Uddhav Bhaiwal

Inspirational

2.5  

Uddhav Bhaiwal

Inspirational

मळभ दूर झाले

मळभ दूर झाले

11 mins
2.4K


आज सकाळपासून गोविंदराव अस्वस्थ होते. घरामध्ये इकडून तिकडे अन् तिकडून इकडे सारख्या फेऱ्या मारीत होते. त्यांची ही अस्वस्थता शालिनीबाईंच्या नजरेतून काही सुटली नाही. कारण, काही तरी मोठे कारण घडल्याशिवाय ते असे अस्वस्थ होणार नाहीत याची शालिनीबाईंना पक्की खात्री होती. मागील जवळजवळ पस्तीस वर्षांच्या संसारामध्ये गोविन्दरावांचा धीरोदात्त स्वभाव, कुठल्याही प्रसंगी पटकन निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि समोर आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देण्याची त्यांची वृत्ती शालीनीबाईंना ठावूक होती. त्याचप्रमाणे त्यांना गोविंदरावांची आणखी एक गोष्ट माहित होती. ती म्हणजे मनामध्ये कितीही खळबळ असली तरी ती खळबळ गोविंदरावांच्या चेहऱ्यावर कधीही दिसत नसे. मग आजच असे काय घडले होते? शालीनीबाईंनी खोदून, खोदून विचारण्याचा बराच प्रयत्न केला पण त्यांचा तो प्रयत्न व्यर्थ गेला. विचार करता करता शालीनीबाईंच्या लक्षात एक गोष्ट आली. सकाळी नाश्ता झाल्यानंतर गोविंदरावांनी चहा करायला सांगितला आणि त्या दरम्यान त्यांना त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन आल्याबरोबर ते किचनमधून समोरच्या हॉलमध्ये आले आणि त्यांनी मोबाईलवर बोलायला सुरुवात केली. बोलत बोलत ते समोरच्या अंगणात आले आणि अंगणातील झोपाळ्यावर बसून फोनवर बोलू लागले. ते काय बोलत होते किंवा कुणाशी बोलत होते हे काही शालिनीबाईंना समजले नाही. कारण त्या किचनमध्ये चहाची तयारी करीत होत्या. दोन कपांमध्ये चहा ओतला आणि दोन्ही कप घेऊन त्या समोर अंगणात आल्या. त्यातील एक कप समोर अंगणात झोपाळ्यावर बसलेल्या गोविंदरावांच्या हातात दिला आणि दुसरा कप स्वत:साठी ठेवत त्यासुद्धा झोपाळ्यावर बसल्या. तोपर्यंत गोविन्दरावांचे फोनवरचे बोलणे संपले होते. पण चेहरा एकदम त्रस्त दिसत होता. हातात आलेला चहाचा कप पटकन तोंडाला लावून अक्षरशः त्यांनी एका घोटात चहा संपवला. शालीनीबाईंना त्यांची अस्वस्थता जाणवली. त्यांनी चहा पीत पीत गोविंदरावांना विचारले, "कुणाचा होता फोन?"

"असाच होता." गोविंदराव म्हणाले.

"कशासाठी होता?" शालीनीबाई विचारत्या झाल्या.

"काही महत्त्वाचा नव्हता. तू नकोस टेन्शन घेऊ. जा आता."

गोविन्दरावांचे हे बोल ऐकून शालीनीबाई क्षणभर विचारात पडल्या आणि चहाचे कप घेऊन घरामध्ये निघून गेल्या. गोविंदरावही थोड्या वेळेनंतर हॉलमध्ये आले आणि इकडून तिकडे फेऱ्या मारू लागले. शालीनीबाई हॉलमध्ये येऊन त्यांची ही अस्वस्थता बघून काही न बोलताच पुन्हा आपल्या कामाला लागल्या.

दरम्यान गोविंदराव "जरा बाहेर जाऊन येतो" असे किचनकडे पाहून म्हणत कपडे बदलून आणि पायात चप्पल सरकवून बाहेर पडले.

कामातून थोडी उसंत मिळताच शालीनीबाई समोर हॉलमध्ये येऊन सोफ्यावर टेकल्या आणि पेपर चाळू लागल्या. पण का कोण जाणे वर्तमानपत्रात आज त्यांचे मन लागेना. गोविंदरावांची मघाची अस्वस्थता सारखी त्यांच्या नजरेसमोर येत होती. म्हणून त्यांनी हातातील वर्तमानपत्र बाजूला टीपॉयवर ठेवून दिले आणि डोळे मिटून त्या तश्याच बसून राहिल्या. मिटलेल्या डोळ्यांपुढे भूतकाळातील अनेक घटना समोर येऊ लागल्या…..

नागपूरच्या रावसाहेब बासरकरांची एकुलती एक लाडकी कन्या शालिनी औरंगाबादच्या एका सरकारी खात्यात उच्च पदावर काम करणाऱ्या आणि आई वडिलांना एकुलता एक असलेल्या गोविंद नरहरराव देशमुख या तरुणाशी विवाहबद्ध होऊन साधारणत: पस्तीस वर्षांपूर्वी औरंगाबादला आली.

गोविंदचे वडील औरंगाबादच्याच एका सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापक होते, तर आई सरलाताई ही गृहिणी होती. गोविंदच्या लग्नानंतर शालिनी त्या घराशी पटकन एकरूप झाली. कडक स्वभावाचे सासरे आणि शिस्तप्रिय सासूबाई यांच्या सहवासात शालिनी अगदी तावून सुलाखून निघत होती. पुढे शालिनीला दिवस गेले आणि घरामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शालिनीच्या सासूबाईंनी शालिनीला काय हवे, नको ते अगदी मनापासून बघितले. वास्तविक पहिले बाळंतपण माहेरी करण्याचा रिवाज असतो. पण शालिनीच्या सासूबाईंनी आपल्या पतीचा विचार घेऊन शालिनीच्या आई वडिलांना फोन करून कळवून टाकले की, शालिनीचे बाळंतपण इथेच होणार. शालीनीचे वडील जेव्हा 'रितीरिवाजानुसार बाळंतपण नागपूरला करू' असे म्हणू लागले तेव्हा शालिनीच्या सासूबाई म्हणाल्या,

"अहो, मला लेक असती तर नसते का मी तिचे बाळंतपण इथे केले? माझी हौस आहे. मी शालिनीचे बाळंतपण इथेच करणार. मला मुलगी नाही. शालिनीला जर मुलगी झाली तर आम्हाला खूप आनंद होईल. पण परमेश्वर जो कौल देईल, तो आम्ही आनंदाने मान्य करू." त्यांच्या आग्रहाला अर्थातच शालिनीच्या आईवडिलांनी मान दिला आणि शालिनीचे बाळंतपण औरंगाबादलाच करण्याचे ठरले.

दरम्यान, शालिनीचे आईवडील औरंगाबादला येऊन दोन दिवस राहून गेले. त्यामुळे शालिनीलाही खूप छान वाटले.

शालिनीचे बाळंतपण ठरल्याप्रमाणे औरंगाबादलाच झाले. शालिनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सारे घर आनंदाने न्हाऊन निघाले. शालिनीच्या सासूबाई म्हणाल्या, "आपण याचे नाव बाळकृष्ण ठेवू." बाळकृष्ण हे नाव सर्वांनाच आवडले आणि बाळाचे बारसे थाटात झाले.

बाळकृष्णच्या बाळ लीलांनी सर्वांना मोहवून टाकले. बाळकृष्ण जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे, त्याच्या ममी पपांना आणि आजी आजोबांना त्याचे खूपच कौतुक वाटू लागले. त्याचे दुडूदुडू चालणे, त्याचे बोबडे बोलणे, याचे सर्वांनाच अप्रूप वाटू लागले. ममी, पपा आणि आजी, आजोबांच्या सहवासात बाळकृष्ण मोठा होत होता.

बाळकृष्णचे शालेय जीवन, त्याचे महाविद्यालयीन जीवन, त्याचे इंजिनिअरिंगच्या परीक्षेतील घवघवीत यश, ह्या साऱ्या घटना एखाद्या चित्रपटाप्रमाणे जसजश्या शालिनीबाईंच्या मन:चक्षूसमोरून भरभर पुढे सरकू लागल्या, तसे शालिनीबाई यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. पण ते अगदी थोडाच वेळ. नंतर लगेच मामंजी नरहरराव यांची सेवानिवृत्ती; आणि सेवानिवृत्तीनंतर काही दिवसातच त्यांना आलेले आजारपण आणि त्या आजारपणातच मामंजींचे झालेले दु:खद निधन या घटना डोळ्यासमोर तरळल्या. मामंजींच्या जाण्यानंतरचा सासूबाईंचा उदास आणि भकास चेहरा नजरेसमोर येताच शालिनीबाईंच्या डोळ्यातून घळघळा अश्रू येऊ लागले. मामंजीच्या जाण्याने खचलेल्या सासूबाईंना या धक्क्यातून सावरायला बराच वेळ लागला. दरम्यान बाळकृष्णही एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीस लागला. बाळकृष्णला लागलेली नोकरी आणि त्यानंतर त्याचे लग्न करून टाकण्यासाठी सासूबाईंनी धरलेला हट्ट, हे सारे शालिनीबाईंना आठवले. सासूबाईंच्या हट्टापुढे त्यांना आणि त्यांच्या पतीराजांना मान तुकवावी लागली. तसेच आजीचा लग्नासाठीचा आग्रह बाळकृष्णलाही मान्य करावाच लागला आणि लवकरच बाळकृष्णचे नाशिकच्या स्नेहाशी लग्न झाले. स्नेहाचे वडील रामराव भालेकर हे एक मोठे बिझनेसमन होते. घरामध्ये नवी सून आली आणि घरात एकप्रकारचे चैतन्य आले. पण सूनबाई थोडी आढ्यताखोर आहे, हे शालिनीबाईंच्या लवकरच लक्षात आले. "असतो एखाद्याचा स्वभाव" म्हणून शालिनीबाई तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. कारण त्या खूपच सहनशील होत्या. पण कसचे काय! स्नेहा ह्या घराशी एकरूप व्हायला जणू तयारच नव्हती. थोड्याथोड्या कारणावरून त्या दोघींमध्ये खटके उडू लागले. एकदा काही कारणास्तव चकल्या करायच्या होत्या. तर स्नेहा गॅसवर कढई ठेवून चकल्या तळू लागली. तेव्हा शालिनीबाई तिला म्हणाल्या,

"अगं, गॅस खूपच मोठा झाला. थोडा कमी कर ना. मंद आचेवर चकल्या छान तळल्या जातात." तेव्हा स्नेहाने ताडकन उत्तर दिले,

" माझ्या कामात कुणी ढवळाढवळ केलेली मला चालत नाही. नाही तर मग तुम्हीच तळा या चकल्या."

अशावेळी बाळकृष्णही बायकोचीच बाजू घेत असे. या साऱ्या गोष्टी सरलाताई उघड्या डोळ्यांनी पाहत होत्या. त्यांनीही स्नेहाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण पालथ्या घड्यावर पाणी. तशातच सरलाताई आजारी पडल्या. त्या कायम अंथरुणाला खिळूनच राहू लागल्या. शालिनीने सासूबाईची मनोभावे सेवा केली. पण पिकलं पान कधी न कधी गळणारच. एके दिवशी सकाळी सरलाताई इहलोक सोडून गेल्या. सर्वांना दु:खसागरात लोटून गेल्या. हळूहळू हे दु:खही सर्वजण विसरले. काळ पुढेपुढे सरकत होता. एक दिवस गोविन्दरावांनीही प्रकृतीच्या कारणास्तव नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. तशातच घरामध्ये बाळाच्या आगमनाची चाहूल लागली आणि सर्वांचाच आनंद द्विगुणीत झाला. स्नेहाचे बाळंतपण रिवाजाप्रमाणे नाशिकला माहेरी झाले. स्नेहाला मुलगा झाला. शालिनीबाई आता आजी झाल्या. घरामध्ये आनंदीआनंद झाला. गोविंदराव आणि शालिनीबाई यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. तसेच त्या दोघांनी बाळकृष्णचेही अभिनंदन केले. स्नेहा माहेराहून बाळाला घेऊन आली. शालिनीबाई तर नातू घरी आल्यापासून खूपच खूश होत्या. बाळ बहुतेकवेळा त्यांच्याकडेच असायचे. खूपच गोड होते बाळ. बाळाचे बारसे थाटात करण्याचे ठरले तेव्हा तर शालिनीबाईंना काय करू आणि किती करू असे होऊन गेले. बारशाच्या दिवशी स्नेहाचे आई वडील आले. देशमुख परिवाराचे आप्तेष्टही आले. बाळाचे नाव नीरज ठेवण्यात आले. बारसे धामधुमीत पार पडले. स्नेहाचे आईवडील तसेच इतर सर्व पाहुणेमंडळी दुसऱ्या दिवशी आपापल्या गावी निघून गेली आणि पुन्हा स्नेहाच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले शालिनीबाईंच्या लक्षात आले. त्यांनी स्नेहाला बोलते करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. स्नेहाला रुसायला थोडेसेही कारण पुरत असे. स्नेहाला उशिरापर्यंत झोपून राहण्याची सवय होती. त्यामुळे सकाळी बाळ आणि ती सोबतच उठायची. म्हणून एकदा शालिनीबाई तिला शांतपणे म्हणाल्या,

" लेकरू सकाळी उठायच्या आत आपण उठून पटपट काम आवरून घ्यावं. लेकरू उठल्यावर ते काम करू देत नाही." तर स्नेहा ताडकन म्हणाली, "तुम्हाला माहित आहे का, रात्रभर नीरजने किती जागवलं ते? आणि तसंही मला माझ्या झोपेबद्दल कुणी बोललेलं अजिबात चालत नाही, हे मी याआधीही तुम्हाला सांगितलेलं आहे."

रात्री शालिनीबाईंनी गोविंदरावांकडे स्नेहाच्या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तेव्हा गोविंदराव म्हणाले, "असतो एकेकाचा स्वभाव. एवढं मनाला नकोस लावून घेऊ." तो विषय मग तिथेच संपला. पण दिवसेदिवस बाळकृष्णच्या वागण्यातही शालिनीबाई तसेच गोविंदराव यांना बदल जाणवू लागला. स्नेहा तर शालिनीबाईंचा अपमान करण्याची एकही संधी सोडीत नसे. एके दिवशी सकाळी शालिनीबाई आणि स्नेहामध्ये कशावरून तरी बाचाबाची झाली. बाळकृष्ण संध्याकाळी घरी आल्याबरोबर स्नेहाने सकाळचे सारे तिखटमीठ लावून बाळकृष्णला सांगितले. रात्रीची जेवणे होईपर्यंत बाळकृष्ण आणि स्नेहा, दोघेही गप्प गप्पच होते. जेवण आटोपल्यावर सर्वजण समोरच्या हॉलमध्ये टी. व्ही. पाहत बसलेले असतांना अचानक बाळकृष्णने रिमोट हातात घेऊन टी. व्ही. बंद केला आणि बोलण्यास सुरुवात केली. बाळकृष्ण म्हणाला, "आई, बाबा, मी औरंगाबादची ही नोकरी सोडून पुण्याला शिफ्ट होतोय. पुण्याच्या एका कंपनीमध्ये मी ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला आणि उत्तीर्णही झालो. पॅकेजही चांगले आहे. अर्थातच मला स्नेहाला आणि नीरजला तेथे नेणे भाग आहे. कारण स्नेहाही इथे बोअर झाली आहे. तिचे आणि आईचे जराही पटत नाही."

"असा अचानक तू हा निर्णय का घेतलास? आधी थोडीतरी कल्पना आम्हाला द्यायला हवी होती. आणि नीरज खूपच छोटा आहे अजून. नुकताच तर त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला आपण. तुझ्या आईलाही त्याचा खूपच लळा लागला आहे. आणि स्नेहाचे आणि आईचे पटत नाही म्हणतोस तर तू स्नेहाला कधी समजून सांगितलेस का? मी बघतो ना, नेहमी तू तिचीच बाजू घेऊन तुझ्या आईला बोलत असतोस. आणि तसेही सासू सुनेमध्ये तू दखल देतोच कशाला? " बाबा बोलले.

" तुम्ही काही म्हणा बाबा. पण पुढच्याच महिन्यात आम्ही शिफ्ट होतोय. यावर पुन्हा चर्चा नको." बाळकृष्ण म्हणाला.

"अरे, आमचा तर विचार कर. तुझ्या बाबांनी तब्येतीमुळे नोकरी सोडली अन् तुम्ही असे अचानक निघून गेलात तर आम्हाला काय वाटेल याचा विचार तरी कर. घरामध्ये भांड्याला भांडे लागतच असते." शालिनीबाई म्हणाल्या. तितक्यात स्नेहा बाळकृष्णला म्हणाली, "पुरे करा आता अन् चला झोपायला. इथे राहण्याची हौस फिटली माझी." स्नेहा असे म्हणताच बाळकृष्ण तिच्यासोबत बेडरूमकडे निघून गेला. नंतर बराच वेळ शालिनीबाई आणि गोविंदराव बोलत बसले.

"या मुलीच्या स्वभावाला काय करावे, काही कळत नाही" असे म्हणून गोविंदराव उठले. त्यांच्या मागोमाग मग शालिनीबाईही उठल्या. नंतर ते दोघेही झोपण्याच्या तयारीला लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदरावांनी बाळकृष्णला त्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याचा सल्ला दिला पण तो स्वत:च्या निर्णयावर ठाम होता. नीरज आपल्यापासून दूर जाणार म्हटल्यावर तर शालिनीबाईंना अन्न गोड लागेना.

आणि अखेर तो दिवस उगवला. सर्व सामानाची बांधाबांध झाली; तेव्हा स्नेहा शालिनीबाईंकडे पाहून म्हणाली, " मला लग्नामध्ये माहेरहून ज्या वस्तू आल्या तेवढ्याच घेऊन चाललोत आम्ही." शालिनीबाईंना तर काहीच सुचेना. छोट्या नीरजच्या तोंडावरून हात फिरवितांना तर त्यांना रडूच कोसळले. गोविंदरावांनी त्यांना कसेबसे सावरले. टेम्पोमध्ये सर्व सामान रवाना झाले. टेम्पोच्या पाठोपाठ कारने बाळकृष्ण, स्नेहा आणि छोटा नीरज, हे सारे निघाले. त्यांना निरोप द्यायला शेजारच्या पार्वतीबाई आणि विश्वंभररावही आले होते. बाळकृष्णची कार नजरेआड होताच शालीनीबाई पार्वतीबाईंच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडल्या. " तुम्हीच सांगा, आम्ही असा काय गुन्हा केला म्हणून मुलगा आणि सून आम्हाला सोडून निघून गेले?" पार्वतीबाईंनाही काय बोलावे ते कळेना. त्यांनी शालीनीबाईचे सांत्वन केले.

दिवसामागून दिवस जात होते. सुरुवातीला आठवड्यातून एखादा फोन करणारा बाळकृष्ण नंतर फोनही करेनासा झाला. त्याबद्दल गोविंदरावांनी काही विचारले तर काम खूप असते म्हणून फोन करणे होत नाही असे तो सांगायचा. शालिनीबाई कधीकधी स्नेहाला फोन लावून ख्यालीखुशाली विचारायच्या तर स्नेहा त्रोटक उत्तर देऊन फोन ठेवून द्यायची. शालीनीबाईना नीरजची खूप आठवण यायची. "आपण पुण्याला जाऊन एकदा नीरज बाळाला पाहून येऊ ना." असे त्यांनी गोविंदरावांना म्हटले तर ते म्हणायचे, " काही नको. त्यांनाच आपली किंमत नाही तर आणखी आपण तिथे जाऊन आपली किंमत कशाला कमी करायची? मी तर आता त्यांचे तोंडही पाहू इच्छित नाही. तेही आता इकडे न आले तरच चांगले."

मागील जवळ जवळ दोन वर्षांपासून बाळकृष्ण इकडे आला नाही अन् हे दोघे तिकडे गेले नाहीत.

...........अशा विचारचक्रामध्ये शालिनीबाई असतांना गोविंदराव घरामध्ये आले. शालिनीबाईंना त्यांनी हाक मारली तश्या त्या भानावर आल्या. त्यांनी गोविंदरावांकडे बघितले. गोविंदरावांच्या चेहऱ्यावरील ताण आता नाहीसा झाला होता.

"आता तरी सांगणार आहात का मला, मघाशी एवढे टेन्शनमध्ये का होतात ते?" शालिनीबाईंनी विचारले.

" हो, हो, सारे सांगतो. आधी दोन कप चहा ठेव. एक कप तुला अन् एक कप मला." गोविंदराव म्हणाले.

"स्वारी खुशीत दिसतेय" शालिनीबाई मनाशीच म्हणाल्या अन् त्यांनी चहाचे आधण ठेवले. त्यांच्या पाठोपाठच गोविन्दरावही किचनमध्ये आले आणि डायनिंग टेबलची खुर्ची ओढून त्या खुर्चीवर बसले आणि सांगू लागले.

" हे बघ शालिनी, मघाशी मी तुला जरा त्रस्त दिसलो. त्याचे कारण म्हणजे तो फोन बाळकृष्णचा होता. कधी नव्हे ते बाळकृष्णने स्वत: होऊन फोन केला आणि विशेष म्हणजे बराच वेळ माझ्याशी बोलत होता."

" असं काय बोलत होता तो, ज्यामुळे तुम्ही परेशान दिसत होतात?" शालिनीबाईनी विचारले.

" तो आणि स्नेहा हे दोघेही मागील दोन वर्षांपासून आपल्याशी संबंध तोडून टाकल्यासारखे वागले. अन् आता हा बेटा म्हणत होता की, आपल्यापासून दूर गेल्यावर स्नेहाला तिची चूक कळलीय. ती परत औरंगाबादला यायचं म्हणतेय. त्याचप्रमाणे, इथे असतांना सारासार विचार न करता तोसुद्धा उठ्ल्यापडल्या तिची बाजू घ्यायचा, याचा त्यालाही पश्चाताप झाला असे म्हणत होता. इथल्या पूर्वीच्या कंपनीशी त्याचे बोलणे झाले आहे म्हणाला. तो परत इथेच नोकरी करू इच्छितो. आपण सारे आता एकत्र आनंदाने राहू असे म्हणत होता. मला मात्र त्याचे इथे परत येण्याचे त्याने दिलेले कारण पटेना. म्हणून मी त्याला पुन्हा, पुन्हा विचारले. तेव्हा खरे कारण पुढे आले. तो म्हणत होता की, इथून गेल्यानंतर थोड्याच दिवसांनंतर बाळ वारंवार आजारी पडू लागले. डॉक्टरांनी औषध दिले की बरे वाटायचे. लहान मुलांची दुखणी असतात म्हणून त्या दोघांनीही बाळाच्या आजाराकडे दुर्लक्ष केले. आता जवळ जवळ दोन वर्षे झाली त्यांना इथून जाऊन. नीरज अधून मधून आजारीच असतो. मागच्या आठवड्यात दुसऱ्या एका डॉक्टरांना दाखविले तेव्हा त्यांनी बाळकृष्णला विचारले की, घरी कोण कोण असते. तेव्हा याने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा डॉक्टर म्हणाले की, बाळाची तब्येत छान आहे. मात्र त्याला आजी, आजोबाचा लळा लागलेला आहे. पण इतके छोटे बाळ आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. एक तर त्याच्या आजीला अन् आजोबांना इथे घेऊन या किंवा तुम्ही त्याला तिकडे घेऊन जा. आजीला पाहताच बाळ अगदी ठणठणीत बरे होते की नाही बघा."

"मग तुम्ही काय सांगितले त्याला?" शालिनीबाईंनी विचारले.

"मी त्याला माझे मत सांगितलेच नाही. जो मुलगा आणि जी सून क्षुल्लक कारणावरून घर सोडून जाते त्यांच्याविषयी मला अजिबात कळवळा वाटत नाही."

" अहो, ते स्वत: होऊन येतायत ना. मग त्यांना येऊ द्या की. त्यांना त्यांची चूक कळली हे पुष्कळ झाले. आणि नीरज बाळाला पाहून किती दिवस झाले. लेकराला केव्हा पाहीन असे झाले आहे मला." शालिनीबाई म्हणाल्या.

"तेच तर. माझा हेका मला सोडवेना. द्विधा मनस्थिती झाली होती माझी. पण वारंवार नीरजचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. तुझीही इतक्या दिवसाची घालमेल मला दिसतच होती. म्हणून माझा बालमित्र भीमराव याच्याकडे जाऊन मन मोकळे केले. भीमरावचे सुद्धा हेच मत पडले की, त्यांना आपण इथे येऊ द्यावे. भीमरावने मला बरेच पटवले. शेवटी भीमराव म्हणाला, 'सुबह का भूला शामको घर आये तो भूला नही कहलाता'. मलाही त्याचे म्हणणे पटले आणि बाळकृष्णला परत इथे येऊ द्यावे असे माझे मन म्हणू लागले. म्हणून भीमरावकडे असतांनाच मी बाळकृष्णला फोन लावला आणि "तुम्हा सर्वांचे स्वागत आहे" असे सांगितले. एखाद्या आठवड्यात येतील ते इकडे." गोविंदराव म्हणाले.

"कित्ती आनंदाची बातमी सांगितली हो तुम्ही! मी देवापुढे साखर ठेवते. माझा आनंद गगनात मावेना." शालिनीबाई म्हणाल्या.

"अगं हो, हो, किती घाई करशील! आधी तो चहा घेऊ आपण. थंड होत चाललाय. मग ठेव देवापुढे साखर." गोविंदराव म्हणाले.

"चला, इतक्या दिवसापासूनचे मळभ दूर झाले. कधी आता त्या सर्वांची भेट होतेय असे झाले आहे मला." असे म्हणून शालिनीबाई देवघराकडे जाण्यास निघाल्या आणि गोविंदरावांनीही बसल्या जागेवरून देवाला हात जोडले.


Rate this content
Log in