माणुसकीचा मृत्यू
माणुसकीचा मृत्यू


सांगशील का रे मानवा
काय होता माझा गुन्हा
भुकेने व्याकूळ झाली मी
आटला होता माझा पान्हा
अन्नासाठी इकडे तिकडे
वणवण मी केली
मुखी काही लागले नाही
म्हणूनी गावापाशी आली
काहींना माझी दया आली
तेव्हा फार हायसे वाटले
अननसामध्ये फटाके भरून
का त्यांनीच माझे मुख भाजले?
नदीमध्ये मुख घालून
विव्हळत मी फार होते
पोटामधले बाळ इवलेसे
आतल्या आत रडत होते
काय सांगू त्या बाळा मी
कसा असतो मानव
मानव म्हणजे,मूखवट्यामागे लपलेला
एक क्रूर विखारी दानव
बाळही माझे गेले मानवा
मीही आता जाईन
तुझे हे कृष्णकृत्य पाहून
'बाप्पाही' रडवेला होईल
सर्वांत बुद्धिमान प्राणी तू
या पृथ्वीतलावरचा
तरीही का असा वागशी
षंढ असल्यासारखा
हीच का तुझी मनोवृत्ती,
हीच का तुझी मानवता
किती स्वार्थ बाळगशील
जरा दाखव भूतदया,
जरा दाखव भूतदया.