सत्य धर्म
सत्य धर्म
शेतकऱ्यांचा आसूड
महात्मा फुल्यांचा
विसरले नेते शेतकरी
उगा कळवळा त्यांचा ॥ १ ॥
आंदोलने घडती अशी
मालाचा रस्त्यावर सडा
मेटाकुटीला येतो पोशिंदा
यांचा तो नुसताच राडा ॥ २ ॥
शिक्षणाचा वसा घ्या
आयुष्यभर सांगितले
गावात जेवढी शाळा
तेवढंच पोराला शिकवले ॥३॥
मुलींच्या शिक्षणासाठी
पत्निला शिकवले
शेण, दगड, गरम पाणी
त्यांनीही हसत झेलले ॥ ४ ॥
आज मात्र गर्भातच
मुलीला नष्ट करतात
समज येण्या आधीच
गेटकीन लग्न उरकतात ॥ ५ ॥
रूढी, परंपरा आणि धर्म
केला साऱ्यावर प्रहार
अनुयायी फक्त घालती
आज प्रतिमेस हार ॥ ६ ॥
वाटत असेल जर
पडतात कमी कर्म
पुन्हा करा स्विकार
असा तोच सत्य धर्म ॥ ७ ॥