शारदीय चांदणे
शारदीय चांदणे
मंद मंद सरींसोबत
वेध लागले परतीचे
थेंब मोत्यांनीही टिपला
येता नक्षत्र स्वातीचे...१
घेतली विश्रांती मेघांनी
स्वच्छ झाले वातावरण
हवा झाली गुलाबी जरा
ऋतू राजाचे आगमन...२
नववधूसम सुंदर
ऋतू उल्हासित भासतो
लख्ख पसरले चांदणे
गारवा हवेत वाढतो..३
शरद रात्र मूतीमंत
सडा दारात प्राजक्ताचा
संमिश्र गंध आसमंती
जाई -जुई कूंद कळ्यांचा...४
चित्र रंगीत गालिच्यांची
निसर्गाच्या पटलावर
नितळ पाण्यात प्रतिमा
जणू स्वर्गच धरेवर...५
लखलखत्या चंद्रासवे
चांदणमोती आकाशात
धुंद गुलाबी रात्र झाली
न्हाऊनी शुभ्र प्रकाशात...६
असे शरदाचे चांदणे
वेड सर्वांनाच लाविते
निरभ्र चंदेरी प्रकाश
स्वप्न झुला झुलविते...७
