बिलोरी पाऊस
बिलोरी पाऊस
मेघ अंबरी दाटले
वारा सुसाट सुटला
त्याची लागता चाहूल
जीव माझा हरपला
तप्त धरा शांत झाली
येता पावसाची सर
दूर जाहली काहिली
आनंदले चराचर
नभांगणी सप्तरंगी
इंद्रधनू प्रकटले
रूप सृष्टीचे पाहुनी
मन माझे आनंदले
झेलू थेंबांना टपोऱ्या
चिंब भिजू पावसात
वेचू गारा टपटप
भाव अल्लड मनात
शालू हिरवा नेसली
नववधू ही अवनी
काळ्या मातीचा सुगंध
गंधाळला त्रिभुवनी
गर्द हिरव्या रानात
मोर आनंदे नाचती
चिंब भिजूनिया पोरे
गाती नाचती डोलती
बळीराजा सुखावला
आनंदाश्रू नयनांत
पीक येईल जोमाने
जैसे मोती कणसांत
असा पाऊस बिलोरी
देई सुख थोर बाळा
मला बहु आवडतो
असा रम्य पावसाळा