माझी माय...
माझी माय...
देवघरातल्या ज्योती सम तेवणारी ज्योत
माया ममता वात्सल्याचा खळखळता स्त्रोत
संस्काराची शिदोरी बांधून करते रुजवात
दरवेळी माय मला नव्यानेच उमगली!!१!!
आजारी मी खूप असताना
माय आठवते उशाशी माझ्या जागताना
दिसता मला तिच्या नेत्री माझ्या वेदना
दरवेळी माय मला नव्यानेच उमगली!!२!!
वळ पाठी येईस्तोवर मला शिक्षा करताना
शिक्षणात मला पुढेपुढे नेताना
साम दाम दंडाने मला आकार देताना
दरवेळी माय मला नव्यानेच उमगली!!३!!
तारुण्यात झालेल्या माझ्या नव्या प्रवासात
दोघी मधला प्रेमळ संवाद रूप बदलतो मैत्रीत
देई धडे ,नवीन शिकवे या फसव्या दुनियेत
दरवेळी माय मला नव्यानेच उमगली!!४!!
संसाराची करता सुरुवात बहरता मळा
मायेचा देऊन सवे वानोळा
आठवणी कंठी दाटे उमाळा
दरवेळी माय मला नव्यानेच उमगली!!५!!
आईपण जेव्हा लाभे, आई मला तेव्हा कळे
आनंदे आई संसाराची बघून फळे
पूर्णत्वास येई आईपण सगळे
दरवेळी माय मला नव्यानेच उमगली!!६!!
असे तिचे माझे आईपण झाले साकार
माय माझी जीवनाचा आधार
अनंत तिचे उपकार ,करते तिला नमस्कार
दरवेळी माय मला नव्यानेच उमगली!!७!!
