क्लिक.....
क्लिक.....
"चल ना गं आज तरी...
सोडव या मुला- सुनांच्या पसार्यातून स्वत:ला
आजतरी ही संध्याकाळ भरभरून जग
कधीतरी माझ्याबरोबर ही रमून बघ
नेहमीचंच आहे तुझं
सतत पुढचं काम तयार आहेच
नेक्स्ट मिटींगच्या अजेंड्यासारख" त्यानं म्हटलं.
तिलाही जाणवलं..
नव्या नवलाई नंतर हे असे
गुंतून जगण्याचे फारच कमी क्षण आले...
........
कधी नव्हे ते मनावर
प्रेमाची शाल पांघरून
ती सज्ज झाली
त्यांच्यासोबत रम्य संध्याकाळ.. ..
आठवणी...नव्याने जगण्यासाठी
टेकडीवर त्याच्यासह चढताना
क्षणोक्षणी जाणवलं
कुठे हरवून गेली ती हुरहुर.. तरंगत्या मनाची
" अगं उचल की पावलं झपाझप
अंधार पसरला तर चांगले फोटोही येणार नाहीत. का मी होऊ पुढे?"....
अजूनही अबाधित ठेवलंयस तुझं फोटोचं आणि ते दुसर् यांना दाखवत कौतुक मिळवण्याचं वेड....
आजही तुझा आवडता कॅमेरा जपण्यात आणि फोटोसाठी चांगलं लोकेशन शोधण्याच्या नादात हातातला हात निसटतोय .... आताशा मलाही सवय झालीच आहे की....
<p> 'एकट्यानंच चालण्याची'
.................
पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय
घेऊन गेलंय प्रवाहात तुझं " माझं" असणं...
. .......
साजरे करायचे सगळेच क्षण
कॅमेर् यात क्लिक करायचं तुझं वेड..
माझ्याकडे कितीतरी एकाकी क्षण अन्
आसवांचे गरम कढ..
उशीमधे रिझवलेले
तुला वेळच मिळाला नाही कधी
ते अश्रू.. ते तळमळणं "क्लिक" करायला.
आजही रमलायस तू
या संध्याकाळच्या रंगपंचमीला तुझ्या कॅमेर् यात कैद करण्यात
पण खरंच सांगते...
"मावळतीलाही" माझ्यातलं माझं असणं
माझ्या मनातलं तुझं असणं तुला जाणवलंच नाहिये रे.
ते क्लिक करायचं राहूनच गेलंय.
जाणीव ही नाहिये रे तुला.
जे जाणिवांतून निरंतर अनुभवत रहायचं..
जे नेत्रांतून काठोकाठ मनात भरून घ्यायचं..
ज्या सोहळ्याच्या प्रत्येक क्षणाचं साक्षीदार व्हायचं....
त्याला कॅमेर् यात "क्लिक" करायच्या नादात तो जगण्याचंच विसरतोयस तू.
आज ही.......