उघडा संसार
उघडा संसार
( चित्रकाव्य अष्टाक्षरी )
।। उघडा संसार ।।
थंडी गुलाबी वाऱ्यात
कसा संसार थाटला
घेई झाडाचा आसरा
माया पाझर आटला ।।
गोड गोजिरी लेकरे
उभ्या थंडीत काकडे
पोट व्याकूळ भुकेने
खाण्यासाठी तडफडे ।।
नाही अंगात स्वेटर
नसे दुलईची उब
कुत्र्या परी ते जीवन
नसे जगण्याला आब ।।
तीन विटाची रे चूल
येथे कोठे काटवट
सुटे बेभान वादळ
वारा वाहतो मोकाट ।।
आग भुकेल्या पोटाला
नसे भाजीची रे आस
मिठ भाकरीचा मिळो
आम्हा पोटा दोन घास ।।
