पौराणिक कथा (भाग २ )
पौराणिक कथा (भाग २ )


ह्या भागात आपण अशाच काही अद्भुत आणि अद्वितीय गोष्टींची माहिती घेणार आहोत.
मी खाली दिलेली माहिती अचूक आहे असे मी म्हणणार नाही. परंतू , जर तुम्हाला या ठिकाणांबद्दल अधिक माहिती असेल तर ती आवर्जून मला कमेन्टद्वारे सांगावी. शेवटी आपण सगळे अज्ञानी आहोत.
मला देवी-देवता, रहस्यमय जागा, त्या जागेबद्दलच्या पौराणिक कथा वाचायला आणि ऐकायला खूप आवडतात. म्हणून मी ऐकलेल्या आणि वाचलेल्या काही जागेची माहिती तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुम्हालाही हयाबद्दल वाचायला आवडेल अशी मी आशा करते.
तुम्हाला माहीतच असेल की, जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी आपल्या ‘द थेअरी ऑफ रिलेटीविटी’ या सिद्धांतामध्ये असा दावा केला होता की, वेळेचा प्रवास (टाईम ट्रावेल) करणे शक्य आहे आणि त्यांनी त्याचे मार्गही सांगितले होते, ज्याचा वापर करून वेळेचा प्रवास केला जाऊ शकतो.
पण यातील अनेक मार्ग केवळ अशक्य आहेत जसे की, जर आपण प्रकाशाच्या गतीने प्रवास केला तर आपण वेळेचा प्रवास (टाईम ट्रावेल) करू शकतो पण आपण सर्वजण जाणून आहोत की, आपले तंत्रज्ञान इतके प्रगत नाही की आपण प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकू.
याच थेअरी ऑफ रिलेटीविटीमध्ये आईन्स्टाईन यांनी ‘वॉर्म होल’ याचा उल्लेख केला आहे.
‘वॉर्म होल’ म्हणजे असा मार्ग ज्याद्वारे ब्रम्हांडात अस्तित्वात असणाऱ्या दोन ठिकाणामध्ये प्रवास करता येतो.
हा मार्ग अंतराळ आणि वेळ यांच्यातील अंतर कमी करतो म्हणजेच जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचायला आपल्याला जर करोडो वर्षांचा काळ लागत असेल तर खूपच कमी काळात या वॉर्म होलद्वारे आपण त्याठिकाणी सहज पोहचू शकतो. वॉर्म होलच्या दरवाजाला ‘स्टार गेट’ असेही म्हणतात.
अस म्हणतात की, हे स्टार गेट पृथ्वीवर आजच्या काळात एकमेव ठिकाणी अस्तित्वात आहे जे की तिरुमला डोंगरावर स्थित आहे. यालाच स्थानिक लोक "शिला तोरणम" या नावाने ओळखतात. स्थानिक लोकांच्या मते, याच दरवाजातून भगवान विष्णू धरतीवर आले होते. स्थानिक लोकच नव्हे तर तेथील सरकार आणि संशोधक देखील मानतात की हे एक स्टार गेट आहे जो एका वॉर्म होलशी जुळलेला आहे. म्हणून या स्टार गेट जवळ जायला कोणालाच परवानगी नाही.
या शिला तोरणमच्या अवतीभवती सर्वत्र सरकारद्वारे जाळीचे कुंपण घालण्यात आले आहे आणि २४ तास याठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. तोरणम जवळ मोबाईल घेऊन जाण्यासही मनाई आहे. काही वर्षांपूर्वी एक पर्यटक मोबाईल घेऊन कुंपणाला पार करून शिला तोरणम जवळ गेला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला. तसेच काही वेळाने त्याचा मृत्यू देखील झाला.
दवाखान्यात नेल्यानंतर असे समजले की, त्याच्या हृदयात बसवण्यात आलेले पेसमेकर त्या दगडांजवळ गेल्यानंतर काम करणे बंद झाले. जेव्हा संशोधकांद्वारे या ठिकाणचे संशोधन केले गेले तेव्हा असे आढळले की, शिला तोरणम च्या दगडांतून मोठ्याप्रमाणात विद्युत चुंबकीय लाटा (इलेक्ट्रॉमॅगनेटिक वेवज्स) निघतात. त्यामुळे बॅटरीवर चालणारी कोणतीही वस्तू याठिकाणी काम करत नाही अथवा त्याचे वाईट परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात त्यामुळे इथे मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली जात नाही.
भू-वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, दगडांपासून बनलेली अशी रचना जगात अन्यत्र कोठेही नाही. शिला तोरणम हे निसर्गतः बनलेले नाही आणि ही दगडी रचना २ कोटी वर्षे जुनी आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये देवी - देवतांचे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाणे दर्शवले गेले आहे तसेच हिंदू लोकांमध्येही अशी मान्यता आहे की याच शिला तोरणम मधून भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर प्रवेश केला होता.
हे ठिकाण तिरुमला मंदिरापासून केवळ १ किमी अंतरावर स्थित आहे. आपण जर लक्षपूर्वक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की तिरुमला मंदिरातील भगवान तिरुपतींच्या बाजूला दरवाजासारखी रचना आहे.
वैज्ञानिकांद्वारे या ठिकाणांबाबतचे केले गेलेले दावे आणि हिंदू लोकांची वर्षानुवर्षे चालत आलेली मान्यता हा संयोग असू शकत नाही. आज अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत पण म्हणून आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
तुमचे "शिला तोरणम" बाबतीत काय मत आहे आणि तुम्हाला याबाबत अधिक माहिती असेल तर मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा.
आता पुढे मी तुम्हाला अजून एका जागेची माहिती देणार आहे.
आपला प्राचीन भारत देश हा निश्चितच खूप प्रगतशील होता आणि ते आपल्याला प्राचीन भारतीय मंदिरातील स्थापत्यशास्त्र वरून लक्षात येतेच. सांगण्याचा मुद्दा हा की, आपले जे प्राचीन मंदिर आहेत ते विविध आश्चर्याने भरलेले आहेत. त्यापैकीच एक आश्चर्य म्हणजे ‘ज्वालाजी माता मंदीर’.
हे मंदिर हिमाचल प्रदेशातील कांग्रा या जिल्हयातील असून देवीच्या ५१ शक्ती पीठांपैकी एक आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे या मंदीरात इतर मंदिरांसारखी देवीची मूर्ती नसून तेथे एक सतत तेवणारा अग्नी आहे.
आता तुम्ही म्हणाल यात काय आले आश्चर्य?
तर हयात आश्चर्य म्हणजे हा अग्नी विना वात आणि तेलाचा पेटत आहे. तेही एक-दोन नाही तर तर खूप प्राचीन काळापासून म्हणजे महाभारत काळापासून अशी मान्यता आहे.
याबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी की, एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होता. त्यामध्ये सर्व देवलोकांना आमंत्रण होते, पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण केले नाही. सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली.
शिवाने तिला जाण्यास रोखले शिवाने सांगितले की, “तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तेथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील, म्हणून तू जाऊ नकोस.” परंतु काही ऐकण्याचे सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिव शंकरांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली. तेथे जाताच सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली, “की समस्त देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानास्पद आहे”, त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद वक्तव्य करावयास सुरुवात केली ते म्हणाले, " शिव हे स्मशानी, भूत-प्रेतांवर राहणारे एक शूद्र व्यक्ती आहेत, ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपून असतात. त्याचबरोबर त्यांना वस्त्र, आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे, त्यामुळे त्यांना ह्या यज्ञात मान मिळणे कठीण आहे, त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल ! ".
हे आपल्या पतीविरोधात अपमानास्पद वाक्य सतीच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता हे मनात आणून ती थांबली. ह्या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याच महायज्ञकुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले.
असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले, त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडवनृत्य करायला सुरुवात केली, त्याचा परिणाम संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला, सगळीकडे निसर्गानी कोप घेतला, हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल, म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शनचक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले, सुदर्शनचक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले, तेव्हा शिवाचा राग शांत झाला.
त्यापैकी देवीची जीभ या ठिकाणी पडली होती जिथे आता ‘ज्वालाजी माता मंदीर’ आहे.
असे म्हटले जाते की, या मंदिराचे निर्माण पांडवांनी केले. अकबराने त्याच्या राज्यात हा अग्नी विझविण्याचा प्रयत्न केला होता पण यात तो असफल ठरला. अकबराने शेवटी असफल होऊन देवीला सोन्याचे छत्र अर्पण केले होते, पण देवीला ते मान्य नसल्यामुळे ते एका न उलगडून येणाऱ्या धातू मध्ये रुपांतरीत झाले आहे, अशी मान्यता आहे.
एव्हाना तुम्ही विचार केलाच असेल की मंदिराच्या खाली नैसर्गिक वायूचा साठा असणार..
तर १९६० सली प्रंतप्रधान नेहरूंच्या काळात एका विदेशी कंपनी कडून याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अहवाल दिला की येथे मंदिरा खाली कुठल्याही प्रकारचा नैसर्गिक वायूचा साठा नाही, व ती कंपनी याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण ही देऊ शकली नाही. त्यामुळे हे वैज्ञानिकांना न कळलेले कोडे आहे.
या मंदिरात सतत पेटत असणारा अग्नी आणि हा इथे फक्त एकच नाही तर ११-१२ असे अग्नी आहेत. येथे आढळणाऱ्या कुंडातील पाणी हे उकळणाऱ्या पाण्यासारखे दिसते पण ते पाणी थंड आहे, तेथील पुजाऱ्यंच्या म्हणण्याप्रमाणे ह्या कुंडातील पाणी हे अन्न शिजवण्यासाठी उपयुक्त असे आहे.
तुम्ही ह्या संदर्भात जर कुठेही वाचले, ऐकले नसेल. तर तुम्हाला अद्भुत आशा दोन ठिकाणांची माहिती नक्की मिळाली असेल. तुम्हाला पण अशा ठिकाणांबद्दल माहिती असल्यास मला नक्की कळवा.
चला आता भेटूया पुढच्या भागात..
क्रमश: