वृक्ष-एक सखा
वृक्ष-एक सखा
लहानपणी पाहिलेलं झाड
आजही जेव्हा मी पाहतो
मनात पुन्हा फुटते पालवी
भावनांचा मोहोर बहरून येतो
त्या पर्णावरती रोज पहाटे
जेव्हा सूर्यकिरणे विसावती
वृक्षाच्या त्या सुंदरतेत मग
तीही अमर भूपाळी गाती
जेव्हाही मी थकलो भागलो
तुझ्याच छायेत आलो
तव गंधाळणाऱ्या वाऱ्यासव
कधी तुझाच होऊन गेलो
पक्षी परतती घरट्यांमध्ये
चोचीत घेऊनी दाणा
पिल्लांसंगे निजती सारे
जणू मायेचा नजराणा
परि रजनीची चाहूल लागे
तरु लागले निजू
वसुंधरेचा गुरु मानूनी
सदैव त्याला भजू
झाड म्हणजे मानवासाठी
लाभ आणि फायदे
पण आपण त्यांसाठी करतो काय
फक्त वायदे आणि कायदे
वृक्षारोपण करुनी आम्ही
झाडांचे महत्व सांगू
परि समतोल राखण्या वसुंधरेचा
झाडे लावू , झाडे जगवू
वृक्ष म्हणजे सखा आपुला
वृक्ष म्हणजेच बंधू
वृक्षसंवर्धनाचा वसा घेउनी
सारे आनंदाने नांदू
