Preeti Sawant

Drama Tragedy Inspirational

3  

Preeti Sawant

Drama Tragedy Inspirational

बंदिवान मी या संसारी (भाग १ )

बंदिवान मी या संसारी (भाग १ )

3 mins
173


"लता झाला का ग चहा? मला निघायला उशीर होतोय", रवी म्हणाला.

"आई, माझे दूध लवकर आण. बस येईल इतक्यात", लवी म्हणाली.

"आणते आणते", असे बोलून आधी लताने रवीला चहा दिला आणि गरम गरम दुधाचा ग्लास लवी समोर ठेवला.

दोघेही आपापल्या कामाला निघून गेले.

आता कुठे लता थोडावेळ निवांत बसणार, तेवढ्यात सासूबाईंनी लताला आवाज दिला.

त्यांच्या सकाळच्या न्याहरीच्या आधीच्या गोळ्या त्यांना घ्यायच्या होत्या. त्या त्यांना रोज सकाळी लताच देत असे.


लताने सासूबाईंना गोळ्या नेऊन दिल्या आणि बेडरूममध्ये जाऊन पाठ टेकवली. अगदी १० मिनिटे झाली असतील तेव्हा पुन्हा सासूबाईंचा आवाज आला.

तोपर्यंत सासरे ही उठले होते. लताने न्याहरी बनवायला घेतली आणि सासू-सासऱ्यांचे प्रात:विधी आटोपल्यावर त्यांना न्याहरी आणि चहा दिला. दोघांनाही कमी गोड चहा लागायचा.

मग लता अंघोळीला गेली. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. पण अंघोळ केल्याशिवाय काही खायचे नाही हा या घराचा नियम होता.

लवी व्हायच्या आधी तर लताला अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात जायला ही परवानगी नव्हती. पण लवी शाळेत जायला लागल्यापासून लताची खूप धांदल उडायची म्हणून तिला फक्त न्याहरी बनवायची परवानगी देण्यात आली.

कशी बशी पाच मिनिटांत अंघोळ उरकून देवपूजा करून लता स्वयंपाक घरात आली. तोपर्यंत बनवलेली न्याहरी थंड झाली होती. तिने चहा गरम करून घेतला व ती न्याहरी करायला बसली. न्याहरी उरकून तिला दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागायचे होते. दुपारी जेवणाला काय करायचे हा विचार करत ती न्याहरी करू लागली.


तेवढ्यात पुन्हा सासूबाईंचा आवाज आला. त्यांच्या न्याहरी नंतरच्या गोळ्या खायच्या होत्या. सासरे त्यांच्या ज्या काही गोळ्या असतील ते स्वतः खायचे. पण सासूबाईंना त्यांच्या सगळ्या गोळ्या लतानेच दिल्या पाहिजेत असे वाटत असे. लताची धावपळ बघून कधीच कधी लताचे सासरे तिच्या सासूबाईंना म्हणायचे सुद्धा, "अग, सुमा कशाला छळतेस लताला. मी देत जाईन तुला रोज वेळेवर गोळ्या"

तेव्हा लताच्या सासूबाई बोलत, "वाह रे वाह, मोठा पुळका तुम्हाला तुमच्या सुनेचा. काम काय असतात तिला. थोडा वेळ काढून मला गोळ्या देऊच शकते की. तुम्ही मध्ये पडू नका. थोडी ढील दिली तर मिऱ्या वाटेल ती आपल्या डोक्यावर"

तिची ती वायफळ बडबड ऐकून सासरे बोलायचं सोडूनच द्यायचे.

घरात लताची सासू बोलेल ती पूर्वदिशा. लताने एम कॉम ही पदवी घेतली होती. लग्नाआधी ती नोकरी करायची.

पण लग्नानंतर जेव्हा तिने हा विषय घरात काढला तर सासूबाईंनी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्या म्हणाल्या, "मला बाई आता काहीच घराची कामं जमत नाही. मी फार थकलेय. म्हणून तर रवीच्या लग्नाची वाट पाहत होते. आता तू आलीस म्हणजे मी निवांत आहे. आता घराची सगळी जबाबदारी तुलाच बघावी लागेल. सकाळची न्याहरी, दुपारचे जेवण, संध्याकाळचे चहापाणी आणि रात्रीचे जेवण. सगळे नीट समजून घे. रविची मिळकत खूप चांगली आहे. त्यामुळे तू घरातलंच बघ"


हे ऐकून लता त्यादिवशी हमसून हमसून खूप रडली होती. पण नवरा म्हणे त्यांची आई म्हणेल ती पूर्वदिशा. त्यामुळे ती निमूटपणे सगळं सहन करत होती. रवीच लतावर खूप प्रेम होतं. तो तिला कसलाही त्रास देत नसे. तिला हवे ते सगळे आणून देत असे. फिरायला ही नेत असे. फक्त तिने त्याच्या आई-वडिलांना चांगलं बघावं हीच त्यांची अपेक्षा असे.

असो,लता स्वयंपाक घरात आली आणि बेसिन मधली भांडी बघून तिला रडू कोसळले.

तिने किती तरी वेळा भांडी घासायला बाई ठेवायचा हट्ट रविकडे केला होता. तो तयार सुद्धा झाला होता. पण सासूबाईंना हे कळल्यावर त्यांनी नकार दिला. तेव्हापासून हा विषय कितीही काढला तरी रवी कोणत्या ना कोणत्या प्रकारे लाडीगोडी लावून तो टाळत असे.

तिने शांतपणे सगळी भांडी आवरली आणि ती दुपारच्या जेवणाला लागली.


सासूबाईंना जेवणा आधीच्या गोळ्या देऊन तिने स्वयंपाकघर आवरले आणि सासू सासऱ्यांना जेवायला वाढले.


त्यांचे जेवण आटोपले आणि लवी शाळेतून घरी आली. तिने लविला आणि स्वतःला जेवायला वाढले. लवी बरोबर थोडया गप्पा मारल्यावर तिचा दिवसभराचा सगळा थकवा कुठच्याकुठे निघून गेला.

सासूबाईंना जेवणानंतरच्या गोळ्या देऊन ती लवीला कुशीत घेऊन तासभर झोपली.


क्रमश:


(ही कथा कशी वाटली हे कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा. आवडल्यास ह्या कथेला जास्तीतजास्त शेअर करा. धन्यवाद.)

©preetisawantdalvi


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama