Milind Rane

Comedy Romance

3  

Milind Rane

Comedy Romance

लग्न गोंधळ

लग्न गोंधळ

1 min
511


माणसाला आयुष्यात काय लागतं. अन्न, वस्त्र, निवारा. यात ऍड करायचं झालं तर लग्न करावं. कारण सध्या ज्या पद्धतीने ऑनलाईन विवाह साईट आणि लग्न जुळवणाऱ्या ज्या संस्था निघाल्या आहेत त्यावरून लग्न जमणं सध्या किती कठीण झालंय हे दिसतंय. पूर्वीच्या काळी लोकांच्या अपेक्षा माफक होत्या. नात्यातला एखादा चांगला मुलगा, मुलगी असेल तर लग्न पटकन जुळवून टाकायचे. नोकरी, घराच्या बाबतीत फार अपेक्षा नसायच्या. मुलगा, मुलगी चांगले असले कुटुंब चांगले असेल तर बाकीच्या गोष्टी दुय्यम असायच्या आणि लग्न वेळेवर पटकन होत.


काळ बदलला मुली शिकू लागल्या चांगल्या कमवू लागल्या. त्यामुळे शिकण्यासाठी करियर करण्यासाठी त्यांना वेळ लागू लागला. लग्नही आताशी उशिरा होऊ लागलीत. मुलींच्या त्यांच्या आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळे  शिक्षण होऊन छोटी मोठी नोकरी असून मुलांना मुलीवाले नापसंत करू लागले आहेत. मुलाची स्वतःची मोठी जागा हवी ही अपेक्षाही वाढू लागली आहे. व्यवसाय  करणारा मुलगा तर मराठी बहुतेक मुलींना आणि त्यांच्या पालकांना नकोसा असतो कारण नोकरीत  जी काय  थोडी फार सुरक्षितता असते ती व्यवसायात  नाही असं त्यांचं ठाम मत. त्यामुळे मराठी माणसात मोठे उद्यजोकच निर्माण होत नाही आहेत.


प्रेम करून लग्न करणारे मोजकेच. कारण शाळा कॉलेजात प्रेम प्रकरण करून लग्नापर्यंत जाणं बहुतेकांना कठीण होतं. कदाचित प्रेम करून कंटाळाही काही जणांना आलेला असतो. त्यातून मनही भरलेलं असतं. मग फॉर अ चेंज म्हणून म्हणा किंवा आई वडिलांचा विरोध नको म्हणून म्हणा प्रेम प्रकरण करत असणारे किंवा करून मोकळे झालेलेही या लग्न स्थळांवर  आपलं नाव लग्नासाठी रजिस्टर करत असतात. आता हे इतक सगळं मी तुम्हाला का सांगतोय, तर नमस्कार माझं नाव सुनील चव्हाण, वय वर्ष २७, उंची :  पाच फूट पाच इंच, गहू वर्ण, शिक्षण : मास्टर इन कॉमर्स - मॅनेजमेण्टमधून, सध्या लॉच्या शेवटच्या वर्षाला आहे. कामाला सध्या पाणी खात्याच्या जुन्या इमारतीत लोक विकास पक्षाच्या ऑफिसच्या ऍडमिनिस्ट्रेशन विभागात ऍडमिनिस्ट्रेशन अँड लीगल असिस्टंट  म्हणून काम करतोय मागील ३ वर्षा पासून. पगार : २५०००/- महिना . स्वतःची  जागा नाही. वडिलांची चाळीत जागा आहे. रिडेव्हलपमेंट चालू आहे . येत्या एक दोन वर्षाच्या आत वन बेडरूम मिळण्याची आशा आहे. एक मोठी बहीण आहे जिचं लग्न झालेलं आहे. कुठे सुयोग्य मुलगी असेल तर सांगा. हे सगळं लोकांना सांगून मी खूप कंटाळलोय . मागच्या तीन वर्षापासून मी हेच करतोय. पण अजून मनासारखी मुलगी मिळाली नाही आहे.


तुम्हाला सांगतो खरं म्हणजे मला लव्ह मॅरेज करायचं होतं. पण मुळात दुर्दैवाने मनासारखी मुलगी प्रेम करण्यासाठी कधी सापडलीच नाही. बरं घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलीला फिरवण्यासाठी ना बाईक होती ना पैसे. वडिलांनी मी कॉलेजमध्ये असताना बरेच रडल्यानंतर त्यांचा बोनस झाल्यावर एक सायकल घेऊन दिली होती. आणि कॉलेजवाल्या मुलाला काहीतरी पॉकेटमनी द्यायला हवा म्हणून महिन्याला फक्त दोनशे रुपये देत होते. आता अशा परिस्थितीत गर्लफ्रेंडला फिरवणं मला परवडणार न्हवतं. तसेच माझ्या नात्यातले जेवढे काका, मामा होते  त्यांची सगळ्यांची अरेंज लग्न झालेली होती. आमच्या नात्यात प्रेम करून लग्न केल्याचा इतिहास नव्हता.


वडिलांनी तर मला स्पष्टच सांगितलं होतं. “प्रेम करून लग्न करायचं असेल तर स्वतःच्या जीवावर वेगळं राहून करावं, आमच्याकडून कुठलीही मदतीची अपेक्षा करायची नाही.” आईने तर कॉलेजमध्ये मी असताना आमच्या नाटकात काम करणाऱ्या मुलीचा फोटो कपडे धुताना माझ्या खिशात सापडलेला तेव्हा मला दमच देऊन ठेवला होता, "मुस्काट फोडेन प्रेमाची लफडी वगैरे करशील तर." त्यामुळे प्रेम करून लग्न करायची इच्छा मनात दाबून लग्न करून मग प्रेम करावं असं मी ठरवलं. पण अरेंज लग्न जमण्यातल्या अडचणी बघितल्या आणि लग्न करूच नये असं वाटू लागलं.


बहिणीचं लग्न झालं आणि मी निश्वास सोडला. बरीच वर्ष तिच्यासाठी मुलगा शोधत होते. पण हिच्या राशीला कुठून मंगळ चिटकला होता माहीत नाही. त्यामुळे मॅडमचं लग्न जमेना आणि हीचं लग्न जमेना म्हणून मला माझ्या लग्नाचा विषय काढता येईना. एकदाचं हीचं लग्न झालं आणि मी बोहल्यावर चढण्यासाठी तयार झालो.


वडिलांनी मला बरोबर घेऊन जाऊन आमच्या मराठा समाजातील एका फेमस वधू वर सूचक मंडळात माझं नाव नोंदवलं. मला फॉर्म भरून द्यायला सांगितला. माझ्या शेजारी एक म्हातारा बसला होता. तो माझा फॉर्म बघत होता. माझं शिक्षण वगैरे वाचून खुश झाला. "लय शिकलं हस"म्हणाला. मी जरा फुशारलो.  पण मग पगार या ऑप्शनवर माझी गाडी अडकली. पगार मोठा नसल्यामुळे मी थोडा घुटमळलो. माझा पगार बघून शेजारचा म्हातारा फिस्कारला. “शिक्षणाच्या मानानं पगार कमी असा. पण  चलात”. “बरेच पोरी असत मंडळात” . वधू वर मंडळातील सभासदांमधील म्हातारा असावा.


सरकारी ऑफिसच्या इमारतीमध्ये आमच्या पार्टीचं ऑफिस असल्यामुळे मी नोकरी रकान्यात सरकारी ऑफिसमध्ये कामाला लिहिले. फॉर्ममध्ये जागा कमी असल्यामुळे बारीक अक्षरात पार्टी ऑफिसचं नाव लिहिलं. पण ते क्लिअर दिसत नव्हतं .पण पुढे जाऊन इथे मोठा घोटाळा होणार याची मला कल्पना नव्हती.


वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवून मी माझ्या लग्नाच्या शोधाशोधीचा श्री गणेशा केला. वधू वर मंडळातून त्यांच्या साईटचा  माझा प्रोफाइल पासवर्ड  मिळाला. मग रोज वेळ मिळेल तेव्हा साईटवर स्थळ शोधायला सुरुवात झाली. बऱ्याच शिकलेल्या सुंदर मुली होत्या. पण त्यांचे जास्त पगार, शिक्षण बघून त्यांना लग्नासाठी कॉल करण्याची हिम्मत होईना. एखादी शिक्षणाने नोकरीने दिसायला बरी मुलगी सापडली तर एकतर तिच्याशी माझी पत्रिका जुळायची नाही. पत्रिका जुळली तर मुलींच्या अपेक्षा बघून डोकं गरगरायचं अपेक्षा पुढील प्रमाणे असत  : “वयामध्ये फक्त दोन वर्षांचाच फरक हवा” .  मी मनात म्हणे वयाने लहानच मुलगा करा इतका फरक तरी कशाला हवा म्हणून लिहितात. “पगार किमान ४०-५० हजार  हवा “. “स्वतःची जागा हवी . सरकारी नोकरी असेल तर उत्तम “. आता अशा अपेक्षा असल्यावर या मुलींना काय कर्म कॉल करून कॉन्टॅक्ट करणार. 


माझे प्रोफाइल बघून काही मुलीवाले आम्हाला कॉल करायचे. सगळ्या गोष्टी ठीक असल्या की आम्ही मुलीवाल्यांना भेटायला जवळच्या एरियातल्या हॉटेलमध्ये बोलवायचो. शक्यतो मुलगी आणि तिच्या एखाद दुसरा निर्णय घेणारा वडीलधारी. जर सगळ्या गोष्टी दोन्ही बाजूनी ठीक असतील तर मग पुढे इतर सगळे नातेवाईकांशी भेट करायची असं आम्ही ठरवलेलं.


मला एक मुलगी आली. फोटोत ती ठीक वाटली. एका रविवारी सकाळी आम्ही त्यांना भेटायला गेलो. हॉटेलमध्ये गेलो मनात धाकधूक. समोरून मुलीवाले आले. मला वाटले मुलगी छान असेल पण सगळा भ्रम निरास झाला. मुलगी खूप काळी होती. फोटोमध्ये तिला उजळ केलेलं होतं. मी फारसं काही बोललो नाही. होकार असेल तर कळवतो सांगून आलो. पहिलीच सुरुवात अशी झाल्यामुळे मन थोडं नाराज झालं. 

वडील मात्र मला बडबडत होते.


“पोरगी शिकलेली आहे. तब्बेतीने धडधाकट आहे. नोकरीला चांगली आहे. घरातलेही चांगले वाटले. पण याला अप्सरा हवी झालीय. चवळीची शेंग हवीय. हाडाची काडं असलेली मॉडेल नखरेल मुलगी संसार करायला कशी चालेल. आजच्या पोरांना काय समजत नाही वगैरे”. मी म्हणालो “घाई कशाला करता आहात ? मुली बघायला आताशी सुरुवात केली आहे” . थोड्या अजून मुली बघू . वडील गप्प बसले.


मग मुलींचे प्रोफाइल बघणं . त्यांना मेसेज, कॉल करणे . आपली पत्रिका, डिटेल्स पाठवणे . आणि शनिवार, रविवार मुलगी पाहायला जाणे चालू झाले . एक एक नमुन्या मुली आणि त्यांचे घरातले आम्हाला भेटायला लागले . बऱ्याच मुली तर एकदम सामान्य ड्रेस घालून . काहीही मेकअप वगैरे न करता सामान्य पद्धतीने येत. त्यांना मुलावाले बघायला येणार आहेत तर नीटनेटकं तयार होऊन जावं हे पण समजत नव्हतं. त्यांच्या डोक्यात असे कि मी जशी आहे तस मला पसंत करावं . तसंच मेकअप केलेलं चांगलं ड्रेसिंग करून गेलेलं मुलावाल्याना आवडलं नाही तर ? म्हणून त्या साध्या पद्धतीने भेटायला येत . त्यामुळे त्यांना बघायला उत्सुक असलेला मी . त्यांना प्रत्यक्ष बघून निराश होऊ लागलो.


काहींचे आई वडील तर डोक्यात जात . एक तर हॉटेल मध्ये माणसांची गर्दी असे . आजूबाजूच्यांना माहीत असे मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू आहे . ते आमच्याकडे टक लावून बघत आणि ऐकत बसत . त्यामुळे मी आधीच नर्व्हस असे . त्यात मुलीचा बाप किंवा एखादा त्याच्या बरोबर आलेला अति शहाणा नातेवाईक डोक्यात जायचा नको ते प्रश्न करून . "किती पगार आहे "? "इतका कमी पगार का ". नोकरी पर्मनंट आहे का "? तुम्ही नक्की काय काम करता ? अजून स्वतःची  जागा का घेऊ शकला नाहीत ".? कधी घेणार ? आई वडिलांबरोबर राहणार कि वेगळं ? एक ना दोन हैराण करणारे प्रश्न करायचे . त्यात त्यांची मुलगी चांगली असेल तर त्यांना चेव चढायचा . मुलीकडे बघून मी बऱ्याचदा मनातला राग दाबून चेहरा हसरा ठेवून शक्यतो बोलण्यात सौजन्य ठेवून उत्तरे द्यायचो , कदाचित होकार देतील असे वाटून . पण मुली वाले प्रश्नांचा किस काढून . मग नंतर काहीच होकार नकार कळवायचे नाहीत.


एकदा तर मुलगी बघायला गेलो . मुलगी इतकी जाड होती कि मला तिला लांबून बघूनच मागच्या मागे पळून जावं असं वाटलं . पण मग वडील मला ओरडले म्हणाले भेटायला बोलवून त्यांना न भेटता जाणे बरोबर नाही .  अजून एकदा  मुलगी बघायला गेलो होतो. मुलगी चांगली शिकलेली , जॉबला ही चांगली होती . दिसायला हि चांगली होती . हॉटेलमध्ये भेटायला गेलो तर तिची  सगळी खानदानी आम्हाला बघायला आली होती . ८-१० माणसे पहिल्या भेटीतच बघायला आली . मी विचारलं इतके जण आलात तर म्हणतात “सगळ्यांना मुलगा बघायचा होता . आणि सगळ्यांचा विचार आम्हाला घ्यावा लागतो”. मी मनातल्या मनात त्यांना दंडवत घातला.


हॉटेल वाले ही असे हरामी बघण्याच्या कार्यक्रमाला जास्त लोक आले कि त्यांना वेगळ्या जागेत बसवत . तिथे तुम्हाला नुसता चहा घेऊन बसता येत नसे . तुम्हाला कंपलसरी नाश्ता किंवा जूस घ्यावाच लागे . पर व्यक्ती कमीत कमी २०० रुपये घेत . आता इतकी माणसे आलेली  . मुलीकडे बघून नाईलाजाने मी बिलाचे १६०० रुपये दिले . मुलीवाल्यानी नंतर होकार नकार काहीच कळवले नाही . इतके पैसे गेले म्हणून वडील मात्र माझ्यावर उखडले . “त्यांची माणसे जास्त होती . तुला बिलाचे पैसे द्यायची काय गरज होती” ? मी मनात म्हटलं . लॉटरी लागेल असं वाटलं होत म्हणून पैसे दिले.


मुली येत होत्या मी बघत होतो . पण मनासारखं काही घडत नव्हतं . नंतर नंतर तर मुलगी कशी ही असावी  होकार देऊन लग्न करावं असं फ्रस्ट्रेशन येऊन वाटू लागलं . बरं काही चांगल्या मुली कोल्हापूर, सोलापूर , सातारा ,सांगली , रत्नागिरीकडच्या मला येत. पण त्या आमच्या तळ कोकणातील नाहीत , जातीतील नाहीत, खाण्या पिण्यात राहणी मानात बराच फरक असतो म्हणून तीर्थरूप नकार देत . त्यामुळे त्या मला पसंत असून पण गप्प राहणे भाग पडे.


अशीच पटकन दोन वर्ष झाली . लग्न जमत नसल्यामुळे नातेवाईक आणि मित्रांनी हैराण करून सोडलं होत . डोकं खराब झालं होत . त्यात विवाह मंडळाने त्यांचा वधू वर मेळावा भरवला होता . मला त्यात जावं म्हणून वडील आणि बहिणीने जबरदस्ती केली . “त्या मेळाव्यात बऱ्याच मुली येतात . समोरासमोर भेटता येते . माहिती मिळते . लग्न पटकन जमतात . तेव्हा तू या मेळाव्यात जा म्हणू लागले” . मी हि जायचं नक्की केलं . नाव नोंदणीसाठी त्यांनी वेगळे हजार रुपये शुल्क माझ्याकडून घेतलं .या मंडळानी तर लग्न जमवण्याचा मस्त धंदाच करून टाकलाय . प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लावायचे . त्या मेळाव्यात किमान १००-१५० मुले आली होती . म्हणजे किती पैसे त्यांनी एका दिवसात कमावले बघा . मी मेळाव्याच्या हॉल मध्ये गेलो बऱ्याच मुली आणि मुले आलेली . मुली खूप सजून वगैरे आल्या होत्या . मनात म्हटलं इतक्या चांगल्या मुली पैकी काही मुलींची स्थळं मला का येत नाही ? कार्यक्रम सुरु झाला . स्टेजवर मुला मुलींची नाव घेण्यात येऊ लागली . प्रत्येकाने स्टेज वर जाऊन स्वतःची माहिती आणि अपेक्षा सांगायची . ज्या आलेल्या सुंदर सुंदर मुली होत्या . त्यांचं शिक्षण, पगार आणि अपेक्षा ऐकूनच मी सर्द झालो . मनात म्हटलं . यांना लांबूनच बघून समाधान मानायचे . हातात काही या येणाऱ्यातल्या नाहीत . मी हि स्टेज वर गेलो . माझी माहिती सांगितली . पण पगार आणि चाळीतील घर यामुळे माहिती सांगताना शरमल्या सारखे झाले .  

हॉल मध्ये नजर टाकली. असं वाटलं गुरा ढोरांचा जसा बाजार भरतो तसाच हा पण एक बाजार वाटू लागला . आई वडील मुलांना या बाजारात घेऊन येतात . आणि मग त्यांचं जुळवून देतात . पशु , पक्षी आपला जोडीदार आपल्या हिमतीवर कला गुंणांवर एकमेकांना आकर्षित करून मिळवतात . पण  माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो आपला जोडीदार जात , दिसणं, शिक्षण, पैसे , जागा , स्टेटस बघून निवडतो . पण चांगला माणूस आपला जोडीदार व्हावा हे कोण बघत नव्हते. मीही त्यातलाच एक ... 


मेळाव्यात बाकी काही नाही पण एक मुलगी मला आवडली . स्वप्ना नरसाळे . शिक्षिका होती . शिक्षण नोकरी या मध्ये आमचं जमत होत . मी तिचा प्रोफाइल नंबर नोट करून ठेवला होता . मी तिला मेसेज करून ठेवला . मी माझ्या रोजच्या कामात बिझी झालो . स्वप्नाला मेसेज करून ८-१० दिवस झाले होते . एके दिवशी तिच्या वडिलांचा मला फोन आला . आम्ही एकमेकांच्या पत्रिका आणि डिटेल्स एकमेकांना पाठवल्या . सुदैवाने तिची आणि माझी कुंडली जमली . तिचे घरातले भेटायला तयार झाले . माझ्या मनात धाकधूक वाढली . मला हवी तशी मुलगी इतक्या वर्षात पहिल्यांदाच भेटायला येत होती . मी वडिलां बरोबर तिला बघायला गेलो . ती छान साडी घालून बऱ्यापैकी मेकअप वगैरे करून आली होती . सुंदर दिसत होती . मी तिला पाहातच राहिलो.


आमचं बोलणं झालं . त्यांना त्यांचा होकार नकार कळवायला सांगितला. दोन दिवसानंतर त्यांचा फोन आला . त्यांचा होकार आला . मी तर उडालोच . इतकी सुंदर मुलगी माझी बायको होणार . मी तर हवेत तरंगू लागलो . मनातल्या मनात देवाचे आभार मानले . मनात म्हटलं देवाने उशिरा ऐकलं . पण मनासारखी मुलगी बायको म्हणून दिली . 

पुढे जाण्या आधी मला तिला पर्सनली भेटून आधी तिच्या होकाराची खात्री करायची होती . मी तिला भेटायला बोलावलं एका शनिवारी सकाळी . आम्ही हॉटेलात भेटलो . ती छान ड्रेस घालून आली होती . तिला बघतच राहावं असं मला वाटू लागलं . हॉटेलातले वेटर पण तिला बघत होते.


आम्ही एकमेकांकडे बघून हसलो . एकमेकांच्या  घरातल्यांबद्दल बोललो . आवडी निवडी बद्दल बोललो . ती चाळीत माझ्या आई वडिलां बरोबर राहायला तयार होती . मग एकमेकांच्या नोकरी वरती विषय आला . तीने बी एड केलं होत . सेट परीक्षेची ती तयारी करत होती .एका खाजगी शाळेत ती शिक्षिका म्हणून कामाला होती . बोलता बोलता ती म्हणाली तुम्ही गव्हर्मेंट ऑफिस मध्ये कामाला आहात ना ? मी स्वप्ना माझी बायको होणार या आनंदात समोरच्या प्लेट मधलं सॅन्डविच चवीने खात होतो . मी तिला खाण्याच्या नादात हो म्हणालो मी गव्हर्मेंट ऑफिसमध्ये काम करतो म्हणालो . तिचा ताबडतोब पुढचा प्रश्न आला . "किती वर्ष झाली गव्हर्मेंट सर्विस मध्ये लागून "?. मी सॅन्डविच खात होतो . तिचा प्रश्न ऐकून सॅन्डविच माझ्या घशात अडकले . मला ठसका लागला . ती खुश होऊन पुढे बोलली “मला कधी वाटलं नव्हतं गव्हर्मेंट सर्विस मध्ये कामाला असलेला मुलगा मला मिळेल” . “आमचे भावजी पण सरकारी नोकरीत कामाला आहेत” . आता माझ्या लक्षात आले यांचा गैर समज झाला आहे कि मी सरकारी नोकरीत कामाला आहे . मी तिला हळूच विचारलं . “तू आणि तुझ्या घरातल्यानी मला पसंत केलं ते फक्त मी सरकारी ऑफिस मध्ये कामाला आहे म्हणून का “? ती लाजली आणि मान खाली घालून हसत म्हणाली . “तसंच काही नाही . पण सरकारी नोकरीमुळे आम्ही तुम्हाला पहिलं प्रेफरेन्स दिलं “.  

झालं मी मनातल्या मनात माझ्या कपाळावर हात मारून घेतला . सरकारी ऑफिसमध्ये आमच्या  पार्टीच  ऑफिस असल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता . देवाने मोठ्या संकटात मला टाकलं होत . मनासारखी मुलगी बायको होणार होती . स्वप्नाला कसंही करून हातून जायला द्यायचं न्हवत . मला ती खूप आवडली होती . पण त्यासाठी मला खोटं बोलावं आणि वागावं लागणार होतं.


माझ्यासमोर मोठा पेच निर्माण झाला होता . खरं सांगायचं तर स्वप्ना हातातून जाणार आणि खोटं बोलायचं तर मोठी रिस्क होती . काय करावं तेच समजेना. 

याच टेन्शन मध्ये मी दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये बसलेलो असताना आमच्या पार्टी ऑफिसचा हेड अजितने मला बघितल. मी त्याला सगळा प्रॉब्लेम सांगितला . तो म्हणाला हे बघ मनासारख काही मिळवायचं असेल तर सरळ मार्गाने मिळतेच असे नाही .मी त्याला म्हणालो “अरे पण हा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे . माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे . उद्या फसवणूक केली म्हणून बदनामी झाली तर ? पोलीस केस झाली तर? . सगळीच वाट लागेल . परत उद्या लग्ना नंतर तिला कळलं तर तिच्या घरातल्यांच्या आणि तिच्या समोर माझी काय इज्जत राहील.” 


त्याने शांत पणे ऐकलं . “काही होत नाही . एकदा लग्न झाल्यानंतर कळलं तर काय होणार . बडबडतील आणि गप्प बसतील . थोडंसं निर्लज्ज व्हायचं . ऑफिसमध्ये ऐकतोना बॉसचं तसंच . या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडायचं . एक मात्र लक्षात ठेव. लग्नानंतर बायको पहिल्या सहा महिन्यात प्रेग्नन्ट राहिली पाहिजे एवढं बघायचं . मग बायको आणि तिच्या घरातले बडबडून गप्प होतील . सॉरी बोलायचं . तू चांगला शिकलेला आहेस . पुढे मागे चांगली पोस्ट पगार मिळेल . मग काही बोलणार नाहीत . तुमची मोठी जागाही आता होईल म्हणजे तो प्रश्न हि मिटेल “.  

“अरे पण माझ्या आई वडलांना कळालं कि मी खोटं बोलतोय तर ?” . तो म्हणाला “आई वडलांना सांगायचं गप्प बसायला . सांगायचं लवकर सुंदर नातं, नातू बघायचा आहे ना ? इतकं पुरेसं आहे” तो हसला . मी त्याला म्हणालो “अरे हे झालं लग्नानंतरच लग्नापूर्वी ते चौकशी करतील . ऑफिस मध्ये येतील मग काय करायचं”? . तो म्हणाला ” नॉट टू वरी . आपलं ऑफिस सरकारी कार्यालयात आहे . तू काम करताना सरकारी ऑफिस मध्येच दिसणार . येणाऱ्याला वाटणार तू सरकारी कर्मचारी आहेस. मी तुला एक डुप्लिकेट गव्हर्मेंट आय कार्ड बनवून देतो . तिच्या कोणी नातेवाईकाने बघायला मागितलं तर दाखवण्यासाठी . काम झालं कि फाडून फेकून दे . सेम सॅलरी स्लिपच करून देतो स्टॅम्प वगैरे मारून . बाकी बघायला येतील तेव्हा आधी सांग . आपली पार्टीची माणसं सेटिंग लावून उभी करतो . तू सरकारी कर्मचारी आहेस आणि इथे काम करतो हे त्यांना आपली माणसे पटवून देतील”.


तो पुढे म्हणाला “अरे घाबरू नकोस मीही असच लग्न केलं . थोडे दिवस ती आणि तिच्या घरातले नाराज होते पण मग मुलं झाली आणि मी पार्टी ऑफिस मध्ये काम करून लोकांची काम करून चांगले पैसे कमावतो . मोठी जागा, गाडी घेतली . आता बायको आणि सासरचे खुश आहेत माझ्यावर . थोडी रिस्क घ्यावी लागते भावा” . “हे साले अमराठी व्यावसायिक बघ . कसे खोटे बोलतात. सरकारला, बँकेला फसवतात . कोर्ट कचेरी करतात . किती बदनामी होते . पण हजारो कोटी कमावतात मजेत राहतात आणि उजळ माथ्याने समाजात वावरतात. लोक त्यांच्याबद्दल बोलतात आणि त्यांच्याच कंपनीत काम करतात. त्यांच्याकडे डोनेशन मागायला जातात . आपण साले मराठी घाबरून राहतो आणि गरीबच राहतो . शिकलो पाहिजे त्यांच्याकडून आपण”.  “तू तर फक्त मुलीवाल्यांचा गैरसमज थोडे दिवस कायम राहण्यासाठी खोटं बोलणार आहेस ". "त्यांच्या मुलीचं वाईट थोडी होणार आहे  त्यामुळे " 

त्याच्या बोलण्याने मला थोडी हिंमत आली .


लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कडून आठ दहा माणसे आली . मी आत्मविश्वासाने वावरलो आणि बोललो . मी तिच्या नातेवाईकांना पटवून दिल मी सरकारी नोकरीत आहे . आणि माझ्याकडच्यांना अस बोलण्यातून भासवलं माझं ऑफिस सरकारी कार्यालयात आहे . माझं ऑफिस सरकारी कार्यालयात असल्यामुळे आणि मी सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेजारच्याच रूम मध्ये बसत असल्यामुळे कोणाला जास्त संशय आला नाही . तिचे वडील आणि काही नातेवाईक मला काही दिवसांनी माझ्या ऑफिस मध्ये येऊन भेटून गेले . अजितला मी ते कधी येणार हे आधी सांगितल्या मुळे त्याने सगळीं सेटिंग करून ठेवली . त्यामुळे तिच्या घरातल्याना कुठलाही संशय आला नाही.


लवकरच आमचा साखरपुडा झाला . पुढच्या महिन्यात लग्न होत . आता मी आणि स्वप्ना रोज खरेदीच्या निमित्ताने भेटू लागलो . ती खूप खुश होती . मी हि खुश होतो . पण मनात अपराधाची भावना होती . भीती वाटे . अधे मध्ये तिला आडवळणाने मी खरं सांगायचा प्रयत्न केला . पण  मी तिला खरं सांगू शकलो नाही . यामध्ये एक आनंदाची गोष्ट झाली . आमच्या चाळीतल्या जागेवर मोठी इमारत होऊन आम्हाला वन बेड रूमच्या फ्लॅटची चावी मिळाली . आम्ही खूप खुश झालो स्वप्ना आणि तिच्या घरातले ही . माझे आईवडील बोलू लागले . “पोरीचा पाय गुण  चांगला आहे . आम्हाला मोठी रूम योग्य वेळी मिळाली”.


पण सुखाला अचानक दृष्ट लागावी . किंवा खोटं कधी तरी बाहेर येतच तस झालं . आणि माझ्या येऊ घातलेल्या सुखाला ग्रहण लागलं. 

स्वप्नाचे दोन नंबरचे मामा त्यांच्या कामा निमित्त माझ्या ऑफिसच्या शेजारी आले होते . होणाऱ्या जावयांना भेटावं म्हणून मला भेटण्यासाठी ते आमच्या ऑफिसच्या सरकारी इमारतीत आले , नेमकं त्या वेळी त्यांच्या गावचा एक मुलगा जो आमच्या पार्टीचा कार्यकर्ता होता . तो गावाहून काही कामा निमित्त आमच्या पार्टीच्या ऑफिस मध्ये आला होता . तो त्यांना आमच्या ऑफिसच्या बाहेर भेटला . त्यांचं जुजबी बोलणं झालं आणि “तू इथे कसा”? असं मामानी त्याला विचारलं . त्याने पार्टीचं ऑफिस इथे आहे आणि पक्षाच्या कामासाठी आलो असल्याबद्दल सांगितलं . मामा बोलले इथे सरकारी ऑफिस आहे . त्याने सांगितलं हो सरकारी ऑफिस आहे . पण सत्ताधारी पार्टीच्या ऑफिसला इथे भाड्याने जागा दिलेली आहे . इथे आमच्या पार्टीचं ऑफिस देखील आहे . नेमका मी आणि अजित तिथे त्या दिवशी नव्हतो.


मामा गोंधळले त्यांनी आपल्या गाववाल्या मुलाच्या मदतीने सगळी चौकशी सरकारी कार्यालयात आणि पार्टी ऑफिस मध्ये केली . त्यांनी असे भासवले कि ते पक्षाच्या कामानिमिताने आले आहेत . आणि माझ्याकडे त्यांचे काम आहे . सगळी चौकशी केल्यानंतर त्यांची खात्री झाली कि मी सरकारी नोकरीत कामाला नसून सरकारी कार्यालयात सत्ताधारी पार्टीच्या ऑफिसच्या ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट मध्ये काम करतो. मामानी ही बातमी स्वप्नाच्या वडिलांना दिली . आणि मग तिच्या घरातल्यानी आमचं लग्न मोडल्याच माझ्या घरी ताबडतोब कळवलं .  

या गोष्टी मुळे आता पुढे काय करायचं मला काही कळेच ना ? माझ्या घरी तर आई, वडील, बहिणीने मला बडबडून हैराण करून सोडलं . वडील तर मला खूप ओरडले, "चव्हाणांच्या पिढ्यान मध्ये कोण असं वागलं नव्हतं . पण तू मात्र चव्हाणांना व्हानेनें मार खाण्याची आज  वेळ आणली आहेस. आमची लाज घालवलीस . आता आम्ही लोकांना काय सांगायचं , कस तोंड दाखवायचं ?”


मी स्वप्नाला कॉल करत होतो . मेसेज करत होतो. पण ती माझा कॉलही घेत नव्हती कि माझ्या मेसेजला रिप्लाय हि देत नव्हती . शेवटी मी तिच्या घरी फोन केला. तिच्या वडिलांनी उचलला. मी त्यांची माफी मागितली , म्हटलं मला स्वप्नाशी बोलायचंय . तिचे वडील भडकले . म्हणाले “खोटारड्या माणसाशी तिला आणि आम्हाला बोलायचं नाही आहे . आम्ही तुमच्याशी संबंध तोडले आहेत . आता  तुमच्याशी तिचं लग्न होणं शक्य नाही . उगाच तिला त्रास देऊ नका . नशीब समजा तुमच.  आम्ही तुमची पोलीस तक्रार केलेली नाही आहे . पण जर तुम्ही तिला कॉल करणे , मेसेज व भेटण्याचा प्रयत्न करणं बंद केलं नाही तर मग आम्हाला तुमची तक्रार पोलिसात करावी लागेल” . असे बोलून त्यांनी फोन ठेवला .


मी मग पुढचे १५ दिवस स्वप्नाशी कुठल्याही प्रकारे संपर्क करायचा प्रयत्न केला नाही .  आमच्या लग्नाला १५ दिवस बाकी होते . काय करायचं कळत नव्हतं. शेवटी माझी बहीण मला बोलली  “जे झालं ते झालं . शेवटचं स्वप्नाशी आणि तिच्या घरातल्यांशी बोल . तयार आहेत का बघ लग्नाला . नसेल तर सर्व नातेवाईकाना लग्न मोडलं म्हणून कळवावे लागेल” .


मी रविवारी सकाळी स्वप्नाच्या घरी निघालो . जाण्यापूर्वी गणपतीच्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं . देवाला म्हणालो “तूच काय तो मार्ग दाखव यातून” .  

स्वप्नाच्या  रूमची बेल दाबली . बऱ्याच वेळाने दरवाजा उघडला गेला . समोर तिचे भावजी होते . मी हसलो म्हणालो “थोडा वेळेसाठी शेवटचं स्वप्नाशी आणि तुम्हा सर्वांशी बोलायचं आहे” . त्यांनी दरवाजा उघडला . मी आत गेलो . घरात तिचे आईवडील , बहीण होते . तिचे वडील मला पाहून ओरडले . “मी तुम्हाला येऊ नका म्हणून सांगितलेलं” .


स्वप्नाचे भावजी म्हणाले “बाबा त्यांना शेवटचं थोडंसं आपल्या सर्वांशी बोलायचंय . त्यांना बोलू द्या मग ते जातील” . 


मी स्वप्ना कुठे आहे विचारलं . तिच्या बहिणीने तिला दोनवेळा हाक मारल्यावर ती बेड रूम मधून रडत बाहेर येऊन दरवाजाजवळ उभी राहिली . मी तिला बघितलं तिचा चेहरा खूप उतरला होता .तिची अवस्था  बघून मला माझाच राग- आला . मी तिला आधीच खरं सांगायला पाहिजे होत . निदान तिची अशी अवस्था तरी झाली नसती . 

मी बोलायला सुरुवात केली . पण शब्दच तोंडातून निघेना . मी थोडा घाबरतच तिला सॉरी म्हणालो . अचानक स्फोट व्हावा तशी ती माझ्या जवळ रागाने आली आणि ती ने माझ्या कानाखाली मारली . माझ्याकडे जळजळीत नजरेने बघत मला म्हणाली . “तुम्हाला खरं सांगायला काय झालं होत ? खोटं बोलताना, फसवताना काहीच वाटलं नाही का “? 


मी थोडा वेळ शांत राहिलो . मग तिला म्हणालो . “तू मला हक्काने मारलंस त्या मुळे बरं वाटलं . “आज २-३ वर्ष मुली बघतोय . लग्न जमत नव्हतं. कमी पगार, चाळीत घर म्हणून. अचानक तुझं स्थळ आलं आणि ध्यानी मनी नसताना तुमच्या कडून होकार आला. मी फसवलं नाही . माझा विचार हि तसा न्हवता . गैर समज  तुमच्या कडून झाला. मी गव्हर्मेंट मध्ये कामाला आहे असा . तुझ्या सारखी चांगली मुलगी माझी बायको व्हावी ही इच्छा होती . तुला हातातून जायला द्यायचं न्हवत . म्हणून मी फक्त तुमचा गैरसमज कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. फक्त तुम्हाला खुश ठेवता यावं म्हणून. त्यासाठी मी काही चुका केल्या त्या मला मान्य आहेत. मी तुला सांगायचा प्रयत्न केला. पण नाही सांगू शकलो. सतत भीती वाटायची. तू मला  कायमची दुरावशील  म्हणून घाबरायचो. मी शिकलेला आहे . चांगल्या घरातला आहे. आता मोठं घर हि झालंय . उद्या पुढे मागे चांगला पगार, नोकरी , पोस्ट मिळेल हि मला . पण तुम्हाला जर मी आधीच सांगितलं असतं मी गव्हर्मेंट मध्ये कामाला नाही तर तुम्ही मला नक्कीच नाकारलं असतं. नाकारलं असतंच असं नाही तुम्ही नाकारलंच आहे. सगळं माझ्याकडे असूनही. फक्त सरकारी नोकरी नाही म्हणून”…… 


मी थोडा वेळ थांबलो आणि तिला म्हणालो. “तू मला म्हणालेलीस मी जर एल एल बी चांगल्या मार्कांनी पास झालो तर मी तुला आवडलेले कानातले रिंग्स गिफ्ट म्हणून द्यायचे. मी घेऊन आलोय तुझ्यासाठी. माझी शेवटची भेट. प्लीज नाही म्हणू नकोस”. मी बॉक्स टेबल वर ठेवला . “माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास मनस्ताप होतोय त्या बदल मला जमलं तर क्षमा करा . मी तुम्हाला कुठला ही त्रास या पुढे देणार नाही “. मी तिच्या घरातल्याना नमस्कार केला . आणि निघालो .  


मागून स्वप्नाचा आवाज आला “मला एकदा तरी खरं सांगायचं होत . खोटं किती दिवस टिकणार होत” . मी तिच्याकडे बघून तिला म्हणालो. “खरं सांगितल्या वर तू लग्नाला तयार झाली असतीस “? ती म्हणाली “एकदा सांगून तर बघायचं होत?  नकारच दिला असता असं कस समजलात. मी शांतपणे तिच्याकडे बघितलं . “तुला आता सगळं खरं सांगितलंय . करणार आहेस माझ्याशी लग्न ?” . घरात सगळीकडे शांतता पसरली . तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली “या पुढे असं खोटं पुन्हा बोलणार नसाल तर हो” . तिच्या घरातले हसले. स्वप्ना पण माझ्या कडे पाहून हसली . सासरे थोडे तळ्यात मळ्यात होते . पण मग तिच्या बहिणीने आणि जावयानी त्यांना समजावल्यावर ते लग्नासाठी तयार झाले . 


आमचं लग्न झालं . मित्रानो नशीब चांगलं म्हणून सगळं ठीक झालं . पण ज्या मुलांची लग्न व्हायची आहेत त्यांना माझा प्रेमळ सल्ला त्यांनी असं काही करून लग्न जमवण्याच्या फंद्यात पडू नका . आणि बर का आताच आपापले प्रोफाइल आणि फॉर्म चेक करा . काही गोंधळ होण्यासारखं लिहिलेलं नाही ना ? पुढे जाऊन माझ्या सारखं व्हायला नको . माझं कसबस झालं तुमचं होईलच असं समजू नका .... समजलं ना ? नमस्कार . 

 

                            ..... समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy