पाऊस आला
पाऊस आला
सोसाट्याचा वारा सुटला मेघ दाटले
तप्त धरेला वरुणाचे मग वेध लागले
सूर्य घाबरत शामल रंगी ढगात लपला
गरजत बरसत टपटप रिमझिम पाऊस आला
आकाशी बघ प्रखर विजांचे चालू नर्तन
मृद्गंधाच्या वासाने मोहरले तन मन
ग्रीष्म ऋतूची तप्त काहिली विरून गेली
उनाड वारा पावसासवे गट्टी जमली
तृणपानांवर दवबिंदूची सुरेख नक्षी
पाखरांकडे उडत निघाले वेगे पक्षी
हिरव्या रानी थुईथुई सुंदर मोर नाचतो
चिंब चिंब बघ बालचमूंचा मेळा भिजतो
हिरवा शालू लेवून धरती वधू भासते
रूप पाहूनी सृष्टीचे मन गाली हसते
थेंब टपोरे झेलू पटपट गारा खाऊ
हासू खेळू मुक्त बागडू नाचू गाऊ
बळीराजाच्या आनंदाला सीमा नाही
वाऱ्यावरती डूलतील पिके दिशास दाही
आनंदाने झोळी भरतो सर्व जनांची
म्हणूनच सारे वाट पाहती पर्जन्याची