Prakash Patil

Horror

1  

Prakash Patil

Horror

भूतबंगला

भूतबंगला

1 min
1.6K


भूतबंगला

गावापासून दूर जंगलात एक पडकं घर होतं. मला नेहमीच जंगलातल्या पाय वाटेवरुन चालत जातांना त्या घराबद्दल भीतीयुक्त कुतूहल वाटायचं. पायवाटेच्या डावी कडे साधारण दोनशे- अडीचशे फुटांच्या अंतरावर असलेल्या त्या पडक्या घराला गावकरी "भूत बंगला" म्हणून संबोधीत असत. तिथून जातांना गर्द झाडीत असलेल्या त्या घरातून कुणीतरी आपल्याकडे पाहतेय असा भास व्हायचा, म्हणून त्या घराजवळून जातांना लोक झपा झपा चालून कसाबसा रस्ता पार करायचे. दिवसा उजेडीही त्या बंगल्यात शिरायची हिम्मत कुणी करीत नव्हते. त्या बंगल्याच्या आजूबाजूलादोन माजलेले बैल फिरायचे. त्यांच्या वाटेला कुणी जायचे नाही. कुणी त्या बैलांना अडवायचा प्रयत्न केलाच तर ते अंगावर धावून यायचे. त्यांना लोक भुतांचे बैल म्हणायचे. असे म्हणत, त्या बंगल्यात रात्री ढोलकी वाजवल्याचा आवाज यायचा, भूते नाचायाची. भूतांचा नाच पाहिलेल्या गावातील काही माणसांचे बळी गेले होते, तर काही माणसे भीतीने वेडी झाली होती. त्या बंगल्याच्या, बंगल्यातील भूतांच्या बाबतीत अनेक गोष्टी ऐकीवात होत्या. आम्ही लहानाचे मोठे झालो, तरी त्या "भूत बंगल्या" चे गूढ कायमच होते.

 

मी, समीर, नितिन, सुनील आणि प्रियांका असे पाच जण आता गावापासून २५ किलोमीटर दूर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जायला लागलो होतो. तालुक्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणारी आमची पाहिली बॅच 

असल्याने गावात आमचा सत्कार तर झालाच, शिवाय आम्हाला प्रत्येकाला ग्राम पंचायतीतर्फे सायकली देण्यांत आल्या होत्या. अजूनही आमची त्या बंगल्याचे गूढ जाणून घ्यायची जिज्ञासा तशीच होती, नव्हे जास्तच वाढतचालली होती. पण जंगलाचा तो रस्ता तालुक्याच्या विरुद्ध दिशेला होता. त्यामुळे त्या बाजूला जाणे-येणेच होत नव्हते. आमच्या पैकी प्रियांका आणि मी सायन्सचे विद्यार्थी, तर बाकीचे कॉमर्स वाले. संपूर्ण गावात अंधश्रद्धा 

भरलेली. प्रियांका आणि मी कुठल्याही घटनेला सायन्सच्या तराजूतून तोलून पाहायचो. सायन्स शाखेचे विद्यार्थी 

म्हणून इतर जण आमच्याकड़े सन्मानाने पहायचे. शिवाय कोणत्याही अंधश्रद्धेच्या घटनेच्या बाबतीत आमची मते 

जाणून घ्यायला ते नेहमी उत्सुक असायचे. समीरला बारावी कॉमर्स मधे आमच्या सर्वात चांगले गुण मिळाले होते. 

पण का कुणास ठावुक मला समीर कोणत्याही बाबतीत कधी हुशार वाटत नव्हता. मात्र जास्त गुण मिळाल्याने सगळी हुशारी आपल्यातच आहे अशा अविर्भावात तो वावरायचा. एक दिवस त्या "भूत बंगल्या"चा विषय निघाला. त्याला 

कारणही तसेच होते. रात्री भूतबंगल्याच्या बाजूने येणाऱ्या जगनला भूताने पछाडले होते. आम्ही पाच जण कॉलेजवरुनआल्यावर जगनला पाहायला गेलो. तो तापाने फणफणत चित्र विचित्र बडबडत होता. बाजुच्या गावातल्या भगताला 

बोलावले होते. तो त्याच्या जवळच्या पक्षांच्या पीसांचा झाडू जगनच्या डोक्यावर फिरवून, कुठलासा अंगारा उधळून, 

कसलासा मंत्रजप करत होता."आता बोल, प्रतिक तू म्हणतोस ना भूतं नसतात म्हणून...मग जगनची अशी अवस्था कशाने झालेय?' जगनच्या घरातून बाहेर पडता पडता समीर ने मला विचारले.

"अरे, काही नाही. तो घाबरलाय फक्त..." खांदे उडवत मी म्हणालो.

"मग भगत बरा करेल त्याला?" नितिनने प्रतिप्रश्न केला. त्याला उत्तर द्यायला प्रियांकाने तोंड उघडले.

"माणूस भूताने नाही, तर भीतीने पछाडलेला असतो. भगत म्हणजे एक प्रकारचा मानसोपचार तज्ञ आहे. बाकी काहीनाही. 

त्याची झाडाफुकी, हावभाव या मुळे भीतीने पछाडलेला माणूस मुळ पदावर येतो. कळलं?" आम्ही माना डोलावल्या. मीपूर्वी पासून प्रियांकाचा चाहता होतो. तिचे बोलणे, तिचे वागणे मला नेहमीच आवडायचे. ती हुशार आहे याचा मला मनातल्या मनात अभिमान वाटायचा. तिच्या आताच्या स्पष्टीकरणाने आजही ते सिद्ध झाल्यागत मी खुश झालो. "हो, प्रियांका बरोबर बोलतेय.." मी तिच्या बोलण्याला पृष्टि देवून मोकळाही झालो. प्रियांकाने आभारयुक्त नजरेने 

माझ्याकडे पाहिले आणि मी तृप्त तृप्त झालो. असो, प्रियांकाच्या बाबतीत मी जरा जास्तच भावुक होतो आणि मुळ 

मुद्दा बाजूला राहतो. तर त्या नंतर रस्त्याने चालता चालता मी प्रियांकाला विचारले, "तुला काय वाटते, प्रियांका.. भूत बंगल्यात खरोखर भूते असावित?"

"मला तर नाही वाटत!" समीरने पटकन बोलून टाकले. मला त्याचा तो चोंबडेपणा बिलकुल आवडला नाही. मला 

प्रियांकाच्या तोड़ून ऐकायाचे होते. मी तिच्याकडे पाहिले. तिला समजले "तिथे भूते नाहीत या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. पण तिथे काहीतरी निश्चितच आहे, जे पाहुन लोक घाबरतात आणि त्याचा संबंध भुतांबरोबर जोडतात. जो पर्यंत आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही तो पर्यंत काही सांगता 

येणार नाही. "तिने माझ्याकडे पाहिलं. जणू नजरेनंच विचारलं "झालं तुझ्या मनाचं समाधान?" मी मान डोलावली.आमच्या पाच जणांमधे सुनील आणि नितिन अंगाने मजबूत होते. सुनील नियमित व्यायाम करायचा त्यामुळे त्याचे शरीर पिळदार होते, तर नीतिनची अंगकाठी पूर्वी पासुनच धिप्पाड होती. समीर एकदम हडकुळा होता आणि मी मध्यम बांध्याचा, ना सडपाळ ना जाडा. प्रियांकाची एकदम अंगकाठी ही माझ्याशी मिळती जूळती, माझ्याहून किंचितसी कमी. मात्र तिची सुडौल शरीर रचना खूपच आकर्षक होती. तिच्या प्रत्येक हालचाली नजरेत भरून घ्याव्याशा वाटत. असो, मी पुन्हा मूळ विषयावर येतो.  मी सुनील कडे पहात विचारले,

 "सुनील, एकदा हिम्मत करायची का, भूतबंगल्यात शिरायची?"

"तुम्ही तिघे तयार असतील तर माझी काही हरकत नाही." तो कसलाही विचार न करता लगेच म्हणाला.

"माझीही तयारी आहे!" नीतिनने त्याच्या हातात हात मिळवला. मी समीर कडे पाहिले. त्याची चलबिचल सर्वांच्या

 लक्षात आली.

"अरे, पण आपल्याला घरून परवानगी देतील का...?" आपली भीती लपवण्यासाठी काहीतरी बोलावे म्हणून त्याने 

परवानगीचे कारण पुढे सारले. "तू लेखी परवानगीच घे!" म्हणत सुनील हसला. 

"समीर, घरी विचारुन आपल्याला परवानगी मिळणार आहे का?" मी त्याला प्रश्न केला. 

"मला हे खूप थ्रिलिंग वाटते. मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे." प्रियांका उत्साहाने म्हणाली, तसा समीर वरमला.

"मी ही आहे तुमच्या बरोबर..." तो नाईलाजानेच पुटपुटला.

"पण मला वाटते, प्रियांका तू प्रत्यक्ष मोहिमेत सामिल न होता आम्हाला आमच्या योजनेत मार्गदर्शन करावे. कारण हे काम दिवसा-रात्री पाळत ठेवून करावे लागेल. शक्यतो रात्रीच जास्त काम करावे लागेल, आणि एकट्या मुलीने रात्री अपरात्री, तेही

जंगलात मुलांबरोबर असणे योग्य नाही." मी प्रियांकाला समजावले. 

"ठीक आहे, पण दिवसाच्या मोहिमेत मी असणार आहे!"

"ओके, डन!" मी तिला अंगठ्याने सम्मती दर्शवली. पुन्हा प्रियांकाच्या जवळ जात म्हणालो, "प्रियांका, आपण उद्यापासून या प्लान वर काम करायला सुरुवात करू . तू आणि मी प्लानिंग करू. प्रत्यक्ष मोहिमेत सुनील आणि नितीन पुढे असतील. मी ही त्यांच्या बरोबर असेल. समीर वर दुरून पाळत ठेवण्या सारखी जबाबदारी

असेल."

"ओह ग्रेट,प्रतिक!" अत्यानंदाने माझ्या जवळ खेटून उभी राहात ती म्हणाली, तेव्हा समीर आतल्या आत चिडल्या सारखा  झाला.

"पण मी काय म्हणतो, प्रियांका प्लानींग मध्ये मलाही इंटरेस्ट आहे." तो प्रियांकाकडे पाहात म्हणाला. प्रियांका ने 

माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. "ठीक आहे, माझी काही हरकत नाही." आता आतल्या आत चिडायची पाळी माझ्यावर आली होती. कारण समीरचा 

काही उपयॊग तर होणार नव्हता, उलट नाना शंका काढून तो आमच्या डोक्याला तापच देणार होता. पण प्रियांकाला

 त्याला उगीचच दुखवायचं नव्हतं, हे जाणून मी प्लानींग टीम मध्ये त्याच्या सामील होण्याला संमती दिली. 

 

दुसऱ्या दिवसापासूनच आम्ही कामाला लागलो. सर्वात आधी मी कॉलेज जवळच्या सायबर कॅफेत जाऊन गुगल मॅप वर भूतबंगला व आजूबाजूची जागा झूम करून पाहिली. मॅप चे प्रिंटआउट्स काढले. आम्ही तिघे जण गावाबाहेरच्या 

पारावरच्या कोब्यावर नकाशा पसरवून बसलो. बंगल्याला असलेले मोडकेतुडके दगडाच्या बांधकामाचे कंपाउंड

 नकाशात स्पष्ट दिसत होते. ती साधारण एक एकर जागा असावी. कम्पाउंडच्या आत व बाहेरच्या बाजूला मोठ मोठी झाडे-झुडपे दिसत होती. कंपाउंडला मोठे लोखंडी गेट होते. रस्त्याला समांतर बंगल्याची पुढची-मागची बाजू होती. बंगल्याच्या पुढच्या बाज़ुकडे मुख्य रस्त्यापासून छोटी पाय वाट गेटपर्यंत आडवी गेली होती. पण मागच्या बाजूला मुख्य रस्त्यापासून जायची सोय नव्हती. उलट त्या बाजूला असलेली झाडेझुडपे जास्तच दाट होती."काय वाटतं, प्रियांका?" नकाशा निरखतच मी विचारलं.

नेहमीच्या सवयी प्रमाणे आगाऊ पणा करत समीर ने मधे तोंड खुपसलं,

"किती भयानक वाटतेय...या गेट मधून आत गेलेला माणूस एकतर वेडा होऊन तरी बाहेर पडलाय, किंवा कायमचा

 बेपत्ता झालाय..."

"म्हणूनच आपण गेटने आत नाही जायचं.." प्रियांका पटकन बोलली.

"आपण मागच्या बाजूने आत शिरायचं!" तोच धागा पकडून मी म्हणालो.

"मग आपल्याला मागची झाडे-झुडपे कापायला मजूर लावायला लागतील..." पुन्हा समीर ने त्याची अक्कल पाजळली. त्याच्या कानाखाली जोरात 

टपरी मारण्याचा विचार आला.

"तुला काही कॉमन सेन्स आहे का!" त्याच्यावर डाफरत प्रियांका म्हणाली, "झाडे कापायला लावून आतल्या लोकांना सावध करायचे आहे का?"

"पण आत लोक आहेत की भूते...कुणास ठावुक! कशासाठी, आणि कुणासाठी आपण जीवावरची इतकी रिस्क घ्यायची, प्रियांका?" समीर चे नकारात्मक बोलणे अपेक्षेनुसार होते.

"समीर, तुला नसेल जमत तर सोड! आमचा निर्धार पक्का आहे!" मी जरा कड़क अवाजात बोललो. प्रियांकानेही त्याच्याकडे वैतागल्या सारखे पाहिले, तसा तो चपापला. त्यानंतर मी साहित्याची यादी बनवायला बसलो. प्रियांका मला 

एकेक वस्तू आठवून आठवून सांगत होती. काळे कोट, दंडुके,टॉर्च,मिरची पावडर, रस्सी, सूरे, नकली पिस्तूल, पाणी, 

नाश्ता अशी यादी तयार झाली. "पण काळे कोट कशाला? डिटेक्टिव सारखे दिसायला?" समीर ने शंका काढली. 

"अरे, रात्री काळे कोट घातल्यामुळे आपण काळोखात सहजासहजी शत्रुच्या नजरेस पडणार नाहीत..." प्रियांकाने त्याच्या शंकेचं निरसन केले. मी व प्रियांकाने कलेंडरच्या तारखांवर सर्कल करून टेहळणी व प्रत्यक्ष आत जायच्या दिवसाचे मार्किंग केले.तीन दिवस टेहळणी करायची, त्यानंतर संशयास्पद काही आढळले तर टेहळणी अजून दोन दिवस वाढवायची, आणित्यानंतर पाचव्या दिवशी दिवसा आत शिरायचे, आणि त्यानंतर दोन दिवसांनी रात्री आत शिरायचे असा कार्यक्रम ठरला. 

 

एकदाचा मोहिमेचा दिवस उजाडला. पहिले दोन दिवस मी एका ऊंच झाडावर चढून बसलो, पलिकडच्या बाजूला समीर एका झुडुपाआड लपून राहिला. त्याच्या बाजुच्या झुडुपाआड प्रियांका लपून बसली. दुपारपर्यंत कुठलीही संशयास्पद हालचाल दिसली नाही. आम्ही अर्ध्यातासाकरिता रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली एकत्र जमलो. जेवण आटोपले व पुन्हा आपापल्या जागेवर जावून बसलो. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काही दिसले नाही. पुन्हा एकदा आम्ही त्या झाडाखाली जमलो आणि तिथुनच घरी परतलो. 

 

दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि चक्रावून गेलो. ज्या झाडावर मी चढून बसलो होतो, ते झाड व ज्या झुडुपा आड प्रियांका व समीर लपून बसले होते, ती झुडुपे जळून गेली होती. अजून निखारे धुमसतच होते. आताकाय करायचे अशा विचारात असतानाच बंगल्याच्या आतून झुडुपा मागून  काहीतरी सळसळत आले. तो तीक्ष्ण लाकडी बाण होता. तो बाण बरोबर माझ्या मानेचा वेध घेत आला होता. मी झटकन मान बाजूला वळवली नसती, तर माझा खेळ खलास 

होता. बाण जिथून आले त्या दिशेकडे आम्ही पाहात असतानाच पुन्हा एकाचवेळी असंख्य बाण आमच्या दिशेने सुटलेले पाहिले. बाण चुकवत आम्ही पळ काढला. सायकलच्या दिशेने सुसाट धावत सुटलो. पण पाठून पुन्हा काही बाण सुटले आणि त्यातला एक बाण समीरच्या हाताच्या मागच्या बाजुला लागून खाली पडला. मी त्याला ओढतच माझ्या सायकलवर पुढे बसवले आणि पायडल मारायला सुरुवात केली. बाणांच्या पल्ल्यापासुन दूर पोहोचल्यावर एका ओढयाजवळ सायकल थांबवली. समीरच्या हाताला रक्ताची धार लागली होती. माझ्याखिशातून रुमाल काढून मी त्याच्या हाताला बांधत असतानाच समीर माझ्या अंगावर लवंडला. त्याची शुद्ध हरपली. गाव अजून पाच किलोमीटर दूर होते. मी आणि प्रियांका रडकुंडीला आलो. कसाबसा समीरला सायकल वर टाकून

 मीसायकल ओढत पायी निघालो. माझ्या बरोबर प्रियांका ही हळू हळू तिची सायकल चालवीत निघाली. तोच पाठून 

घड़घड़ आवाज येऊ लागला. त्या पाठोपाठ घुंघरांचा आवाज यायला लागला. मी चालण्याचा वेग वाढवला. तो आवाज जवळ जवळ येऊ लागला. आवाज अगदी जवळ येऊन ठेपला तेव्हा मी भीतभीतच मागे पाहिले. मी एक दीर्घ सुस्कारा सोडला. तो आवाज बैलगाडीचा होता. बैलगाड़ी जवळ आली तेव्हा मी बैलगाड़ी हाकणाऱ्याला विनंती केली. "काका, आम्हाला जरा गावापर्यंत सोडा ना!" गाडी थांबवून तो खाली उतरल"आरंर! काय झालया याला?" समीरकडे पाहात त्याने प्रश्न केला. 

"बेशुद्ध पडलाय... जरा मदत करा ना!" म्हणत मी काकाच्या मदतीने समीरला उचलून बैलगाडीत ठेवले. माझी सायकलही बैलगाडीत ठेवली. बैलगाड़ी सुरु झाली. प्रियांका बैलगाडी सोबत सायकल चालवीत राहिली. एकदाचे आम्ही सरकारी दवाखान्यात पोहोचलो.दवाखान्यात गेल्याच महिन्यात रुजू झालेली डॉक्टर स्मिता प्रियांकाच्या मैत्रिणीची बहीण होती. आमच्या चांगल्या ओळखीची होती. तिने पटापट उपचार सुरु केले. तो पर्यंत प्रियांकाने सायकलवरुन समीरच्या घरी निरोप दिला होता.त्याची आई, भाऊ घाई घाईत दवाखान्यात पोहोचले. काही वेळाने मी व प्रियांका डॉक्टर स्मिताच्या केबिन मधे शिरलो.

"पोईझनिंग झाले आहे, मी AntiDote इंजेक्शन दिले आहे. सलाईन लावली आहे. ही इज आउट ऑफ डेंजर नाऊ!" स्मिता आत्मविश्वासाने म्हणाली. आम्हाला हायसे वाटले. 

"पण..." डॉक्टर स्मिताच्या या एका शब्दाने आम्ही काळजीत पडलो. ती पुढे काय बोलते ते ऐकण्यासाठी आम्ही तिच्या तोंडाकडे प्रश्नार्थक नजरेने पहात राहिलो. "तो खूप घाबरलेला आहे. शुद्धीवर आल्यावर त्याचा प्रतिसाद कसा येतो ते पाहायला हवे!"

थोड्या वेळानंतर आमच्या घरची मंडळीही दवाखान्यात पोहोचली. 

आम्ही भूतबंगल्याजवळ गेलो होतो, हे समजल्याने त्यांनी आम्हाला दवाखान्यातच धारेवर धरले. डॉक्टर स्मिताने 

मध्यस्थी केली म्हणून वातावरण थोडे नरम झाले.

संध्याकाळी समीर शुद्धीवर आला. पण तो काही बाही बडबड़ू लागला. स्मिताचा अंदाज बरोबर होता. तो खूप घाबरलेला होता, म्हणून असे वागत होता. गावभर बातमी पसरली,समीरला भूताने पछाडल्याची! आम्ही हतबल होतो. सर्वाना 

समाजावणे निष्फळ ठरत होते. उलट जो-तो आम्हालाच दोषी ठरवत होता, भूतांच्या वाटेला का गेलात म्हणून खडसावत होता. अशावेळी माझ्या मनात एका माणसाचे नाव आले,जो आम्हाला मदत करू शकेल असे वाटत होते. ते नाव होते

 इंस्पेक्टर सतीश पाटील.... 

सतीश पाटील...साताऱ्याचा एक देखणा युवक! वय अंदाजे ३५-३६ वर्षे! त्याला मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो, तेव्हा वाटले,इतका बांधेसूद आणि देखणा तरुण चित्रपट सृष्टीतच असायला हवा होता. आमच्या आजुबाजुची आठदहा गावे मिळून एकच पोलिस ठाणे होते आणि त्या पोलिस ठाण्याचा तो प्रमुख होता. त्याची आमच्या विभागात बदली होऊन जेमतेम आठदहा दिवसच झाले होते. पण त्याची कर्तबगारी आम्ही ऐकून  होतो. कुणावर अन्याय झालेला त्याला खपत नसे. एखादी तक्रार आली तर पूर्णपणे त्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, शहानिशा करूनच तो कृती करायचा. त्यामुळे आपल्या प्रकरणात तो नक्कीच आपल्याला सहकार्य करेल असा आम्हाला विश्वास होता. उलट या प्रकरणाबाबत त्याला आधीच या बाबतीत सांगितले असते तर त्यानेच पुढाकार घेऊन या प्रकरणाचा एव्हाना छडालावला असता असे मला आता वाटू लागले. आमच्या पोलीस ठाण्यातले इतर पोलीस कर्मचारी फार उद्धट आणि भ्रष्टाचारी होते. त्यामुळे आता पोलीस स्टेशनच्या दिशेने जाताना ढोणे आणि शिंदे या दोन हवालदारांची नजर चुकवून इन्स्पेक्टर सतीशची भेट घेता आली पाहिजे असा विचार मनात येत होता. पण तसे झाले नाही. आम्ही दवाखान्यातून निघून थेट पोलीस ठाण्यात पोहोचलो तेव्हा ही जोडगोळी पोलीस ठाण्याच्या पायरीवरच तंबाखू मळतबसलेली दिसली. 

"काय काम आहे?" आम्हा दोघांना बघून हवालदार ढोणेने  वैतागूनच विचारले. 

"इन्स्पेक्टर साहेबाना भेटायचे आहे!" प्रियांका म्हणाली. 

"काय काम आहे विचारलं आम्ही! कोणाला भेटायचं आहे ते नाही विचारलं!" हवालदार शिंदेने आम्हाला दटावलं. त्यांचा उद्धटपणा पुन्हा दिसून आला. 

"आमचं त्यांच्याशीच काम आहे. " मी म्हणालो. 

"ये जास्त आगाऊ पना करू नको!" ढोणे माझ्यावर खेकसला.

त्याच वेळेला योगायोगाने इन्स्पेक्टर सतीश बाहेर आले. "काय झालं ढोणे ओरडायला!" असं म्हणत ते आमच्याजवळ आले. "अरे, तुम्ही इथे काय काम काढलं!" त्यांनी चौकशी केली. 

"साहेब, गावापासून दूर जंगलात एक भूत बंगला आहे. " प्रियांका म्हणाली. 

"भूत बंगला? बरं मग? तिथे काय भुत असतात की काय!"

"साहेब, भुतं नाहीत, पण तिथे काहीतरी गडबड आहे! आम्ही तेच शोधण्याचा प्रयत्न करतोय!" मी म्हणालो. 

"ये पोरांनोss ते तुमचं काम न्हाय! त्या भुतांच्या वाटंला जाव नका! इस्तवाशी खेळाल न आमाला कामाला लावाल!" ढोणे आमच्यावर पुन्हा ओरडला. पण बाजूला सतीश साहेब होते म्हणून त्याचा आवाज जरा कमी होता. 

"ढोणे, मी बोलतोय ना त्यांच्याशी! हं बोला नक्की काय प्रकरण आहे?"

आम्ही इन्स्पेक्टर सतीश साहेबांना सगळी हकीकत सांगितली. 

"ढोणे काय गडबड आहे ही! तुम्हाला माहित नाही काय?"

"सायेब, गाववाल्यांना कोणाला त्रास नाय त्या भुतांचा, कोणी तिकडं खोड काडायला गेल तरच कायतरी होते! मागच्या सायबांना  बी माहीत व्हतं! पण त्यांनी बी कणाडोळा केला होता, तसा तुमी बी करा! या पोरांच्या मागे कुटं लागता! इथं बदली झाल्यापासनं गावचे जमीनदार दौलतराव तुमाला सांगावा धाडतायेत, तिथं अजून गेले न्हाय तुमी! वाटल्यास त्यांचा सल्ला घ्या या बाबतीत. खूप दानशूर माणूस आहे तो!"   

"ढोणे, मला अक्कल शिकवू नका! मला कुणाला भेटायला जायची गरज नाही.... आणि मला माझ्या कामात आणि कर्त्यव्यात इतरांच्या सल्ल्याची गरज नाही! कळलं?" इन्स्पेक्टर सतीशनी ढोणेंना ठणकावलं. तो खाली मान घालूनऊभा राहिला.

"ठीक आहे! आपण उद्या सकाळी जाऊ या तिथे! तुम्ही सकाळी दहा वाजता इथे या!" इन्स्पेक्टर सतीश आम्हाला उद्धेशून म्हणाले. "थँक यु साहेब!" आम्ही आम्ही आभार मानून निघालो.. घरी आणखी कसे स्वागत होतेय या विवंचनेतच आम्ही तिथून घरी निघालो. 

 

 *** दिवसभराच्या थकव्याने प्रियांका लवकरच झोपी गेली. रात्रीचे बारा वाजून गेले होते. कसलासा आवाज आला. अर्धवट डोळे उघडून प्रियांकाने आवाजाच्या दिशेने पाहिले. खिड़कीवर कुणी थाप मारत होते. हळू हळू थाप मारल्याचा आवाज वाढू लागला तशी ती ओरडली. दरवाजा उघडून "आई आईss " ओरडत बेडरुमच्या बाहेर पडली."काय झालं?" आई सोबत तिच्याजवळ येत बाबांनी विचारलं.

"माझ्या रूमच्या खिड़की वर कुणीतरी थाप मारतेय!"बाबा,आई आणि ती बेडरूम मधे गेली. आता आवाज बंद झाला होता. बाबांनी हिम्मत करुन खिड़की उघडली. बाहेर कुणी नव्हतं. पण दुरवर हातात कंदील घेवून सफेद वस्त्रांमधे एक स्त्री पाठमोरी जातांना सर्वांनी पाहिली. बाबांनी खिड़की लावून घेतली.

"चल तू आत झोप!" बाबा प्रियांकाला म्हणाले.

"नको, ठीक आहे. मी झोपते इथेच!"

"ठीक आहे!" म्हणत बाबा आई बरोबर तिच्या खोलीतून बाहेर पडले. खोली मधील बल्ब चालू ठेवूनच प्रियांका झोपी गेली.

सकाळी दहाला दहा मिनिटे कमी असतांना मी प्रियांकाच्या घरी पोहोचलो. प्रियांका आई-वडिलांसोबत नाश्ता करत बसली होती. "प्रतीक, अरे ये न्याहरी कर!" तिच्या आईने आग्रह केला. 

"नाही काकू, मी करून आलोय.."

तिच्या वडिलांचा नाश्ता आटोपल्यावर ते मला चहाचा कप घेऊन आले. 

"प्रतीक, आज कुठे दौरा आहे तुमचा?" त्यांनी प्रश्न केला. 

"काही नाही काका, ते भुताच्या वाडयाचं प्रकरण आम्ही इन्स्पेक्टर सतीश पाटीलांच्या कानावर घातलेय. त्यांनी आज दहा वाजता बोलावलंय आम्हाला.

"अरे पण तुम्हीच ठेका घेतलाय का या गोष्टीचा? गावातले इतर सगळे जण मूग गिळून गप्पा आहेत आणि तुम्हालाच का या उठाठेवी करायची गरज आहे? तुला काय करायचं  ते कर, यापुढे प्रियांका या बाबतीत तुझ्या सोबत नसणार आहे."

"पण का काका?"

"जरा बघ तिच्याकडे.. किती घाबरलीय ती. रात्रभर नीट झोपली देखील नाही."

मी प्रियांका कडे पाहिले. खरोखरच मला तिचा चेहरा मलूल वाटला. 

"पण काल बरी होती ती, आज अचानक काय झालं तिला?"

"रात्री तिच्या खोलीची खिडकी वाजवत होते कुणीतरी.... सफेद कपड्यातली एक स्त्री आम्ही जातांना पाहिली." प्रियांकाची आई संभाषणामध्ये भाग घेत म्हणाली. "हे बघ, प्रतीक तुम्ही इन्स्पेक्टर सतीशला पाटीलना सांगितले आहे ना! त्यांनाच बघू दे काय ते! तुम्ही उगीच स्वतःचा जीव धोक्यात घालू नका!"

"पण ते आमची वाट बघत असतील...आम्ही गेलो नाही तर त्यांना वाईट वाटेल." मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो. 

"हो बाबा, मी जाते प्रतीक बरोबर... " प्रियांका म्हणाली. 

"नाही, तुम्ही दोघांनीही जायचं नाही! यापूर्वी त्या भूतबंगल्यात गेलेलं कुणीही परत आलं नाही. तुम्ही जीवाची जोखीम घेऊन जायचं नाही!" प्रियांकाचे वडील आपल्या म्हणण्यावर ठाम होते. आता काही सांगून ते ऐकणार नाहीतहे पक्के होते. मी गप्प बसलो. समोर टी पॉय वर पडलेले वर्तमान पत्र हातात घेऊन चाळू लागलो. साधारण सव्वा दहाच्या सुमारास बाहेर जीपचा हॉर्न वाजला. आम्ही बाहेर पाहिले. इन्स्पेक्टर सतीश पाटील जीपमधून बाहेर उतरत होते. ते तडक घरात आले. त्यांच्या पाठोपाठ हवालदार शिंदे आणि हवालदार ढोणे आत आले. ते काही बोलणार तोच इन्स्पेक्टर सतीश पाटील यांच्या मोबाईलची रिंग वाजली. 

"हॅलो, इन्स्पेक्टर सतीश पाटील स्पिकिंग.. "

"राम राम, इन्स्पेक्टर साहेब! दौलतराव देशमुख बोलतोय... तुम्हास्नी सांगावा धाडला व्हता, पन तुमी मोठी माणसं!तुमाला काय सवड मिळत न्हाय! म्हणलं आपणंच करावा फोन!"

"हो नमस्कार! बोला! कामाशिवाय मी कुठे जात नाही! तुमचं काही काम असेल तर चौकीवर येऊ शकता!"

"काम तसं काय न्हाय! एकदा चहा-पान्याला येऊन जा म्हणलं!"

"म्हटलं ना बिनकामाचा मी कुठे जात नाही म्हणून! काही काम निघालं तर जरूर येईन!"

"मग काम आहे असंच समजा! तुमी भूतबंगल्याच्या बाबतीत लई इंटरेस्ट घेतलाय असं समजलंय! त्याबाबतीत बोलायचं हाय!" 

"ठीक आहे, येतोय त्याच बाजूला!" असं म्हणत इन्स्पेक्टर सतीश पाटीलांनीं जळजळीत नजरेनं हवालदार ढोणेकडे पाहिलं. ढोणे गोंधळला. "ढोणे, तुम्हाला कोण चोंबडेपणा करायला सांगतं? काय गरज होती भूतबंगल्याच्या बाबतीत दौलतरावांशी बोलण्याची!"

"नाही साहेब, मी नाही काही बोललो!" ढोणे चाचरत चाचरत म्हणाला. 

"मग कसं माहीत पडलं त्यांना?" 

"साहेब, त्यांचाच फोन आला होता. नाविन PI कसे आहेत विचारत होते. बोलता बोलता विषय निघाला तेव्हा माझ्यातोंडून निघालं." हवालदार शिंदे म्हणाला.

या सगळ्या गोंधळात आपण प्रियांकाच्या घरी आहोत, हे लक्षात आल्याने इंस्पेक्टर सतीश पाटीलांनी प्रियांकाच्या वडिलांकडे पहात दिलगिरी व्यक्त केली, " माफ करा!"

"अवं तुमचं कामच आहे ते!"

"प्रतीक-प्रियांका, तुम्ही दोघेही दहा वाजून गेले तरी आले नाहीत म्हणून मीच आलो तुम्हाला घ्यायला!"

"पण बाबा पाठवित नाहीत..." प्रियांका म्हणाली.

इंस्पेक्टर सतीश पाटीलांनी प्रियांकाच्या वडिलांकडे पाहिले.

"ठीक आहे..तुम्ही सोबत आहेत, तर काही काळजी नाही! साहेब क़ाय घेणार? ,चहा, थंड वगैरे?""नको,thanks! पुन्हा कधीतरी!" म्हणत त्यांनी प्रतीक-प्रियांकाला चलण्याची खूण केली. सगळे जीपमधे बसल्या वर जीप सुरु झाली.

दौलतराव देशमुखांच्या प्रशस्त बंगल्याच्या अंगणात जीप थांबली. "या या! आमचे भाग्य, तुमचे पाय आमच्या घराला लागले!" दौलतराव स्वतः बंगल्याबाहेर स्वागत करण्यासाठी आले. सर्वांना घेऊन बंगल्यात शिरले. सोफ्यावर बसता बसता इन्स्पेक्टर सतीश पाटीलांनी सभोवताली नजर फिरवली. बंगल्याला शोभेसा हॉलही प्रशस्तच होता. हॉलमधले प्राचीन नक्षीदार सागवान लाकडाचे फर्निचर राजेशाहीथाट दर्शवित होते. हॉलच्या मध्यभागी असलेले भले मोठे झुंबर हॉलची शोभा द्विगुणित करत होते. 

"बोला! काय म्हणायचं आहे रावसाहेब, आपल्याला भूतबंगल्याच्या बाबतीत?" इन्स्पेक्टर सतीशनी सरळ विषयालाच हात घातला. 

"त्याचं काय आहे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही नवीन आहात इथे! घाईघाईत कुठला निर्णय घेण्याआधी विषयाचा अभ्यास करून मगच काही कृती करावी एवढंच आमचं म्हणणं आहे. भूतबंगल्याचा विषय तुम्हाला वाटतो तितका सोपा नाही."

"तुम्हाला काही माहिती असल्यास स्पष्ट सांगत का नाहीत, तुम्ही ?" इन्सपेक्टर सतीशनी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखित विचारले. 

"सांगेन! पण तुमच्या भल्यासाठी सांगतोय, तूर्त तुम्ही ही मोहीम थांबवा!" नोकराने आणलेला मिल्कशेकचा ग्लास ट्रे मधून उचलून आदराने इन्स्पेक्टर सतीश पाटीलांच्या हातात देत ते म्हणाले. त्याचवेळी हवालदार, मला व प्रियांकाला ट्रे मधून मिल्कशेकचा ग्लास घेण्याची खूण केली. आम्ही मिल्कशेक चे ग्लास तोंडाला लावले. हा माणूस भूतबंगल्याचे रहस्य उलगडण्याच्या मोहिमेत खोडा का घालतोय असा विचार मिल्कशेक पीत पीत मी करीत होतो. दौलतरावांचा भूतबंगल्याशी काहीतरी संबंध निश्चितच असावा. कदाचित त्यांचाच काहीतरी डाव असावा, म्हणून तेगोड बोलून मोहीम पुढे ढकलण्याचा सल्ला देत असावेत. 

"ठीक आहे! आम्ही आता भूत बंगल्यावर जात नाहीत!" इन्स्पेक्टर सतीश मिल्कशेकचा ग्लास संपवून टीपॉय वर ठेवत म्हणाले. त्यांच्या या वाक्याने मी आणि प्रियांकाने एकाचवेळी चक्रावून त्यांच्याकडे पाहिले. "पण आम्ही आज रात्री भूतबंगल्यात शिरणार आहोत! मला आज रात्रीच सोक्षमोक्ष लावायचा आहे!" इन्स्पेक्टर सतीश पुढे म्हणाले, तेव्हा आम्हाला हायसे वाटले. 

"चला मुलांनो! मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो! आज रात्री ठीक दहा वाजता मी तुम्हाला घ्यायला येतो." असं म्हणत ते उठले. आम्हीही उठलो.

"जशी तुमची मर्जी!" काहीसे नाराज होत दौलतराव म्हणाले. त्यांचा निरोप घेऊन आम्ही जीप बसलो. जीप माझ्या घराच्या दिशेने निघाली. 

 

रात्री बरोबर दहा वाजता मी तयार होऊन प्रियांकाच्या घरी पोहोचलो. प्रियांका ही तयार होती. तिचे वडील थोडेसे नाखुश दिसत होते. पण इंस्पेक्टर साहेबांनी सांगितल्यामुळे ते नाकारु शकत नव्हते.

"काका, तुम्ही पण चला ना!" मी त्यांना आग्रह केला.

"मी? चालेल मी आलो तर?" त्यांची यायची इच्छा दिसली.

"हो, चला तुम्ही, मी बोलतो इंस्पेक्टर सहेबां बरोबर!"

"बरं बरं, मी शर्ट घालतो." असं म्हणून ते आत गेले. पाच मिनीटांनी शर्ट घालून हॉल मधे आले. आम्ही पोलिसांची जीप यायची वाट पहात बसलो. थोड्या वेळाने गाडीचा हॉर्न वाजला. आम्ही लगबगीने बाहेर आलो. बाहेर जीप होती, पण पोलिसांची जीप नव्हती, तर दौलतराव देशमुखांची होती. दौलतराव ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते. आम्हाला "बसा" म्हणून म्हणाले. दौलतराव आम्हाला कुठे घेऊन जायला आलेत, काही कळत नव्हतं. आम्ही संभ्रमात जीप जवळ उभेच राहिलो, तेव्हा ते म्हणाले, "हॉस्पिटलला जायचे आहे, इंस्पेक्टर साहेबांचा एक्सीडेंट झाला आहे." आमच्या छातीत धस्सं झालं. हे एक नाविन विघ्नं समोर येऊन ठेपलं होतं. आम्ही जीपमधे बसलो. "कसा झाला अपघात?" मी दौलतरावांना विचारलं. 

"पोरांनो, आमचं कुणी ऐकत न्हाई! भूतबंगल्यावर जायचा निर्णय त्यांनी पक्का केला म्हणून हे समदं घडलं!"

"पण भूतबंगल्याचा आणि अपघाताचा काय संबंध?"

"संबंध का न्हाई? त्यांच्या जीपला दोन आडदांड बैलांनी धक्का दिला. ते दोन्ही बैल भूतबंगल्यातले होते."

"पण तुम्हाला कसे माहीत?"

"आमचं यूवराज त्याच रस्त्याने चाललं होतं. त्यांनीच त्यांना हॉस्पिटल मध्ये पोहोचवलं... "

दौलतरावांच्या बोलण्यावरून त्यांचाच या घटनेमागे हात असावा असा संशय मला येऊ लागला. पण मी काही बोललो नाही. मनातल्या मनात देवाचा धावा करू लागलो....देवा, इंस्पेक्टर सतीश पाटीलांना काही होऊ देऊ नको, ते सुखरूप असू देत!" 

 

*** अचानक पणे कुणालाही सोबत न घेता पेट्रोलिंगला निघायची इंस्पेक्टर सतीश पाटीलना सवय होती. कुणाला कल्पना न देता निघाल्यावर कुठे काय चालते ते नीट समजते असा त्यांचा आजवरचा अनुभव होता. शिवाय सोबतीला कुणी हवालदार असले की ते त्यांच्या नजरेतुन एखाद्या गोष्टीचे विश्लेषण करायचे, आणि ते सतिशना नको होते. असे एकट्याने फिरणे कधी कधी धोकयाचेही ठरू शकते, याची त्यांना कल्पना होती. पण त्यांना असे थ्रिल आवडत होते आणि नेमके तेच आज त्यांच्या जीवावर उठणार होते. रात्री दहा वाजता भूतबंगल्यावर निघायचे होते. तो पर्यंत भरपूर वेळ होता. आताशी आठ वाजले होते. गावातल्या एका पाड्यात रात्री जुगार बसतो, अशी त्यांना टीप होती. त्यांची जीप त्या पाड्याच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. जंगलाचे एक टोक पार करून पलीकडे जायचे होते. उजव्या बाजूस जंगल आणि डाव्या बाजूस दरी अशा एका वळणावर जीप पोहोचली आणि ते घडले. वरच्या बाजूने दोन माजलेले बैल अकस्मात त्यांच्या जीपवर धावून आले.एका बैलाने जीपला धड़क दिली तर दूसरा बैल जीप समोरआडवा आला. इंस्पेक्टर सतीश नी जीप कंट्रोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण रस्ता अतिशय निमुळता असल्या कारणाने त्यांचा प्रयत्न असफल ठरला. जीप धुरळा उडवत दरीत कोसळली. प्रसंगावधान राखून त्यांनी ती कोसळण्या आधीच उडी घेतली. पाय आतल्या आत कटकन मोडल्या सारखं वाटलं. एक तीव्र वेदना उठली आणि त्यांची शुद्ध हरपली. 

ते हॉस्पिटलवर पोहोचले तेव्हा इन्स्पेक्टर सतीश पाटील साहेब शुद्धीवर आले होते. दौलतरावांसोबत आम्ही त्यांच्या कॉटजवळ पोहोचल्यावर ते पाठ टेकून बसून राहिले. 

"कसे आहात साहेब?" मी विचारलं. 

"ठीक आहे, पण पाय ठीक व्हायला साधारण महिनाभर वेळ जाणार. आपलं मिशन भूतबंगला तोपर्यंत स्थगित ठेवायला लागेल." त्यांच्या बोलण्यात स्वतःच्या तब्येतीपेक्षा मोहीम पुढे ढकलण्याबददलची काळजी वाटत होती.   

"साहेब, कशाला उगीच आगीत हात घालता? ती भुतं आपल्या वाटेला जात नाहीत तर आपण कशाला त्यांच्या वाटेला जायचं?" दौलतरावांचं तुणतुणं पुन्हा सुरु झालं.

"दौलतराव, मला तर वाटायला लागलंय भूतबंगल्यातली भुतं तुमची नातेवाईकच आहेत!" सतीश साहेबांनी थेट असाटोमणा मारल्याने मला जरा बरे वाटले. हा माणूस आम्हाला या मोहिमेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न का करतोयते एक गूढ होतं. पण आमच्यापाशी काही माहिती नव्हती म्हणून आम्ही काही बोलू शकत नव्हतो.

"मला तुमची काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला सावध करायचे काम करतो, बाकी तुमची मर्जी!" दौलतराव थोडेसे नाराज होत म्हणाले. 

"आभारी! मी भूतबंगल्याची पाले मुळे खणून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!" इन्स्पेक्टर सतीश पाटील ठामपणे म्हणाले. पण आमची भूतबंगला शोध मोहिम एक महिना लांबणीवर पडल्याने मी आणि प्रियांका नाराज झालो होतो. आधी समीरवर झालेला हल्ला व त्यानंतर इन्स्पेक्टर सतीशना झालेला अपघात... एकंदरीत ही मोहीम इतकी सोपी आणि साधारण नाही याची कल्पना आम्हाला यायला लागली होती.....  

 

नदीचे विस्तीर्ण पात्र जंगलाच्या टोकापर्यंत पसरलेले होते. पालिकडच्या बाजूला पहात नदी किनाऱ्यावरच्या हिरवळीवर बसून मी पाण्यात खडे मारीत होतो. बाजूला प्रियांका, नितीन आणि सुनिल बसले होते. मोहीम पुढे ढकलली गेल्याने मी सर्वात जास्त वैतागलो होतो. 

"काय करायचे प्रतीक? आपण घुसायचे का थेट भूतबंगल्यात?" सुनीलने माझी बेचैनी ओळखून  विचारले.

"माझाही तोच विचार आहे. इंस्पेक्टर साहेबांचा पाय ठीक होईपर्यंत थांबण्याची माझी बिलकुल तयारी नाही."

"आमची काही हरकत नाही" नितीन म्हणाला. 

"हो. मी ही तयार आहे! पण प्रत्येक वेळी काहीतरी अडचण येते आणि मोहीम मागे पडते. यामागे खरोखर भुताटकी आहे, की कुणी माणूस हे सर्व करतेय ते समजत नाही... " असे बोलता बोलताच प्रियांका दचकली. पाण्यात काहीतरी सळसळल्या सारखा आवाज आला. सर्वांनी एका झुडुपाचा आडोसा घेत आवाजाच्या दिशेने पाहिले. त्यांच्या बाजूला शे-दोनशे फुटावर असलेल्या झुडुपामागून एक होडी नदीच्या पलिकडच्या बाजूस निघाली होती...

 

"मालक, मी त्या पोरास्नी जंगलाकडं जातांना पाह्यंलं.." दौलत रावांचा गडी रघु धावत धावत दौलतरावांच्या जवळ येत म्हणाला.

"ही पोरं सांगून ऐकणार न्हाईत.. आता आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. चांगले तालमीतले १०-१२ गडी लाठी-काठी घेवून बोलावून घे पटापट! मी माझी बंदूक घेतो. आज क़ाय तो सोक्ष मोक्ष लावायलाच हवा! दौलतराव ओरडले.रघु ने अवघ्या दहा मिनीटांत डझनभर पेहलवान गोळा केले. जॅकेट चढवत दौलतराव एका जीप मधे काही पेहलवानां सोबत बसले. बाकीचे पेहलवान मागच्या जीपमधे बसले. काळा कुट्ट अंधार चिरत दोन्ही जीप भुतबंगल्याच्या दिशेने निघाल्या. ढोलकीच्या आवाजाला घुंगरांची साथ होती. रात्रीच्या अंधारात तो आवाज धीर गंभीर, भयावह भासला नाही तरच नवल. आम्ही बराच वेळ बाहेर दबा धरून बसलो होतो. आम्ही म्हणजे मी, सुनिल, आणि नितिन! रात्रीची वेळ असल्याने प्रियांका आमच्या बरोबर नव्हती. थोड्या वेळाने आम्ही भूतबंगल्याच्या लोखंडी गेट जवळ दबकत दबकतपोहोचलो आणि  गेट वर चढून आतल्या बाजूला उड्या मारल्या. काही कळण्याच्या आतच आमच्या तिघांच्या अंगावर कापडासारखे काहीतरी काळे काळे पडले. आम्ही तिघेही फरफटत एका छोट्या खोलीत ढकलले गेलो. आम्हीबंदिस्त झालो. काही वेळाने गेटवरुन एकाचवेळी आठ-दहा माणसांनी उड्या मारल्यासारखा आवाज आला. त्या पाठोपाठ झटापटीचे आवाज येऊन बाहेर कसली धडपड होतहोती, ते काहीच कळत नव्हते. अचानक आमच्या खोलीचा दरवाजा खाड़कन उघडला गेला. पाहतो तर क़ाय, समोर प्रियांका ऊभी! मी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर तिने हातानेच गप्प राहण्याचा इशारा केला. ढोलकीचा आणि घुंगरांचा आवाज आता बंद झाला होता. ही शांतता तर अजूनही भयावह वाटत होती. आतल्या बाजूला मशालींचा उजेड दिसत होता. आजूबाजूचा अंदाज घेत प्रियांका

 आतल्या बाजूला चालत होती. तिच्या पावलावर पाऊल ठेवत आम्ही तिच्या मागे मागे चाललो होतो. आत पोहोचल्या वर कुणाची तरी झटापट सुरु असलेली दिसली. नीट पाहिल्यावर मला दूसरा धक्का बसला... ते हवालदार माने आणि दौलतराव होते. आजुबाजुला धष्टपुष्ट पेहलवान दिसत होते. त्यातल्या एका पेहलवानानं हवालदार ढोणेची गचांडी पकडली. बाकीचे पेहलवान आतल्या बाजूला धावत सुटले. आम्हाला काहीच अर्थबोध होत नव्हता. सगळा गोंधळ माजला होता. दौलतराव आणि हवालदार ढोणे कडे लक्ष न देता, आम्ही त्या पेहलवानांच्या मागे मागे धावत आतल्या बाजूला गेलो. त्याचवेळी आतल्या खोलीतल्यां मशाली पटापट विझल्या. नेमके क़ायचालले आहे ते समजत नव्हते आणि आम्ही काय करावे ते सुचत नव्हते.पुन्हा झटापटी सुरु झाल्या. अंधारात सुरयांची धारदार पाती चमकली. पण पेहलवानांनी सूरे काढणाऱ्यांचे हातच कटाकट पिळले. काही वेळातच त्यांचा प्रतिकार संपला. "बाहेर जीपमधे दोर आहे तो घेऊन या!" एक पेहलवान आमच्याकड़े पाहात म्हणाला. आम्ही घाईघाईत बाहेर धावलो. बाहेर जाता जाता आम्ही पाहिले, दौलतराव आमच्या अंगाला घासून आतल्या बाजूस धावतगेले. आम्ही दोर घेऊन परत आलो तेव्हा ते पकडलेल्या माणसांत कुणाला तरी शोधत असतांना दिसले. ते कुणाला शोधतात ते माझ्या लक्षात आले "पाच-सहा पेहलवांनाना घेवून पटकन चला, माला माहित आहे तो कुठे गेला असेल ते!" मी म्हणालो.

ते चकित झाले. कसलाही विचार न करता ते पाच पेहलवान घेवून माझ्या बरोबर निघाले. आमची जीप सुसाट सुटली.....

 

दुसऱ्या दिवशी दौलतरावांच्या बंगल्याला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. बंगल्याच्या आवारात डीसीपी, एसपी आणि असंख्य पोलिस. बंगल्या बाहेर हातपाय बांधलेल्या अवस्थेत आठ इसम आणि चार स्त्रियां. त्या आठ जणांपैकी चार जण मजबूत दिसत होते. त्या चार जणांत धिप्पाड आणि अत्यंत कुरूप असलेला एक इसम खूपच भयानक दिसत होता. डीसीपी, एसपी, दौलतराव यांच्या बाजूला मी, प्रियांका, सुनील आणि नितिन उभे होतो.

"साहेब, हा यांचा म्होरक्या!" त्या कुरूप माणसाकडे बोट दाखवत दौलतराव म्हणाले. "हा एकटा हिला घेऊन बोटीतून निसटला होता. पण आम्ही जीपने पालिकडच्या बाजूला आधीच जावून पोहोचलो आणि हा बोटीतून उतरल्या बरोबर आम्ही याला पकडले." दौलतराव माझ्याकडे बोट दाखवत पुढे म्हणाले, "या मुलाने मला ते पलीकडे कुठे उतरणार आहेत ते अचूक दाखवले. या सर्वामुळेच यांना पकडणे शक्य झाले. आपल्या तालुक्याबाहेर होणाऱ्या चोरयांमधे यां चोरांचा हात होता. या स्त्रिया आणि या पैकी चार जण तमाशाचा कार्यक्रम करत गावोगाव फिरत आणि बाकीचे लोक गावातली घरे साफ करण्याचे काम करीत. चोरी करून हे भूतबंगल्यात येवून राहात. रात्री घुंघरू बांधून भूतबंगल्यात तमाशाची तालीम करत. रात्रीच्या वेळी कुणी जर शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर त्याला घाबरवून सोडत किंवा मारत. महत्वाचे म्हणजे या आधीचे पोलिस निरीक्षक यांना सामिल होते. यांच्याकड़ून ते प्रत्येक दरोड्यातला हिस्सा घेत. सध्या ते एका लाच प्रकरणात जेल मधे आहेत. त्यांच्यानंतर हवालदार ढोणे आणि शिंदे यांना मदत करीत होते. टीप देत होते. भूत बंगल्याच्या रहस्याचा शोध घ्यायची गोष्ट इंस्पेक्टर सतीश करत असतांना ढोणे-शिंदे  त्यांच्या बरोबर होते, म्हणून मी मुद्दाम टाळाटाळ करत होतो. "दौलतराव, आम्ही तुमचे आणि या मुलांचे अत्यंत ऋणी आहोत. मी डिपार्टमेंट तर्फे आपणा सर्वांचा सत्कार करणार आहोत!" डीसीपी साहेब खुश होवून उद्गारले. माझ्या मनात विचार आला...प्रसंगाचे गांभीर्य ओळखून दौलतराव जरपेहलवांनाना घेवून वेळेवर पोहोचले नसते, तर आम्ही या मोहिमेचे बळी ठरलो असतो हे नक्कीच! आमची घाई आमचा घात करणारी ठरली असती. "सर, हे श्रेय दौलतराव साहेबांचे आहे. त्यांच्या मुळेच आम्ही वाचलो!" मला हे सर्वांसमोर कबुल करायला जराही संकोच वाटला नाही. डीसीपी, एसपीनी पुन्हा एकदा दौलतरावांचे अभिनंदन केले आणि ते आमच्याकडे वळले. ते आमची पाठ थोपटत असतांना आम्ही मात्र दौलतरावांकडे कृतज्ञतेने पाहात राहिलो.....



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror