वाट अडवली भुताने...
वाट अडवली भुताने...
गणेश एका इलेकट्रीकल केबल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत पर्चेस मॅनेजर होता. महाराष्ट्राच्या सीमेलगतच, पण गुजरात मध्ये असलेल्या उंबरगाव येथे ही कंपनी होती. कंपनीच्या कामात तो इतका गुंतून जायचा, की त्याला वेळेचं भान देखील राहायचं नाही. पालघर मध्ये असलेल्या एका सप्लायरकडे तो आला होता. संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेली मिटिंग नऊ वाजेपर्यंत चालली. मिटिंग संपल्यानंतर कंपनीतच गणेशच्या जेवणाची व्यवस्था होती. आचाऱ्याने खास झणझणीत मटण, भाकऱ्या, चिकन तंदुरी, चिकन काली मिरी कबाब, डाळ, भात असा बेत बनवला होता. सोबत ब्लॅक लेबल होतीच. आता अनौपचारिक गप्पा रंगल्या. व्यक्तिगत आयुष्यातले काही किस्से सुरू झाले. मग वेळ पुढे पुढे सरकू लागली. काटा साडे-अकराच्या वर गेला. गणेश जेवून सप्लायरच्या कंपनीतून बाहेर पडला तेव्हा बारा वाजून गेले होते.
गणेशची इनोव्हा पालघर मधून निघाली. बोईसर मार्गे चिल्हार फाट्यावरून त्याची कार मुंबई अहमदाबाद रस्त्याला लागली. आता कारने खरा वेग पकडला. काही मिनिटांनीच डहाणूचा चारोटी नाका मागे पडला. एक-दोन वळणे घेत कारने दापचेरीही मागे टाकली. तलासरी फाट्यावरून त्याने ओव्हर ब्रिज न चढता गाडी डावीकडील तलासरी-उंबरगाव रस्त्याला घेतली. सुनसान रस्ता. ना माणूस, ना वाहन! गणेशला अशा रस्त्यांची रात्री-अपरात्री प्रवास करायची नेहमीची सवय! तो आपल्याच तंद्रीत सुसाट कार चालवत होता.
तो झरी गावाजवळ पोहोचला. हे तेच ठिकाण होतं जिथे रात्री वाहन चालकांना काहीतरी विपरीत दिसायचं. वाहनावर दगडफेक व्हायची. गणेशने तिथे पोहचता पोहोचताच जोरात ब्रेक दाबला. तो थोडक्यात वाचला होता, त्याच्या पुढे उभ्या असलेल्या टेम्पोवर आदळण्यापासून! त्यांने हुश्श करत समोर पाहिलं, तर अजून तीन चार वाहने पुढे थांबली होती. तो इनोव्हा मधून उतरून पुढच्या बाजूला आला. पुढे पाहतो तो काय! लाल भडक लुगड्यात एक बाई रस्त्यात पाठमोरी उभी होती. लांबसडक केस पाठीवर मोकळे सोडलेले. कुणी हॉर्न मारायला पण धजावत नव्हते. गणेश हिम्मत करून पुढे सरकला. तोच त्याला एका टेम्पो ड्रॉयव्हर ने मागे खेचले. ती बाई हळू हळू रस्त्याच्या एका कडेला गेली. तिथून वरच्या बाजूला चढून दिसेनाशी झाली.
"भाऊ, तुम्ही कशाला जीवाची रिस्क घेत होता?" त्या टेम्पो ड्रॉयव्हरने गणेशला विचारले.
"त्यात काय रिस्क? काय केलं असतं त्या बाईने?" गणेशने उलट प्रश्न केला.
"भाऊ, ती बाई नव्हती, ते बाईचं भूत होतं. इथे अधेमधे दिसते रात्री बारा नंतर!"
"म्हंणून तर मला खात्री करायची होती, पण तुम्ही अडवलंत!" गणेश असं म्हणत असतानाच मागचे गाडीवाले हॉर्न वाजवू लागले. घाईघाईत गणेश इनोव्हात जाऊन बसला. गाडी स्टार्ट करू लागला. पण गाडी स्टार्ट होत नव्हती. खाली उतरून बॉनेट उघडून त्याने वायरिंग चेक केली. पुन्हा गाडीत बसून गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ! एव्हाना इतर गाड्या निघून गेल्या होता. तो एकटाच त
्या सुनसान ठिकाणी राहिला. सोबतीला रातकिड्यांचा आवाज तेवढा होता. तो पुन्हा पुन्हा गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या प्रयत्नाना यश येत नव्हते. अचानक पुढच्या बाजूला कुणाचा तरी हसण्याचा विचित्रसा आवाज आला. त्याने आजूबाजूला पाहिले. कुणी दिसले नाही. लाल लुगड्यातली ती बाई निघून गेलेल्या वरच्या बाजूला त्याने पाहिले आणि त्याच्या काळजात चर्र झाले. ती बाई हळू हळू खाली उतरत होती. तो समोर पाहात असतानाच त्याच्या गाडीचा दरवाजा खसकन उघडला गेला. काही कळण्याच्या आतच त्याचा डोक्यावर लाकडी दांड्याचा आघात झाला. कुणीतरी गाडीत शिरत होते. सर्व शक्ती एकवटून त्याने त्या व्यक्तीला बाहेर ढकलले. दरवाजा ओढला. पुन्हा एकदा गाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने यावेळी गाडी स्टार्ट झाली. त्याने गाडी पूर्ण वेगाने पुढे काढली. तोपर्यंत ती बाई रस्त्यावर उतरली होती. तिला गाडीची धडक देऊन तो पुढे निघाला. तिचे काय झाले ते पाहायला त्याला उसंत नव्हती. रस्ता कापत कधी एकदा फ्लॅटवर पोहोचतो असे त्याला झाले होते.
त्याची इनोव्हा जेव्हा उंबरगावमधील त्याच्या इमारतीखाली थांबली, तेव्हा त्याने दीर्घ श्वास घेतला. डोकं खूप ठणकत होतं. त्याने डोक्यावरून हात फिरवला. त्याच्या हाताला रक्त लागलं. डोक्याला जखम झाली होती. त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी सर्व शक्ती एकवटून तो इथंपर्यंत पोहोचला होता. आता आपली सहनशक्ती संपत चाललीय याची त्याला जाणीव झाली. डोकं जास्तच ठणकू लागलं. त्याने हॉर्न वाजवला. गाडी बंद केली. तो स्टिअरिंग व्हीलवर डोके टेकवून पडला. त्याची शुद्ध हरपली.
संध्याकाळी हॉस्पिटल मधील बेडवर गणेश चहा घेत होता. त्याचा भाऊ घाईघाईत एक वर्तमानपत्र घेऊन त्याच्याजवळ आला. वर्तमानपत्रातील एक फोटो त्याच्यासमोर धरत तो म्हणाला, "गणेश, झरी गावाजवळ ही बाई रात्री एका ऍक्सिडेंटने मरण पावली. लोकांनी तिला पाहायला गर्दी केली होती. अनेक जण पोलिसांना म्हणाले की ही तीच बाई होती जिचे भूत रात्री या परिसरात दिसायचे!"
"अरे, ती काल रात्री मेली ना? मग तिचे भूत यापूर्वीच कसे दिसायचे!"
"तेच तर सांगतोय! लोकांना आता पटले की ही बाई भूत बनून रात्री फिरायची आणि तिचे साथीदार लोकांना लुटायचे! पोलीस आता तिच्या साथीदारांना शोधताहेत!"
"इतकी वर्षे झोपा काढत होते. रात्रीच्या लुटमारीच्या घटनेकडे दुर्लक्ष करायचे. स्वतः पोलिसच या भुताटकीला घाबरायचे! आता ती मेली तेव्हा यांना पटले की ते भूत नव्हते!"
"हो ना! तू अर्जंट ब्रेक मारल्याने तुझे डोके आपटून दुखापत झाली. पण मी काय म्हणतो, तू पण काल रात्री त्याच रस्त्याने आला होतास ना? तुला रस्त्याला काय संशयास्पद नाही दिसले?"
"दिसले ना! पण कुणाला सांगू नकोस!" आजूबाजूला पाहात गणेश हळूच म्हणाला,"लोकांना लुबाडणाऱ्या त्या बाईला माझ्याच कारने उडवले होते!" गणेशचा भाऊ अवाक होऊन पाहात राहिला.
: प्रकाश पाटील, वसई