उन्हाळा...
उन्हाळा...
भल्या पहाटे ऐकून जाग आली ते कोकिळेचे गान
सूर्यराज पूर्वेस येऊन उजळले अंगण
उन्हाळ्याचे करी स्वागत आनंदले मन
मौजमजेचा हा बालगोपाळांचा जणू सण!!१!!
झाडाझुडपांना फुटली कोवळी पालवी
लाल पायघड्या घाली गुलमोहर तो लाघवी
रंगपंचमी रंग उधळत आली चेतना नवी
गार गार हवा वाटते हवी हवी!!२!
हिरवेगार कलिंगड खुणवी हळूच लाली
आंबा ,चिंच मिटकावत बालगोपाल ही आली
खाण्या कुल्फी ,बर्फाचा गोळा मजाच ती आली
जांभळे ,रानमेवा खाण्या जमा सारी झाली!!३!!
सैर करू त्या डोंगर अन् कपारी
आमराई ,वृक्षराजी बघू ,करू जंगल सफारी
फणस, काजू ,कोकमाची ती मजाच न्यारी
आई आमरस, पुरणपोळीचा बेत करी!!४!!
ऋतुराज बदले घडी ही कालचक्राची
तहानली ही धरती, वाट पाही जलाची
शेतकरी राजा करुनी मशागत शेतीची
वाट पाही वर्षाराणीच्या आगमनाची!!५!!
