माय मराठी माझी
माय मराठी माझी
मधुर लाघवी रसाळ सोपी माय मराठी माझी
सुगम सरल अन् आशयघन ही माय मराठी माझी
सालंकृत ही शृंगाराने अलौकिक हिची रत्ने
अनमोल हिच्या रूप गुणांची किती रचू मी कवने
विशाल अनुपम ग्रंथ संपदा हिची वाढवी शोभा
उत्तुंग अशा त्या हिमालयाहुन भव्य हिचा हो गाभा
ज्ञानेशाने वीट रोवली ग्रंथ निर्मिला पहिला
थोर कवी अन् लेखक यांनी जतन वारसा केला
कुसुमाग्रज बी अन् पु. ल. गदिमा संपत नाही नावे
प्राशन करुनी ज्ञानामृत ते धन्य होऊनि जावे
>
सुनीत कविता गझल लावणी हिचीच सारी अंगे
ललित कथा अन् विनोद नाटक रंगू यांच्या संगे
भारुड गौळण भजन कीर्तने, अभंग आणिक ओवी
गोंधळ आर्या पोवाड्याची किती थोरवी गावी
वेगवेगळ्या प्रांतांमधल्या नानाविध बहु बोली
कधी गोड तर कधी रांगडी हिची अनोखी शैली
बेळगाव अन् कोकणातली मधाळ बोली न्यारी
मराठवाडा कोल्हापुरचा ठसका असतो भारी
समृद्ध अशा भाषेचे या पाइक होऊ सारे
मनामनाच्या अंगणातही तिचेच वाहो वारे