शांतव्वा
शांतव्वा
गावाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या ST च्या खिडकीतून डोकावले तर पाटलांचा चिरेबंदी वाडा नजरेस पडायचा. मोठ-मोठ्या दगडी विटांनी बांधलेल्या भिंती, त्यात हे भले मोठे सागवानी दार. गावातील मंडळींसोबत गुजगोष्टी करण्यासाठी विटांनी बांधून घेतलेली बैठक व्यवस्था आणि त्यावर शेणाचा सपका. दारासमोर सारवलेले आंगण, तिथे रोज न चुकता शांतव्वा पहाटेच्या वेळेस रांगोळीची सुबक नक्षी उमटवत असे. पाटलांचा वाडा गावाची शान होता. दारातून आत आल्यावर तुळशीवृन्दावन होते. वाड्यात दूधदुभती जनावरं देखील होती. गाय आणि तिचे वासरू, दोन म्हशी, पाच सहा शेळ्या. किसन पाटील म्हणजेच दाजी. आई वडिलांच्या पश्च्यात मेहनत करून तीस एकर शेती, जनावरे कमावली होती. शेतीच्या कामात स्वतःला पूर्णपणे त्यांनी झोकून दिले होते. प्रगत शेतीबद्दलचे धडे ते गावातील तरुण पिढीला देत होते. विहिरीतील मुबलक पाणी , बागायत जमीन आणि आई वडिलांच्या आशीर्वादसोबतच वरुणराजामुळे शेतीला बरकत होती.
पहाटेच्या निरव शांततेमध्ये शांतव्वा काही तरी गुणगुणायची. तिला साद देत गोठ्यातल्या गाई, म्हशी त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज करत. त्यामुळे सारा आसमंत उजळून निघायचा. शांतव्वाच्या लहानपणी तिच्या आईचे ते मधाळ गुणगुणणे तिच्या स्मरणात होते. त्यानंतर डोक्यावरचा पदर हा सावरत एका हाताने जळण चुलीत घालायची तर दुसऱ्या हाताने फुंकरीच्या साह्याने चूल पेटवायची. मग गोटा साफ करून दूध काढायला घ्यायची. हि सर्व कामे आटोपल्यावर डोक्यावर भाकरीचं गाठोडं घेऊन सूर्य माथ्यावर येण्याच्या आत नागमोडी वळणाचा रास्ता पार करून अर्धा मैल चालत शांतव्वा रान गाठायची. सांजवेळी तुळशीसमोर हात जोडून जेव्हा ती उभी असायची तेव्हा लुकलुकणार्या दिव्यातून येणारा पिवळसर मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडल्यावर ठसठशीत मोठं कुंकू कपाळावर लावणारी शांतव्वा लक्ष्मीसारखी प्रतीत व्हायची.
वयाच्या पंधराव्या वर्षीचं शांतव्वाचं लग्न झालं होतं. शांतव्वाच्या घरची परिस्थिती हि बेताचीच होती. पाच खाणारी तोंडं. पाटलाचं स्थळ चालूनच आलं होतं म्हणून शांतव्वाचे हात पिवळे केले. दाजी म्हणजे शरीराने दणकट, नेहमी पांढरे धोतर आणि झब्बा घातलेला ,डोक्यावर फेटा, सरळ टोकदार नाक ,निमुळते ओठ आणि गालापर्यंत आलेल्या मिश्या, यामुळे दाजी रुबाबदार दिसायचे आणि या दाजींसोबतच शांतव्वाची गाठ बांधली गेली. कमी वयातच मोठी जबाबदारी तिच्यावर पडली होती तरी हि ती पूर्ण श्रद्धेने सर्व काही करायची. शांतव्वा सुरवातीला त्यांना घाबरायची पण नंतर हळू हळू त्यांचा स्वभाव तिला समजत गेला. तिला शिकायची आवड होती. चुलीत जेव्हा चिटोऱ्या, फाटलेले कागद ती घाले तेव्हा दाजीच्या नकळत त्यात काय लिहलं आहे हे वाचायचा ती प्रयत्न करायची. लग्नाला आठ वर्ष झाले होते तरी पण पाळणा हलला नव्हता. शांतव्वाने बरेच उपास केले. नवस बोलले तरी पण काहीच झाले नाही. अलीकडच्या काळात दाजी शांत शांत राहू लागले होते. त्यांची चीड चीड होत असे पण ते शांतव्वाला काही बोलत नव्हते. पण तिला त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसत होते ते. मुलं नसल्याचं वैफल्य दिवसेंदिवस गडद होत चाले होते. सकाळी वाड्यातून बाहेर पडल्यावर भर उन्हांत रानातील कामे करून विश्रांतीसाठी दाजी आमराई मध्ये जात असत. दूरवर पसरलेली झाडे त्याला लटकलेले मोहर. त्यामुळे शिवारात एक सुवास दरवळत होता. मधून मधून माश्या गुंजारात होत्या. त्या गर्द सावलीत आणि निरव शांततेत दाजींचे भणभणारे डोके थोडे शांत व्हायाचे.
असेच दिवस जात होते. एके दिवशी शांतव्वाच्या माहेरवरून सांगावा आला. तिच्या भावाच्या म्हणजेच सुख्याच्या पोराचं बारसं होतं. ती आनंदाने हुरळून गेली. एवढ्या दिवसानंतर माहेरवरून बोलावणं आलं होतं. सुसाट वारा यावा त्यात बेभान पाऊस पडून जावा आणि त्यातच सैरावैरा धावणाऱ्या वासरासारखे तिचे मन माहेरच्या चौकटीवर येऊन धडकले आणि ढगांच्या कोपऱ्यातून सूर्य किरणांनी कानोसा घ्यावा तसं तीच मन बालपणीच्या आठवणींचा कानोसा घेत होतं. माता यशोदेने लोण्याचा गोळा लहान्या श्री कृष्णाच्या हातावर ठेवल्याने प्रफुल्लीत मुद्रा करून बागडावे तसे शांतव्वाचे मन बागडत होते. ओढ्याच्या पलीकडे शांतव्वाचं माहेर. सुख्या हा शांतव्वाच्या पाठीवरचा. लहान पोरांचा तिला लळा होता. शांतव्वाला भाऊ झाल्यावर अख्या गावात तिने पेढे वाटले. आपल्या भावाला ती खाऊ पिऊ घालायची, अंघोळ घालायची. त्याच्या हनुवटीला धरून त्याचा भांग पाडायला तिला खूप आवडायचे. प्रेमाने सर्व काही करायची. सुख्याच्या पोरासाठी तिने चांदीचा करदोडा आणि भावा आणि वहिनींसाठी आहेर घेतला. आज त्याच भावाच्या पोराच्या बारशाचा सांगावा आला होता. दुसऱ्या दिवशी सगळी कामं उरकल्यावर सकाळच्या बसने माहेरी जाण्याचा रास्ता तिने धरला.
गावाची सर्व मंडळी खोपट्याजवळ जमली होती. एकीकडे बाया जेवण बनवण्यात मश्गुल होत्या तर आलेल्या बायकांना हळदी कुंकू तारा देत होती. तारा म्हणजे शांतव्वाची चुलती. तर एकीकडे पुरुष मंडळी सरपंचासोबत गप्पा मारण्यात मग्न होते. खोपटीला रंगरंगोटी केल्यामुळे जुनीच खोपटी नव्याने भासत होती. कार्यक्रम चालू व्हायाला अजून बराच अवधी असल्यामुळे अंगणांतच पारिजातकाच्या झाडाखाली गोदा पोराला खेळवत बसली होती. गोदा म्हणजेच शांतव्वाची वाहिनी. शांतव्वा बाजूलाच चपल काढून पोराला डोळं भरून बघू लागली. पोराने सुख्याचा मुखडा घेतला आहे म्हणून मनोमन शांतव्वा खुश झाली. पोतडीतून आणलेलं सर्व सामान बाहेर काढत गोदाच्या हाती सुपूर्त केले. मायेने दोघांच्याही चेहऱ्यावरून हात फिरवून स्वतःच्या डोक्याला लावत कडा कडा बोटं मोडली. बाप झाल्याचा आनंद सुख्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. शांतव्वा तिथून उठून खोपटीत कामाला हात भार लावायला गेली. तिची पाट वळाल्यावर गोदाने काही क्षणांतच आक्रोश करायला सुरुवात केली. तिच्या आवाजाने खोपटीतील सर्व लोक आता अंगणात जमा झाले. तिच्या पोराने डोळे पांढरे केले होते. सर्दीमुळे त्याच्या अंगात ताप होता. घरातील उपचारामुळे दोन दिवस अंगावरच काढले होते. ताप त्याच्या डोक्यात जाऊन त्याने डोळे पांढरे केले. ह्या सर्व बाबींचं खापर मात्र शांतव्वाच्या माथी मारलं गेलं. "झंझोटी ,पांढऱ्या पायाची माझ्या पोराला खायला आलीस का इथं?". गोदाचे हे शब्द ऐकून शांतव्वाचं काळीज चर्र चर्र झालं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. लहानपणी जिच्या हातचे दोन घास खाल्याशिवाय गुपचूप न बसणाऱ्या सुख्याने आज त्याच हाताला धरून त्याने सर्वांदेखत फरफटत शांतव्वाला बाहेर काढत ह्या घरची पायरी चढू नकोस बजावले. एका क्षणात त्याने तिला परके केले. जात्याच्या दोन दगडी पाटा एकमेकांवर घासून डाळीचे चिथडे व्हावे तसं तुकडे तिच्या काळजाचे झाले.
रवी ताकात घुसळावी तसं अनेक विचार शांतव्वाच्या मनात घोळत होते. डोळ्यांत आसवे घेऊन जड अंतकरणाने तिने सासरकडची बस पकडली. कंबरेत जोराची लाथ कुणी तरी मारावी आणि सगळं अवसान गळून पडावं अशी तिची अवस्था झाली होती. भावाने केलेल्या अपमानाने ती कोलमडून गेली. घडलेला प्रकार तिने दाजींना सांगितला नाही. शांतव्वाच्या अवस्थेकडे बघून तिच्या माहेरी काही तरी झालेलं आहे हे दाजींनी हेरलं. राना वनात वणव्याने घेतलेल्या आगीत भस्म होऊन पडलेल्या पाचोळ्यासारखी शांतव्वा रात्रभर तळमळत राहिली. माहेरचा एक आधार होता आता तो हि तुटला.
तिथून आल्यावर शांतव्वाच्या डोक्यात काही तरी शिजत होते, दाजींना बोलायचं कसं याचा विचार ती करत होती. सकाळी जेवण झाल्यावर पाण्याचा तांब्या दाजींना देत शांतव्वा म्हणाली ,"थोडं बोलायचं हुतं बोलू का "?. दाजी तिच्याकडे न बघताचं बोलत होते ," मंग , बोल कि कुणी अडवलं हाय ". दाजी आपल्या भारदस्त आवाजात बोले. शांतव्वा नरमाईने घेत बोलू लागली," नाय म्हटलं आपल्यास्नी पोर बाळ होइनात तवा म्यास सवत आणायचा इचार करावा". शांतव्वा तिच्या हृदयावर दगड ठेवतच दाजींना बोलत होती. तिच्या आवाजात समजुतदारपणा वाटत होता आणि धन्याची काळजी तिच्या बोलण्यात प्रखरपणे जाणवत होती. त्यांचं सुख कशात आहे हे तिला कळून चुकले होते. नवऱ्याचं सुख ते आपलं सुख असं मानून चालणारी भाबडी शांतव्वाच ती. शांतव्वाच्या काळजाला लागलेली जखम अजून भरली नव्हती. दाजी शांतव्वाच दुःख समजू शकत होते पण त्यांचाही नाइलाज होता. तिचं पोरा बाळासाठी झुरत राहणं दाजी उघड्या डोळ्याने बघण्याखेरीस काहीच करू शकत नव्हते.
तिच्या प्रश्नाने निरुत्तरीत होतं चेहरा लालबुंद करत राग-रागात फेटा घेऊन झप झप ढांगा टाकीत दाजींनी रानात जायचा रास्ता धरला. रागात बाहेर पडलेल्या दाजींच्या वागण्याचा अर्थबोध शांतव्वाला समजत नव्हता. रानात गेल्यावर दाजी आमराईमध्ये जाऊन एका झाडाच्या सावलीमध्ये आपला देह जमीवर टाकत हाताची त्रिकोणी घडी डोक्याखाली घेत झाडाच्या फांद्यामधून दूरवर पसरलेल्या आभाळात त्यांची नजर गेली. ते शांतपणाने विचार करत होते. आपल्याला मुल बाळ होत नाही ह्यात दाजींचा दोष आहे हि गोष्ट त्यांनी शांतव्वापासून लपवून ठेवली होती. दुसरं लग्न केल्याने त्यांचा प्रश्न सुटणारा नव्हता. त्या गोष्टीचे संपूर्ण ज्ञान त्यांना होते. दाजींचं शांतव्वावर खूप प्रेम होतं. दाजी विचारांच्या कोशात अडकत चाले होते.
हृदयाला बोचणाऱ्या काट्यांवर मात करण्यासाठी दाजींनी एक योजना आखली. वाड्यावर आल्यावर दाजी डोक्यावरचा फेटा काढत शांतव्वाला बोलू लागले, "ये अस्सं समोर माझ्या". शांतव्वाला दाजी आता मायेने बोलत होते. शांतव्वाने मानेनेच नकार दर्शवला. तसे दाजी हसायला लागले. दाजी अनपेक्षितपणे समोर येताच मागे जाणारा पदर लगबगीने पुन्हा डोक्यावर घेतला. पण तिने आपली नजर जमिनीवर रोखली होती. शेवटी शांतव्वाच्यासमोर उभे राहत दाजी तिला बोलू लागले, "तुला लिवया वाचया लयं आवडतंय ठावं हाय म्यास्नी. आपल्या वाड्यातील मांजर कसं च्वारुन दूध पितया तसं तुला च्वारुन वाचितांना कीत्यानंदा बघितल्या म्या”. शांतव्वाची चोरी पकडली गेली म्हणून ती डोक्यावरचा पदर कपाळापर्यंत घेत खांदे गालापर्यंत घेऊन जात मान हि कासवासारखी आणखीनच आत घेऊन दाजींपासून चेहरा लपवण्याचा भाबडा प्रयत्न करू लागली. मनांत असलेले शल्य आणि कोलाहल दाजी शांतव्वासमोर मांडत बोले, “आपल्यास्नी पोर बाळ होत नाय यात तुझा काय बी द्वाश नाय. समदा द्वाश माझ्यात हाय.” तशी शांतव्वाची नजर दाजीच्या नजरेला भिडली. शांतव्वाच्या नजरेतून तिची होणारी घुसमट,बैचेनी दाजींना पिळवटून टाकत होती. एवढे दिवस सोसलेले शिव्या शाप कुणाकडे हि त्याचे गराहने न करता एकटी कण्हत राहिली शांतव्वा. एवढ्या वर्षांची खंत उरी बाळगून असणाऱ्या दाजींनी आपले दोन्ही हात जोडत शांतव्वाकडे माफीची याचना केली आणि ओक्सबोक्शी रडू लागले. तिच्या डोळ्यांतून हि घळा घळा पाणी वाहू लागले. शांतव्वाने आपले दोन्ही हात दाजींच्या हातावर ठेवत मोठया मानाने त्यांना माफी दिली. पुढे दाजी बोलत होते, “दुसऱ्यांदा लगीन केलं तर गाव तोंडात शानं घाललं ते येगळंच पण तुला अंतर द्यायचं माझ्या बाप जन्मात व्हायाचं नाय बघ.”. हे ऐकताच ती मनोमन सुखावली. आता स्वतःला सावरत दाजी दृढ निश्च्याने बोलत होते, “म्या काय तरी ठरवलं हाय. तु पुढलं शिकशान घ्यावं आणि गावचा इकास करावा असं म्यास्नी वाटतया. तुझ्या पाठीस म्या भक्कमपण उभा राहीन”. तिच्या अश्रूंचा बांध कधीच तुटला. आई वडील निवर्तल्यावर दाजींना शाळा सोडून पोटा पाण्यासाठी शेतीची कामं करावी लागली होती. दाजी चवथी पास होते. ते स्वतः शिकले नाहीत पण आज शांतव्वाला शिकायची आण घालून तिला पाठींबा देणार होते.
तिच्या ध्यानी मणी नसणारे असे काही तरी विचार दाजींकडून येतील असं तिला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. दाजींवर तिची परमेश्वरा इतकीच निष्ठा असल्यामुळे दाजी जे सांगतील ते पडत्या फळाची आज्ञा मानत पुढच्या शिक्षणाचा श्री गणेशा केला. गावातील मास्तरलाच दाजीने वाड्यावर बोलावलं. शांतव्वासाठी एक शाळा वाड्यावर भरणार होती. घराचा उंबरठा हा फक्त विहिरीतील पाणी उपसण्यासाठी ओलांडला जावा हि समजूत फोल ठरवत शांतव्वाने मात्र सुटलेली पाटी पेन्सिल परत एकदा हातात घेतली होती. आपल्यासोबत गावातील बायकांनीही शिकायला हवे हि भावना तिला शांत बसू देत नव्हती. बायकांना शिकता यावं म्हणून तिने दाजी आणि मास्तरांच्या मदतीने 'रात्र शाळा' सुरु केली. सकाळी शांतव्वा जे काही शिकत असे तेच ती 'रात्र शाळेत' शिकवत असे. विधार्थिनीपासून एका शिक्षिकेमध्ये तिचे रूपांतरण झाले होते. एकीकडे दाजी गावातील पोरांना प्रगत शेतीचे धडे देत होते तर एकीकडे शांतव्वा शिक्षणाचे धडे गिरवत होती. तिला आता हळू हळू शिक्षणाचे महत्व पटू लागले होते. शांतव्वा आता मॅट्रिक पास झाली होती.
गावातील मुली शहाण्या झाल्या किंवा पैशाअभावी किंवा कुण्या श्रीमंताचं स्थळ चालून आलं कि मग लगेच त्यांचं लग्नाचं बघायचं. जे वय मौजमजा करण्याचं असतं त्या बालवयात त्यांच्यावर प्रौढत्वाच्या ओझ्याचा हंडा देत संसाराच्या दावणीला बांधून टाकलं जायचं आणि शिक्षणाची ओढ हि कागदावर येण्याआधीच तो कागद चुरगळा जायचा. शांतव्वा गावातील बायकांचे , मुलींचे मन वाचत होती. त्यांना मोकळेपणाने बोलता यावं म्हणून शांतव्वाने गावातच 'मुक्तांगण वर्गा’ सोबतच 'साक्षरतेचे वर्ग' सुरु केले. गावातील बायकांना शिक्षणाचे धडे देऊ लागली. गावातुन शिक्षणाच्या सभा ह्या शांतव्वा , दाजी आणि मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली होत होत्या. ‘गिरवू अक्षर, होऊ साक्षर’, 'मुलगी शिकली प्रगती झाली', 'शिक्षण जर घेशील मुला ज्ञान थोर करेल तुला','हट्ट नको वंशाच्या दिव्याचा हट्ट हवा साक्षरतेचा' , असे आणि बरेच घोषवाक्य पाटलांच्या गावात ऐकू येऊ लागले. शांतव्वा मात्र गावातील बायकांसाठी आणि मुलींसाठी सावित्रीबाई फुले झाली होती. शब्दांची एकमेकांशी घातलेली सांगाड व त्यांचा नेमका अर्थबोध ती शिक्षणातून देऊ लागली. विचारांची अक्षरधारा ज्ञानगंगेच्या रूपात गावामध्ये झेप घेऊ लागली होती. शिक्षणासोबतच हळू हळू हुंडा बळी , बालविवाह कसे थांबवता येतील याकडे सुद्धा लक्ष देत असताना बायकांना त्या गोष्टीचे महत्व पटवून देऊ लागली.
दोघांनीही आपल्या दुःखाला कवटाळून न बसता त्यातून एक मार्ग काढला. शिक्षणामुळे शांतव्वाच्या दुःखावर फुंकर मारली गेली होती. गाव, गावातील माणसं, बायका, लहान पोरं आपली मानून त्यांच्या प्रगतीकडे लक्ष दयायला त्यांनी सुरुवात केली होती. आज दाजी आणि शांतव्वामुळे गाव हा खऱ्या अर्थाने सम्रुद्ध आणि विकसनशील झाला होता. आपल्या कष्टाच्या दौलतीमधून दाजींनी आणि शांतव्वाने अनाथ पोरांना दत्तक घेतले होते. गावा गावात शांतव्वासोबत दाजींचे नाव हि अभिमानाने घेतले जाऊ लागले. आता त्यांच्या गावा व्यतिरिक्त इतर गावाच्या बायका - पोरी शिक्षण घेऊ लागल्या होत्या. खऱ्या अर्थाने गावचा विकास झाला होता. शिक्षणाच्या हिमतीवर शांतव्वाने दुनियेला जिंकले होते आणि त्याचमुळे समाजाने तिला आता नावे न ठेवता तिची पाठराखणच केली होती.
वृषाली सुनगार-करपे