Charu Singh

Drama Crime Inspirational

4.7  

Charu Singh

Drama Crime Inspirational

पीडिता

पीडिता

10 mins
1.1K


"तुज्या आय* ** " आईने दचकून मृणालकडे नजर टाकत फ्रेंच विंडोची काच बंद करून टाकली. त्या घट्ट काचेतूनही त्या उनाड मुलांचा कोलाहल आता मृणालला स्पष्ट ऐकू येत होता. आतापर्यंत तिचे लक्षही गेले नव्हते त्याच्याकडे, पण आईच्या तीव्र प्रतिक्रियेने तिला पुन्हा अस्वस्थ केले. आताशा असेच व्हायचे. सगळे नको तितके सांभाळायच्या नादात तिला पुन्हा सामान्य व्हायला देत नव्हते.


हा आजचाच प्रसंग. यांचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर रस्त्यालगत होता. त्यांच्या समोरच एक नवीन इमारत उभी राहत होती. तिच्या बांधकामाच्या मजुरांची उनाड मुले दिवसभर काही काम नसल्याने तिथेच खाली खेळत राहायची. बरेच वेळा खेळापेक्षा मारामारी आणि अश्लील भाषेतली भांडणेच जास्त असायची. आणि मृणालच्या घरी त्यातला शब्द न शब्द ऐकायला जायचा. खर तर ही कटकट गेले ९-१० महिन्यांपासून अशीच होती. आधी घरी कुणाला त्रास जाणवत नसे. पण आता त्या प्रसंगानंतर ती मुले, त्यांची भाषा आई आणि बाबाना जास्तच खटकू लागली होती.


"जळले मेले हे बांधकाम कधी संपते आहे कोण जाणे. मी तर पोलिसात तक्रार करायचा विचार करत आहे. नाही तरी सध्या वाऱ्या असतातच तिथे. या परिस्थितीत ऐकतील तरी आपले. आपणही आवळा देऊन कोहळा काढू." बोलण्याच्या भरात आपण नको ते बोलून गेलो हे जाणवून आईने करकचून जीभ चावली. मृणालच्या कपाळावरची शीर आतापावेतो तणतणली होती. ओटीपोटात परत एक बारीक कळ उमटली. तसे ४ महिने होऊन गेले होते त्या घटनेला. पण काही जखमा आयुष्यभर न भरणाऱ्या होत्या हेच खरे. ती काही न बोलता उठून आतल्या खोलीत गेली. हा विकेंडही असाच रटाळ जाणार होता. आठवड्याचे पाच दिवस तिचे बरे जायचे. ऑफिसचे व्यस्त वेळापत्रक तिला बाकी काही विचार करायला फार वेळ द्यायचेच नाही. पण वीकेंड? नकळत तिची नजर बेडसाईडच्या अमितच्या फोटोकडे गेली. तो असताना किती गोष्टी ठरवलेल्या असायच्या विकेंडला..बाकी काही नाही तर कुठे न कुठे तरी ट्रेकिंग तर हमखास..तिचीच आवड होती ती. तिच्या आवडीखातर अमितनेपण अंगिकारलेली. त्या दोघांनी मिळून कितीतरी ट्रेक्स एकत्र केले होते. तो निसर्ग..तिथली ताजी हवा..तिथली शांतता..तिला नेहमीच एक वेगळी अनुभूती देऊन जायचे. त्या दोघांनी तर "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स" चा ट्रेक पण प्लॅन केला होता या वर्षी. पण नियतीने काही वेगळेच योजले होते. आता तिच्या आयुष्यातून ट्रेकचा विषय कायमचा निषिद्ध झाला होता. तसाही अमितच्या आईला ट्रेक कधी आवडायचाच नाही. आणि मृणाल अमितला ट्रेकला नेते म्हणून त्यांचा मृणालवर रागही होता. आता तर अमित जायला पण तो ट्रेकच कारणीभूत ठरला. खरतर अमितच्या मृत्यूला ट्रेक जबाबदार नव्हता. काही समाजकंटक जबाबदार होते. पण ते घडले ते ट्रेकवर... त्यामुळे अमितची आई आता कधी मृणालला माफ करणार नाही याची मृणालला खात्रीच होती.

"वकिलांच्या ऑफिसमधून फोन होता. उद्याची तारीख आहे कोर्टाची." बाबा मागून येऊन हळुवार स्वरात बोलले.

"हो लक्षात आहे माझ्या. उद्या उशिरा येईन सांगून आले आहे ऑफिसमध्ये." मृणाल मागे वळून न बघता बोलली. आता हे पर्व किती वर्षे असेच चालू राहणार होते देवास ठाऊक. घर, ऑफिस, पोलीस स्टेशन, कोर्ट, ट्रायल्स ... मृणालला परत ओटीपोटातली कळ जाणवायला लागली.


दारावरची बेल वाजली तसे बाबा दार उघडायला निघून गेले. अकरा वाजले होते. सविता आली असणार. सविता त्यांची कामवाली. हल्ली तिचीही बडबड घरी आली की कमीच असायची. घराचे वातावरण तिलाही घुसमटवून टाकायचे. पण आज मॅडमचा नूर काही वेगळाच वाटत होता. एक चकार शब्द न बोलता तिने भांडी घासली आणि घर साफ करायला घेतले.

"काय ग? काय बिनसले आज?" आईलाही तिचे बिनसलेले जाणवले होते तर.

"पोराने ५०० रुपये चोरले काल. शाळा बुडवून समोरच्या पोरांबरोबर हुक्का ओढायला गेला होता. तरी बरे शेजारच्याने पहिले म्हणून कळले. नाही तर मी इकडे कामात. मला तर कळलेच नसते हा कधी हाताबाहेर गेला ते." सविताच्या डोळ्यातून आता धार वाहायला लागली होती.

"मेली नतद्रष्ट कारटी. स्वतः शिकणार नाहीत आणि दुसऱ्यांच्या पोरांना शिकू देणार नाहीत. आणि असेच मोठे होऊन दुसऱ्यांच्या पोरींचे आयुष्य उध्वस्त करायचे हाच यांचा आयुष्यभराचा धंदा." उद्वेगात आई नेहमीच त्या विषयावर येऊन घसरायची. सविताने चमकून मृणालच्या दिशेने पहिले आणि मान खाली घालून जमीन पुसायला लागली.


मृणाल हळूहळू बधीर होत चालली होती. आताशा या उद्वेगाचा तिच्यावर काही परिणाम होत नसे. तिने शांतपणे स्वतःचे कपाट लावायला घेतले. सहज पुढच्या एका तासाची निश्चिती. सगळे कप्पे रिकामे करून तिने साफ केले आणि परत लावायला सुरु केले. सगळ्यात खालच्या कप्प्यातून अचानक एक पिशवी खाली पडली. तिचे ट्रेकिंग शूज. हे पूर्वी हॉलमधेच असायचे. दर वीकेण्डला तिला लागायचेच. पण त्या दिवसानंतर त्यांची रवानगी कपाटात झाली. किती उत्साहात होती ती त्या दिवशी. ते दोघे भल्या पहाटे उठून कळसुबाई कड्यावर जाण्यासाठी निघाले होते. तसा त्यांचा नेहमीच ग्रुप ठरलेला होता. पण त्या दोघांना जरा एकट्यानेच थोडे निसर्गभ्रमण करायचे होते.


भल्या पहाटे नेहमीप्रमाणे अमितने तिला पीक अप केले आणि ते दोघे ५.३० सुमारास त्या पायथ्याशी जाऊन पोहोचले. अजून पहाटेचे फटफटले पण नव्हते. ते दोघे आपल्याच धुंदीत हळूहळू चालायला लागले. अमितने एकदा सुचवलेही होते की आपण बाकीचे येईपर्यंत थांबू. पण तिथल्या एका स्पॉटवरून सूर्योदय सुरेख दिसतो असे तिने ऐकले होते. त्या स्पॉटवर जाऊन थांबायचे असे तिने ठरवले. आणि सगळेच अघटित घडले. मागून कधी ते चौघे त्यांच्या मागावर आले ते या दोघांना कळलेही नाही. कळेपर्यंत दोघांनी तिला धरले होते आणि दोघे अमितला मिळेल त्या वस्तूने मारत होते. झटापटीत तो तोल जाऊन दरीत पडला तेव्हाही त्यांनी दयामाया दाखवली नाही. त्यांची शारीरिक भूक संपवून तिच्या शरीराचा चोळामोळा बाजूच्याच झाडीत टाकून ते पसार झाले. नशिबाने मागचा ट्रेक ग्रुप तासा-दीड तासात त्या जागी पोहोचला आणि हिची खाली पडलेली पर्स एकाच्या दृष्टीस पडली म्हणून त्यांनी तिला शोधले. हॉस्पिटलमधून बाहेर पडायला एक महिना लागला होता तिला. त्या काळात तिचे विश्वच उलथपूलथ होऊन गेले. ती पीडिता नावाने उल्लेखली जाऊ लागली होती. बऱ्याच वार्ताहर, न्यूज चॅनेल्सनी तिची कहाणी चटकदार बनवून विकली होती. शारीरिक, मानसिक सगळ्याच बाजूनी कुचंबणा होत होती. अमित असता तर ती हे पण सहन करू शकली असती. पण तो तर गेलेला.


त्या घटनेनंतर त्याची आई एकदा भेटायला आली होती हॉस्पिटलमध्ये. फार बोलली नाही, पण मृणालच्या बाजूला शांतपणे तासभर बसून गेली. पण नंतर ती कधी आली नाही. तिची बाजू मृणाल समजू शकत होती. अमित तिचा एकुलता एक मुलगा. तिचे तर विश्वच संपुष्टात आल्यासारखे झाले असणार. आणि त्यातून हे सगळे ट्रेकिंग वर घडल्यामुळे त्या मृणाललाच त्या घटनेला जबाबदार धरत असणार हे तिला पूर्ण ठाऊक होते. मृणालने शांतपणे ते शूज परत कपाटाच्या तळाशी कोपऱ्यात सारून ठेवले. हे शूज सविताच्या मुलाला देऊन टाकले पाहिजेत. एव्हढे महागाचे शूज, कमीतकमी वापरात तरी राहतील. मृणालने मनातल्या मनात ठरवत उरलेले कपाट नीट लावून टाकले.


एव्हाना आई बाहेर जेवायची ताटे घ्यायचा आवाज यायला लागला होता. आईला मदत करण्यासाठी ती उठणार इतक्यात दाराची बेल वाजली.

"अर्रे तुम्ही? या या." बाबांचे कोणी तरी स्नेही आलेले असावेत.

"मृणाल, बाहेर ये ग. अमितच्या आई आल्या आहेत बेटा." बाबांनी बाहेरूनच वर्दी दिली.

अमितची आई? आता? मृणाल झटक्यात उठली. बापरे आता काय नवीन? तिला याक्षणी कुठलाही नवीन तमाशा नको होता खरे तर. पण त्यांना दुर्लक्षित करता येणार नव्हते. या आपत्तीला तोंड देण्याखेरीज गत्यंतरही नव्हते.

ती अस्वस्थ होऊन बाहेर आली.

त्या तिच्याकडे बघून हलकेच हसल्या.

"मी अवेळी आले का? हल्ली जरा वेळकाळ लक्षातच राहत नाही माझ्या. सॉरी हा." टेबलावरची ताटे बहुदा त्यांच्या नजरेस पडली असावीत.

"अहो आपल्या लोकांना कसली वेळकाळ? आलात तेच खूप बरे वाटले." आई सौम्य आवाजात बोलली. मृणाल गच्च मूठ धरून त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली. एक दोन क्षण विचित्र शांततेत गेले.

"उद्या कोर्टाची तारीख आहे ना? मी म्हणूनच आले. तुझी हरकत नसेल तर मी येईन तुझ्याबरोबर उद्यापासून." त्यांनी सरळ विषयालाच हात घातला. मृणाल आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती.

"हे बघ, अमितचा मृत्यू पचवणे मला शक्य नाही आहे पोरी. पण त्याला सामोरे जाताना तुझ्या पदरची कुचंबणा मला भोगावी नाही लागली. मला खात्री आहे, आज अमित असता तर तो प्रत्येक क्षणाला तुझ्या बाजूला खंबीर उभा असता. माझ्या मुलाच्या आत्मनिर्भरतेची मला खात्री आहे. म्हणूनच या परिस्थितीतून बाहेर पडेपर्यंत मला तुझी सावली बनू दे. मला तेव्हडेच समाधान." त्या प्रत्येक शब्द पूर्ण विचार करून बोलत होत्या.

"आणि हो. गेले २ महिने मी सकाळी रोज चालण्याचा सराव करत आहे. तुझी हरकत नसेल तर आपण दोघी त्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स चा ट्रेक करू या. बरोबर तुझे कोणी फ्रेंड्स असतील तरी माझी काही हरकत नाही. पण अमितची ती शेवटची इच्छा मला पूर्ण करायची आहे. तू ट्रेकिंग सोडलेले त्याला कधीच आवडणार नाही. त्यामुळे तेव्हडा विचार मात्र मनात कधी आणू नकोस बेटा. त्याच्या मृत्यूनंतर का होईना, त्याची आई काहीतरी नवीन शिकली याचे त्याला समाधान मिळो." बोलता बोलता त्यांचा स्वर गदगदीत झाला.


मृणालच्या डोळ्यातून आता आसवधारा लागल्या होत्या. नकळत उठून ती कधी त्यांच्या कुशीत शिरली ते तिचे तिलाच कळले नाही. आईने त्यानंतर अमितच्या आईला जेवल्याशिवाय सोडलेच नाही. त्याही फारसे आढेवेढे न घेता जेवून निघाल्या. त्यांना खाली सोडून आई बाबा घरी आले. निघण्याआधी सकाळी ८ वाजता भेटायचे निश्चित करूनच त्या गेल्या. आज कुठे तरी मृणालला हलके वाटत होते. ती येऊन विचारांच्या धुंदीत बिछान्यात पडली. आई बाबाही कुठेतरी हळवे झाले होते. इतक्यात..पुन्हा शिव्यांचा भडीमार कानी पडून तिची तंद्री भंगली. ते गलिच्छ शब्द..असेच काहीसे त्या दिवशी त्या नराधमांच्या तोंडून ऐकता ऐकता तिची शुद्ध हरपली होती.

"दुपार तिपार काही आहे की नाही या निर्लज्जाना?.." अचानक दरवाजा बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून आई धसकली.

"मृणाल कुठे जातेस? थांब.." आईचे शब्द पूर्ण होण्याआधी मृणाल लिफ्ट मध्ये शिरली पण होती.

तिरमिरीच्या एका झटक्यात मृणालने समोरच्या इमारतीचे आवार गाठले होते. जेमतेम ८ ते १५ वर्षांची नुकते मिसरूड फुटायला लागलेली ७-८ मुले होती ती. तिचा आवेश पाहून थबकून तिच्याकडे पाहत होती. डोळ्यात एक उर्मट भाव मात्र होते.

"तुम्ही सगळे आत्ता २ मिनिटात माझ्या घरी आलेले पाहिजेत मला." जरबेच्या सुरात तिने सुनावले.

"आम्ही काय केले पण?" त्यातल्या एकाने आता उसने अवसान आणले.

"नाव काय तुझे?"

"राजा..राजेश." समोरचा स्वर आता थोडा मवाळ झाला होता.

"राजा तू सगळ्यांना घेऊन मला लगेच वर आलेला हवा आहे. वरती आल्यावर बोलू. मला उशीर झालेला चालणार नाही." इतकेच बोलून ती वळली. ती घरी परत येईपर्यंत आईच्या जीवाचे पाणी पाणी झालेले होते. दार उघडेच ठेवून मृणाल आत येऊन सोफ्यावर बसली.

"काय ग? कुठे जाऊन आलीस?" बाबानी कुतूहलाने विचारले. ती काही बोलणार तितक्यात दारावर टकटक झाली. मृणाल आणि बाबा दोघांनी एकाच वेळी बाहेर पाहीले. खालची आठही टाळकी दारात उभी होती.

"मीच बोलावले आहे त्यांना बाबा. आत या रे सगळे." मृणाल बोलली.

मान खाली घालून सगळे निमूट आत आले.

"बसा त्या सतरंजीवर. पाणी देते. उन्हाचे खेळून आला आहात. तहान लागली असणार." मृणालने थंड पाणी भरून जग आणि ४-५ पेले त्याच्या हाती दिले. घटाघटा पाणी पिऊन ते मृणाल कडे पाहू लागले.

"ताई आम्ही काय नाही केले." त्यातल्या एकाने आता हिम्मत केली.

"सगळे आम्हालाच बोलतात. पण आम्ही कुठे जायचे मग?"

मृणालने काही काळ त्यांना बोलायला दिले.

"सगळे तुम्हाला उगाच बोलतात का? तुमची काहीच चूक नसते का रे?" मृणालच्या प्रश्नावर अचानक त्यातले दोघे तिघे बोलायला लागले.

"आम्ही खेळायचे पण नाही. दिवस भर काय करू मग?"

"तुम्ही दिवसभर इथेच असता? शाळेत कधी जात मग?" या प्रश्नावर मात्र सगळे गप्प.

"काय रे? शाळा बुडवून हे उद्योग करता ना? तुम्ही पाहता का आमच्या इमारतीतले मुले कधी तुमच्यासारखी अवेळी खेळताना? अशी अश्लील भाषा बोलताना? तुम्हाला लाज वाटली पाहिजे एवढ्याश्या वयात असे बोलताना." मृणालचा राग आता शब्दातून जाणवायला लागला होता.

"कुठली शाळा ताई? आधी गावी होती तेंव्हा रातीच्या शाळेत तरी जायचो. दिवसा शेतीवर असायचो. आता तर शेत पण विकले बाबाने." एकजण आता धीर धरून बोलायला लागला.

"आणि इथे तर जवळ आमच्यासाठी शाळा बी नाही आहे. सगळ्या तुमच्या लोकांच्या शाळा. एकच शाळा आहे पण ती बाजूच्या शेरातील गावठाणात हाये. रोज कोण सोडणार आणि आणणार. आईकडे वेळ नसतो. रात्री पण हल्ली डूटी असते तिची." त्यांच्या तोंडी आता प्रामाणिक स्वर लागला होता. मृणाल अवाक होऊन ऐकत होती. गावाची शेती गेलेली ती गरिबांची पोरे, आता त्यांची हडकुळी शरीरं आणि खपाटीला गेलेली पोटे तिच्या नजरेस पडत होती. एक वेळ तरी खायला मिळत होते त्यांना की नाही, देवच जाणे. मृणालला एकदम गलबलून आले.

"शिकायला मिळाले तर अभ्यास मन लावून करणार का?" मृणाल आता हळुवार झाली होती.

"कोण शिकवणार पण? सरकार नवीन शाळा देणार का आम्हाला?" एकाने विचारलेच.

"सरकारचे नंतर बघू. पण मी सध्या शिकवेन तुम्हाला. रोज अभ्यास करणार असाल तर. रोज रात्री ८-१० वाजेपर्यंत यायचे माझ्याकडे. आणि शनिवार-रविवारी अर्धा दिवस. पण सांगेन तो अभ्यास केला पाहिजे नीटपणे. मला कुचराई अजिबात चालणार नाही. आणि रोज रात्रीचा डाळभात पण इथे येऊन जेवायचा." मृणाल त्यांच्याकडे रोखून पाहत होती.

सगळेजण स्तब्ध होते.

"ताई पण खालचा वॉचमन सोडेल का आम्हाला रात्रीचा वर?" एकाची रास्त शंका.

"ते सगळे मी बघेन. पण एक महत्वाची गोष्ट. रोज दुपारचा अभ्यास करायचा. आणि संध्याकाळी या काकी शिकवतील ती रामरक्षा एकत्र जमून म्हणायची. त्यात खंड पडलेला मला चालणार नाही. काय मग मंजूर?" आई त्यांना रामरक्षा निश्चित शिकवू शकते याची तिला खात्री होती. वर एकदा या नित्यक्रमात पडली की पोरे आपोआप सुधारणार हे तिला माहित होते.

सगळ्यांनी निमूटपणे मन डोलावल्या.

"चला तर आज संध्याकाळ पासूनच सुरवात." प्रत्येकाच्या हाती एक एक मावा केक ठेवून तिने त्यांना घरी पिटाळले.

जाताना मात्र राजा घुटमळला.

"ताई रामरक्षा पण आजपासूनच शिकायची ना" त्या चेहऱ्यावर ती पहिल्यांदाच वयाला शोभेल अशी निरागसता पाहत होती.

"हो तर. आजच सुरु करायची." तिच्या सांगण्यानीशी उत्स्फूर्ततेने हर्षोद्गार काढून तो पळून गेला.

दार लावत तिने बाबांकडे पहिले. त्यांच्या नजरेतून मुलीविषयीचा सार्थ अभिमान ठासून ओसंडत होता.

"अग पण तुला झेपणार का हे सगळे?' आईचा काळजीयुक्त स्वर.

"अग कोणीतरी सुरुवात करायलाच हवी ना. त्या चौघांना पण एक मृणाल वेळीच मिळाली असती तर आपल्या घरात आज एक पीडिता निश्चित नसती." बाबांच्या धीरगंभीर सुरावर आईने फक्त मान डोलावली. अचानक मृणालच्या लक्षात आले, खूप काळापासून ओटीपोटातली कळ तिला जाणवली नव्हती आणि आता परत जाणवणारही नव्हती.


Rate this content
Log in

More marathi story from Charu Singh

Similar marathi story from Drama