छोटीशी परी...
छोटीशी परी...


मला अजूनही आठवतो तो दिवस सोनेरी|
जेव्हा आमच्या घरी आली एक छोटुकली परी||
इवलेसे होते हात आणि छोटीशी होती बोटं|
लहानगेसे पाऊल आणि होते नाजूकसे ओठं||
पाहता रूप गोजिरे किती सांगू झाला हर्ष|
अजूनही स्मरे मजला तिचा मऊ मखमली स्पर्श||
ठेवण्यासाठी नाव साजिरे जमली मंडळी सारी|
आजी, आजोबा साऱ्यांनाच होता उत्साह भारी||
माझे बोट धरून तिने टाकले पहिले पाऊल...
आमच्या घरी घेऊन आली ती चिरंतन सुखाची चाहूल...||
तिचे बोबडे बोबडे बोल वाटे ऐकतच राहावे|
सुंदर अशा बाललीला डोळे भरूनी पाहावे...
माझे लहान पिल्लू हळूहळू मोठे होऊ लागले...
तिचे खेळ, नटणे नि गप्पा यात सारे घर रमले...
तिची शाळा, अभ्यास, छंद आणि तिच्या आवडीनिवडी...
तीच आमचे जग आणि तीच संसारातील गोडी...
बघता बघता कळलेच नाही कशी वर्षे सरली...
माझी छोटीशी परी आता काॅलेजात जाऊ लागली...
सुरवंटाचे आता रंगबेरंगी फुलपाखरू झाले...
तिला पाहून मीही माझ्या गुलाबी आठवणीत रमले...
तिच्या नटण्या-मुरडण्याने माझा जीव मोहून गेला...
तिच्या रुपात रोजच घरी श्रावण सजू लागला...
काॅलेजची वर्षे कशी भूर्रकन उडून गेली...
मेहनतीच्या बळावर तिने चांगली नोकरी मिळवली...
एके दिवशी तिला तिचा स्वप्नातील राजकुमार भेटला..
थाटामाटात तिचा विवाह सोहळा संपन्न झाला...
आता नाही तिचे निखळ हास्य नि नाहीत गप्पा-गाणी...
आता फक्त आम्ही दोघे नि दोघांच्या डोळ्यामधले पाणी...