कविता दातार

Comedy

3.1  

कविता दातार

Comedy

वर संशोधन (?)

वर संशोधन (?)

7 mins
398


"प्रिती! ए ...प्रिती !!"

आईची तिसऱ्यांदा हाक आली, तेव्हा प्रिती दुसऱ्यांदा साडीच्या निऱ्या काढून पुन्हा बसवत होती.

"आले गं !! " आईच्या हाकेला उत्तर देऊन ती पुन्हा साडी नेसण्यात गुंतली.

'हे साडी नेसणं म्हणजे एक वैताग आहे.' ती मनात म्हणाली. भराभर निर्‍या करून तिने साडीत खोचल्या आणि बाहेर आली.

"अगं काय हे ?? इतका वेळ लावूनही धड साडी नेसता आलेली नाहीये तुला... थांब मी निर्‍या नीट बसवून देते." आईने तिची साडी ठीकठाक केली.

"साडी नेसणं जरूरी होतं का गं आई ? ड्रेस घातला असता तर नसतं का चाललं ?"

वैतागून प्रीती बोलली.

"अगं मुलाच्या घरच्या मंडळीं सोबत त्याची आजी सुद्धा येणार आहे, म्हणून साडी नेसलेली बरी..."

"अजून कोणी ?? काका-काकू, मामा, मावशी येणार नाहीत का ???"

प्रीतीने तोंड वाकडं करून विचारलं. आईने तिचं बोलणं फारसं मनावर घेतलं नाही.


मुळात तिला असं दाखवून घेणं, ठरवून लग्न करणं अजिबात पसंत नव्हतं. पण करणार काय ?? बाबांनी तिला विचारलं होतं, "तू कोणी पसंत केला असशील तर सांग... नाहीतर आम्ही स्थळं बघायला सुरुवात करतो." काही दिवस तिनं त्यांना थोपवून धरलं. पण तिचा चोविसावा वाढदिवस झाल्यापासून त्यांचा आग्रह वाढला होता. आणि अजून तरी ज्याच्याशी लग्न करावंसं वाटेल, असा कोणी तिला भेटला नव्हता. त्यांच्या घरात आज गडबड उडाली होती. पहिल्यांदाच प्रितीला बघायला मुलाकडची मंडळी येणार होती.


पुण्यातील नामांकित कॉलेजातून बी टेक झालेली प्रिती देशमुख, पुण्यातीलच एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सहा महिन्यांपासून काम करत होती. दिसायला चारचौघींत उठून दिसणारी प्रिती, आईबाबांची लाडकी, एकुलती लेक होती. चार दिवस जोडून सुट्टी आल्याने, सध्या ती नगरच्या तिच्या घरी आली होती. नगर मधीलच एका परिचिता कडून तिच्या बाबांना या स्थळाबद्दल कळले होते. मूळचा नगरचा असलेला मुलगा, इंजिनिअर झालेला, एमपीएससीची परीक्षा पास करून मुंबईत सचिवालयात चांगल्या हुद्द्यावर काम करत होता.


दारावरची बेल वाजली. प्रीतीचे बाबा लगबगीने पुढे झाले. "नमस्कार.. या.. या.." मुलाचे वडील नमस्काराला प्रतिसाद देत आत आले. त्यांच्या मागोमाग मुलाची आई, आजी आणि शेवटी मुलगा. प्रीती अवघडून आई जवळ उभी होती. सर्वजण स्थानापन्न झाले. एकमेकांचा परिचय करून घेवून, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, चहा-पोहे झाले. चौकस नजरेने एकटक तिच्याकडे पाहणारी मुलाची आई, प्रीतीला अजिबात आवडली नाही. एखादी मौल्यवान वस्तू विकत घेण्याआधी, ती वस्तू हातात घेऊन, उलट-पालट करून, नजरेपासून दूर, मग नजरे जवळ नेऊन, नीट पारखतात, तसंच त्यांनी शक्य असतं तर केलं असतं, असं प्रितीला वाटून गेलं. मुलाने तिला तिच्या कामाबद्दल काही प्रश्न विचारले. तो बोलत असताना, त्याच्या वाजवीपेक्षा जास्त भरघोस मिशा, बहुतेक त्याच्या नाकात गुदगुल्या करत असाव्यात, त्यामुळे त्याचे नाक आणि मिशांमध्ये लपलेल्या ओठांची होत असलेली विचित्र हालचाल पाहून प्रीतीला मनातून खूप हसायला येत होतं.


त्या दोघांना एकमेकांशी नीट बोलता यावे, यासाठी प्रितीचे वडील सगळ्यांना त्यांची बाग दाखवायला म्हणून बाहेर घेऊन गेले. प्रीतीला पाहायला आलेल्या त्या मुलाने समोरच्या टीपॉय वरचा न्यूज पेपर उचलून तोंडासमोर धरला. पेपरच्या आड त्याची काहीतरी हालचाल सुरू होती. तो नेमका काय करतोय ? हे पहायला काटकोनात बसलेल्या त्याच्या कडे प्रीतीने हळूच वाकून बघितले आणि....ती उडालीच... तो चक्क उजव्या हाताने पेपर धरून, डाव्या हाताच्या चार बोटांनी गुदगुल्या करणाऱ्या त्याच्या भरघोस मिशा विंचरून, सरळ करण्यात गुंतला होता. तिला हसावं की रडावं कळत नव्हतं. त्यानंतर त्याने काय विचारलं? तिनं काय उत्तरं दिली? याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. ते लोक गेल्यावर प्रीतीने आई-बाबांना सरळ सांगून टाकलं की, तिला तो मिशाळ मुलगा आवडलेला नाही.


दोनच दिवसांनी प्रितीच्या आईच्या मैत्रिणीने एक स्थळ सुचवलं.

"प्रीती ! तू परवा परत जाते आहेस ना ? त्या अगोदर काळोखें कडचा बघण्याचा कार्यक्रम करून घ्यायचा का ?" मैत्रिणीने सुचवलेल्या त्या मुलाचा फोटो प्रीतीला दाखवत आईने विचारले.

"कोणाकडचा कार्यक्रम ??"

"अगं! काळोखेंकडचा.."

"या मुलाचं आडनांव काळोखे आहे?? शी.... मला नाही बाई असं आडनाव असलेल्या मुलाला बघायचं..."

तिचं बोलणं ऐकून आईने कपाळावर हात मारला.


सुट्टी संपल्यावर प्रीती पुण्याला परत गेली आणि कामात बुडाली. तिच्या आई-बाबांनी मात्र वरसंशोधन मोहीम चालू ठेवली. दोन-तीन विवाह मंडळांत तिचं नाव नोंदवलं. तीन-चार मॅट्रीमोनी वेबसाइटस् वर तिचं प्रोफाईल टाकलं. त्यांची मोहीम जोरात सुरू होती. पण कुठे प्रितीची पत्रिका जुळत नव्हती, तर कोणाला तिची उंची कमी वाटत होती. कोणाला पोस्टग्रज्युएट मुलगी हवी होती, तर कोणाला एकुलती एक मुलगी सून म्हणून नको होती. सगळं काही जुळून आलंच तर नेमकं प्रिती मुलाला फोटो वरून किंवा काहीतरी खुसपट काढून नापसंत करायची. त्यातून एखादं स्थळ बघण्याच्या कार्यक्रमा पर्यंत पोचलंच, तर मुलाच्या बाबतीत अशा काही गमतीजमती व्हायच्या, की विचारायलाच नको. एकंदरीत काय तर प्रितीच्या लग्नाचा योग काही जुळून येत नव्हता.


अशातच एक सर्व दृष्टीने योग्य वाटावं असं स्थळ एका मॅट्रिमोनी साइटवर प्रीतीच्या बाबांना मिळाले. मंडळी पुण्यातली होती. मुलगा कॅनडात सॉफ्टवेअर इंजिनीयर होता. महिन्याभराच्या सुट्टीवर भारतात येऊन लग्न जमवून परत जाणार होता. मुख्य म्हणजे प्रितीने या स्थळाच्या बाबतीत कुठलीही खोच काढली नव्हती. त्यांनादेखील प्रितीचे स्थळ सर्व दृष्टीने योग्य वाटत होते. बघण्याचा कार्यक्रम ठरला. आई-बाबा नगर हून पुण्याला आले. प्रीती तीन मैत्रिणींसोबत फ्लॅट शेअर करून राहत असल्याने, तिचे आई-बाबा तिच्याकडे न येता प्रभात रोड वर राहणाऱ्या तिच्या मावशीकडे उतरले. कार्यक्रमाच्या दिवशी प्रितीने मावशीकडे येऊन मुलाकडच्या मंडळींकडे जाण्याचे ठरले.


पुण्यातील बावधनमध्ये त्यांचा दुमजली आलिशान बंगला होता. मुलाकडील मंडळींनी तिघांचे छान स्वागत केले. खूप आदरातिथ्य केले. तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ त्यांना आग्रहाने खाऊ घातले. मुलगा सुद्धा चांगला वाटत होता. पण........ प्रीती आणि तो, दोघं बोलत असतान तिच्या लक्षात आलं, तिचे बोलणे नीट ऐकायला यावे, यासाठी तो आपला कान तिच्याजवळ येईल अशा बेताने चेहरा पुढे करत होता. त्यावरून त्याला ऐकायला कमी येत असावे, असा प्रीतीने कयास बांधला. तिने मुद्दाम त्याला हळू आवाजात विचारलं, "तुमच्या कंपनीचे नाव काय?"

"समीर..." मुलाचे उत्तर...

चकित झालेल्या प्रितीने मुद्दामच विचारलं,

"तुमचं गोत्र कोणतं हो??"

"पामेरियन...." (त्याने कदाचित कुत्रं असं ऐकलं.)

"His name is Tuffy...come on Tuff..."

प्रीतीला त्या टफी मध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. तिने तिच्या आईला निघण्याची खूण केली.


मुलाकडच्या लोकांना प्रीती पसंत आहे हे त्यांच्या वागण्यावरून लक्षात येत होते. तिचे आई-बाबा सुद्धा त्यांच्याकडून परत येत असताना उत्साहाने त्यांच्या बद्दल चर्चा करत होते. ती मात्र गप्प होती. रात्री मावशीकडे सगळे एकत्र जेवत असताना, प्रीतीने ही बाब सर्वांना सांगितली. हे ऐकल्यावर तिच्या आईचा चेहरा पडला. बाबा मात्र म्हणाले, "बरं झालं, तुझ्या लक्षात आलं ते..." मावशीच्या जरा खाष्ट असलेल्या सासुबाई म्हणाल्या, "अगं ! बरंच आहे की.... ऐकायला कमी येतं त्यामुळे, तू त्याच्यावर ओरडलीस, शिव्या दिल्यास तरी तो गुमान ऐकून घेईल..." हे ऐकून तिथं एकच हशा पिकला.

"मावशी ! अगं हे बघण्याचे कार्यक्रम मला विनोदी वाटतात. लग्न ठरवण्याचा काही दुसरा मार्ग नाही का?"

"सरळ लव्ह मॅरेज करावं गं..." प्रीतीची मावस बहीण अनुष्का म्हणाली.

"अगं लव्ह तर जमलं पाहिजे ना... लव्ह मॅरेज करण्यासाठी..."

"हो खरंय.." अनुष्काला प्रितीच म्हणणं पटलं.

"माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत घडलेला एक मजेदार किस्सा तुम्हाला सांगते..." असं म्हणून अनुष्का सांगायला लागली,

"माझी ती मैत्रीण, एक मुलगा बघायला गेली होती, मुलगा बर्‍यापैकी गाणं म्हणणारा होता, तो सरळ गिटार घेऊन आला आणि त्याने गाणं सुरू केलं,

'रात कली एक ख्वाब मे आयी...

और गले का हार हुई ...'

बरं गात होता गं, पण गाण्याच्या मधले म्युझिक पिसेस सुद्धा तोंडाने वाजवत होता. टिंग डिंग डँग डँग...असे.. माझी ती मैत्रीण हसू आवरलं न गेल्याने फोन आल्याच्या बहाण्याने मोबाईल हातात घेऊन, उठून बाहेर पळाली." हा किस्सा ऐकून सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली.


दोन-तीन महिने तिच्या प्रोजेक्ट कम्प्लिशन ची गडबड असल्याने प्रीती ने वर संशोधनाचा कार्यक्रम तिच्या आई-बाबांना बंद ठेवायला सांगितला. त्यानंतर मात्र तिच्या आई बाबांनी पुन्हा कसून प्रयत्न सुरु केले. यावेळेस त्यांनी शॉर्ट लिस्ट केलेल्या स्थळांपैकी एक स्थळ पुण्यातील होते. बघायचा कार्यक्रम ठरला. पण नेमकं त्या दिवशी तिच्या बाबांना महत्त्वाचं काम आल्याने त्यांनी प्रीतीला तिच्या मावशी सोबत मुलाकडे जायला सांगितलं.


मावशीच्या घरापासून मुलाचं घर बरंच लांब असल्याने, दोघी लवकर निघाल्या, तरीही ट्राफिक मध्ये अडकल्याने त्यांना ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशीर झाला. मुलाच्या आईने त्यांचे स्वागत केले. काही जुजबी गप्पा झाल्यावर त्या अचानक म्हणाल्या,

"जाम घ्या ना. . तुम्ही तर काही घेतलंच नाही.. "

प्रितीने चमकून, डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहिलं. "जाम ? यावेळी ?? अहो.. पण मी पीत नाही.."

ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. पण लगेच, त्यांनी हात केला त्या दिशेकडे पाहून तिच्या लक्षात आलं, टीपॉयवर गुलाबजाम आणि फरसाण ठेवलं होतं आणि त्यांच्या म्हणण्याचा अर्थ गुलाबजाम असा होता. तिने नकळत एक सुटकेचा निश्वास टाकला.


काही वेळाने त्यांच्या दारावरची बेल वाजली. बाईंनी दार उघडले. दारात साडी नेसलेली, हलकासा मेकअप केलेली एक मुलगी तिच्या वडिलांबरोबर उभी होती. बाई काहीश्या वरमल्या सारख्या दिसत होत्या. मुलाला तर फारच ऑकवर्ड वाटत असावं. नाईलाजाने दोघांना आत घेऊन बाईंनी बसायला सांगितले. प्रीतीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. 'नक्कीच या बाईंनी एकाच दिवशी दोन मुलींना बघण्याचा कार्यक्रम ठेवलेला असणार. आपल्याला उशीर झाल्याने, नंतरची मुलगी मात्र वेळेवर आल्याने, हा घोळ झाला असणार..." तिला कसंसच वाटलं. तिने मावशीकडे बघून निघण्याची खूण केली.


परत येताना दोघींना हसू आवरत नव्हतं, हे सांगायलाच नको.


प्रितीला कळत नव्हतं की, असे विनोदी प्रसंग तिच्याच बाबतीत घडतात का सर्वच लग्नाळू मुला-मुलींना अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागते ?? एक मात्र नक्की... या बघण्याच्या, दाखवण्याच्या कार्यक्रमांना ती विलक्षण कंटाळली होती. तिने निक्षून आई-बाबांना सांगितलं, "आता हे वर संशोधन बंद करा. माझं लग्न व्हायचं असेल तर ते केव्हातरी होईलच. प्रत्येक व्यक्तीसाठी देवाने कोणीतरी जोडीदार बनवला असतोच." तिच्या सांगण्याप्रमाणे आई-बाबांनी तिच्यासाठीच्या वर संशोधनाला पूर्णविराम दिला.


वर्षभरातच प्रितीने तिच्या बरोबर काम करणाऱ्या, एका अनुरुप गुजराथी तरुणाशी लग्न ठरवलं आणि तिच्या मनाप्रमाणे तिचं लव्ह मॅरेज झालं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy