पप्पा
पप्पा
माझे पप्पा, "मधुकर बाळकृष्ण कांबळी" मी दहा वर्षांचा असताना ते स्वर्गवासी झाले. ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सर्विसला होते. मला त्यांचा फारच थोडा सहवास लाभला पण चाळीतील लोक जेव्हा मला मधु कांबळ्याचा मुलगा म्हणायचे तेव्हा असं वाटायचं की माझे पप्पा फेमस होते. त्यांचा एक पिण्याचा दोष सोडला तर ते नंबर वन होते.
मला एक किस्सा आठवतोय मी खाली मुलांसोबत गोट्या खेळत होतो. पप्पा वर आहेत हे मला माहित नव्हतं. माझ्या तोंडातून चुकुन अपशब्द बाहेर पडले. पप्पांनी वरून हाक मारली. "दीपक वर ये" मी घाबरत वर आलो.
"काय म्हणालास?" मी खाली मान घालून उभा राहिलो. पप्पांनी सणकन एक कानाखाली वाजवली. त्या दिवसापासून माझ्या तोंडातून कधी अपशब्द बाहेर पडला तर मला ही गोष्ट आठवते.
कुणीतरी म्हणायचे ते दिसायला सुंदर होते. त्यांना चित्रपटात काम करण्यासाठीही विचारले होते. मग मला वाटायचं अरे आपण त्यांच्या सारखे का झालो नाही. डाॅ. काशिनाथ घाणेकर त्यांचे मित्र होते. ते एकत्र सोनापुरलेन मधील ऑंटीकडे दारू प्यायचे. लहानपणी ते मलाही तेथे घेऊन जायचे, पण मला ते काय प्यायचे याची कल्पना नसायची, पण मला एक वेगळी ट्रीटमेंट मिळायची की मी मधु कांबळीचा मुलगा आहे.
माझ्या वडिलांचा आवाज खूप छान होता. ते गाणं खुप छान म्हणायचे. मी त्यांचे ऐकलेली गाणी म्हणजे "सवेरेवाली गाडीसे चले जाएंगे" आणि "बस्ती बस्ती परबत परबत गाता जाए बंजारा लेकर दिल का इकतारा" कदाचित गाणं माझ्या अंगात त्यांच्यामुळेच आले असावे. लहानपणी ते मला घेऊन बाहेर पडायचे. कधी खोताची वाडी, कधी सोनापुरलेन, मला त्यावेळेस त्या जागा निषिद्ध आहेत याची कल्पना नव्हती.
त्यांच्यामुळे कधी कधी मला अपमानही सहन करावा लागला आहे. माझी मोठी आत्या पाटकरांकडे दिली आहे. त्यांची तेव्हा परिस्थिती चांगली होती. आमची आत्या म्हणजे पप्पांची आत्या कधी कधी यांना कंटाळून डोंबिवलीला जायची. एकदा त्यांनी मला मोठी आत्या, म्हणजे पाटकरांकडे पाठवले आणि पैसे मागयला सांगितले. मी तिथे गेलो आणि पप्पांचा निरोप सांगितला. तिने पैसे तर दिले नाहीच पण मला खूप सुनावले. मला म्हणाली
"त्याला विष देऊन मारून टाका" मी हे ऐकून सुन्न झालो आणि रडत खाली आलो, आणि पप्पांना हे सांगितले. पप्पांनी मला जवळ घेतले आणि म्हणाले
"बेटा आपली वेळ वाईट आहे, पण तू हे लक्षात ठेव तुझी काही चूक नव्हती, माझ्यामुळे तुला हे ऐकायला लागले, पण एकवेळ अशी येईल की तुला उत्तर द्यायची संधी मिळेल, बेटा वक्त सबका आता है"
हे पप्पांच वाक्य खरं ठरलं. जेव्हा त्याच आतेचा मुलगा व्यसनी, जुगारी झाला आणि त्याने खूप कर्ज करून ठेवले होते. कर्ज देणारी माणसे घरी यायला लागली. तेव्हा मी प्रोहिबीशन ॲंड एक्साईज या विभागात क्लार्क म्हणून नोकरीला लागलो होतो. माझ्या आतेने मला घरी बोलावले. तेव्हा ती माझ्याशी खूप गोड बोलत होती. मला खायला प्यायला दिले आणि मग विषय काढला की "तू सोसायटीमधून विस हजार कर्ज काढ, मी तुला दर महिन्याला पैसे देईन" मी बघतो म्हणालो आणि तिथून निघून आलो. त्यावेळेस मला पप्पांचे शब्द आठवले की "तुला उत्तर द्यायची संधी मिळेल"
मी माझ्या काकांना विचारल्या शिवाय काहीच करत नव्हतो. त्यावेळेस पप्पा नसल्यामुळे काकाच मला वडिला समान होते. ते म्हणाले
"एकही पैसा द्यायचा नाही" मी आमच्या आते सोबत निरोप पाठवला "माझ्या पप्पांना विष द्या म्हणाली होती ना, आता तू तुझ्या मुलाला विष दे"
माझ्या पप्पांचे माझ्यावर खूप प्रेम होते. ते लिवरच्या आजाराने घाटकोपर येथील सर्वोदय हाॅस्पिटलला एडमीट होते. तेव्हा मला कुणी हाॅस्पिटलला नेत नव्हते. त्यांनी औषधांच्या बाॅक्सची आणि इंजेक्शनच्या बाटलीची गाडी बनवून आत्तेकडे पाठविली होती. तेव्हा ते बरे होऊन आले होते. ते काही दिवस घरात शांततेचे आणि आनंदाचे होते पण नियतीचा ते मान्य नव्हते. पुन्हा त्यांनी प्यायला सुरुवात केली आणि घरात क्लेश भांडणे सुरू झाली. हे वातावरण पाहता काका मला डोंबिवलीला घेऊन आले.
एकदा सकाळी डोंबिवलीत मी शाळेत जात असताना बाळ डोंगरे मला रस्त्यात भेटले. ते म्हणाले "कुठे चाललास?'
मी म्हणालो "शाळेत" तर ते म्हणाले "आज शाळेत जाऊ नकोस, आपल्याला गिरगावात जायचे आहे" घरी जायचे म्हणून मी खुश झालो.
मी त्यांना घरी घेऊन आलो. त्यावेळी काका ऑफिसच्या कामासाठी औरंगाबाद येथे गेले होते. मी आणि काकी आम्ही गिरगावात आलों. पाहिले तर दारात गर्दी होती. पप्पांना खाली झोपवले होते. सगळे रडत होते मला काहीच कळत नव्हते. माझी लहान बहीण सुचिता आणि जेमतेम एक वर्षाचा भाऊ मनोज हे शेजारच्या घरात होते. काहीतरी दुर्दैवी घटना घडली आहे इतकेच मला कळत होते. वडिलांना उचलून खाली नेले आईची नजर शुन्यात होती.
आईला पाहून मला रडायला आले मी तिला पाहून मिठी मारून खूप रडलो. मला माईने ओढून जवळ घेतले. मला खाली नेले आणि...
"पप्पांना शेवटचे पहा ते आता पुन्हा दिसणार नाही" असे माईने सांगितले. मी पप्पांकडे पाहिले त्यांना टोपी घातली होती. तुळसी माळा आणि फुलांनी सजवले होते. माझ्या पप्पांना एवढे शांत मी कधीच बघितले नव्हते. थोड्या वेळाने त्यांना उचलून नेले
"जयराम श्रीराम जयराम श्रीराम" असे लोक म्हणत होते. अजूनही माझ्या कानात ते आवाज गुंजत आहेत...
