सुंदर माझा संसार
सुंदर माझा संसार


सुंदर माझा संसार , छोटं घर दार
सुखी माझा परिवार , गोविंद गोविंद ।।
सासू आणि सासरा , देर हा तिसरा
कुटूंबाला आसरा , गोविंद गोविंद ।।
रामाच्या पहारी , कोंबडा देई बाग
बाई मला आली जाग , गोविंद गोविंद ।।
अंधारल्या रातीला , तांबडं फुटलं
बाई वसूदेव भेटलं , गोविंद गोविंद ।।
दळण काढीते सुपात , वर्ण घाली जात्यात
पीठा येई बरकत , गोविंद गोविंद ।।
घर घर आवाजात , जातं माझं घुमतं
ओव्या गाऊ कौतूकात , गोविंद गोविंद ।।
सासू माझी अडाणी , गाते गोड गाणी
तुळशीला घाली पाणी , गोविंद गोविंद ।।
सासू आणि ननंद , घरा मध्ये आनंद
भजनात होई दंग , गोविंद गोविंद ।।
घर माझं मंदिर , दिसे बहू सुंदर
नित्य वारी पंढरपूर , गोविंद गोविंद ।।
उठा गं सयांनो , करा सडा रांगोळी
ओवी गात सकाळी , गोविंद गोविंद ।।