मैत्री तुझी माझी
मैत्री तुझी माझी
शाळा आहे बंद जरी
नसे मैत्रीला बंधन
चिंता सारी सोडूनिया
जगु मुक्त बालपण....१
गर्द हिरव्या रानात
पशू पक्ष्यांच्या संगती
चल जाऊ सवंगड्या
गप्पा आपुल्या रंगती....२
बसू एकांत ठिकाणी
तार जुळे हृदयाची
घेऊ वाटून दुःखाला
वाट धरून सुखाची...३
साथ असावी नेहमी
सुख दुःखाच्या क्षणात
सखा तूच जीवलग
नसे दुजा जीवनात....४
मुक्त अशा नभांगणी
मुखी हास्य झळकले
गोड बोलाने मित्राच्या
दुःख सारे विसरले....५
मित्र असावा असाच
भाव नसावा स्वार्थाचा
मित्रा तुझ्या संगतीने
अर्थ यावा जगण्याचा...६
मैत्री तुझी माझी अशी
राग लोभ नसे मनी
हात हातात असावा
तुझा सदैव जीवनी....७
