STORYMIRROR

संजन मोरे

Others

4.9  

संजन मोरे

Others

मसण्या

मसण्या

6 mins
23.3K


त्याचं जग वेगळं, आपलं जग वेगळं.

ओढ्याच्या मोळवाणावर अनेक पालं पडलेली बघीतली. नंदीवाले, डोंबारी, डवरी गोसावी, कांजारभटं, लमाणी, नेवाती. रोज गाढवा घोड्याची बिऱ्हाडं बघत शाळा शिकलो. ही भटकी जमात. प्रत्येकाची एक एक तऱ्हा. त्यांच्या बायका, पोरं पोरी, त्यांची भांडणं, खाणं पिणं, त्यांच्या शिकारी. दरवर्षी नित्यनेमाने येणारी बिऱ्हाडं तर गाववाल्यांच्या जवळीकीची झालेली असतात.

मसण्या पहिल्यांदा दिसला, त्यावेळी शाळकरी पोरगा होतो.

" ये रे..."

एक विचित्र अशी खरखरीत, पत्र्यावर खिळा ओरखडावा तशा आवाजात आलेली हाक. चड्डी ओढत दारापर्यंत बघायला पळंत गेलो, अन आंगणात भुतासारखा उभा असलेल्या मसण्याला बघून दरादरा घामेजून गेलो. पाय जड होवून भुईला चिकटले. पाठीमागून आई येईपर्यंत मी डोळे पांढरे केले होते. आईनं मला पदराखाली लपवले.

ती आठवण अन तो मसण्या.

कितीदा तरी स्वप्नातून भेदरून, किंचाळत उठलो असेन.

"मुडदा बशीवला त्या मसण्याचा...."

माझ्यावरनं मीठ मिरच्या, काळा केस उतरुन आई चुलीत टाकायची. सोबत तोंडाचा पट्टा चालूच. किती वेळा आईने मसण्याचा मुडदा बशीवला असेल, गिणतीच नाही. केसाचा जळका वास, मिरच्यांचा ठसका अन मिठाचं चुलीत तडतडणं. हे सगळं बाल मनावर कोरलं गेलं होतं. मसण्या तर असा जणू भुतानं घाबरावं. अवतारच होता त्याचा तसा. एक तर ही जमात या आधी कधी बघीतली नव्हती. मसण्या पहिल्यांदाच गाव मागायला या गावात आला होता.

काळा कुळकुळीत, डोक्याच्या जटा वाढवून शंकरासारखा बुचडा बांधलेला, त्यावर वासुदेवाच्या टोपीसारखा टोप, टोपाला मोराची पीसं , पितळी देव. हातभर दाढी. मिशांचं पांजरान.

अंगात पायघोळ अंगरखा, त्यावर शाल, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, डोळ्यात काजळ, कपाळाला शेंदराचा टिळा, तोंडाला भस्म, काखेत झोळी अन हातात ती माणसाची भितीदायक कवटी. दुसऱ्या हातात घंटा, दुसऱ्या काखेत अडकलेला शंख.

मसण्यानं डाव्या हातानं घंटा वाजवली, मग जोरात शंख फुंकला, मग

" ये रे..."

अशी जोरदार आरोळी दिली.

" आई मसण जोगी आलाय दारात. भिक्षा वाढ.

वेल मांडवाला जावू दे, घर भुता खेता पास्नं दुर राहू दे..."

मसण्यानं आशिर्वाद दिला. भिक्षा घेवून, दुसर्‍या घरी भिक्षा मागायला निघून गेला.

मी झोपेतून किंचाळून उठायचो. मला मसण्याचीच स्वप्ने पडायची. मसण्या, बाहेरचं पण बघायचा. भुत बाधा, करणी, भानामती. मलाही मसण्या कडं न्हेलं होतं. गावाच्या बाहेर, मसणवट्यात एक वडाचं झाड होतं. कावळ्याचं झाड. झाडाखाली मसण्याचा पसारा. गाडगी मडकी, पीठाचा डबा, तीन दगडाची चूल, बाचकी बोचकी. निवाऱ्यासाठी तशी एक झोपडी होती त्याला, पण सगळा संसार उघड्यावरच. पांढरे शुभ्र दात पुढे आलेली काळीकुट्ट बाई, मसण्याची बायको होती. तुकतुकीत अंगकांतीचं वरुट्यासारखं गुटगुटीत पोरगं होतं त्याला.

तीन दगडाच्या चूलीवर नेहमी कसली तरी शिकार शिजत असायची. झाडावरचे कावळे त्याच्यावर टपून असायचे. मसण्याने टाकलेल्या खरकट्यावर तुटून पडायचे. मला न्हेलं तेंव्हा मसण्या घाटावर अंघोळीला गेला होता. मसण्याची बायको भाकरी थापत होती. मसण्या स्वच्छ होवून आला तेंव्हा, तो जटाधारी साधू पुरुषासारखा दिसत होता. ह्या मसण्याला बघून भिती पळून गेली. मसण्याचं पोरगं स्मशानातल्या मातीत खेळत होतं.

आईनं मसण्याचा पायावर डोकं ठेवलं. मला वाकवलं. मसण्याचे दयाळू डोळे माझ्यावर खिळले. तो विश्वासाने हसला.

" स्कूल जाते हो...?"

मसण्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारले. मी नुसतीच हो म्हणून मुंडी हलवली.

"भिती वाटते...? कशाची..?"

"भु...भुताची.... अंधाराची...."

"भुत प्रेतसे नही डरना... इन्सान से डरना.."

"अंधेरेसे नही डरना.. अंदर के कालेपण से डरना."

माझ्या कपाळाला विभुती लावत मसण्या म्हणाला.

"यहा आके सबका डर खत्म होता है, फिर भी डर लगे तो शंकर भगवान को याद करना. भुतो प्रेतों के देव, देवों के देव है वो.... "

"सारा डर खत्म हो जायैगा. "

तेंव्हा पासून मसण्या कधी गावात दिसला तर पुन्हा कधी भिती वाटली नाही. मसण्यामुळे मी लवकर मोठा झालो. भितीची भुतं हद्दपार झाली.

मसण्या... मसण जोगी. स्मशानात राहणारा, स्मशानात खाणार पिणारा. स्मशानाचा रखवालदार. ढासळलेली जळती लाकडं सरळ करतो , अर्धवट उघडं पडलेलं जळकं प्रेत पुन्हा आत सारतो. प्रेत एकटंच असतं. तो नेहमी बघतो. माया करणारे, टाहो फोडून, धाय मोकलून रडणारे, सगळेच सरण तडतडू लागलं की मुसमुस करत घराकडे निघून जातात. मग प्रेत एकटं उरतं. अंगभूत ज्वालांनी लपलपत, भडकत राहतं, रसरसत, शेवटपर्यंत धुमसत राहतं.

मसण्या बघतो सगळं. चूलीसाठी पेटतं लाकूड घेवून जातो, त्यावेळी त्या प्रेताला

चार शब्द सुनावतो. मसण्याने झाडावर एकही खारुटी ठेवली नाही. मयत नसेल, भिक्षा मागायची नसेल तेंव्हा मसण्या शिकारीला निघतो. रस्त्याच्या कडेच्या, रंगवलेल्या सरकारी झाडावरून खारुट्या सरसर खाली येत असतात. मसण्या च्या नजरेला पडायचा अवकाश, कोवळी, लुसलुशीत शिकार पडलीच म्हणून समजा. कधी खेकडे, कधी मासे. कधी एखादं मांजर. कधी वैदूंची, रामोश्यांची कुत्री असतील तर बिळातल्या घोरपडी, खोकडं.

जळत्या प्रेताच्या उजेडात तो जेवत बसतो, कधी चिलीम फुलवून तारेत प्रेताशी गप्पा मारत राहतो. कुठणं आंध्रातून आला होता की बंगाल मधून कुणास ठाऊक ? कधी हिंदी बोलायचा तर कधी न समजणारी कोंगाडी भाषा बोलायचा. कुठल्या परग्रहावरनं आल्यासारखं गावात मसणजोग्याचं एकच कुटूंब होतं ते. त्याच्याकडे कुणी पावणा रावळ, सोयरा धायरा आलेला गावाने कधी बघीतला नाही . नाही म्हणायला एक दाढीवाला मुसलमान मदारी त्याच्याकडे नेहमी यायचा. दोघेही गांजाचे शौकीन. मदारी शहरात पाल ठोकून राहायचा. येताना पिवर पाला घेवून यायचा. गुडगुडीनं प्यायला मजा यायची. छापी, चिलमीपेक्षा मसण्याला ते बरं वाटायचं.

मदारी साप गारुडी होता. रानात जंगलात फिरायचा. बिळं, वारुळं धुंडाळायचा, आश्शील नाग उकरून काढायचा. पिशवीत टाकायचा. जीवावरचं काम. जनावर जेवढं तेज, तेवढा खेळाला रंग. आजकाल माणसाच्या हातातनं पैसा सुटत नाही. सापा मुंगसाच्या लढाईनं लोकांची करमणूक होत नाही. हात चलाखी, नजर बंदी, नेहमी काहीतरी नवीन खेळ दाखवायला लागतात. रक्त ओकून जमुरा तडफडताना लोकं बघतात, भितीचं गारुड उभं राहतं, तेंव्हा कुठे देव भोळे लोक ताबीज विकत घेतात. ताबीज घेतला तरच धंदा. नाहीतर उधळलेल्या चार आठ आण्याने काय होणार ?

माणसाची हाडे लागतात, कवटी लागते. अजगर, साप, मुंगूस, फणा काढणारं आश्शील जनावर लागतं. माहौल उभा करावा लागतो. बासरीवर माणसं डोलवावी लागतात, तेंव्हा कुठं धंदा होतो.

मसण्याचंही तसंच, कितीही भितीदायक रुप घेतलं तरी एकदा माहीत झाल्यावर माणसं किती भिणार ? भिक्षा किती वाढणार ? मग विंचू पकडायचे, कापडाच्या बोळ्यावर दंश करायला लावून नांग्या निर्विष करायच्या. असे विंचू जटेत दडवून ठेवायचे, पिशवीत विरोळा धरुन ठेवायचा. मग हात चलाखीने दगडाचा विंचू, दोरीचा साप करायचा, काखेतून जिवंत पाल काढायची, मदाऱ्याचं शिकून नजरबंदीचे खेळ करायचे. मंत्र तंत्र म्हणायचे, भिती घालायची. भितीपोटी माणूस भिक्षा जास्त वाढतं.

मदाऱ्याचं जीवावरचं काम. जनावर तसंच सांभाळता येत नाही. पोराबाळांना कधी डसेल सांगता येत नाही. फक्त दात पाडून उपयोग नसतो. ब्लेड ने चिरुन विषाची पिशवी काढावी लागते. विषारी दात उपटून काढावे लागतात. जनावर जखमी होतं. जखम बरी होईपर्यंत तेल पाणी पाजावं लागतं. तेंव्हा कुठं ते खेळायला तयार होतं, पण कायमचं अधू होवून जातं. शिकार करता येत नाही. आठ दिवसातून एकदा पाणी पाजायचं, पंधरा दिवसातनं एक अंडं खलून नरड्यात सोडायचं. कसं तरी जगत राहतं बिचारं !

ना वतन ना घर दार. गावात कधीतरी मयत होते. मग चिता जाळायची, राखाण करायची. तिसऱ्या दिवशी नातलग येतात. मसण्या राखेची पूजा करतो, आरती म्हणतो. पन्नास शंभर दक्षिणा मिळते, राखेत एखादा मणी, वितळलेलं जोडवं, अंगठी कधी चुकून माकून सापडली तर सापडते. येवढ्यावर आयुष्य कसं चालणार ? काम ना धंदा, ना शेत ना पाणी. कसं चालणार ?

"गुप्त धनासाठी लोक विचारतात. करणी, भानामती, कोंगामती साठी लोक येत असतात. मोठा गंडा घालून पसार व्हायचं ? लांब निघून जायचं ? मदाऱ्याला मांडीचं हाड हवय, आपल्याला एक नवी कवटी. हल्ली माणसं दफन केली जात नाहीत. जाळली जातात. प्रेताचे काही नाही, माणसाची भिती वाटते."

वल्ली बाळंतीण मेली तर तिला जाळत नाहीत. पुरतात. आठ दिवस लक्ष ठेवायचं. जास्त दिवस झाले की हाडे ठिसूळ होवू लागतात. आठ दिवसांत मांस गळू लागतं. प्रेत उकरायचं. मुंडकं तोडायचं केस कापून खड्ड्यात टाकायचे.खड्डा बुजवून टाकायचा. आळ्या वळवळत असतात, किड्यांची बुजबुज झालेली असते. गळाला मुंडके लावून खोल पाण्यात टाकुन द्यायचं, गळ दगडाला बांधून ठेवायचा.पाळत ठेवायची. सात आठ दिवसात फक्त कवटी उरते. खेकड्या माशांनी सर्व खावून टाकलेलं असतं. कवटी स्वच्छ धुवायची.मग तेल, शेंदूर लावून वापरायला तयार. जोखीम आहे. मदाऱ्याला जरा जास्त जोखीम. मांडीचं हाड लागतं ना ?

" सापडलो तर जिवंत जाळतील, झोपडी पेटवतील. बायको, पोरगं ?"

" त्या पेक्षा नकोच कवटी !"

" प्रेताची भिती नाही... माणसाची भिती वाटते."

नवीन कायद्यामुळे मदाऱ्याचा धंदा बसला. तो दुरच्या मुलखात निघून गेला.

मसण्या मग गावातच राहिला. वरवंट्यागत पोरगं हात दोन हात झालं. मसण्याला घरकुल मिळालं, पोराला शाळा.

मसण्या माणसात आला, माणूस झाला......


Rate this content
Log in