महिलादिन विशेष अलक
महिलादिन विशेष अलक
मुक्त
दुपारच्या जेवणाची भांडी आवरता-आवरता शीतलने विचारले-
"सासूबाई, आज सायंकाळी मी मैत्रिणीसह झिम्मा सिनेमाला जाऊ का?रात्री 10 वाजेपर्यंत परत येईन."
" रात्रीचा स्वयंपाक, मोठ्या सासूबाईंचे जेवण आणि औषधे शिवाय बबलूचा अभ्यास या सर्व गोष्टी व्यवस्थित होतील का? मी देखील महिलादिनाच्या कार्यक्रमासाठी बाहेर जाणार आहे. तेव्हा तुझे तू ठरव."
असे बोलून सासूबाई तयारी करण्यासाठी निघून गेल्या.
-------------------------------------------------
कर्तव्य
महिलादिनानिमित्त दिलेल्या सवलतीमुळे आज हॉटेलमध्ये खुप गर्दी होती.
रात्रीचे अकरा वाजले तरी कमलाबाईंपुढे खरकटया भांडयाचा ढिग पडतच होता.पटापट हात चालवून कमलाने काम संपविले आणि लेकरांसाठी उरलेले अन्न घेऊन झपाझप पावले टाकत घराकडे निघाली.
चालताना ती विचार करत होती की आज हॉटेलमध्ये महिलांचीच संख्या जास्त का होती.
-------------------------------------------------
प्रश्न
रेस्टोरंट मालकांनी आज वेळेच्या आधीच कमलाला घरी जाण्यास सांगितले.
जाताना तिला आवश्यक असलेले मिक्सर ,मुलांसाठी खाऊ आणि वह्या-पुस्तके दिली . कमलाने सर्व वस्तू घेतल्या पण ती विचारात पडली की आज या वस्तू का दिल्या असतील.
तिची प्रश्नार्थक मुद्रा पाहून मालकांनी तिला
महिलादिनाच्या शुभेच्छा देऊन सन्मान केल्याचे सांगितले.
महिलादिन' म्हणजे काय असा असा नवा प्रश्न घेऊन ती बाहेर पडली.
--------------------------------------------------
हास्य
महिलादिनाच्या शुभेच्छा देणारे बैनर्स ,बोर्ड्स खिडकीतून तिला स्पष्ट दिसत होते. त्यावरील स्त्रिया अतिशय गोड हसत असल्याचे दाखवले होते.तीही (तुच्छतेने) हसली अन चेहऱ्याची रंगरंगोटी अधिकच भडक कशी करता येईल यात मशगूल झाली.
---–---------------------------------------------
निर्भया
महिलादिनानिमित्त केलेल्या दिवसभरातील धमालीच्या सुगंधित आठवणी घेऊन ती धावतच शेवटच्या लोकलमध्ये चढली. आनंदाच्या भरात डब्यात आपण एकटेच आहोत याकडे तिचे लक्षच गेले नाही.
इकडे आईबाबा तिची वाट बघत जागेच होते.
त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की त्यांची लाडकी
लेक अत्याचाराला बळी पडेल.
--------------------------------------------------