आठवणीतील शाळा
आठवणीतील शाळा
सांगा सांगा कुणीतरी
कधी उघडेल शाळा
घरी मला बसण्याचा
आता आलाय कंटाळा.. १
पाटी दप्तर घेऊन
आलो करुन तयारी
गाडी शाळेला नेईन
वाट बघतोय दारी.. २
खेळ खेळण्या मैदान
खुणावतो काळा फळा
मित्र येतील शाळेत
रंगे गप्पांचा सोहळा.. ३
शाळेतील माझ्या बाई
हाक प्रेमाने देतील
पाढे कविता म्हणता
मला जवळ घेतील.. ४
खोड्या करता थोड्याशा
रट्टा गुरुजी देतील
देता उत्तर प्रश्नाचे
लाड माझे करतील.. ५
आठवूनी सा-या गोष्टी
वाटे स्वप्नातली शाळा
कधी बोलेल मायेने
यावे शाळेमध्ये बाळा... ६
शिक्षणाची वाताहत
आता तरी हो थांबावी
आठवणीतील शाळा
प्रत्यक्षात उतरावी... ७
