कृतज्ञ भिकू
कृतज्ञ भिकू
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात भिकू नावाचा भिकारी राहत होता. तो या गावात कसा आणि कोठून आला ह्या बाबत कोणाला जास्त माहीत नाही. पण तेव्हापासून तो या गावचाच बनून राहिला होता.
ह्या गावात एक गणपतीचे मंदिर होते..त्या गणपतीची नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती होती..त्यामुळे दिवसभर त्या मंदिराभोवती भाविकांची गर्दी असे..कोणी नवस बोलायला, कोणी फेडायला, तर कोणी मंदिर आणि गणपतीचे दर्शन घ्यायला गर्दी करत असत.
भिकू जवळ स्वतःच असे घर नव्हतं. त्यामुळे तो जिथे आडोसा मिळेल तिथे रात्री झोपत असे..मंदिरातला प्रसाद आणि कोणी भाविकाने पैसे किंवा काही खायला दिले तर त्यावर त्याची उपजीविका चालत असे..
पण त्याचा एक नित्यनियम होता. त्याला दिवसभरात जे काही मिळेल त्याचं अर्ध तो नेहमी देवासाठी ठेवत असे..कारण त्याचे म्हणणे होते की, "देतो तो देव".
असा हा त्याचा नीतिनियम कित्येक वर्षे चालत आलेला होता.. एक दिवस असाच भिकू मंदिर बंद व्हायच्या आधी रोजच्याप्रमाणे मंदिरात गेला आणि त्याला दिवसभरात मिळालेल्या भिकेमधील अर्धे पैसे त्याने दानपेटीत टाकले आणि आजचा दिवस सरला म्हणून देवाचे आभार मानले व तो समोरच्या वडाच्या झाडाखाली झोपी गेला..
इथे गणपती बाप्पा सगळं बघत होता त्याने भिकूची परीक्षा घ्यायचे ठरविले..सकाळी भिकू र
ोजच्याप्रमाणे उठला आणि नदीवर जाऊन सकाळचे क्रियाविधी करून मंदिरासमोर येऊन बसला..आज सकाळी जरा रहदारी तशी कमीच होती..त्याने देवाची प्रार्थना केली आणि भीक मागायला सुरुवात केली..
तर कोण आश्चर्य एक धनवान माणूस गाडीतून उतरला..त्याला पाहून आज चांगले जेवण मिळेल अशी आशा भिकूला झाली..तो माणूस मंदिरात दर्शन करून भिकूजवळ येऊन थांबला.. त्याने भिकूला एक थैली भरून पैसे दिले आणि तो निघून गेला..
भिकूला कोण आनंद झाला..इतके सारे पैसे एकदम तो पहिल्यांदाच पाहत होता..आता काही दिवसांसाठी तरी त्याची जेवणाची सोय झाली होती..त्या पैशात चमचमीत आणि हवे ते पदार्थ तो खाऊ शकत होता.. त्याने एकदा त्या थैलीतल्या पैशांवर नजर फिरविली आणि मनोमनी देवाचे आभार मानले.
पण भिकू एक कृतज्ञ व्यक्ती होता..जरी त्याला एकदम धनलाभ झाला असला तरी तो नित्यनियम विसरला नाही..त्याने त्या थैलीतील पैशाचे दोन भाग केले आणि ठरल्याप्रमाणे एक भाग त्याने देवाला अर्पण केला आणि उरलेले पैसे त्याने स्वतःजवळ ठेवले व त्या पैशाने त्याने हवे ते पदार्थ पोटभरून खाल्ले..
देवाला खरचं भिकूचं कौतुक वाटलं आणि त्याच्या कृतज्ञ स्वभावाचे ही..
त्यांनतर भिकूला कधीही अन्नाची कमतरता भासली नाही..
कारण देवाने त्याची जवाबदारी जी घेतली होती..
समाप्त