धनु कोष्ठक - १५
धनु कोष्ठक - १५
लेखक: सिर्गेइ नोसव ; भाषांतर: आ, चारुमति रामदास
03.34
साइड टेबलवर, रिकाम्या ‘मग’च्या शेजारी नोटबुक ठेवून कपितोनव बिछान्यावर पडतो आणि डोक्यावरचा लैम्प ‘ऑफ’ करतो.
03.35
आणि त्यानंतर? – त्याची स्वतःलाच विचारायची इच्छा होते (आणि खरोखरंच कपितोनव स्वतःला विचारतो).
पण पुढे काय झालं, ह्याबद्दल उत्सुकता कां असावी, जेव्हां जास्त जरूरी आहे हा प्रश्न : हे खरोखरंच झालं होतं कां?
कपितोनव छताकडे बघतो.
पहिली गोष्ट, शैली. जितपत कपितोनवला आठवतं, मूखिनची भाषा साधारण मानवीय भाषा होती, चक्क ‘मानवीय’ भाषा आणि जरासुद्धां ‘मानवांसारखी’ नाही. कपितोनवने कदाचित मूखिनचे लिहिलेले काही लेख वाचले होते, जसं की, उदाहरणार्थ, इतरांसारखाच मूखिनपण इंटरनेटच्या सोशल साइट्सवर बरांच लोकप्रिय होता, पण, जर कपितोनवला ते लेख आठवंत नाहीये, तर हे ह्या गोष्टीचं प्रमाण आहे की त्यांच्यात काहीही अतिशयोक्ति नव्हती.
ही गोष्ट मान्य करता येईल, की मूखिनने एखाद्या साहित्यिक-फैण्टेसीची कल्पना केली असेल – प्रथम पुरुषांत, कां नाही? – पण, मग त्यांत आपल्या जीवनातील वास्तविक घटना खुपसायची, वास्तविक नाव प्रकट करण्याची काय गरज होती? आपल्या वैयक्तिक जीवनाला अशा विचित्र आणि अवास्तविक रूपांत दाखवायची काय गरंज होती? त्यांत कपितोनवला खेचण्याची काय गरंज होती, तेसुद्धां उपहासात्मक संदर्भात? कपितोनवने त्याचं काय घोडं मारलं होतं?
आणि, सगळ्यांत प्रमुख गोष्ट “कां” : त्याने नोटबुकमधेच कां लिहिलं – हाताने? मरीना बरोबर म्हणते – हेच सगळं कम्प्यूटरवर लिहिणं कित्ती सोपं झालं असतं!
हैण्डराइटिंगची गोष्टतर सोडूनंच द्या. त्याने काय कुठे शुद्ध आणि सुलेखनाचा कोर्स केला होता?
तसंही, कुठेसुद्धां शाईचा एकही डाग न सांडता लिहिलं आहे.
आणि तसं पण, हे सगळं लिहिलं कशासाठी आहे? मूखिनने कागदावर हा काय फालतूपणा लिहिला आहे? कशासाठी? कुणासाठी? काय स्वतःसाठी?
कपितोनवच्या डोक्यांत दोनंच प्रकारचे उत्तरं येतात:
-एक तर मूखिनची गाडी रुळावरून घसरली होती;
- किंवा ...त्याला खरंच प्रतिस्थापित केलेलं होतं.
जर त्याला प्रतिस्थापित केलं गेलं असतं, तर सगळं ठीक झालं असतं: हे मूखिनने लिहिलंय, त्या मूखिनने बिल्कुल नाही, ज्याला कपितोनव ओळखत होता.
पण मग तेव्हां स्वरूपसुद्धां विषय-वस्तुच्या अनुरूप असतं. दुसरा माणूस – त्याला काहीही विचारू शकंत नाही.
कपितोनव बाथरूममधे जातो, शॉवर घेतो, दात ब्रश करतो, आणि शेव करूं लागतो ( लवकरंच सकाळ होण्यांत आहे – आत्ताच कां न उरकून घ्यावं?) हे सगळं करताना कपितोनव सतत मूखिनबद्दलच विचार करतो आहे.
तो विचार करतोय की उत्तराच्या दोन्हीं विकल्पांमधे जास्त अंतर नाहीये. मूखिन, नक्कीच रुळावरून घसरला होता. आणि रुळावरून घसरलेला मूखिन – हा, नक्कीच, दुसरा मूखिन होता. म्हणूं शकतो, की दुसरं व्यक्तित्व.
कपितोनवला आशा आहे, की झोप लागेल. लागोपाठ झोप न झाल्यामुळे तीन तासांची झोपसुद्धां उपहारासारखीच वाटेल. पण, त्याला ब्रेकफास्टला पण फाटा द्यायचा नव्हता. त्याने मोबाइलवर 7.30चा अलार्म लावला.
पण आता किती वाजलेयत?
4.07
तो पडतो. डोळे बंद करतो आणि अचानक बघतो की खूप सारे धनु-कोष्ठक डोकावतांत आहेत.
त्याने पुन्हां छताकडे एकटक बघितलं – बाहेरून येणा-या लाइटने प्रकाशित झालेल्या खिडकीच्या अंधुकश्या प्रतिबिंबावर. की, हे बाहेरून प्रकाशित होत असलेल्या खिडकीचं प्रतिबिम्ब कपितोनवकडे टक लावून बघंत होतं?
तसा खिडकीचा पडदा छतावर पडंत असलेल्या चौकोनाला विझवतो आहे, पण तरीही तो वास्तविक खिडकीच्यामागे पडंत असलेल्या बर्फाला प्रतिबिंबित होण्यापासून थांबवंत नाहीये. बर्फ तुटक-तुटक ठिपक्यांच्या रूपांत चौकोनाच्या एका बाजूकडून दुस-या बाजूकडे घसरतो आहे – खिडकी लगतच्या भिंतीकडून दाराच्या भिंतीपर्यंत. कपितोनव नजर नाही काढंत. छतावरचा चौकोन दुस-या आयामांत उघडंत असलेल्या टेक्निकल ‘हैच’ सारखा वाटतोय, ज्यांत डावीकडून उजवीकडे सावल्या चालताहेत. अचानक असं वाटलं, की ह्या सावल्या नाही, तर त्यांच्या सापेक्ष खुद्द ‘हैच’च चालतंय – खोलीबरोबर – उजवीकडून डावीकडे. आणि त्या स्थिर आहेत. आणि त्याला असं वाटलं की पाठीवर झोपलेला कपितोनवसुद्धां पलंग आणि खोलीबरोबर, फिरतो आहे, उजवीकडून डावीकडे, आणि सावल्या स्थिर ठिपक्यांच्या रूपांत, अश्याप्रकारे झपाट्याने फरपटंत आहेत, जसं टेक-ऑफ़ करंत असलेल्या विमानाच्या उघड्या ‘हैच’मधे रेतीवर असलेले स्थिर खडे. असा विचार करतानासुद्धा भीति वाटते, की तुम्हीं कसे ह्या ‘हैच’मधे तोंडावर पडताहात, आणि तिथेच राहून जाता, अचल अवकाशांत, अचल सावल्यांच्यामधे, हे माहीत असूनही की मागचा ‘हैच’ कुठे डावीकडे सरकलांय, रिकाम्या झालेल्या खोलीबरोबर आणि तुमच्या सम्पूर्ण विश्वाबरोबर, ज्याचा, आधीसारखीच, ही खोली एक अंश आहे, पण तुम्हीं आता नाहीये. पलंगाचा कोपरा धरायचीही इच्छा झाली, ज्याने, जर अचानक आकर्षण-शक्ति प्रकट झाली, तर त्यापासून वेगळा नाही होणार आणि छतावरच्या अंधुक ‘हैच’मधे नाही पडणार. पण तो तसं नाही करंत, फक्त डोळे मिटून घेतो.
धनु-कोष्ठक पुन्हां प्रकट झाले. तेव्हां तो स्वतःला असं समजावंत शांत करण्याचा प्रयत्न करतो, की हे त्याचे वैयक्तिक नाहींत, तर मूखिनचे फालतू नोट्समधले आहेत. असंच आहे – कोष्ठक किंचित एकीकडे झुकलेले आहेत, जी हाताने लिहिलेल्या मजकुराची विशेषता आहे. तो ठरवतो, की त्यांचाशी उपभोक्त्यासारखा वागेल आणि तो त्यांना मोजणं सुरू करतो, जणु ते हत्ती असावेत. एक कोष्ठक, दोन कोष्ठक, तीन कोष्ठक...अकरा कोष्ठक...नैचुरल सिक्वेन्स – गणिताच्या दृष्टीने खूप गणना, त्यांना ‘फिबोना-सिक्वेन्स’26मधे ठेवणं जास्त चांगल राहील कां? समस्या ही आहे, की धनु-कोष्ठक हत्ती नाहीत, आणि ते अप्रत्याशितपणे प्रकट होतात, कधी एकटे, कधी जोडीने, आणि समजंत राहा की कोण कुठे बघतंय. त्यांच्या अनधिकृत अवतरणापासून सुटका करून घेण्यासाठी तो उपभोग्य पदार्थाच्या रूपांत त्यांचा उपयोग करायचा विचार करतो आणि एक गणितीय फॉर्मूल्यावर विचार करू लागतो. पण ह्याच्यासाठी आधी गोल आणि मग वर्गाकार कोष्ठकांना ठेवावं लागेल. ते, जे वर्गाकार कोष्ठकांमधे आहे, त्यांत आरामांत एकाचा अंक जोडतो आणि हे सगळं क्रमवार पद्धतीने सोडवण्याचा निर्णय घेतो...सगळं त्याच वर्गांत – ह्याप्रकारे धनु-कोष्ठकांची पहिली जोडी संपली. त्याने पुन्हां एकाचा अंक जोडला आणि धनु-कोष्ठकांची दुसरी जोडी संपवून, ही सगळी सामग्री तिस-या पायरीवर आणतो. त्यानंतर, एक जोडल्यावर धनु-कोष्ठकांच्या पुढच्या जोडीला संपवतो, हे सगळं चौथ्या पायरीवर आणतो. पाय-यांच्या वाढत्या क्रमाबरोबरंच त्याच्या डोक्यांत धनु-कोष्ठकांची गर्दी होऊं लागते. आता तो हत्यांसारख्या पाय-या मोजू लागतो, ज्यांच्यावर धनु-कोष्ठकांच्या आत जखडलेलं ठेवलं जातंय. झोप येतंच नाहीये. मग त्याला पुन्हां आठवतं की हे त्याचे नसून परके कोष्ठक आहेत, आणि तो मूखिनबद्दल विचार करंत राहतो. मूखिनबद्दल विचार न करण्यासाठी तो डाव्या कुशीवर वळतो.
तो ऐकतो, की कसं घड्याळासारखं
05.15
उशीला टेकलेल्या डाव्या कानशीलांत, रक्त टिक्-टिक् करतंय.
रक्त, रक्त, रक्त, रक्त.
रक्त – रक्ताचा ग्रुप (ब्लड-ग्रुप) आणि Rh.
तेव्हां त्याला तिचा ब्लड-ग्रुप माहीत नव्हता.
मूखिनने फालतूचंच लिहिलंय. कोणीही बुडंत नव्हतं, नदीत नाही, आणि समुद्रांतही नाही, असं काहीही त्याप्रकारे झालेलं नव्हतं. दुस-याच प्रकाराने झालं होतं.
फुटका काच होता, प्लेटफॉर्म होता आणि सहा वर्षाच्या अन्यूताचं रक्त होतं. आणि डॉक्टर्स होते. तिच्या ग्रुपचं ब्लड मागवायचं होतं. वेळ बिल्कुल नव्हता, एक मिनिटसुद्धां नाही. टेलिफोन होता, भाच्याचा नंबर होता शेवटच्या दोन अंकांशिवाय. त्याने नंबर दाबला – शेवटचे दोन अंक अंदाजाने दाबले. आश्चर्यच झालं – नंबर लागला. पण तसं नाही : आधी त्याला एक अंक दाबायचा होता, मग दुसरा, पण दाबला तिसराच – आणि बरोबर दाबला. “वान्या, नीना आण्टीला बोलाव, ती जवळंच आहे? लगेच.” (नीनाचा फोन त्या दिवशी हरवला होता.) “नीना, ह्यावेळेस काहीही विचारू नकोस, अन्यूताचा ब्लड-ग्रुप आणि Rh सांग”. तिने लगेच स्पष्ट सांगितलं : “दुसरा, प्लस”.
कपितोनवला आता काहीही आठवंत नाही, की त्यानंतर काय झालं होतं, आणि हेसुद्धां नीट आठवंत नाहीये की त्याच्या आधी काय झालं होतं. पण तो फोन-कॉल त्याला न केवळ चांगलाच लक्षांत आहे, तर तो त्याच्या स्वामित्वांत आहे, जणु तो एखादी वस्तु असावा – एखादी ठोस वस्तु – जसं त्या ‘बीच’वर लागलेल्या कंकालासारख्या उपकरणाच्या दुहेरी हुका सारखा, ज्याचे पंख वा-याबरोबर खाली-वर होतात.
कपितोनवला तो अंक लक्षांत आहे, पण तो त्याच्याबद्दल विचार नाहीसुद्धां करूं शकंत. ही त्या तीन दुहेरी अंकाच्या संख्येमधील एक संख्या आहे, जिच्याबद्दल कुणीही विचार नाही करंत. त्याला माहीत आहे, की ह्याबद्द्ल विचार करण्यास मनाई आहे.
त्याच्याजवळ ह्याबद्दल विचार न करण्याची योग्यता आहे.
वाट्टेल त्या बद्दल विचार करा, पण कोण्या दुस-या वस्तुबद्दल विचार करा (आदर्श परिस्थितीत कशाबद्दलंच नाही), आणि हे ‘दुसरं” त्याला दिसतं एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या गुणाच्या स्वरूपांत – कधी जंगली उंदीर, तर कधी निकोल मैरी किडमैन, तर कधी एखाद्या घराच्या दर्शनीय भागावर बनलेलं शिल्प, तर कधी विनाशाचा सिद्धांत.
त्याला खात्री आहे, की कोणच्यातरी दुस-या वस्तुबद्दल विचार करतोय आणि हे, की जागाच आहे, झोपलेला नाहीये, आणि फक्त झोपायची इच्छा आहे, पण झोपेसारखी कोणचीतरी वस्तु येते तर खरं – सकाळी-सकाळी. तरीही त्याला कळतंय, की हे स्वप्न नाहीये, कारण की झोपला नाहीये, आणि, जेव्हां मोबाइलचा अलार्म वाजूं लागतो,
07.30
तेव्हां थकव्याने चूर-चूर झालेला, दुःखाने डोळे उघडतो, की उगीचंच बिछान्यांत पडून राहिला. पण ते, स्वप्नासारखं, विसरता नाही आलं, जसं की त्यांच्याबरोबर, स्वप्नांबरोबर (त्यांच्याबरोबर आणि आमच्याहीबरोबर) होतं, आणि ह्याच्या विरुद्ध, लक्षांत राहतं. आणि आठवण होते फक्त संक्षिप्त रूपांत. आणि जर ते आहे, तर तेसुद्धां स्वप्नासारखं – स्वप्नंच होतं. कदाचित, स्वप्न, थोड्याच वेळासाठी होतं, पण तरीही स्वप्न तर होतंच.
अलार्म बंद करून, कपितोनव बिछान्यांतच राहिला – स्वप्नाचा सारांश पुनर्जीवित करावा लागेल.
07.31
जंगली उंदीर. कपितोनवच्या बालपणातला. पिंजरा, त्यांत लाकडाचा भूसा, पाण्याचे भांडे, खाण्याची वाटी आणि चिमुकलं घर.
विशेष म्हणजे – रक्ताबद्दल नाही, फुटक्या काचेबद्दलही नाही...
चिमुकलं घर, प्लास्टिकचा क्यूब आहे, मीठाच्या बरणीपेक्षाही लहान. एक भोक, गोल – आत जायला आणि बाहेर यायला. साइज – मोठा आलुबुखारा जाऊ शकतो, पण कोंबडीचा अंडा – मुश्किलीनेच जाईल. जंगली उंदीर अरुंद जागेंत राहाणंच पसंद करतो – बाहेरून खेचंत-खेचंत लाकडाचे चिप्स घरांत आणतो, पूर्ण घर त्याने भरून टाकतो. आत येण्याचं दार लाकडाच्या चिपने बंद झालं. खरं सांगायचं तर हे अजूनपर्यंत स्वप्न नव्हतं, पण स्वप्नाची सुरुवात होती. सगळ्या गोष्टींकडे बघतां असंच वाटतंय. स्वप्नंचतर आहे हे. जर झोप आहे तर.
कपितोनव बोटाने लाकडाची चिप बाहेर काढतो आहे, पण उंदीर माघार घ्यायला तयार नाहीये, पण तो कसा नाही हरणार? कपितोनवचं बोट चिपपर्यंत पोहोचतं. बघतो की तिला पुन्हां खेचलंय. तो तिला पुन्हां बोटाने बाहेर काढतो. बघतो, पुन्हां परंत. पुन्हां बोटाने, पुन्हां.
हे स्वप्न नसूपण शकतं, फक्त एखादी आठवण असेल (लहानपणी एकदा असं झालं होतं ; तो जंगली उंदराच्या घरातून लाकडाची चिप काढंत होता), बस, आता एक मुलगा नाही, तर मोठा माणूस – पूर्ण शुद्धीत चिप बाहेर काढतोय.
डॉक्टर फ्रायड सगळ्यांत मोट्ठा मूर्ख ठरला असता जर तो जंगली उंदराच्या पाठोपाठ लगेच कपितोनवच्या डोक्यांत आला नसता. जंगली उंदराची आठवण काढंत कपितोनव स्वतःला विचारतो : ह्यांत कुठे सुप्त समलैंगिकतातर नाहीये? स्वतःच उत्तरसुद्धां देऊन टाकतो की असं नाहीये. तसं सांगायचं तर, त्याचं हे मत आहे, की सुप्त समलैंगिकतेचा आविष्कार वास्तविक लोकांनी केला होता, सुप्त लोकांने नाही, पण ह्या आकलनातही सुप्त समलैंगिकता तर नाहीये? जर काही लोकांचं म्हणणं ऐकलं, तर ती सगळीकडे आहे, डॉन जुऑनमधे तर ती खूपंच जास्त आहे...आणि, मूखिन ह्या नोटबुकमधे कपितोनवबद्दल जे असामान्य आकर्षण दाखवतो आहे, कुठे त्यातही सुप्त समलैंगिकता तर नाहीये? आणि, जे ‘तलाव’ने कपितोनवला कॉन्फ्रेन्सला आमंत्रित केलं, कुठे त्यामागेसुद्धां सुप्त समलैंगिकता तर नाहीये? आणि, तसंही, कॉन्फ्रेन्समधे महिला इतक्या कमी कां आहेत?
उठला आणि कपडे घातले. सकाळचे कार्यक्रम, जसे पाठ्य पुस्तकांत “My Morning” ह्या धड्यांत असतात. ‘शेव’ करावीशी वाटते, पण आश्चर्याने लक्षांत येतं की, कदाचित, आधीच केली आहे, - तेव्हांच हेपण लक्षांत आलं की तीन-चार तासांपूर्वी ‘शेव’ करून झाली आहे.
आणि, काय सु...
पण चेह-यावर पाणी मारून ह्या विचाराला दूर करतो. आह, ह्याने त्याला उत्साही नाही वाटलं.
स्वतःला तुटका-फुटका (‘शेव’ केलेला) अनुभव करंत, झोप न झालेला (पण ‘शेव’ केलेला) कपितोनव आपलं घरटं सोडून ब्रेकफास्टसाठी निघतो.
08.06
लिफ्टने खाली जातानासुद्धा तो नोटबुकबद्दलंच विचार करतोय. सगळ्यांत कठीण प्रश्न : ती त्याला कां दिली होती? कोणच्या उद्देश्याने?
कैफेच्या प्रवेश द्वारावर उभी असलेली ड्यूटी-गर्ल आपल्या लिस्टमधे खरंच आलेल्या लोकांच्या नावांवर खूण करंत होती.
“प्लीज़ – तुमच्या खोलीचा नंबर.”
“32” – आपल्यांच विचारांत गुंग कपितोनव यंत्रवत् विचार करतो.
“माफ करा, तुम्हीं आपला नंबर नाही सांगितला.”
“32,” कपितोनव शुद्धीवर आला.
