लोकलकमधील माणुसकीचा मृत्यू कधी
लोकलकमधील माणुसकीचा मृत्यू कधी
मुंबई – (१७ डिसेंबर) दर महिन्यात मुंबई लोकलच्या बाबतीत काही बातम्या सातत्याने येत असतात. त्यात ‘लोकलमधून पडून मृत्यू’, ‘लोकलमधून पडून प्रवासी जखमी’ या विषयांच्या बातम्या अधिकच असतात. प्रत्येक माध्यमांतून बातमी वेगवेगळ्या पध्दतीने सादर केली जाते. पण, मुंबई लोकल अन प्रवाशांचा मृत्यू हा विषय मात्र नेहमीचा झाला आहे. इतका नेहमीचा की मी तर म्हणतो अशा बातम्यांचा ढाचासुध्दा माध्यमांकडे तयार असेन. तसंच आपल्या सामान्य जनतेचेसुध्दा होऊ लागलं आहे. अशा बातम्या आल्या की वाचणं, हळहळ करणं, श्रध्दांजली वाहणे, आपल्या ओळखीचे जवळचे नाही ना, याची खात्री करून झाली की, एक दीर्घ उश्वास टाकून पुढे आयुष्य चालू ठेवणं हेही नेहमीचे झालं आहे. यात जनतेची काही चूक आहे असेही म्हणता येणार नाही. याचं कारण, मुंबईत जनतेच्या आयुष्याचे ध्येयच आहे ‘वेग आणि आपापलं काम’.
आयुष्यात रोज आपल्याला कुठेतरी वेळेत जायचंय, अन मग त्यासाठी कितीही कोणतेही धाडस करायला लागो. रोजच तसे करणारे लोक ईथे तुम्हाला मिळतील. रस्त्यावरील गाडी चालकांना पादचारी त्यांचे शत्रु वाटतात. पादचारी लोकांना त्यांच्या पुढे चालणारे लोक शत्रु वाटतात. प्रत्येकाला फक्त आधी जाण्याची घाई. जसे, रस्त्याचे तसेच लोकल ट्रेनचेही आहे. सगळ्यात प्रथम ट्रेनमध्ये चढण्यासाठी लोटालाटी. मग, ट्रेनमध्ये जागा मिळवण्याची धडपड, ज्यांना बसायला जागा मिळत नाही त्यांची उभं राहण्यासाठी धक्काबुक्की सुरू होते. हे रोज नेटाने लाखों लोकांच्याबाबतीत घडते. लाखो लोक रोज यातून जातात, अन आपल्या ठरल्या ठिकाणी सुखरूप पोहोचतात. अन काही मात्र अनंताच्या प्रवासालाच निघून जातात.
हे सगळं का घडतं, कशामुळे हे सगळं थांबेल, यावर उपाय काय? याबद्दल कोणाला आता काहीच विचार करावासा वाटत नाही. विचार करून तरी उपयोग काय? एकूणच महाराष्ट्र असो किंवा मुंबई असो मूलभूत गोष्टी इथे प्रचंड चिघळल्या गेल्या आहेत. सगळी वाट लागून गेली आहे. अन, परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की त्यावरील उपाययोजना करणंच आपण सोडून बसलो आहोत. गर्दीशी स्पर्धा करता करता इथल्या माणसाला स्वतःलाच स्वतःचे मोल किंचितही महत्वाचे वाटत नाही. आपला जीव आपल्यालाच प्यारा राहिला नाही. असला तरी त्याच्या कोणत्या गरजा पूर्ण करायच्या कोणत्या नाही या बाबत आपण पुरते गोंधळून गेलो आहोत. अन, ह्या लोंढ्या-लेंढाऱ्यांच्या प्रश्नांना बगल देण्याचा सोपा उपाय येथील गर्दीने शोधून काढला आहे, तो म्हणजे या गर्दीने सगळ्यांमधून आधी माणुसकीलाच संपवून टाकले.
माणुसकीला संपवल्यामुळे वरच्या परिच्छेदात सांगितला तो सगळा संघर्ष मुंबई लोकलमधून रोज व्हायला लागला. लाखो लोकांना तो अंगवळणी पडला. अन, धडाडत्या ट्रेन्समधून गर्दीत माणुसकी गुदमरू लागली. अगदी रोजच्या रोज नेटाने. अगदी कोणाकडे विकत जरी तुम्ही मागितली तरी ही माणुसकी मिळणार नाही. या जीवघेण्या स्पर्धेमुळे प्रत्येक इथल्या माणसांत अहंभाव निर्माण होऊन डूख धरून बसू लागला. अन, मग त्याचं भरणपोषण माणसांकडून सुरू झाले. अन, ते पूर्ण करण्याची एक माध्यम म्हणून लोकलचा वापर होऊ लागला. या संघर्षाला चिथावणी लोकलमधून मिळत जाते. छोट्या-छोट्या कुरबूरी ते हातापायीवर येणारी भांडणे. उर्मट भाषणे, लाखोल्या वाहणे हे ही त्याच संघर्षाचे द्योतक ठरतात.
या सर्व गोष्टींवर उपाय काय? उपाय करायला गेलं तरी इथल्या सामान्य जनतेच्या हातात काहीच शिल्लक नाही. काहीच लोकांना करता येणं शक्य नाही. तशी ईच्छा अनेकांची होत असावीच. पण अमलात मात्र कोणी करणार नाही. लोकलमधून जाताना, लटकताना फक्त एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर दोष देत ढकलत गेलं की झाले. याच एका प्रकाराने आत्मसमाधान लोक करून घेतात. अन गप्प बसतात. अगदी परत सगळं जसे सुरू असते तसेच ते सुरू ठेवतात. आयुष्य पुढे जात राहते. कोणाचे कोणावाचून अडत नाही. धक्के बसले तरी त्याचा वापर पुढे जाण्यासाठीच केला जातो. विषण्ण वाटत नाही असे नाही, हतबलता येतेच. कंठ दाटतो. मनात अन पोटात गोळा येतोच. पण यातील काहीच आता लोक बाहेर पडू देत नाहीत. सगळीच जणू प्रतिक्रियाहीन होऊन बसलेत.
काही जंतरंमंतर होऊन मग हे सगळे सुधारले जाईल असा साऱ्यांचा समज. पण आतल्या आत प्रत्येकाला माहित आहे की कोणताच चमत्कार होणार नाही. तर, या गोष्टींवर फक्त विचार करूनही नुसतं होणार आहे का? यावर खरोखरच मोठ्या आणि ठोस उपाययोजनांचीच गरज आहे. लोकांनी हट्टाने एकमेकांचा विचार माणुसकीय दृष्टीकोनातून करायलाच हवा. प्लॅटफॉर्मवर उभं राहण्यापासून ते इच्छित स्थळी पोहोचण्यापर्यंतचा हा संघर्ष थांबवायला सजगता जागवली पाहिजे. दंडणीय अपराधीपणाची भावना माणुसकी सोडून वागणाऱ्यांच्या मनात, डोक्यात जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत या गोष्टी आटोक्यात येणं शक्य होईल असे वाटत नाही. प्रत्येक माणसाने हे ठरवायला हवे, यासाठी कठोर असे दंडविधानाची अमलबजावणी होणे आवश्यक आहे. लोकल म्हणजे आपलं घर कुणीही समजत नाही. याचे कारण आपापल्या घरातील लोकांना कधी कोणी मृत्यू येईल असे वर्तन करेल का? मग, तीच भूमिका आपण लोकलमधील प्रवाशांसाठी दाखवली तर! याच्यामुळे आपल्यातून मेलेल्या माणुसकीचाच कदाचित पुर्नजन्म होईल.