Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

URMILA DEVEN

Romance


4.1  

URMILA DEVEN

Romance


तो चंद्र होता साक्षीला ...

तो चंद्र होता साक्षीला ...

8 mins 1.9K 8 mins 1.9K

कॉलेजचा पहिला दिवस होता, साची अगदीच उत्साहात होती. पण तिची टू व्हिलर सिनिअर्सने ने गेटवरच थांबवली आणि तिला गोल गोल चक्करा मारायला लागले. साचीआधीच घाबरट स्वभावाची, असं काही पहिल्याच दिवशी अनुभवाला मिळेल असं तिने कधीच मनात आणलं नव्हतं. ढसाढसा रडायलाच लागली. तेवढ्यात शेवटच्या वर्षात असणारा सुमेध समोर आला आणि तिला बघून मनातल्या मनात स्मित हसला. आणि तिसऱ्या, दुसऱ्या वर्षातल्या मुलांना त्याने तिथून जायला सांगितलं. आणि तोही काहीही न बोलता निघून गेला. पहिल्याच नजरेत प्रेमात पडला होता. साची होतीच खूप सुंदर, पण जरा भित्री आणि बावळट. अभ्यासात जेमतेम पण विचाराने मजबूत. आणि सुमेध कॉलेजचा टॉपर, देखणा आणि परिस्तितीतून मार्ग काढत इथपर्यंत पोहचलेला.

सुमेधच प्रेमाच्या चंदेरी दुनियेत आगमन झालं होत, जिथे बऱ्याच चांदण्या त्याच्यासाठी लुकलुक करत होत्या पण त्याचा चंद्र मात्र त्याच्या ह्या भावनेपासुन अजाण होतो. 

मग हळूहळू तो तिच्याशी बोलायचा, सिनिअर होता, मग थोडी मदतही करायचा. तिलाही तो आवडायचा, पण साची मनातल्या भावना अगदीच सहज गच्च दाबून ठेवण्यात पटाईत होती. मग सुमेधला तिचा थांग पत्ता लागत नव्हता. त्याच्या भावना तो फक्त त्या चंद्राला साचीठेवूनच एकांतात व्यक्त करायचा. वर्ष संपायला आलं तरी सुमेधच काही साचीशी बोलणं झालंच नाही. मग अंतिम वर्षाच्या आदल्या दिवशी त्याने तिला बोलावून एक पत्र दिल, ज्यात त्याने तिला आयुष्यभराची साथ मागितली होती. आणि पात्राच्या खाली 'तुझाच' असं लिहिलं होत. साची बावळट आणि भावना व्यक्त करण्यात कंजूस, मग तिने पेन घेतला आणि लिहिल.. 'तुझाच मित्र' आणि निघून गेली. तिच्या त्या उत्तरातही सुमेधला हवं ते उत्तर मिळालं होत आणि त्या क्षणासाठी फक्त चन्द्र होता साक्षीला.

सुमेधच कॉलेज संपलं आणि तो नौकरीच्या शोधत लागला. इकडे साची अभ्यासात गुंग झाली. दोघेही शहरात भेटायचे, दिवसभर गप्पा करायचे. सुमेध नेहमीच साचीला अभ्यासाठी प्रोसाहन द्यायचा. तिला परिस्थितीशी सामना कसा करायचा, हे नेहमीच बिंबवीत होता. त्यांच्या प्रत्येक भेटीला चन्द्र साक्षीला असायचाच.

लवकरच त्याला लठ्ठ पगाराची नौकरी लागली आणि साची कॉलेजच्या अंतिम वर्षात पोहचली. सुमेधला वाटलं आता सगळं मनासारख होईल. आणि तो स्वतःला साचीच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी तयार करत होता. अचानक त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि दिवस पालटली. घरची सर्व जवाबदारी त्याच्यावर आली. वडिलांनी अंतिम क्षणात चारुचा हात त्याच्या हातात दिला आणि वचनात बांधलं त्याला. चारू, त्याच्या वडिलांच्या मित्राची मुलगी. आईवडील अपघातात मरण पावले होते तिचे. आणि सुमेधाचे बाबा तिची काळजी घ्यायचे. शिक्षणासाठी बाहेर मुलींच्या वसतिगृहात राहायची. पण आता वर्षभरापासून शिक्षण संपल्यामुळे ती सुमेधकडेच असायची. मग वडिलांचं खूप मन होत तिलाच घरची मोठी सून करून घ्यायचं. सुमेध दोन्ही वचनात अडकला होता. त्याच्या मनाचा गोंधळ तो विराट आकाशाकडे चंद्राच्या साक्षीनेच व्यक्त करायचा.

साचीची अंतिम वर्षाची परीक्षा झाली आणि दोघेही नेहमीप्रमाणे भेटले. सुमेधने तिला चारू बद्दल सांगितलं तेव्हा साची गप्पच झाली. तिची स्वप्नं फुलण्याधीच कोमेजली होती. एकतर त्या नभातल्या उगवणाऱ्या चंद्राकडे बघत होती आणि भानावर आली, सुमेधला म्हणाली, "येऊ देत चारुला तुझ्या आयुष्यात. तिला तुझी जास्त गरज आहे. माझ्या घरी तर तुझी चर्चाही नाही मग मी मला सांभाळून घेईल. आणि हा, भविष्यात कुठे भेट झाली ना माझी तर माझ्याशी बोलायला नक्की ये आणि ओळख करवून देशील चारूशी, आवडेल मला." सुमेधाचा विश्वासच बसत नव्हता कि हि तीच साची आहे जी कॉलेजच्या पहिल्या दिवशी ढसाढसा रडली होती. तो तिच्याकडे बघतच राहिला, आणि तिने त्याचा हात हातात घेत म्हटलं, "अरे बघतोस काय असा, मी साची आहे. तूच मला गेल्या चार वर्षांपासून ट्रेनिंग देतोय ना परिस्थितीशी लढण्याच आणि नेहमी हिम्मत ठेवण्याचं. बस, मी आज त्याची परीक्षा दिल." आणि ती निघून गेली. सुमेध तिला ती दूर निघून जाई पर्यंत बघतच राहिला त्या दिवशी नभातला चंद्रही साक्षीला होता पण कोर होवून रुसला होता.

इकडे साचीने कॉलेज संपल्यानंतर लगेच नौकरी मिळवली आणि नौकरीच्या ठिकाणी एकटीच रहायला गेली. घरची मोठी होती मग घरात लग्नाच्या चर्चा असायच्या पण ती कुणालाच होकार देत नव्हती. आई बाबांनी तिला खुप प्रेशर दिल, पण ती काही लग्नासाठी तयार होईना. तिला बघायला येणाऱ्या मुलांना मग आई बाबा लहान बहिणीसाठी सुचवायचे. लहानीच्या लग्नात तिला खुप लोकांची बोलणी खावी लागली. नातेवाईक आणि जवळपासची लोक तिला नको नको तस बोलायची. पण, साचीवर काही परिणाम होत नव्हताच. तिच्या काळजीत वडील वारले आणि घराची आर्थिक जवाबदारी तिच्यावर आली. घरी अजून एक लहान बहीण आणि भाऊ होता. भावाला उंच शिक्षणासाठी लागणार पैसा साचीने लावला. त्याला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळाला आणि तो डॉक्टर झाला. लहान बहिणीचं प्रेम प्रकरण तिच्या लक्षात आला. मग पुढकार घेवून, आईला समजावून तीच थाटात लग्न लावून दिलं. लागल्याचं वर्षी भावानेही लग्न केलं आणि पोस्टिंगच्या ठिकाणी बायकोला घेऊन राहायला गेला. आता आई आणि साचीचं असायच्या. आईला सतत तिच्या लग्नाची काळजी असायची मग ती अजूनही मुलाचे प्रस्ताव घेवून हळूच तिच्या मागे लागायची आणि साची आईला म्हणायची, "काय ग? माझं काय वय राहिलं का आता लग्नाचं, लग्नापेक्षाही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत मला."

तिला नावं ठेवणारी लोक आता तीच नाव घेत होती. प्रत्येकाच्या मदतीला धावून जायची. पूर्ण गावात ती एक समाजसेविका म्हणून नावाजली होती. लोकांची लहान सहन काम सहज तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करून द्यायची. अश्याच एका कामासाठी ती शहरात गेली होती, तर तिची भेट सुमेधशी झाली. तब्ब्ल दहा वर्षाचा काळ लोटला होता. तरीही तिने सुमेधला बरोबर ओळखलं आणि त्याच्या समोर जावून उभी राहिली आणि म्हणाली, "अरे सुमेध, किती बदलला आहेस? आणि तुला चष्मा लागला."

सुमेधच्या अनपेक्षितपणे साचीसमोर उभी राहिली आणि तो भूकाळात गेला, आणि बोलला, "बापरे .. अग पण तू जशीच्या तशीच आहेस."

साचीनेही स्वतःला सावरत म्हटलं, "मग, मी स्वतःला ठेवलं ना तसं...." आणि दोघेही क्षणभर हसले,

मग नजीकच्या कॉफी शॉप मध्ये बसले. साचीने, चारू ची चौकशी करत म्हटलं, "कशी आहे तुझी बायको चारू? नीट काळजी घेते ना तुझी, कधी भेटवतोस, मुलं किती आहेत रे तुला.. "सुमेध ने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "चार वर्ष झालीत, मी एकटाच आहे, चारू मला सोडून कायमची देवाघरी गेली. मुलांची खूप आवड होती तिला पण बाळ होत नव्हतं म्हणून नेहमीच विचारात राहायची. दत्तक बाळ घेणारच होतो आम्ही. पण मैत्रिणीच्या मुलाला वाचवतांना स्वतःचा बळी दिला तिने. तिच्या मैत्रिणीचा मुलगा वाचला पण हि ट्रकच्या मागच्या चाकात आली आणि जागीच गेली. तीच अचानक जाण मला खूप लावून गेलं. मग, दोन वर्ष अमेरिकेत होतो आणि आत्ताच आईची तब्येत खराब असल्यामुळे भारतात आलो आणि बघ ती भेटलीस मला."

साची निरुत्तर बघत राहिली, कॉफीचे पैसे देतांना सुमेध तिला म्हणाला, "आणि तुझं ग काय सुरु आहे .. कस चाललंय?" त्याच्या पर्स मध्ये असणारा तिचा जुना फोटो तिला दिसला आणि ती नजर चोरतंच म्हणाली, "माझं काय? मस्त चाललंय, एकटा जीव सदाशिव ..

सुमेध, "म्हणजे .. लग्न....."

साची, "करण्याची इच्छा नाही झाली" असं म्हणत ती शून्यात हरवली. आणि सुमेध परत त्या उगवणाऱ्या चन्द्राकडे बघत तिला चोरून बघू लागला. दोघांनीही चन्द्राच्या साक्षीने एकमेकांना गोड निरोप दिला आणि आपल्या आपल्या घरी निघून गेले.

नंतर बऱ्याच वेळा दोघांच्या भेटी झाल्या, सुमेध काही सोशल प्रोजेक्ट राबवत होता आणि साची त्यासाठी लोक त्याला मिळवून द्यायची. भेटी वाढल्या पण मिठी पर्यंत आल्या नव्हत्याच. दोघांच्याही मनातलं प्रेम कुठेतरी अडकलं होत. सुमेधला कहीदा वाटलं साचीशी बोलावं. दहा वर्षा आधीच्या गोष्टीवर परत फिरावं. पण तो घाबरायचं कि साची आत्ताच तर परत आयुष्यात आली आहे. आणि तिच्या बोलण्या वागण्यात ती आयुष्यात ह्या विचारांच्या फार पुढे गेली असच त्याला वाटायचं. मग साचीशी बोलायचं कसं हा प्रश्न त्याला भेडसावायचा.

शनिवार होता आणि साची निवांत दुपारची झोप घेत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि समोरून कुणीतरी सुमेध-सुमेध असं जोरजोरात ओरडत होत. नुसतं नाव ऐकून ती घरातच सैरावैरा झाली. आईला शोधू लागली पण तिला आई घरात दिसली नाही मग तीने तशीच लगभगिने स्वतःची गाडी काढली आणि सुमेधच्या घराकडे जाणारी रस्त्यावर वळवली. वाटतेय बऱ्याचदा तिने सुमेधला फोन लावला त्याच्या घरी लँड लाईनवर लावला पण कुणीच उचलत नव्हतं. तिच्या मनाची घालमेल वाढत होती आणि हृदयाचे ठोके आवाज करत होते. त्याच्या घरी पोहचली तर घरी खुप वर्दळ होती. घराबाहेर खुप गाड्या उभ्या होत्या. ती अजूनच घाबरली आणि सरळ धावतच सुमेधला आवाज देत घरात शिरली. आणि सुमेध तिच्यासमोर येऊन उभा राहिला तशीच ती थबकली आणि त्याला बिलगून रडायला लागली.

रडतच हुंदके देत म्हणाली, "आता नाही मी काहीच ऐकून घेणार तुझं. अजून माझी परीक्षा घेऊ नकोस. तू माझाच आहेस"

रडतांनाच तिची नजर तिच्या आईवर गेली नंतर घरची सर्वच हळूहळू बाहेर यायला लागले, तिच्या बहिणी, त्याचें नवरे, भाऊ आणि त्याची बायको. सुमेधची आई आणि त्याच्या घरची सर्वच मंडळी. सगळा हॉल पाहुण्यांनी भरून गेला. साची थोडीशी बावरली आणि लाजलीही. तेव्हा तिच्या आईने तिला मागून हात लावत जवळ घेतलं आणि म्हणाली, "मीच फोन केला होता तुला, मी फक्त सुमेधच नाव घेतलं आणि तू हेही विचारलं किंवा ओळखलं नाहीस कि मी आई बोलते". "बाळा, सुमेध आमच्या सर्वांच्या संपर्कात मागच्या काही महिन्या पासून आहे. तो मला भेटायाला आला होता आणि मला तुझ्या आणि त्याच्या बद्दल सर्व सांगितलं. दहा वर्षाआधी राहिलेले कार्य त्याला पूर्ण करायचं आहे असं बोलला. आम्ही सर्वानी मिळून हे घडवून आणलं तुझी चुप्पी तोडण्यासाठी. तुझ्यातील त्याच्याबद्दल प्रेम पुन्हा जागृत करण्यासाठी." "बाळा, अजून किती भावना दाबून ठवशील. तुझा होकार नेहमीच होता पण तू ओठावर कधीच आणला नाहीस. तुझं स्त्रीत्व एका दुसऱ्याच बाजूने समोर आणलंस तू. तुझ्या प्रेमाची शक्ती होती हे जी तुला स्ट्रॉंग बनवत होती. स्वतःला विसरून आमच्या सर्वांची आई झालीस तू. घरातील प्रत्येक जवाबदारी संभाळलीस आता मला माझी जवाबदारी पूर्ण करू दे. सुमेध बद्दल तू घरात कधीच बोलली नाहीस पण आज तुझ्या लग्नाच्या नकारच कारण कळलं आणि नतमस्त झाले मी. भावंडांनच आयुष्य उभं करायला रात्र नि दिवस एक केलीत आता आमच्या सर्वांची इच्छा आहे की तू तुझं आयुष्य जगावं. म्हणूनच हा सर्व घाट घातलाय."

साक्षीच्या एवढ्या वर्षपासून दाटून असलेल्या भावना अश्रूतून वाहत होत्या.. तिच्या बहिणी तिला आता घेऊन गेल्या. तासाभराने ती तयार होऊन बाहेर आली तेव्हा अतिशय सुंदर अशी परिपकव पस्तिशीतली स्त्री दिसत होती. चेहऱ्यावर प्रसन्नता होतीच आणि स्वतःवरचा तिचा विश्वास तिला अधिकच प्रभावी भासवत होता. सर्व संम्मतीने सुमेधच्याच घरी लग्नाचा समारंभ आटोपला. चारुच्या फोटोजवळ जाऊन दोघानींहि तिला वंदन केलं.

पहिल्या रात्री दोघेही खिडकीजवळ उभे राहून चंद्राला बघत होते. साची शांत तिच्या भूतकाळात शिरली आणि सुमेधने तिला मिठीत घेतलं. तोच चन्द्र ढगातून बाहेर आला आणि त्याच चंद्राला साक्षी ठेवून दोघानींही चारुच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. बाळाच्या ओढीत तिचा मृत्यू झालं होता. तीच सुमेधला बाबा बनवण्याचं स्वप्नं अधुरं होत.मग लग्नाच्या तीन महिन्यानंतर साचीने काद्येशीर रित्या एक लहान नवजात मुलीला दत्तक घेतलं. आणि छोटी चारू घरात वर्षभरात धावायला लागली. एक अधूरस स्वप्न पूर्ण झालं होत आणि एक अधुरी प्रेम कहाणी जी दहा वर्षा आधी थांबली होती ती परत सुरु झाली.. ज्या कहाणीचा फक्त चन्द्र साक्षीदार होता त्याला आज सगळ्याची साक्ष लाभली होती..


Rate this content
Log in

More marathi story from URMILA DEVEN

Similar marathi story from Romance