केमिस्ट्री
केमिस्ट्री


मेढेकर बाई ...
अजब रसायन
नवीनच शाळेत जॉईन झालेल्या
कोणालाच फारशी माहिती नाही त्यांच्याबद्दल
सायन्स शिकवायच्या
शिकवलेलं झिरपायचं आत आत खोलवर
शाळेतून पास आऊट झालेला विद्यार्थीही शिकवलेलं सायन्स कायमचं बरोबर घेऊन जायचा.
शिकवलेलं न येणाऱ्याला वर्गात उभं करून डोकं पोखरून काढत असतं
"येत नाही म्हणजे काय?
आईबाप काय गोटया खेळायला पाठवतात इथे?...."
यांसारख्या शब्दांपासून सुरु होऊन खानदानाचा उद्धार सगळ्या वर्गासमोर.
तास बुडवायची तर चुकूनही हिम्मत करायची नाही.
संध्याकाळी बाई घरी बघायला येणारच.
त्यांची मुक्ताफळ आणि घरच्यांचा प्रसाद..
वर्गात ठरवून घोकून घ्यायच्या..
"डॉक्टर झालात... इंजिनियर झालात.. कितीही मोठे व्हा... पाय कायम जमिनीवर ठेवायचे. जमेल त्या मार्गाने देशसेवा करायची. फार काही भव्यदिव्य केलं नाही तरीही चालेल.
काही चूक न करता, गैरमार्गाने न वागता आयुष्य जगणे हीदेखील देशसेवाच.
जमलं तर शिक्षक होऊन बघा..."
शालेय काळात राग यायचा..
"या आजारी कशा पडत नाहीत किंवा कधीच सुट्टी कशी घेत नाही?
जेव्हा पाहावं तेव्हा आहेतच शाळेत. यांच्या घरी कोणी नाही का?.. त्यांना कधीतरी घरी थांबवून ठेवण्यासाठी.."
मुलांच्या डोक्यात विचारांचा गुंता
मग एक दिवस ठरवून मेढेकर बाईंचा पाठलाग.
गावाबाहेरच्या साईडला एका खोलीत बाई राहात.
आलटून पालटून मुलांचा पहारा
"बाई एकट्याच राहतात?
का?
कोणीच कसं नाही बरोबर?"
..........
प्रश्नांचा फुगा सगळ्यांच्या डोक्यात.
वर्गात खुसफूस
बाईंची एवढीशी मिळालेली माहितीही संसर्गजन्य रोगासारखी या कानातून त्या कानाकडे शाळाभर पसरत जायची.
कधीतरी कळलं...
नवरा, मुलगा आणि त्या फिरायला निघालेले
बसचा एक्सीडेंट आणि नवरा व मुलगा जागीच...
बाई एकट्याच राहिल्या
इतक्या हुशार इंजिनियर
नोकरी सोडली..
हाडाची शिक्षिका
शाळा जॉईन केली
आता शाळेतल्या मुलांत स्वतःचा लेक शोधतात...
संस्काराने माणूस घडवायचं तंत्रच न्यारं त्यांचं.
बाईंबद्दलच्या रागाची जागा कणवेनं घेतलेली.
त्या दिवाळीत मुलं फराळाचं घेऊन बाईंच्या घरी पोहोचली.
मुलींनी दारात सुरेख रांगोळी काढली.
मुलांबरोबर बाईंच्या अश्रूंमध्येही दिवाळी झगमगली
शाळेशी जडलेलं मुलांचं आणि बाईंचं नातं आता घट्टंमुट्टं झालेलं...
पूढे जाऊन 11वी सायन्सला ॲडमिशन घेतली की मेढेकर बाईंची आठवण हमखास होणारच.
पाया घट्ट असेल तर कळस कसा डगमगणार?
मेढेकर बाईंची हातोटीच जबरदस्त
बाबांची बदली झाली आणि शाळेशी संपर्क हळूहळू क
मी झाला.
शिक्षण..लग्न.. संसार यामध्ये आमची गाडी जोरदार पळू लागली
जगण्याच्या शर्यतीत मधेच कधीतरी बाई मनात डोकवायच्या...
.......
शाळेतल्या मित्र-मैत्रिणींचं री-युनियन
धमाल धमाल
बाईंची आठवण.. निघणारचं..
कोणीतरी सांगितलं
'आता शाळेत शिकवत नाहीत.
शाळेचं आणि शिक्षणाचं.. बदललेलं रूपडं त्यांच्या मनाला पेललंच नाही.
त्यांच्यातली शिक्षिका घुसमटायला लागली होती.
आता कुठे असतात कोणालाच माहीत नाही. कोणीतरी दूरचे नातेवाईक आले होते मधे एकदा.
घेऊन गेले बरोबर
नंतर नंतर म्हणे परिणामच झाला होता डोक्यावर त्यांच्या.'
सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रूंचा महापूर
मनात बाईंबरोबर घालवलेल्या क्षणांची गर्दी
पुस्तकातलं आणि पुस्तकाच्या बाहेरचं...
जगणं तर त्यांनी शिकवलं होतं.
मुलांमध्ये मूल होऊन जगणाऱ्या
मनानं हळव्या तेवढ्याच शिस्तीने कडक..
अचानक एके दिवशी निलेशचा फोन.. बाईंचा पत्ता मिळाला
त्यांनी घडवलेली आमची पहिली बॅच...
जमतील तेवढे सगळेजण एकत्रच निघालो भेटायला.
शहरापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर जागा.. मोठं आवार असलेली. नैसर्गिक सौंदर्यानं वेढलेली पण एकाकी...
बाईंनीच आकार दिलेला...साकेत जोशी आता मोठं प्रस्थ झालेला..
त्याच्या ओळखीने आत प्रवेश मिळवला.
आता प्रत्यक्ष भेटून बाईंना आश्चर्यचकित करायचं...
आठवेल का त्यांना इतक्या वर्षांनी
कदाचित पहिली बॅच त्या कधीच विसरणार नाहीत...
सगळ्यांच्या मनात चलबिचल
शब्द नव्हते..
पण नजरा एकमेकांशी खूप काही बोलत होत्या...
बरोबर आलेल्या माणसाने कोपऱ्यातल्या खोलीकडे बोट दाखवलं.
"डोक्यावर थोडासा परिणाम झाला आहे त्यांच्या. काही म्हणजे काही आठवत नाही त्यांना"
आमच्या उरात उगाचच धाकधूक.. इतक्या वर्षांनी... इतकं मोठं झाल्यावरही
बाईंची भीती...
दारातून हळूच डोकावलं
हातात छडी घेऊन बाई काहीतरी शिकवत होत्या...
सामान्यांच्या नजरांना न दिसणारं उज्वल भविष्य त्यांच्यासमोर विद्यार्थी होऊन अदृश्य रूपात बसलं होतं.
बाई केमिस्ट्री शिकवत होत्या.
मन गलबललं..
बाईंचे चकाकते डोळे...
त्या शिकवत होत्या आणि आम्ही काळाला रिवाइंड करून पुन्हा एकदा शाळेत रमलो होतो....
*आणि लोकं म्हणत होती बाईंच्या डोक्यावर परिणाम झालाय..
म्हणे त्यांना काही आठवत नाही....
खरंतर काळच त्यांच्यापुरता तिथेच थांबला होता..*
तशीही त्यांची केमिस्ट्री कधीच बदलत्या शैक्षणिक जगताबरोबर जुळली नव्हती....
संस्कारांनी माणूस घडवणाऱ्या हाडाच्या शिक्षिकाच राहिल्या होत्या त्या... कायमसाठी.