Preeti Sawant

Children Stories Fantasy Others

2  

Preeti Sawant

Children Stories Fantasy Others

पौराणिक कथा (भाग १ )

पौराणिक कथा (भाग १ )

5 mins
1.1K


लहानपणापासून सर्वांनाच पौराणिक कथा, देवी-देवता, ब्रह्मांड या सर्वांबाबत उत्सुकता असते. मी ह्या कथामालिकेत तुम्हाला अशाच अद्भुत, अकल्पनीय गोष्टींची माहिती देणार आहे. 


आपल्या सर्वांना त्रिदेव माहीतच असतील. अहो, ब्रम्हा, विष्णु आणि महेश.


जेव्हा त्रिदेवांनी ब्रह्मांडाची रचना केली तेव्हा पृथ्वी ही त्या त्रिमूर्तीची सर्वाधिक सुंदर रचना होती.


त्रिदेवांपैकी ब्रम्हदेव निर्माता, विष्णुदेव संरक्षक, शिवशंकर विनाश करणारे मानले जातात.


एके काळी आपली पृथ्वी ब्रह्मांडातील विविध लोकांपैकी एक होती जिथे जीवन संभव होते.


अजूनही संपूर्ण ब्रह्मांड आपल्या मानव जातीसाठी गूढच आहे.


असे मानले जाते की, ज्याप्रकारे त्रिदेवांनी इतर देवांची आणि त्यांना राहण्यासाठी स्वर्गाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे अंधाराने वेळेनुसार आपली क्षमता समजून घेऊन असुर आणि नरक बनवून सात वेगवेगळ्या नरकांना आकार दिला. या दोन्ही रहस्यमय ताकदींच्या मध्ये संघर्ष कधी आणि केव्हा सुरू झाला व स्वत:चे वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्यांच्यातल्या लढाईत दोन्ही पक्ष कधी आणि कुठे एकमेकांच्या समोर आले हे सांगणे कठीण आहे.


आपल्या प्राचीन किंवा पौराणिक काळात असे मानले जाते की, पाच अत्यंत विनाशकारी अस्त्रे होती.


त्यामध्ये पहिले अस्त्र ब्रह्मास्त्र, दुसरे नारायणस्त्र, तिसरे पाशुपतास्त्र, चौथे वज्र आणि पाचवे सुदर्शन चक्र होते. चला आता आपण या सगळ्या अस्त्रांची थोडक्यात माहिती घेऊ.


सगळ्यात पहिले अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र. जगाचे पितामह ब्रह्मदेव यांनी राक्षसांच्या नाशासाठी ब्रह्मास्त्राची निर्मिती केली होती. ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्माचे (देवाचे) शस्त्र. सुरुवातीला ब्रह्मास्त्र फक्त देवी-देवतांकडे असायचे. प्रत्येक देवतांकडे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शस्त्र होते. देवांनी हे अस्त्र प्रथम गंधर्वांना दिले. रामायण काळात विभीषण आणि लक्ष्मणाकडे हे शस्त्र होते, तर महाभारत काळात द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कृष्ण, कुवलश्व, युधिष्ठिर, कर्ण, प्रद्युम्न आणि अर्जुन यांच्याकडे होते. अर्जुनाला ते द्रोणाचार्यांकडून मिळाले. द्रोणाचार्यांना ते राम जमदग्नेयांकडून मिळाले.


ब्रह्मास्त्राचे अनेक प्रकार होते. लहान आणि मोठे आणि व्यापक. इष्ट, रासायनिक, दैवी आणि जादू-अस्त्र इ.


असे मानले जाते की दोन ब्रह्मास्त्रांच्या टक्करमुळे आपत्तीची स्थिती निर्माण होते. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीचा अंत होण्याची भीती असते.


महर्षि वेद व्यास लिहितात की जेथे ब्रह्मास्त्र सोडले जाते तेथे 12 वर्षे पर्जन्य पाऊस (प्राणी, वनस्पती इत्यादींची निर्मिती) होत नाही. ब्रह्मास्त्रामुळे गावात राहणाऱ्या स्त्रियांच्या गर्भाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख महाभारतात आहे. 


दुसरे अस्त्र म्हणजे नारायणास्त्र. हे भगवान विष्णूचे शस्त्र आहे. जे त्यांनी त्यांच्या नारायण अवतारात वापरले होते. ह्या अस्त्रातून अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा तसेच आगीचा वर्षाव होत असतो, जेव्हा जेव्हा एखादा योद्धा त्याचा विरोध करतो तेव्हा या अस्त्राची तीव्रता वाढते आणि ती पूर्वीपेक्षा अधिक तीव्रतेने शत्रूवर तुटून पडते. जोपर्यंत एकतर योद्धा आश्रय घेत नाही किंवा तो मरत नाही तोपर्यंत या शस्त्राची शक्ती वाढतच राहते. नारायणास्रासमोर जगण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे, त्याला शरण जाणे , शस्त्र सोडणे. युद्धाच्या नियमांनुसार, हातात शस्त्र नसलेल्यावर कोणीही हल्ला करू शकत नाही आणि म्हणूनच असे केल्याने हे शस्त्र शांत होते.


महाभारताच्या युद्धादरम्यान, कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या कुरु योद्धा अश्वत्थामाने पांडवसेनेवर नारायणास्त्राचा वापर केला. भगवान श्रीकृष्ण, जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार आहेत, म्हणजेच भगवान नारायण यांनी पांडवांना समजावून सांगितले की, त्यांची शस्त्रे खाली ठेवून या अस्त्राला शरण जावे, हाच ह्या अस्त्रापासून वाचण्याचा मार्ग आहे.


तिसरे अस्त्र आहे पाशुपतास्त्र. हे असे एक शस्त्र आहे जे संपूर्ण हिंदू इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि भयंकर शस्त्रांपैकी एक आहे. जे भगवान शिव आणि देवी काली यांचे प्रमुख शस्त्र मानले जाते. असे म्हणतात की ते मन, डोळे, शब्द किंवा धनुष्यातून सोडले जाते. हे शस्त्र आपल्यापेक्षा कमी बलवान किंवा कमी योद्ध्यावर सोडू नये. पाशुपतास्त्र संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकते. हे पशुपतीनाथांचे शस्त्र आहे, त्यांनी सृष्टीच्या निर्मितीपूर्वी कठोर तपश्चर्या करून ते आदिशक्ती कडून मिळवले होते. या शस्त्राने केलेला विनाश पुन्हा दुरुस्त करता येत नाही.


महाभारताच्या युद्धातही पाशुपतास्त्र शस्त्राचे वर्णन आढळते. महाभारतात अर्जुनाने जयद्रथाचा वध करण्यासाठी पाशुपतास्त्राचा वापर केला होता. पाशुपतास्त्र प्राप्त करण्यासाठी अर्जुनाने भगवान शंकराची आराधना केली होती.


चौथे अस्त्र म्हणजे वज्र. हे देवांचा राजा इंद्र याचे शस्त्र होते. महर्षि दधिची यांच्या त्यागामुळे वज्राची निर्मिती होऊ शकली. हे शस्त्र त्यांचा अस्थींपासून निर्मिले होते. या शस्त्राचा वापर करून इंद्राने वृताचा निप्पात केला; तसेच स्वर्गावरील अनेक आक्रमणे परतवून लावत युद्धे जिंकली.


पाचवे अस्त्र म्हणजे सुदर्शन चक्र. श्रीकृष्ण १२-१३ वर्षांचे असताना परशुरामांची भेट घेण्यासाठी जानापाव (इंदूर) येथे गेले होते. तेथे परशुरामांनी भेट म्हणून श्रीकृष्णास सुदर्शन चक्र दिले. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी महादेवाने हे चक्र तयार करून विष्णूला दिले होते. हे सुदर्शन चक्र कायम कृष्णाकडे राहिले.


भगवान विष्णूंच्या हाती सुदर्शन चक्र कसे आले, याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते. एकदा कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या वेळी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू काशीला आले असता, माणिकर्णिका घाटावर स्नान करून त्यांनी भगवान शिवाला एक हजार सुवर्णकमले अर्पण करून त्यांची पूजा करण्याचा संकल्प केला. अभिषेक झाल्यानंतर जेव्हा विष्णूंनी पूजेला आरंभ केला, तेव्हा त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी शिवांनी हजार कमलपुष्पांपैकी एक पुष्प कमी केले. विष्णुंना एक कमलपुष्प पमी पडत असल्याचे लक्षात आले, पण त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याने त्या एका कमलाच्या ऐवजी भगवान विष्णू आपला डोळा त्यागण्यासाठी तयार झाले. विष्णूंचे डोळे कमलाप्रमाणे असून, त्यासाठीच त्यांना पुंडरीकाक्ष, कमलनयन म्हटले जाते. त्यामुळे पूजेसाठी कमी पडलेल्या एका कमळाच्या ऐवजी आपला कमलरूपी डोळा देण्यास विष्णू तयार झाले. त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन शिव विष्णूंच्या समोर अवतरले आणि भगवान विष्णूंनी ही पूजा केलेला दिवस अतिशय पुण्य देणारा ठरून, ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून ओळ्खला जाईल असा आशिर्वाद दिला. तसेच या दिवशी जो कोणी अतिशय भक्तिभावाने व्रतपूर्वक शिवाचे पूजन करेल, त्याला मोक्ष प्राप्ती होईल असा ही आशिर्वाद शिवांनी दिला. विष्णुंची अपार भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवांनी त्यांना सुदर्शन चक्र दिले, आणि जगातील दुष्ट शक्तींचा नाश करण्याची ताकद या चक्रामध्ये असेल असा आशिर्वादही दिला. तेव्हापासून भगवान विष्णूंच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले अशी ही कथा आहे.


शास्त्र व शस्त्रे शिकवणाऱ्या ब्राम्हणामध्ये परशुराम हे सर्व श्रेष्ठ मानले जातात.


सामंत पंचकाच्या शुद्धीकरणांनंतर ( क्षत्रियांच्या रक्ताने पाच तलाव परशुरामाने भरविले होते), म्हणजे त्यांच्या पूर्वजांच्या शांती नंतर भगवान परशुरामाने आपला निर्णय बदलविला होता. तसेच देवव्रत ( भीष्म ) हा गंगेचा पुत्र व अष्ट वसु असल्याने, तिने भगवान परशुरामाकडून त्याला शिष्य म्हणून विद्यादान करण्याचे वचन घेतले होते. हे पण एक अपवादाचे कारण होते. त्यामुळे महाभारतात भीष्म यांना परशुराम यांनी धनुष्य धरायला शिकवले व शास्त्र आणि शस्त्र विद्येत पारंगत केले.


कवच-कुंडलांचे दान केल्यानंतर युद्धात आपण अर्जुनाला कमी पडू नये म्हणून कर्णाने ब्रम्हास्त्र प्राप्त करण्याचे ठरवले. द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्यांचे गुरू असलेल्या परशुराम कडुन ब्राह्मस्त्र मिळविले.

परशुराम केवळ ब्राम्हणालाच शस्त्रास्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून म्हणजे स्वत: ब्राह्मण आहे असे सांगून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला, आणि ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतली. 


परंतु एके दिवशी परशुराम विश्रांती घेत होते, व त्यांचे डोके कर्णाच्या मांडीवर होते. त्यावेळेस एक भुंगा कर्णाच्या मांडीला कडकडून चावत मांडीत घुसला. गुरूंची झोप मोडली जाईल, म्हणून कर्णाने मांडी हलवली नाही. अखेर भुंगा मांडी फोडून परशुराम यांना चावला. तेव्हा ते खाडकन जागे झाले. त्यांना ब्राम्हणाच्या सहनशक्ती बद्दल आकलन होते. तेव्हा त्यांनी शपथ घालून, तु ब्राह्मण नाही तर कोण आहेस ते सांग असे विचारले असता, कर्णाने त्यांना खरी हकीकत सांगितली. त्यावेळेस परशुरामाने कर्णाला शाप दिला की, तू खोट बोलून विद्या शिकलास, त्यामुळे ऐन युद्धाच्या वेळेस तुला विद्या आठवणार नाही. अशी आख्यायिका आहे.


क्रमश:



Rate this content
Log in