माती.....
माती.....


विठ्ठलाचं सुंदर मंदिर होतं त्या गावात.सकाळ संध्याकाळ आरती होत होती. संध्याकाळी कामावरून, शेतावरुन घरी आलं की काहीबाही तोंडांत टाकून आसपासची माणसं देवळात जमायची. भजन कीर्तन रंगायचं. सारे विठुरायाच्या नाम गजरात तल्लीन होऊन जायचे. लोक भाविक होते. अडल्या नडल्या वेळी हाकेला धावून येणारा त्यांचा पाठीराखा होता तो.
मंदिराच्या बाहेर एका टोपलीत मातीचे दिवे विकायला बसायची ती. पाय अधू होते. तिलाही बसल्याजागी हे दिवे विकण्याच काम बरं वाटायचं. लोक ख्यालीखुशाली विचारायचे जाता येता. दिवेही विकत घ्यायचे. मातीचा दिवा... घर, अंगण उजळून टाकायचा. देवापुढे देवळात लावला की मंद उजेड पसरायचा गाभाऱ्यात.
"अगं! आई ग ! पडला की ग" काकी हातातून पडून फुटलेल्या दिव्याकडे बघत म्हणाल्या.
"राहू द्ये काकी. अव देह काय अन् दिवा काय..दोग बी मातीचेच. मातीतच मिसळायचे. घ्या दुसरा घ्या" ती म्हणाली. तसं काकीनं तिच्या तोंडावरून हात फिरवत बोटं मोडली.
"गुणाची ग बाय माझी"
जत्रेचा दिवस होता तो. अनेक जण तिच्याकडून दिवा घेऊन देव दर्शनासाठी जात होते. आपला बोललेला नवस फेडायला. कुणी देवाच्या पायी लीन होत इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करायला जात होते.
लोकांची हीsss झुंबड. पुजार्यांची त्रेधातिरपीट उडत होती.
तिला दिसत होतं लांबूनच...देवाची दानपेटी भरत होती.
"देवा तुझी दानपेटी बी भरू दे, आन माझी चंची बी. घरला जाताना बक्कळ मिळू दे रं. ही तुझी जत्रा फळू दे मला" मनोमन तिनं प्रार्थना केली आणि हात जोडले विठोबाला.
विठ्ठल विठ्ठल ... वातावरण विठ्ठलमय झालं होतं.
दुपारी बाराच्या पूजेनंतर पादुकांची पालखी निघायची. फुलं उधळली जायची. देवाच्या डोक्यावर वाहिलेलं लाल फुल त्यात असायचं. ज्याच्या हाती ते पडेल त्याला मंदिरातर्फै दानपेटीतील काही रक्कम दिली जायची. पैशासाठी नाही पण प्रसादाचं फुल मिळवण्यासाठी लोक आटापिटा करायचे.
दर्शनानंतर जत्रेत हौशे, नवशे, ग
वशे .. सारेच मजा करत होते. कुणी विविध खेळ खेळत होते. पाळणे, जादू.. कितीक खेळ. सारेजण मौजमजेत दंग होऊन गेले होते. काहीबाही खरेदी करत होते.
कसा कोण जाणे पण अचानक एक उधळलेला बैल जत्रेच्या गर्दीत घुसला.जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची पळापळ चालू झाली. लोक सैरावैरा जमेल तिथून वाट काढत धावत होते.
देवळाच्या दाराशी मातीच्या दिव्यांची टोपली घेऊन बसलेल्या तिच्याकडे कोण लक्ष देणार?
बैल तिच्या दिशेने जोरजोरात धावत येत होता. लोक आरडाओरडा करत बाजूला जात होते. तिने डोळे गच्च मिटून घेतले.
'आता बैल आपल्याला तुडवून जाणार'.... काही कळायच्या आत कोणी तरी सावधगिरी बाळगत तिला धरून बाजूला ओढले. बैल मोकाट सुटला होता.
पुढे दूर शिवाराकडे जात असताना त्याला पकडण्यात यश आलं. आता गोंगाट शांत झाला.
लोकही सावरू लागले....
इतक्या पळापळीत जत्रेसाठी म्हणून घातलेले तिचे नवे कपडेही फाटले. खुरडत टोपलीपाशी जाऊन तिने बघितले.
"अरे देवा! हे काय झालं?" तिचे डोळे वाहायला लागले. टोपलीतील दिवे फुटून चक्काचूर झाले होते. सगळा मातीचा रगडा....मातीचे दिवे मातीला मिळाले होते.
फाटलेल्या कपड्याला ठिगळ लावता येईल पण या परिस्थितीला ठिगळ कसं लावणार... त्यासाठी कोण मदत करणार. फुटके दिवे निवडून तिने टोपली बाहेर टाकले.
दिवे घेण्यासाठी जेवढे भांडवल तिने घातले होते त्याच्या अर्धीही रक्कम जमा झाली नव्हती आणि आता तर कितीतरी दिवे फुटून गेले होते. काय विकणार?
देवळाकडे नजर टाकली. देवालयातील दानपेटी भरत चालली होती....
ती डोळ्यात पाणी भरून टोपलीतील रिकाम्या पैशांच्या चंचीकडे आणि माती झालेल्या दिव्यांकडे बघत राहिली....
जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल!!हाsssरी विठ्ठल.....
विठ्ठलाचा नामगजर झाला..
पालखी निघाली... फुलं उधळली गेली.. आणि ते विठ्ठलाच्या डोईवरचं नवसाचं लाल फुल अलगद घरंगळत तिच्या ओटीत येऊन पडलं....