मला वाटते परत फिरावे
मला वाटते परत फिरावे
हिरवळ, गंधित ओली माती
कसे बालपण मी विसरावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे
एक सदनिका विकत घेतली
तेच वाटते अमाप वैभव
वाडा, अंगण कसे कळावे?
खुराड्यातले ज्यांचे शैशव
अंगणातल्या प्राजक्ताच्या
गंधाला श्वासात भरावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे
खिडक्या दारांना पडदे अन्
आडपडदेही मनात नव्हते
सार्यांसाठी गर्द सावली
कुठलेही घर उन्हात नव्हाते
टीव्हीवरच्या मालिकांतले
मुळीच नव्हते कधी दुरावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे
लुगडे घेता वहिनीसाठी
नणंद त्याची घडी मोडते
चापुन चोपुन नेसुन होता
सर्वांच्या ती पाया पडते
विभक्त इथल्या कुटुंबात हे
दृष्य कधी अन् कसे दिसावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे
लेक सासरी जाण्या निघता
रंक असो वा रावाची ती
आईबाबांची नावापुरती
लेक खरे तर गावाची ती
आभाळमाया इथे पाहिली
प्रेम किती अन् कसे करावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे
खेड्यामधल्या तरुणाईला
भुरळ घालती शहरी वारे
नसे संस्कृती, विकृतीच ही
लुभावणारे मृगजळ सारे
थांबव देवा श्वास अता तू
काय कारणे जगी उरावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे
