात गोळी मारली..... कळलं का, त्याने फक्त क्लू दिले नाही अभि... तो खरोखरंच बुद्धिबळ खेळतो आहे.... " अभिला सगळं बोलणं पटलं...प्रत्येक गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेली.

" मग पुढे काय आता महेश.. ? " ,

" त्याने चिट्ठीत लिहिलं होतं.. चेकमेट होणारच... राजाच्या समोर... कुठल्याही बाजूने... विरुद्ध राजाचा सैनिक असेल तरच चेकमेट होतो.. मला वाटते तो दिपकला समोरून मारणार असेल.. ",

" हो.... पण कुठे... ते कळणार कसं... " महेशने नकारार्थी मान हलवली.

ते वाट बघत होते... संदेशच्या क्लूची... बरोबर ४ वाजता.. महेश आणि अभिच्या मोबाईलवर एकच मेसेज आला.. एका इमारतीचा पत्ता होता तो.. आणि त्याखाली लिहिलं होतं... " चेकमेट "...संदेशचाच मेसेज आहे हे समजून अभि ,महेश टीमसहित निघाले. पत्ता जरा दूरचा होता. कितीही वेगात गाडी चालवली तरी ट्रॅफिक होतेच.. तरी प्रयन्त करून ते पोहोचले.. ४: ४० झाले होते... अजून २० मिनिटे आहेत.. त्याला अडवायला. नुकतीच बांधकाम पूर्ण झालेली ती इमारत होती ती . वॉचमॅनला काहीच कळतं नव्हतं, एवढे पोलीस कशाला आले ते. तो घाबरला.

महेशने त्याला सांगितलं काय झालं ते.. त्याने लगेच गेट उघडून दिला... १० मजली इमारत... कुठे शोधणार संदेशला.. काही जणांना पार्किंगमध्ये पाठवून, अभि स्वतः पहिल्या मजल्यावर शोधाशोध करू लागला.. एका मजल्यावर ६ रूम.. सगळ्या शोधल्या... त्यातच १५ मिनिटे गेली.. हाती काहीच लागलं नाही.. ५ मिनिटे शिल्लक होती..५ वाजायला... दुसऱ्या मजल्यावर त्याने आपली माणसं पाठवली. अभिसुद्धा निघत होता, पण महेशने त्याला अडवलं.

" अभि... त्याला चेकमेट करायचा आहे ना.... चेक आणि मेट तेव्हाच होतो, जेव्हा राजाला पळायला कुठे जागाच शिल्लक राहत नाही... या इमारती मध्ये तशी एकच जागा आहे... " महेश बोलला..

" टेरेस !! " अभि पट्कन बोलला आणि बाजूलाच असलेल्या लिफ्टच्या इंडिकेटर वर लक्ष गेलं. ती लिफ्ट १० व्या मजल्यावर होती असं दाखवत होती. बाजूलाच असलेल्या दुसऱ्या लिफ्टने महेश आणि अभि वर निघाले. पुढच्या २-३ मिनिटात ते शेवटच्या मजल्यावर पोहोचले.

गच्चीचा दरवाजा उघडा होता. अभिने गन काढली. हळूच डोकावून पाहिलं. एका माणसाला समोर बांधून ठेवलं होतं... yes... तो दिपकच होता.... त्याचं तोंडही बांधलं होतं. त्याच्या समोर एक जण हातात गन घेऊन उभा होता. " Hands up संदेश... !! " अभि गच्चीत प्रवेश करत म्हणाला. संदेशकडे गन रोखून धरली होती..." मला माहिती आहे.. तुला ऐकायला येते ते.. गन खाली टाक !! " तसा संदेशने मागे वळून अभिच्या दिशेने गोळी झाडली. अर्थात त्याच्या बाजूलाच, त्याला लागू नये अशी... महेश मागच्या मागे गेला. अभिने बाजूला उडी मारली. आणि एक गोळी संदेशच्या दिशेने झाडली... ती त्याच्या पायात घुसली.. ...खाली, गुडघ्यावर बसला संदेश... लगेच अभिने दुसरी गोळी झाडली. ती संदेशच्या पोटात लागली... संदेश खालीच पडला.

संदेश खाली पडलेला बघून... अभि पुढे जाऊ लागला. तसा संदेशच्या हातातील घड्याळातील अलार्म सुरु झाला. ५ वाजले होते. संदेश झटक्यात उठला. खाली पडलेली गन उचलली त्याने आणि एका झटक्यात गोळी दिपकच्या डोक्यातून आरपार झाली..... थरारक असं काहीतरी.... ते घडलं होतं. दिपक तर जागच्या जागी गेले. संदेशने त्यांना मेलेलं बघितलं... हसत हसत तो खाली पडला. हळू हळू करत डोळे मिटले.

अभिला क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. महेश सुद्धा आला.. थोड्यावेळाने त्याची टीम वर आली. बाकी फोन वगैरे करून डेड बॉडी घेऊन जाण्यासाठी ऍम्बुलन्स बोलावली गेली. अभि एका कोपऱ्यात उभा राहून ते सगळं बघत होता.. महेश त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला..

" झालं अभि आता... सोडून दे विचार.. " महेश त्याचे खांदे थोपटत म्हणाला.

" नाही रे... त्याला वाचवता आले असते.. संदेशला... दिपकला... दोघांनाही... जरा कमी पडलो... " अभि...

"नाही.. खूप मेहनत घेतलीस... सागरचे बोलणं आता कळलं मला... सगळेच मरणार, असं बोलला होता... संदेशला, दिपकला मारून मारायचं होतं... म्हणून त्याने क्लू देऊन आपल्याला इथे बोलावलं.. part of plan... बरोबर ना... ",

" हम्म... सागर अजून एक वाक्य बोलला होता... या सारखा रक्तरंजित खेळ दुसरा कुठून सापडणार नाही... त्यांनी सुरुवात केलेली खेळाला... संदेशने संपवला.. त्याचा राजा जिवंत राहिला... संदेश जिंकला.. दुसऱ्या राजाला मारून.. game over.. !! चेक अँड मेट... " अभि संदेशच्या मृत शरीराकडे बघून म्हणाला आणि आपल्या गाडीत बसून पोलीस स्टेशनकडे निघाला.


Rate this content
Log in

More marathi story from vinit Dhanawade

Similar marathi story from Crime