आगगाडीशी जडले नाते
आगगाडीशी जडले नाते
मित्रहो, माझे गाव बदनापूर. आता जालना जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असले तरी पन्नास साठ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील आणि जालना तालुक्यातील एक छोटे खेडे होते. मी बदनापूरच्या शाळेमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेत असतांना आम्हाला बहुदा भूगोलाच्या पुस्तकात एक धडा होता. त्यात बदनापूर हे कृषी संशोधन केंद्र असलेले महत्त्वाचे गाव असल्याचा उल्लेख होता. तसेच जालना हे मोठे व्यापारी शहर असल्याचाही उल्लेख होता.
बदनापूर आणि जालन्यामध्ये केवळ एकोणीस किलोमीटरचे अंतर. जणू घर अंगणच. मी मार्च १९६६ मध्ये बदनापूरच्या जि. प. प्रशालेतून पहिल्या श्रेणीत एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्यावर जालन्याच्या जे. ई. एस महाविद्यालयात P.U.C. Science ला प्रवेश घेतला आणि माझा आणि आगगाडीचा संबंध सुरु झाला. पी. यु. सी. पासून बी एस्सी {स्पेशल फिजिक्स } ची पदवी मिळेपर्यंत सलग चार वर्षे बदनापूर ते जालना नियमितपणे रेल्वेने जाणे येणे केले. सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी बदनापूरच्या स्टेशनवर येण्याची पॅसेंजर ट्रेनची वेळ असे. बहुदा ती वेळेवरच येत असे. तसेच सायंकाळी ५.२०ला जालन्याहून परतीची गाडी {पूर्णा ते मनमाड पॅसेंजर} होती. तीसुद्धा वेळेवरच येत असे. त्या चार वर्षांच्या काळातील रेल्वेविषयीच्या अनेक आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या आहेत. त्यातल्या फक्त दोन आठवणी इथे सांगतो.
बदनापूर ते जालना विद्यार्थ्यांसाठीचा सवलतीच्या दरातील मासिक पास चार रुपये तर त्रैमासिक पास दहा रुपये होता. त्यासंबंधीच्या प्रमाणपत्रांचे पुस्तक दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयाकडूनकॉलेजला येत असे. कॉलेजकडून प्रमाणपत्र घेऊन रेल्वे स्टेशनवर दिले की सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असे. बहुतेक मी बी.एस्सी प्रथम वर्षाला असतांना रेल्वेने भाडेवाढ केली होती. ती बातमी त्या काळातील 'अजिंठा' आणि 'मराठवाडा' या लोकप्रिय असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीत स्पष्ट लिहिलेले होते की, रेल्वेची भाडेवाढ झालेली असली तरी विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. परन्तु नंतरच्या आठवड्यात माझा पास संपला म्हणून मी कॉलेजमधून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवर आलो आणि तिकीट खिडकीपाशी जाऊन दहा रुपये आणि कॉलेजचे प्रमाणपत्र देऊन त्रैमासिक पास मागितला तर तिथल्या बुकिंग क्लार्कने बारा रुपये मागितले. मी म्हटलं, बारा रुपये कसे? दहा बरोबर आहेत. तर तो म्हणाला,"पेपर पढते नही क्या? अभी रेल्वे फेअर बढ गया है." मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, विद्यार्थ्यांच्या कन्सेशनमध्ये फरक पडलेला नाही. तरी तो ऐकेना. शेवटी अनिच्छेने मी बारा रुपये देऊन पास घेतला. पण मन बेचैन होते. बदनापूरला आल्यावर लगेच "वाचकाचे मनोगत" या सदरासाठी अजिंठा या वर्तमानपत्राला पत्र लिहिले. त्यात रेल्वेच्या भाडेवाढीसंबंधी मागच्या आठवड्यात आलेल्या बातमीचा उल्लेख केला. तसेच माझ्याकडून जालन्याच्या बुकिंग क्लार्कने दोन रुपये जास्त घेतल्याचाही उल्लेख केला आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत नेऊन टाकले.
दोन दिवसांनी रविवार होता. त्या रविवारी माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयास
पत्र लिहून वस्तुस्थिती कथन केली आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत टाकले.आश्चर्य म्हणजे 'दैनिक अजिंठा या वर्तमानपत्रास पाठवलेले माझे पत्र तीन चार दिवसांनी अजिंठा पेपरमध्ये छापून आले. विशेष म्हणजे माझ्या पत्राखाली संपादकांनी टीप लिहून स्पष्ट केले की, "विद्यार्थ्यांच्या पासच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही, याची आम्ही औरंगाबादच्या स्टेशनमास्तरकडून पुष्टी करून घेतली." मला ते माझे प्रसिद्ध झालेले पत्र वाचून खूप आनंद झाला.
पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे, दोन दिवसांनी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे पत्र 'अजिंठा'मध्ये त्याच कॉलममध्ये प्रसिद्ध झाले. त्या पत्राचा आशय असा. "गैरसमजुतीतून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवरील क्लार्कने दोन रुपये जास्त घेतलेले आहेत. तरी संबंधित विद्यार्थ्याने स्टेशनवर जाऊन दोन रुपये परत घ्यावेत."
मग मी तो पेपर दाखवून जालन्याच्या स्टेशनवरच्या बुकिंग क्लार्ककडून दोन रुपये परत घेतले. त्यानेही दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या आठवड्यात "रेल निलायम सिकंदराबाद"कडून माझ्या बदनापूरच्या पत्त्यावर तशाच आशयाचे इंग्रजी पत्र आले, तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना. आज दोन रुपयांचे इतके महत्त्व वाटत नसले तरी पंचावन्न वर्षांपूर्वी त्या दोन रुपयांचे काय महत्त्व असेल हे आपण समजू शकतो.
रेल्वेसंबंधीची दुसरी आठवण म्हणजे, एक दिवस कॉलेजमध्ये जास्त वेळ थांबावे लागल्यामुळे सायंकाळी सहा वाजता जालना स्टेशनवर आलो. ५.२० ची गाडी अर्थातच गेलेली होती. आता यानंतरची पॅसेंजर ट्रेन रात्री साडेआठ वाजता होती. ती काचीगुड्याहून यायची. पण तिचा लौकिक असा होता की, ती नेहमी दोन तासांपेक्षा जास्त लेट असायची. त्या दिवशी ती तीन तास लेट होती. म्हणजे गाडी रात्री साडेअकरा वाजता येण्याची शक्यता होती. मी स्टेशनवर तिकीट खिडकीच्या समोर बाकावर बसून राहिलो. पोटात काही नव्हते. रात्री नऊ वाजेनंतर झोप येऊ लागली. कारण रोज सकाळी जालन्याला येण्यासाठी पाच वाजताच उठावे लागे. {आई मात्र डबा तयार करून देण्यासाठी चार वाजताच उठायची.}
एव्हाना स्टेशनवरची गर्दी बरीच कमी झाली होती. कारण त्यादरम्यान कुठलीच गाडी येणार नव्हती. मी मनात विचार केला, "आपली गाडी साडेअकरा वाजता येईल. तोपर्यंत थोडी झोप होईल."
म्हणून मी तिथेच बाकावर आडवा झालो. जेव्हा जाग आली तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. पोटात धस्स झाले. आई घरी वाट पहात असेल या विचाराने आणखी त्रस्त झालो. आता काय करायचे? हा विचार करीत असतांना लक्षात आले की, स्टेशनजवळच अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर बस डेपो आहे. तिथून पहाटे साडेपाच वाजता जालना ते मालेगाव बस निघते. मी पटकन तिथे चालत गेलो. तर बस उभीच होती. पण निघायला वेळ असल्यामुळे ड्रायव्हर, कंडक्टर कुणीच नव्हते. दोन तीन लोक बसमध्ये बसलेले होते. मीसुद्धा आत जाऊन बसलो. कंडक्टर आल्यावर तिकिटाचा सव्वा रुपया देऊन बदनापूरचे तिकीट घेतले. थोड्या वेळेत बस सुटली आणि बदनापूरला सकाळी सहा वाजता पोचलो. आई नेहमीप्रमाणे चार वाजता उठलेली होती आणि माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मला बघताच आईने आधी माझ्या तोंडावरून मायेने हात फिरवला आणि नंतर विचारपूस केली.