कविता दातार

Others

3  

कविता दातार

Others

गुरुमंत्र

गुरुमंत्र

2 mins
297


आज मी तुम्हाला माझे श्रद्धास्थान, शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या भक्तवत्सलतेबद्दल मला आलेली प्रचिती सांगणार आहे. माझ्या सासरी अध्यात्मिक वातावरण असल्याने, मला देखील लग्नानंतर काही वर्षांतच अध्यात्मिक वाचनाची, नामस्मरणाची गोडी लागली. माझ्या सासऱ्यांना ह्या विषयाबद्दल सखोल माहिती असल्याने, मी त्यांच्या सोबत बर्‍याचदा अध्यात्मिक चर्चा करत असे. चर्चेच्या ओघात एकदा त्यांनी सांगितले, गुरुने दिलेले नाम घेतल्याने, उपासना जास्त चांगली होते. कारण, नाम घेताना आपण विचार करतो, हे नाम आपल्याला आपल्या गुरूने दिले आहे, त्यांची आज्ञा आपल्याला पाळायची आहे. त्यामुळे त्यात अहंकाराचा लवलेशही नसतो. मात्र आपण आपल्या मनाने कुठलेही नाम घेतल्यास आपल्या मनात "आपण नाम घेतो आहोत." असे येते. तो एक प्रकारचा अहंकारच आहे. मी त्यांना विचारले, गुरु कडून नाम घेण्यासाठी काय करावे? त्यांनी सांगितले, काही नियम पाळावे लागतात, जसं मांसाहार, अपेयपान, खोटे बोलणे वर्ज्य करावे लागते. मग गुरूला विनंती करावी लागते, तेव्हा आपल्याला गुरु योग्य ते नाम देतात.


मांसाहार आणि अपेयपानाशी माझा दुरान्वयेही संबंध नव्हता. पण विचारांती लक्षात आले, कधीतरी काही क्षुल्लक कारणावरून, समोरचा माणूस दुखावला जाऊ नये म्हणून, आपण बर्‍याचदा खोटं बोलतो. ते कटाक्षाने पूर्णपणे बंद केले पाहिजे. मग विचार आला, मी शेगावचे श्री संत गजानन महाराजांना गुरू मानलं आहे. त्यांनी समाधि घेतली आहे. ते तर देहावर नाहीत. मग मला गुरुमंत्र कोण देणार? नाम कोण देणार? दोन दिवस मी याच विचारात होते. माझे कशातच लक्ष लागत नव्हते. अशा विचारातच मी रात्री झोपले. रात्री केव्हातरी मला स्वप्न पडले, स्वप्नात माझी गुरु माऊली श्री गजानन महाराज कमरेवर दोन्ही हात ठेवून उभे होते आणि मला म्हणत होते, कळलं का? मी तुला कोणते नाम घ्यायला सांगितले ते? माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, "विठ्ठल विठ्ठल" हसून महाराज अंतर्धान पावले आणि मला जाग आली.


मला वाटलं, गेले दोन दिवस याच विचारात असल्याने, मनाचे खेळ म्हणा किंवा "मनी वसे ते स्वप्नी दिसे" या उक्तीप्रमाणे मला स्वप्न पडलं असेल. नाहीतर माझं एवढं कुठलं पुण्य की महाराज माझ्या स्वप्नात येतील? ही घटना मी काही दिवसांत विसरूनही गेले. नेहमीचे व्यवहार सुरु होते. त्यानंतर साधारणतः पंधरा दिवसांनी शेगावला जाण्याचा योग आला. शेगावला गेल्यावर समाधी दर्शन घेतल्यावर, गादीचे दर्शन घेताना, मी महाराजांच्या पादुकांवर मस्तक टेकले. आणि... काय आश्चर्य माझ्या मनात शब्द उमटले, "मी तुला विठ्ठलाचे नाम दिले होते, लक्षात आहे ना?" मी चमकून पादुकांसमोरच्या महाराजांच्या तसबिरीकडे पाहिले. मनोभावे नमस्कार केला. आनंदाश्चर्याने माझ्या अंगावर रोमांच उठले. डोळ्यांत पाणी आले. गजानन माऊलींनी समाधिस्थ होताना म्हटले होते,"मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच" याची पूर्णपणे प्रचिती मला आली.


त्या दिवसापासून आठवणीने मी रोज थोडावेळ तरी गजानन माऊलींचे आणि विठ्ठलाचे नामस्मरण करते. वेळ मिळाला नाही, तर काम करत असताना मुखाने नाम घेते.


।। गण गण गणात बोते ।।

।।विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल।।


Rate this content
Log in