Preeti Sawant

Children Stories Inspirational Others

3  

Preeti Sawant

Children Stories Inspirational Others

आला रे आला गणपती आला

आला रे आला गणपती आला

5 mins
197


पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा,

पुष्पहारांच्या घातल्यात माळा

ताशाचा आवाज तारारारा आला

रं गणपती माझा नाचत आला!!

“अरे आकाश, आधी आवाज कमी कर बघू गाण्याचा. ह्या ब्लुटूथ स्पीकरने वीट आणलाय नुसता. किती तो आवाज!!  

आता ही गौरी, कुठे राहिली. गौरी, अगं आरतीच ताट आण पाहू. बाबा येतचं असतील इतक्यात बाप्पांना घेऊन” काकू म्हणाल्या.

“आले ग आई” गौरी म्हणाली.

तेवढ्यात काका बाप्पांना घेवून हजर झाले. काकांनी दारापुढे काढलेल्या रांगोळीवर बाप्पांची मूर्ति ठेवली. मग काकूने हळद-पिंजर आणि तांदूळ वाहून बाप्पांची आरती ओवाळली. मग “गणपती बाप्पा मोरया” असा बाप्पांचा जयघोष करत काकांनी बाप्पाला घेऊन घरात प्रवेश केला.

मग पहिले आधी काकीने आरतीच ताट उचलून देवघरात ठेवले आणि मग आकाशने काकांच्या हातावर सॅनिटायझर स्प्रे केला. मग काका सरळ न्हाणीघरात गेले.

हे आहे आपल्या मुंबईतील विघ्नहर्ता अपार्टमेंट मध्ये राहणारे देशपांडे कुटुंब. माधव देशपांडे हे ह्या कुटुंबाचे प्रमुख. मालिनी ही त्यांची अर्धांगिनी आणि गौरी व आकाश ही त्यांची मुले.

माधव काका हे प्रायवेट कंपनीत कामाला आहेत आणि मालिनी काकू ह्या गृहिणी. गौरी बीएससीच्या पहिल्या वर्गाला आहे व आकाश आता ईयत्ता नववीत आहे. सध्या कोरोनामुळे गेले ४-५ महीने सगळेजण घरातच आहेत. काका घरातुनच त्यांचे काम करत आहेत व गौरी आणि आकाश ऑनलाइन शाळा आणि कॉलेज अटेंड करत आहेत.

कोरोनाने गेले वर्षभर सगळ्या जगभर हाहाकार माजवला आहे. अगदी देवळे देखील बंद केली याने!!

आता ह्या विघ्नहर्त्याला साकडे आहे की, लवकरात लवकर हा आजार आणि ह्या रोगाचा विषाणू नष्ट होऊ देत आणि सगळे काही पूर्ववत सुरू होऊ देत.

असो, देशपांड्यांकडे दरवर्षी दीड दिवसांचा गणपती बसतो. देशपांड्यांना एक भाऊ आणि एक बहीण. बहीण आणि भाऊ दोघेही पुण्यात राहतात. दरवर्षी सगळे देशपांडे कुटुंब दीड दिवस एकत्र येवून हा गणेशोत्सव साजरा करतात.

पण यंदा कोरोना नावाचे संकट आल्यामुळे ह्या वर्षी कोणालाच मुंबईला येणे शक्य नसल्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव खूपच साध्या पद्धतीने करण्याचे माधव काकांनी ठरविले होते. ह्या वेळेला डेकोरेशन पासून गणपतीची सगळी तयारी त्यांनाच करायची होती. कारण दरवर्षी ही सगळी कामे सगळ्यांमध्ये वाटली जायची. त्यामुळे एकट्या माधव काकांवर कधीही सगळी जवाबदारी पडली नव्हती. पण हे वर्ष खूपच निराळे होते.

काकांच्या आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये कोरोना रुग्ण सापडले होते, त्यामुळे घरातलं सामान आणायला काका एकटेच खाली जात असतं. ते कधीही कोणालाही खाली पाठवत नसत. आकाश आणि गौरीने कितीही आग्रह केला तरीही.

गणपतीसाठी काकांनी २ दिवस आधी जाऊन बाजारातून आवश्यक ते सगळे सामान आणले होते आणि गणेशाची मूर्ति गणपतीच्याच दिवशी आणण्याचे त्यांनी आधीच ठरले होते. त्याप्रमाणे ते शेजारच्या बंडू काकांना बरोबर सकाळीच मूर्ति आणायला गेले होते. बंडू काकांकडे पण गणपती बसतो. आकाशला गणपतीची मूर्ति आणायला जायला खूप आवडायचे.

अहो, वेगवेगळ्या गणपती बाप्पाच्या सुबक मुर्त्या ज्या पाहायला मिळतात!!

पण काकांनी त्याला घरात राहून गणपतीच्या स्वागताची तयारी कर असे संगितले म्हणून तर आकाशने स्पीकरवर गाणे लावले होते.

माधव काका स्वत: घरच्या गणपतीची स्थापना करत असत. माधव काकांचे वडील हे भटजी होते. पण वडिलांचा हा वारसा त्यांच्या एकाही मुलाने पुढे चालवला नाही. पण हयाबद्दल काकांच्या वडिलांना ही काही आक्षेप नव्हता, परंतु अडीअडचणीला कोणता दूसरा भटजी ऐनवेळेला मिळाला नाही तर कार्य थांबू नये, म्हणून त्यांनी माधव काकांकडून सगळे मंत्र आणि श्लोक अगदी तोंडपाठ करून घेतले होते. त्याचाच उपयोग आज माधव काकांना होत होता.

गौरीने गणपती बाप्पांच्या मकरासाठी घरातले रद्दी पेपर आणि तिच्या जवळ असलेले रंग वापरुन खूप छान असं निसर्गचित्राचा देखावा बनविला होता. काका आणि काकांनी तिचे खूप कौतुक केले. काकांचे एक काम हलके झाले होते. पण त्यामुळे त्यांना गौरीमध्ये असलेल्या सजावटीच्या कलेची जाण झाली होती. काका एकदम फ्लॅशबॅकमध्ये गेले, तेव्हा त्यांना आठवले गौरी नेहमी मकर बनविताना मध्ये मध्ये लुडबूड करीत असे. पण कोणीही कधीही तिच्याकडे लक्ष दिले नाही. पण आज ह्याच गौरीने घरातल्या मोजक्याच सामग्रीतून सुंदर कलाकृती बनविली होती आणि आकाशने मकराभोवती दिवाळीमध्ये वापरली जाणारी लाईटिंग वापरुन तो देखावा अत्यंत सुशोभित केला होता.

त्याचबरोबर जर कोणी पाया पडायला किंवा आरतीसाठी घरी आले तर त्यांच्या हातावर सॅनिटायझर न लावता त्याबदल्यात एक भन्नाट कल्पना आकाशने शोधून काढली होती. यासाठी त्याने घरात असलेली एक्स्ट्रा बादली त्याच्या आईकडून घेतली आणि त्यामध्ये कचर्‍याची काळी पिशवी व्यवस्थित घातली आणि ती पिशवी निसटू नये म्हणून त्याने त्या पिशवीच्या बाजूला चिकटपट्टी लावून तिला त्या बादलीत फिट बसविले. त्यानंतर त्याने २ लीटर पेप्सिच्या बॉट्लमध्ये पाणी भरून ठेवले आणि घरामध्ये असलेला हँडवॉश घेतला आणि ही सगळी सामग्री त्याने घराबाहेर ठेवली. तेवढ्याच बंडू काका घरी आले तेव्हा आकाशने हा प्रयोग पहिला त्यांच्यावर करण्याचा ठरविला. नेहमीप्रमाणे त्यांच्या हातावर सॅनिटायझर न लावता त्याने काकांच्या हातावर हँडवॉशचे २ थेंब टाकले आणि काकांना २० सेकंड हात चोळायला संगितले आणि मग आकाशने काकांना त्यांचे हात बादलीवरती धरायला सांगून त्याने त्यांचे हात स्वच्छ धुतले आणि मग टीशूपेपर देवून त्यांना हात कोरडे करायला संगितले. मग त्याने काकांना घरात घेतले.

त्यानंतर त्याने ते पाणी टोईलेटमध्ये ओतले आणि मग तो काकांना म्हणाला, “दुपारी जास्त कोणी घरी येणार नाही तेव्हा ही पिशवी बदलायची आणि संध्याकाळसाठी दुसरी पिशवी ठेवायची व ती दुसरी पिशवी रात्री टाकून द्यायची.” काकांना आकाशची ही कल्पना खूप आवडली. त्यांनी आकाशचे कौतुकही केले. तसेच त्यांनी त्यांच्या स्वत:च्या घरात पण पाहुण्यांसाठी तशीच सोय केली.  

कारण सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. तसेच अल्कोहोल हे ज्वलनशील आहे. त्यामुळे अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर हाताला लावून गणपतीच्या पाया पडायला किंवा गणपतीची आरती वा कापूरारती घ्यायला गेल्यास लगेच हात भाजण्याची शक्यता आहे.

माधव काकांना त्यांच्या दोन्ही मुलांचे आज फार कौतुक वाटत होते. त्यानंतर माधव काकांनी त्यांची पुजा आटोपली आणि मालिनी काकीने बनविलेला नैवेद्य आणि बाप्पाचे आवडते मोदक बाप्पांच्या मूर्तीजवळ ठेऊन बाप्पांना त्याचा नैवेद्य दाखविला आणि मग आरतीला सुरुवात झाली.

धूप, दीप, अगरबत्तीचा सुवास!! वाह!!

किती दिवसांनंतर इतके प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते घरात!!

गणपतीच्या दिवसात शक्यतो कोणाला नाही म्हणणे शक्य नसते पण हा कोरोना नावाचा जो आजार पसरलाय तो जास्त पसरू नये, यासाठी योग्य ती काळजी आपल्यालाच घ्यायला हवी. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे ही तितकेच लक्ष देणे जरुरीचे आहे.

माधव काकांनी घरातल्या घरात मोजक्याच मंडळीनसोबत यावर्षीचा गणेशोत्सव साजरा केला आणि त्याचे विसर्जनही केले. दरवर्षीप्रमाणे हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला नसेलही पण घरातल्या प्रत्येक व्यक्तीने माधव काकांना साथ देऊन सगळ्यांची उणीव भरून काढली.

चला मग, होऊन जाऊ द्यात जोरात “गणपती बाप्पा मोरया!! पुढल्या वर्षी लवकर या!!”  

आता पुन्हा कोरोना डोकावतोय..म्हणून स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ राहा. मस्त राहा.

(हा ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्र – मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद)



Rate this content
Log in