सखी जरा थांब
सखी जरा थांब
किती करशील धावपळ
नि किती करशील काम...
क्षणभर जरा घे उसंत...
अगं सखी जरा थांब...||
मुलेबाळे, पाहुणे नि सण..
माहितीये गं सारेच पहावे लागते..
नोकरी नि घर सांभाळताना
पुरती तारांबळ उडून जाते...
इतके कष्ट करून देखील
त्याला कवडीमोलच दाम...
क्षणभर जरा घे उसंत...
अगं सखी जरा थांब... ||
कपाटातील सुंदर ड्रेस
बघ कधीचा तुला खुणावतोय..
हा थंडगार भरारा वारा
सखे तुला साद घालतोय...
साज शृंगार करून जरा
फेरफटका मारून ये लांब...
क्षणभर जरा घे उसंत...
अगं सखी जरा थांब... ||
इतरांच्या आवडीनिवडी
अगदी मनापासून जपतेस...
p>
वडीलधारे, आले गेले
सगळ्यांचेच आनंदाने करतेस..
स्वतःच्या इच्छा नि स्वप्नांना
मात्र कायमच मारतेस लगाम...
क्षणभर जरा घे उसंत..
अगं सखी जरा थांब... ||
अजुनही वेळ गेली नाही...
थोडी स्वतः साठी जग...
मैत्रीणी, छंद नि गप्पा गाणी
यात मन रमवून बघ...
आयुष्य संपल्यावर
खंत करून काही उपयोग आहे का सांग..
क्षणभर जरा घे उसंत..
अगं सखी जरा थांब... ||
एक मात्र सखे तू
मनाशी नक्कीच ठरव...
मुलगा नि मुलगी दोघांनाही
तू घरातील कामे शिकव...
खरी स्त्री पुरुष समानता
मग काही असणार नाही लांब...
क्षणभर जरा घे उसंत
अगं सखी जरा थांब...