Prakash Patil

Classics

2  

Prakash Patil

Classics

"शिकंल तो टिकंल"

"शिकंल तो टिकंल"

5 mins
1.1K


अदिन मदीन फाटलेला पाग शीवीत जना वट्यावं बसलेता. माजघरंन सुरेस लॅपटॉपवं त्याचा रिजेट बघीत बसलेता. त्यानी त्याचा सीट नंबर टाकीला, न तो खुश होऊन ओरडला, "बाबा, मी डॉक्टर झालोsss ." झटका आल्यासारका जना धावत माजघरंन आला. पार्बती पन चुलीपुरशी सुरेस जवल पोचली. जनानी सुरेसला मीठीस मारली. त्याचे डोलेंशी आसवांच्या धारा लागल्या. पारबतीची पन तीस गत झाली होती. त्यांचा पोर अवरे बिकट परिस्थीतीनशी शिकून डॉक्टर झाला होता. जनाला आज धन्य धन्य झाल्यासारकं वाटलं. देवानी आज आपलं आयकीलं म्हंगून त्यानी लगेस देवघरंन जावून गनपतीला, खंडोबाला नारल फोरीला. पार्बतीनी जीवदानीला न एकविरंला ओवालीलं. तवरेन संगीता कॉलेजवरशी आली. 

"पोरी, दादा पास झाला, डॉक्टर झाला...अक्खे गावाला पेरं वाटू" जनाचं मन भरून आलतं. काय करू न काय नोको असं त्याला झालतं. संगीता पन जाम खुश झाली. "दादा, आपले गावंन तू पयलास डॉक्टर, न आपले समाजंन अक्खे तालुकेन तू पैला डॉक्टर..." त्याला हात मिलवीत तीनी त्याला मीठी मारली. सुरेसचे डोल्याला पन धारा लागल्या.

"माजे सदरेनशी पैसं घे, न पेरं घेवून ये" जना डोलं पुशीत संगीताला बोल्ला. ती पेरं आनाला गेली. जना वटयावं आला. खुशी खुशीन एक इडी पेटवीली. त्याला मागचं दिस आठवलं.


*** कालोख परत चालला तसा जनाचा हात पटापट चालाला लागला. शेताचा शेवटचा कोपरा नींदाचा बाकी होता. लांबा उपटीत उपटीत तो पाय पुरं टाकीतोता. सांचे पारा बारीक बारीक मुरकुट जाम चावाला लागलेतं. आज एकदंच नींदन काराचं काम आटोपीलं, का उंदेन खत माराला मोकला असा इचार तो करतोता. नेमकी तेेेस टायमाला पान्याची जोरदार साट आली. इरलं होतं, म्हंगुन त्याला काय वाटलं नय. पन वारा घोंगावाला लागला, न इरलं फुरफुराला लागलं. पान्याचा जोर कमी होयेल असं वाटलेतं, पन तो वारतुस चाल्ला. वाऱ्या-पान्याला घाबरून काम सोरुन जायेल, तो जना कंचा! त्याचं काम पुरं करूनुस तो शेतनशी बायेर परला. खांडीन हात-पाय धवून तो बंदावरशी घराचे रस्त्याला लागला. बंदावर गवत पन जाम वारलेतं. जान-जनावरांची धास्ती वाटतोती. कसा बसा पाय तुकीत तो घरा पोचला. "पारबती, पानी कार आंग धवाला " , त्यानी वट्यावरशीस बायकोला हाक मारली. 

"हा कारते, पानी गरमुस हाय!" पार्वती आतमीनशी बोल्ली. 

इरलं वट्यावं ठेवून जना घरन घुसला. आंग धवाला मोरीन शिरला. 

"न बाय कय हाय?" आंग धवून, टुवालाशी आंग पुशीत पुशीत त्यानी पार्बतीला इचारलं.  

"ती आतमीन आब्यास कराला बसले". जन्याला बरं वाटलं. आपन शिकलो नय, पन आपली बाय-संगीता आपलं नाव कारील असा त्याचा इसवास होता. सुरेसवं त्याचा कारीचा भरवसा नवता. ऊठ सूट तो खेलाला, न पत्तं कुटाला धावाचा. मोठा पोर म्हंगुन त्याचावं जनाचीआशा व्हती, पन त्याची जाम निराशा केली पोरानी. नव्वीला दोन वर्स कारली, न अवंदा धाव्वीला होता. जनाला त्याचं लक्षन काय ठीक दिसत नवतं.

"न तो कय हाय?" जन्या नी पारबतीला इचारलं.

"तो नुंगुतुस जेलाय जरा खेलाला..." पारबती सारवा सारव करीत बोल्ली.

"आथं अवरे पारा कंच खेल कारलेन?" जना चिरुन असा बोलतोता बस, तवरेन बाजुचे ओवरेनची सुरेसची काक्कीस पार्बतीला हाक मारीत घरंन शिरली. 

"जे कय जेल्या?"

"काय झायलं?" पार्बतीनी इचारलं.

"सुरेसला काय आब्यास बीब्यास हाय का नय? तो बग, हीरूबायचे वटयावं बग पत्तं कुटीत बसलाय!" तीनी आगीन तेल वतीलं. जनाचा संताप अजुन वारला.

"काय कराचं या पोराला? बापूस शेतंन मर मर मरतेय याला शिकवाला, न यो ये धंदं करीत फिरते." पार्बती पन संतापली. ती तनतनत त्याला हाक माराला गेली. जना गप्चुप खाटंवं बसला. आबेटयाचे पान्याची इरी करून फुकाला लागला. एक झुरका घेल्ला तवं त्याला जरा डोकं सैल झाल्यासारकं वाटलं. सुरेसला झेवून पारबती घरन आली. तो मान खाली घालून चुलींचे खोलीन जेला. जना काय बोल्ला नय. पन त्याला पोराचं जाम टेंशन आलं. एक इडी खपली तशी त्यानी दूसरी इडी पेटवीली. पार्बतीला ते समजंलं. "आयकीता का, मी काय सांगते, मी सम्जवीते त्याला. तुमी नुसता जीवाला ताप नोको करून झ्याव!"

"आब्यास कर आब्यास कर बोलून बोलून मी थकलो, पन याचे डोकेन काय शीरं नय! त्याला सांग, 'जो शिकल तोस टिकल, न नय शिकला तो भीकंला लागंल'. पार्बते, मी याचेसाठी खप खप खपतंनं खपून जायेल एक दिस, पन याला काय फरक नय पराचा!" 

"नय तेस बोलू नोका" पार्बतीचं आंग थरथराला लागलं. जना इडीचे धुरावं बगीत, इडी वं इडी फुकीत बसून रेला....


*** बीजे दिसा जना सकालचे नास्ता करून नींगाला.

"न जेवाला..दुपारचे याल ना? का जेवन झेवून येव?" पार्बतीनी इचारलं. 

"तू नोको येव, मी येल. दुपार परेन खत टाकून होयेल, बारा वाजाचे आत!" असं बोलून जना घरा बायेर परला. पार्बतीला आज त्याचा चेरा बगून कसं तरी वाटतोतं. कालजी करीतुस ती चुलीन शीरली. वखत कसा जेला ते तिला कल्लस नय. घऱ्यालाचे टोल्याचा आवाज झाला, तवं तिनी वरती बगीलं. "बापरे, एक वाजला?" ती सवताशीस पुटपुटली. नेमका त्यास टायमाला सुरेस शालीनशी आला.

"सुरेस, जा धावत धावत शेतावं, बापूस अजून आला नय, बगून ये जरा, माला काल्जी वाटते"

"त्याचेन काय अवरी काल्जी कराची? काम आटोपाला वखत झाला असंल" सुरेस थोरा बेफिकर होता.

"सुरेस, आज बापूस घरनशी कवरा नाराज होऊन जेलता, तुला नय मायीत..न त्याला कारन तुस हाय. त्यानी तुजं टेंशन झेल्ले. तो शिकला नय, पन पोरनशी शिकून मोठं होवं असं त्याला वाटते. पन तू त्याचे तोंडाला साप पानं पुशीली. जा जरा बग कय रेलाय तो!" ती घाबरी घुबरी होत बोल्ली. आथं सुरेशला थोरी धास्ती वाटाला लागली. तो शेताचे वाटंला धाव्वत सुटला.


*** बारा वाजाचे टायमाला जनाचं काम आटोपलं. आज त्याचं मन थाऱ्यावं नवतं. रोजचे सारखा तो खांडीवं हात पाय धवाला जेला, पन बंदावरचे चिकट मातीवरशी त्याचा पाय घसरला, न तो थेट खांडीनचे मोठे दगडावं तंगऱ्या वर करून आपटला. कानफाटा जवल रक्ताची धार लागली. जना कसा बसा तोल सावरून उबा रेला. पन त्याला चक्कर जसी आली न तो बंदावरशी खाली गरगरला....


*** सुरेस धावत सुटलेता. त्याला आथं जाम पसतावा झालता. "देवा, माजे बापाला काय होवून नोको देव!" अशी पार्थना करीत करीत तो धावतोता. त्याला धाप लागली, आंगाला घामाच्या धारा लागल्या. पन तो थांबला नय. त्यानी लांबशी बगीलं. बंदाजवल कोनतरी परलेतं. धावत धावत तो बंदाजवल पोचला. तो बापुसूस होता. "बाबाsss" सुरेसनी टावो फोरीला. त्यानी चिखलन खाली परुन बापासला मीठी मारली. "बाबाss, बाबाss" करीत तो लराला लागला. खालचे रस्त्याला कमला काका चाललेला सुरेसला दिसला. "कमला काका ss" त्यानी जोरन हाक मारली. कमला काका धाव्वत वरती पोचला. त्यानी जनाची नारी बगीली.

" पोरा घाय कर, नारी चालते" असं बोलून त्यानी न सुरेशनी जनाला तुकीलं. गावाचे येशीवं नेमका यादव रिक्शावाला उबा होता. जनाला रिक्शेन बसवून सुरेस न कमला काका त्याचे बाजूला बसले. रिक्शा सुसाट निंगाली.


*** हॉस्पिटलचे बाकऱ्यावं पार्बती बसली व्हती. बाजूला कमला काका उबा व्हता. सुरेस नुस्तास चकरा मारीतोता. एकदंचा डॉक्टर बायेर आला. सुरेस पट्कन त्याचे जवल जेला. तो बोल्ला, "डॉकटर.."

सुरेस पूरं बोलाचे अगोदरुस डॉक्टर बोल्ला, "काळजी करू नका. पेशंट ठीक आहे आता. पण त्याला जास्त बोलायला देऊ नका!"      

सुरेसनी मान डोलवीली. तो, पार्बती न कमला काका सगले आत शिरले. जनाचे खाटं जवल जेले.

जनानी डोलं उगरीलं, तसा सुरेस लराला लागला. "बाबा, तू सांगशील तसं मी करील. खूप आब्यास करील न मोठा होयेल." सुरेस पस्तावून बोलाला लागला. जनानी त्याला जवल घेल्लं. त्याचे डोक्यावं मायेशी हात फिरवीला. सुरेस ढसा ढसा रडाला लागला.


*** "बाबाss" संगीताचे आवाजाशी जना भानावं आला.

"पेरा घे!" तीनी पेरा त्याचे हातंन दिला.

"न देवापुरं ठेवीला का?" 

"हा!"

"जय गनपती बाप्पा! जय खंडोबा! जय जीवदानी आये! जय एकवीरा मातेसरी, जय मालक्ष्मी, जय वज्रेसरी!" जनानी पटापट देवंची नावं घेल्ली न पेरा तोंडंन टाकीला. परत एकदं त्याचे डोलेंशी आनंदाची आस्वं पराला लागली. सुरेस, संगीता न पारबती सगलेंशी जनाला मीठी मारली. जना डोलं मिटकून कवं पोराची पाठ थोपटीतोता, तं कवं पोरीचे पाठीवंशी मायेशी हात फिरवितोता...न सुरेसचे कानंन बापासचं शब्द घुमतोतं, "जो शिकंल तो टिकंल", जो "शिकंल तो टिकंल"!".....


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics