Deepak Kambli

Inspirational

4.0  

Deepak Kambli

Inspirational

मॅसेज

मॅसेज

4 mins
162


"मन्या" म्हणजे मनोहर मोरे. कोकणातून मुंबईत आलेला एक सामान्य पण प्रामाणिक मुलगा. तो मुंबईत काकांच्या घरात रहात होता. त्याचे काका सरकारी कार्यालयात नोकरी करत होते. मन्या वांद्रे सरकारी वसाहतीत गॅलरीत अभ्यास करायचा. तिथेच पथारी टाकून झोपायचा. पेपरची लाईन टाकून व अशीच छोटी मोठी कामे करून त्याने त्याचं स्वतःच शिक्षण कसंबसं पूर्ण केलं.


      पुढे त्याने मराठी व इंग्रजी टायपिंग आणि लघुलेखनाच्या परिक्षा दिल्या. त्यातही तो उत्तीर्णही झाला. १९८१ साली त्याला एमप्लाॅयमेंट एक्सेंजकडून लघू टंकलेखक म्हणून प्रोहिबिशन ॲन्ड एक्साईज खात्यात काॅल आला. कालांतराने त्याला लघुलेखक या पदावर त्याच्या मेहनतीमुळे पदोन्नती देण्यात आली. 'मोस्ट ओबीडियंट गव्हर्मेंट सर्वंट' असे म्हणून त्याला आम्ही चिडवत असू.

याला कारण म्हणजे तो ज्या साहेबांकडे काम करायचा त्यांच्याबद्दल तो स्वतः तर बोलणे सोडा पण आम्हाला मस्करीतही वाईट बोलू द्यायचा नाही. सरकारी नोकरी करत असतानाच तो एका डाॅक्टरकडे काही दिवस पार्ट टाईम जॉबही करत होता.


    वांद्रे वसाहतीत त्याची मनीशी ओळख झाली. त्याची मेहनत पाहून काॅलनीतले सगळेच त्याला चांगले मानत होते. मनीच्या घरच्यांनाही ते माहित होतं. त्यांनी या दोघांचं लग्न लावून दिलं. आता त्याच्यापुढे प्रश्न होता घराचा. त्याने भाईंदरमध्ये एक वनरूम किचन घेतला. मनी हायकोर्टात नोकरीला लागली. आता हळूहळू मन्याची परिस्थिती सुधारत होती. पुढे वनरूम किचनचा वन बेड किचन झाला.


    मन्या आणि मनीला पुत्र रत्न प्राप्त झाले. म्हणजेच संकेतचा जन्म झाला. सगळं काही सुरळीत सुरू असताना चित्रपटातल्या कथे प्रमाणे याच्याही जीवनात एक वेगळे अवघड वळण आले. नुकताच संसार सावरत असतानाच मनीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं.

मन्या पुरता कोलमडला. त्याला सहारा द्यायला आम्ही त्याचे मित्र म्हणूनही कमी पडलो. त्याही परिस्थितीत तो खंबीरपणे उभा राहिला. तिला घेऊन हाॅस्पिटलच्या फेऱ्या मारत राहिला. खर्चाचा डोंगर उभा राहिला होता. तिचे केस पेपर घेऊन याने सगळ्या चॅरीटेबल संस्था पालथ्या घातल्या. कुठे मदत मिळाली कुठे नाही. मनी मृत्यूशी झगडत झगडत हे जग सोडून गेली आणि मन्या हरला. ऑफिसमधल्या लोकांनी मदत म्हणून काही पैसे गोळा केले होते पण या स्वाभिमानी पठ्ठ्याने नम्रपणे ते पैसे नाकारले. 


    तो आता फक्त संकेतसाठीच जगत होता. आता तो त्याचा बाप आणि आई सुद्धा होता. मन्याला स्वयंपाकाची आवड होती. त्याच्या घरी आमच्या पार्ट्या व्हायच्या तेव्हा मन्याच स्वयंपाक करायचा. संकेतचे शिक्षण, त्याचे खाणे पिणे, गावी असलेल्या आई वडिलांना नियमितपणे पैसे पाठवणे, काही दुखलं खुपलं तर लगेच गावी जाऊन त्यांना मदत करणे. आणि मित्रांसोबत राहणे. त्याची हीच दिनचर्या सुरू राहिली. 


    मनी गेली तरी मनीच्या आई वडिलांना तो भेटत राहिला. त्यांच्याशी असलेले संबंध त्याने तसेच जपले. त्यांच्या अडीअडचणीला तो नेहमीच तत्पर धावला. 

अशात-हेने त्याची जीवनाची गाडी सुरू होती पण त्याची धडपड घरातील जेवणासकट सगळी कामं करणं. हे त्याच्या सासुबाईंना पाहवत नव्हतं. त्यांनी पुन्हा एक नवी मनी त्याच्या जीवनात आणली. आणि त्याची होणारी अबाळ थांबविली. मन्याचे दुसरें लग्न झाले. मन्याला आता चिंता होती की नवीन मनी आणि संकेत हे कसे निभावतील यांची. पण संकेत आणि नवीन आईने त्याचे हे टेंशन दूर केले त्या दोघांचे व्यवस्थित जमत होते.


    आता संकेत साॅफ्टवेअर इंजिनिअर होऊन एका मोठ्या फर्ममध्ये नोकरीस लागला होता. मोरे कुटुंब आता भाईंदर सोडून बोरीवली पूर्व येथे स्थायिक झाले होते. वडिलांच्या पायावर पाय ठेवून संकेतने एक सुंदर मुलगी पटवली व तिच्याशी लग्न केले. कालांतराने त्यांना बाळ झाले आणि मन्या आजोबा झाला. 


    लग्न झाले तरी संकेतच्या वडिलांवरच्या प्रेमात तसूभरही फरक पडला नव्हता. उलट ते वाढतच गेले. सर्व काही सुरळीत चालले असताना कथेने पुन्हा नवे वळण घेतले आणि साधे छातीत दुखतंय म्हंटल्यावर संकेतने त्याला लिलावती हाॅस्पिटलला ॲडमीट केलं. नुसता चेकिंग करायला गेलेला मन्या बायपास सर्जरी करूनच बाहेर पडला. त्याची सगळी लाईफस्टाईल चेंज झाली. खाण्या पिण्यावर बंधने आली होती. आता पैशाचा प्रश्न नव्हताच संकेत त्याच्या पाठीशी उभा होता. मन्याने सगळी पथ्ये व्यवस्थित पाळली आणि हळुहळु त्याची गाडी रूळावर आली. 


   आता मन्या रिटायर्ड झाला आहे. संकेतने त्याला ड्रायव्हिंग शिकवलं आणि लायसन्स काढायला लावलं. मन्याला त्याने नवी कोरी गाडी घेऊन दीली. मन्या आणि मनी फोरव्हिलर घेऊन गावी जाऊ लागले. असेच एकदा गाडी घेऊन जात असताना वडवली ठाणे येथे त्याच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने त्याला काही झालं नव्हतं. पण गाडीचं खूपच नुकसान झालं होतं. त्याने संकेतला फोन केला. समोरून संकेतने फक्त एकच प्रश्न केला 

"पप्पा तू कसा आहेस" 

"मी बरा आहे बेटा पण..." 

"तू बरा आहेस ना? तू तिथेच थांब मी येतो" 

त्यावेळेस संकेत अंधेरीला होता तिथून तो तडक निघाला. तो इथे येईपर्यंत मन्याची घालमेल सुरू होती. पोलीस आले त्यांच्याबरोबर मन्या पोलीस ठाण्यात गेला. त्याच्या मनात एकच प्रश्न होता. 'गाडीचं इतकं नुकसान पाहिल्यावर संकेत कसा रिॲक्ट होईल?' 


     संकेत आला त्याने पाहिलं पप्पाला खरंच काही झालेलं नाही. गाडीचं खूप नुकसान झालं होतं पण गाडीमुळे इतर कुणाचं नुकसान झालं नव्हतं. सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून तो मन्याला घरी घेऊन आला. गाडीची दुरूस्ती होणे शक्य नव्हतं. हे कळल्यावर मन्या हडबडला. कधी कुणालाही न दुखवणारा मन्या आपल्या मुलाला किती त्रास होईल याचा विचार करून दुःखी झाला होता. संकेतने हे कदाचित जाणलं असावं. एकदिवस संकेत ऑफिसला गेला असताना त्याने मन्याला एक 'मॅसेज' पाठवला तो वाचताच मन्या ढसाढसा रडायला लागला.....


  काल एका मित्राच्या मुलाच्या लग्ना निमित्ताने आम्ही सगळे जुने रिटायर्ड आणि काही सेवेत असलेले मित्र मुरूड येथे एकत्र जमलो होतो. हळदी समारंभ पार पडल्या नंतर आम्ही एकत्र बसलो होतो. तिथे मन्याने तो 'मॅसेज' आम्हाला दाखवला. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात तेव्हा अश्रू तरळले होते. काही मिनीटां पूर्वीच मी आजकाल "मुलांपेक्षा मुलीच झालेल्या ब-या" हे विधान केलं होतं. त्या मॅसेजने माझ्या विधानाला चपराक मारली होती....तो मॅसेज होता..

"पप्पा मी तुला दहा गाड्यांचे फोटो पाठवले आहेत तुला कोणती गाडी हवी ते सांग..." 

सोबत दहा लेटेस्ट माॅडेलच्या गाड्यांचे फोटो होते....

"मी देवाला प्रार्थना करतो देवा सगळ्यांना संकेत सारखा पुत्र दे" मन्याच्या या वाक्याने महफिलीची सुंदर भैरवी झाली.

मन्या आणि संकेत तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो ही आई भद्रकाली चरणीं प्रार्थना


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational