सलु, भाकरी आणि अनंताचा प्रवास
सलु, भाकरी आणि अनंताचा प्रवास
"वहिनी आजही उशीर झाला तुम्हाला
चला आता पटापट घ्या भाकरी थापायला.
खोळंबलीत सगळी.
पानं घेते मी एकीकडे. म्हणजे गरमागरम वाढता येतील भाकरी पानात."
"हो हो बाई साहेब. तुम्ही नका चिंता करू. मी चालवते हात भराभर.
सुले तू पटापट बाहेर नेऊन दे."
प्रतिभाताई भराभर भाकरी करत होत्या आणि त्यांची ८-९ वर्षांची आईबरोबर आलेली लेक त्या बाहेर नेऊन देत होती.
"मला.. मला हवी पहिली टम्म फुगलेली भाकरी आणि त्यावर लोण्याचा गोळा. " बाहेरून ऋता ओरडली.
"नाही आज माझा नंबर आहे पहिली भाकरी घेण्याचा" राहुल तिच्याशी भांडत म्हणाला.
"हो!हो! भांडू नका रे. आपण पहिली भाकरी अर्धी अर्धी करून दोघांनाही देऊ मग तर झालं."
वनिताबाईंनी मुलांची समजूत काढली आणि वळून म्हणाल्या,
"वहिनी मला नाही जमत हो तुमच्यासारख्या भाकरी. या मुलांना तव्यावरच्या पहिल्या भाकरीचं वेड."
सगळे जेवायला बसले.
पातळ लुसलुशीत गरम गरम भाकरी....
प्रतिभाताई थापत होत्या.. सलु बाहेर नेऊन देत होती...
"सलु ! बघत काय बसलियेस? जा बाहेर जाऊन दे बघू" प्रतिभाताई लेकीला ओरडल्या तशी सलुची हातातल्या गोल गरगरीत टम्म भाकरीवरची नजर बाजूला झाली...
जेवण उरकली
वनिताबाईंनी सकाळच्या राहिलेल्या पोळ्या प्रतिभाताईंना जाताना दिल्या.
घरी आल्यावर त्यांनी त्याच स्टोव्ह वर गरम केल्या आणि जेवायला घेतल्या.
नवरा जाऊन तीन वर्ष झाली...
त्या आणि सलु राहत होत्या.. एकमेकींना सोबत.
आठ दहा घरची स्वयंपाकाची काम करून त्या घर आणि सलुचं शिक्षण करत होत्या.
रोज कोणा ना कोणा घरून काहीबाही उरलेलं मिळायचं त्यावर त्या दोघींचं भागायचं.
"जे मिळेल त्यात समाधान मानावं बाई सलु." परमेश्वराला हात जोडत प्रतिभाताई जेवायला सुरुवात करायच्या.
पण सलुच्या डोक्यात मात्र ती तव्यावरची पहिली टम्म फुगलेली गरम भाकरी घर करून बसली होती...खरंतर त्या मुलांच्यामुळेच ही ओढ जास्त वाढली होती.
काळ पुढे सरकत होता..
यथावकाश सलुही मोठी झाली.
लग्न ठरलं..
सासरी आल्यावर स्वयंपाकाची जबाबदारी तिच्याच अंगावर..
"चव आहे गं हाताला तुझ्या. अगदी आई सारखीच लेक ही अन्नपूर्णा आहे. तुझ्या हातचं
खाल्लं की समाधान वाटत बघ."
सासरच्या कौतुक वर्षावात न्हाऊन निघायची ती आणि मग हौसेने सगळ्यांसाठी काहीबाही सतत करतच राहायची.
तव्यावरच्या तिच्या फुगलेल्या भाकरीसाठी आता तिचा लेक भांडायचा...हट्ट करायचा....
दिवस पुढे जात होते.
काळाच चक्र कोणासाठी थांबलं आहे कधी?
आई गेली..
सलु ही आता सासू झाली होती.
सून नोकरी करणारी...मायाळू.
सासूला जपणारी. तिला हवं नको ते आणून देणारी...
सलुच्या भाकरीवर तिचाही जीव
"मी बाकीचं सगळं करेन पण भाकरी मात्र तुम्हीच करा. मला फार आवडते तुम्ही केलेली गरमागरम भाकरी खायला"
सलुही मग रोज संध्याकाळी अन्नपूर्णेचे हात ल्यायची...नेहमीसारखीच
......
आजारी होती सलु
अगदी अंथरुणावर..
"आता काही फार दिवस राहणार नाहीत त्या.." म्हणत डॉक्टरांनीही घरी पाठवून दिलेलं.
सूनबाईवर सगळा कामाचा व्याप.
मुलांच्या शाळा.. नवरा.. सासरा.. सगळ्यांचं खाणंपिणं सांभाळून ती सलुकडं बघायची.
एके दिवशी सलुची तब्येत फारच खालावली.
"आई काय होतंय ग.
तुला काही हवं असेल.. काही इच्छा असेल तर सांग ना?
तू कधीच आमच्या कोणाकडे काहीच मागितलं नाही गं.
जे मिळेल त्यात समाधान मानत गेलीस..
सांग ना गं?" उशाशी बसत मुलाने आईचं डोकं मांडीवर घेतलं.
पार मुटकुळं झालेलं. खंगलेलं सुलुचं शरीर पाहून त्याला गलबलून आलं.
" एकच इच्छा आहे रे... शेवटची..
आयुष्यात एकदा तरी तव्यावरची टम्म फुगलेली लुसलुशीत गरम ... "पहिली" भाकरी.. त्यावर लोण्याचा गोळा टाकून मला खायची आहे रे."
सुलुचं मन बालपणात पोहोचलं होतं...
आता शेजारी सुनेच्या जागी तिला आई दिसत होती. तिने हलकेच "आईचा" हात दाबला.
डोळे पुसत सूनबाई स्वयंपाकघराकडे वळली.
पीठ भिजवून तवा गॅसवर ठेवला.
त्यावर थापलेली भाकरी टाकली.
गरम फुगलेली भाकरी तिने ताटात वाढली..त्यावर कणीदार तुपाचा गोळा..
दरवळ घरभर पसरला..
सलुने तो परिचित हवाहवासा वास मनभरून आत घेतला...
सूनबाई ताट घेऊन बाहेर आली..
पण त्या वासाला श्वासात साठवून ठेवत सलु कधीच अनंताच्या प्रवासाला निघाली होती...
तव्यावरची पहिली भाकरी तिच्यासाठी स्वप्नच राहिली....